भा. ल. महाबळ
‘‘ए टवळे, हिंिडबे, चहा आण.’’ नरेंद्र ओरडला.
‘‘आणते, आलेच.’’ नेहानं विसरतेपणी सरळ उत्तर दिलं.
‘‘नेहा, तुला वरणभातातील, मनूवादी भाषेत बोलायचं असेल तर मला तुझा चहा नको, तो मोरीत ओतून दे. असं पिचपिचीत बोलत राहिलीस तर खिडक्यांच्या काचांवर हजारो रुपये, पुढील वर्षांत खर्चावे लागतील. पैशाचं एक सोड, पण आपल्या भावी बाळाचा विचार कर. तोही स्वच्छ, सरळ, मनूवादी भाषा बोलेल. त्याचा या जगात काय निभाव लागेल?’’
‘‘सॉरी, मी विसरले. ए मुडद्या, चहा प्यायचा असेल तर घे, नाहीतर उलथ. उकिरडा फुंक्या मेला!’’ नेहानं चहाचा कप टेबलावर मुद्दाम हलवला.
‘‘अगं उंडगे, चहा तीन थेंब सांडला की!’’ चहाचे पैसे तुझा बाप भरून देणार आहे का?’’
‘‘माझ्या बापाचं नाव काढशील तर तुटक्या सॅडलनं हाणीन. सिगरेटफुंक्या, तंबाकूथुंक्या, बेवड्या, मी पण नोकरी करते. ब्लॉकचे कर्जाचे हप्ते मीच भरते, पुढील वीस वर्षे मीच भरणार आहे, तुझा बाप नाही.’’
नरेंद्रनं दाद दिली, ‘‘नेहा, तुला छान जमतंय्!’’ सिगारेट, पान, दारु यापासून मी दूर आहे, तरीही तू खोटे आरोप केलेस! असंच धडाकून बोलायचं.’’
नेहानं प्रेमानं नरेंद्रचा हात कुरवाळला.
कामवाल्या रुक्मिणीबाई आश्चर्यानं बोलणं ऐकत होत्या. परवापरवापर्यंत, परस्पराशी प्रेमानं व आदरानं बोलणारं हे नवं जोडपं असं शिवीगाळीवर का उतरलं आहे? वयाचा आधार घेऊन, आपण कामवाल्याबाईनं यांना शहाणपण शिकवावं का?
मनाचा धीर करून, एका रविवारी, रूक्मिणीर्बाइंनी विचारलं, ‘‘अलिकडं तुमी येकमेकाशी शिवीगाळीचं का बोलता?’’ असं वंगाळ बोलू नये ह्ये नवं खूळ तुमी का काडलंय्? तुमच्या घरला काम करताना मला झ्याक वाटायचं, आजकाल मनाला ग्वाड वाटत न्हाई.’’
नरेंद्र म्हणाला, ‘‘आम्ही शिव्या देण्याचा सराव का करतोय, ते सांगतो.’’ रुक्मिणीबाई, खिडक्यांच्या सहा काचा बसवायचा खर्च किती आला?
सोळाशे रुपये,’’
‘‘होय, तुमच्या गैरहजेरीत, तुम्ही सांगितल्यापरमानं, ते काम मीच करवून घेतलं व्हतं. ब्लॉकच्या चाव्यांचा एक सेट माझ्याकडंच असतोय्.’’
‘‘बाई, आमच्या निवारा टॉवरसमोरच्या रस्त्यावरून, ‘अखिल भारतीय आमचंच खरं’ या पार्टीचा मोर्चा निघाला होता. आठवतं?’’
‘‘आठवतं, पण पार्टीचं नाव होतं. एबीएके पार्टी.’’
‘‘अखिल भारतीय आमचंच खरं हे त्या पार्टीचं मराठीतील नाव, इंग्रजी नाव एबीएके पार्टी.’’ नेहानं माहिती दिली.
‘‘पार्टी लबाड आहे. त्या मोर्चात माझा नवरा व्हता. दिवसाचे सातशे रुपये ठरले हुते, पण चारशेच दिलं. च्या, जेवन दिलं, त्येचं तीनशे कापून घेतलं.’’ रुक्मिणीबाई म्हणाल्या.
‘‘मोर्चातील लोकानी आपल्या टॉवरवर दगडफेक केली. आपला ब्लॉक रस्त्याच्या बाजूला व दुसऱ्याच मजल्यावर आहे. त्यामुळं आपल्या खिडक्या दगडांच्या टप्प्यात आल्या.’’ नेहा म्हणाली.
‘‘रुक्मिणीबाई, आपल्या टॉवरवर दगड का फेकले हे माहीत आहे?’’
‘‘न्हाई बा.’’
‘‘कारण आम्ही मनूवादी आहोत.’’ नेहा म्हणाली.
