महिन्याच्या वाणसामानाची यादी करताना आपल्याला लक्षात येतं की बटर संपलेलं आहे. तेव्हा कोणतं बटर घ्यावं हा प्रश्न मनात यायच्या आधी उत्तर तयार असतं. ते म्हणजे अमूल बटर. आज वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सची बटर बाजारात उपलब्ध आहेत. पण आजही आपण सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोक अमूल बटर घेणंच पसंत करतो. अमूल बटर म्हणलं की आणखी एक गोष्ट आठवते ती म्हणजे निळ्या केसांची, पोल्का डॉट्सचा ड्रेस घातलेली अमूलची ‘अटरली बटरली डीलीशस गर्ल मला वाटतं पार्ले-जी बिस्किट्सच्या पॅकेट वर असलेल्या बाळाच्या चित्रानंतर लोकांच्या मनात आपली विशेष जागा निर्माण करणारी
दुसरी आहे ती ही अमूलची ‘अटरली बटरली डीलीशस गर्ल.
सांगायचा मुद्दा हा की या अमूल गर्ल चे जनक अल्कायझर सिल्वेस्टर डाकुन्हा नुकेतच पडद्याआड गेले. ते 80 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी निशा आणि मुलगा राहुल डाकुन्हा असा परिवार आहे. तो देखील जाहिरात क्षेत्रात कार्यरत आहे. जाहिरात क्षेत्रातील प्रसिद्ध व्यतिमत्व कै गार्सन डाकुन्हा यांचे ते बंधू होते. अल्कायझर यांनी 1966 साली ‘अमूल गर्लची निर्मिती केली होती.
1966 साली एका जाहिरात कंपनीचे व्यस्थापकीय संचालक सिल्वेस्टर डाकहूना आणि त्यांचा कला दिग्दर्शक युस्टेस फर्नांडिस यांनी मिळून ‘अमूल गर्लची निर्मिती केली. जी आज आपल्याला अमूल बटरच्या पॅकेट वर दिसते. 2016 मध्ये तिला 50 वर्ष पूर्ण झाली. त्यानंतर तिची ख्याती जगभर पसरली.
ही ‘अमूल गर्लजशी बटरच्या पॅकेट वर आपल्याला दिसते. तशीच ती आपल्याला वर्तमानपत्रातून सुद्धा भेटते. जगभरातील असंख्य व्यक्तींची फिरकी घेताना, किंवा एखादा चांगला संदेश जर समाजापर्यंत पोचवायचा असेल तर ते काम ‘अमूल गर्ल करते. थोडक्यात चालू घडामोडींवर भाष्य करण्यापासून ते महान व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्याचे काम सुद्धा ‘अमूल गर्ल करते.
डॉ. वर्गीस कुरियन यांच्या सोबतच डाकुन्हा यांनी 1966 साली अमूलच्या जाहिरातीची सुरुवात केली होती. आणि ही एकमेव जाहिरात सर्वात जास्त काळ सुरु होती. ही एकमेव अशी जाहिरात होती जी कोणत्याही माध्यमापुरती मर्यादित न राहता काळानुरूप बदलत गेली. अगदी वर्तमानपत्रापासून ते आजकालच्या डिजिटल मीडिया माध्यमांपर्यंत सगळीकडे अमूलचा बोलबाला दिसून येतो.