‘‘मोर्चा काढणारे हे नेहमी पुरोगामी, देशावर प्रेम करणारे, कष्ट करणारे, अन्याय सहन करणारे असतात आणि जे मोर्चात सामील नसतात व जे बँकेकडून कर्ज काढून ब्लॉकमध्ये राहतात ते सारे देशद्रोही, गरिबांना पिळणारे, थोडक्यात मनूवादी असतात. मनूवाद्यांच्या घरांवर दगडफेक करण्याचा मोर्चवाल्याना हक्कच आहे असं मोर्चेवाले समजतात.’’ नरेद्रनं खुलासा केला.
‘‘छ्या! छ्या! तुम्ही दोघं झ्याक मानसं हायसा. तुमी माज्यावर पयल्या भेटीत इस्वास टाकला, घराच्या किल्ल्या मला दिल्यात. तुमी दोगं आफिसला जाता, रविवारीच काय त्ये मला भेटता. तुम्ही मनूवादी न्हाई!’’
‘‘दगडफेक का थांबली हे तुम्हांला माहीत आहे का?’’
‘‘न्हाई.’’
‘‘आमच्या टॉवरच्या तळमजल्यावरच्या हॉटेलातील, दुकानांतील कामगार बाहेर पडले व त्यांनी, ‘मादरचोद, भँचोद, भडवां अशा शिव्यांचे निखारे तोंडातून उडवले, रस्त्याच्या कडेचे पेव्हरब्लॉक फेकायला आरंभ केला. ‘इक्बाल, महमूद, जॉन, रंगा, मुथ्यू, उबलता, हुआ तेल लेके आवो, मोर्चेवाले के उपर फेकेंगे, साले, हमे मनूवादी कहते है’ ’’ असा ओरडा हॉटेलकामगारांनी चालू ठेवला. मोर्चावाले तातडीनं पुढं सरकले. शिव्यांचा वर्षाव करणारे व उकळंत तेल अंगावर टाकण्याची तयारी दाखवणारे मनूवादी असूच शकणार नाहीत याची एबीएके पार्टीच्या मोर्चेवाल्यांना खात्री पटली असणार!’’ नरेंद्रनं सविस्तर माहिती दिली.
‘‘नरेंद्र म्हणतो की आपण मनूवादी रहायचं नाही. आपण शिवीगाळ आपल्या रक्तात उतरवायची. काचा फोडणं, अंगावर उकळतं तेल टाकणं ही कामं काही आपल्याला या व पुढच्या जन्मांतही जमणार नाहीत, शिव्याचं जमवूं.’’ नेहा म्हणाली.
‘‘रुक्मिणीबाई, फुटणाऱ्या काचांचे सोळाशे रुपये देणं आम्हांला कसं परवडेल?’’ हा ब्लॉक विकत घेण्यासाठी बँकेकडून कर्ज काढलं आहे. नेहाचा पगार वीस वर्षं कर्जफेडीत जाणार. माझ्या पगारात घर चालवायचं, अधूनमधून आम्हाला दोघांच्याही आईवडिलांना पैसे पाठवावे लागतात. नेहा तिच्यार् आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. आम्ही शिव्या शिकू व काचा वाचवू.’’
‘‘मोर्चातील मानसं वंगाळ वागली म्हनून तुमीबी गुंड व्हनार?’’ गुंड व्हायाचा इच्चार सोडा, मानूस म्हणूनच जगा.’’ रुक्मिणीबाई पुटपुटल्या…….. सव्वा वर्ष उलटलं नरेंद्र व नेहा यांच्या वाचेवर, हावभावावर गुंड-गिरीचे बऱ्यापैकी संस्कार झाले होते. दर रविवारी, रुक्मिणीर्बाइंना दोघांची प्रगती ऐकायला मिळत होती. आणखी एक प्रगतीची, आनंदाची घटना घडली. नेहा व नरेंद्र आईबाप झाले. घरी छान बाळ जन्माला आलं, मात्र बाळात एक वैगुण्य उपजतच होतं. बाळाच्या मुठी वळलेल्या होत्या. डॉक्टरीणबाई थक्क झाल्या. असं मुठी वळलेलं बाळ प्रसूतिगृहात प्रथमच जन्माला आलं होतं! जरा प्रयत्न केला की मूठ उघडता येत असे; पण डॉक्टरीणर्बाइंनी आपला हात काढून घेतला की उघडलेली मूठ फटकन बंद व्हायची! दोन स्पेशॅलिस्ट डॉक्टर तपासण्या करून गेले. डॉक्टरांनी किरकोळ जोर लावला की मूठ उघडे, हात पूर्ण उघडत, दहाच्या दहा बोटं पसरत. पण उघडे पंजे ही हातांची नैसर्गिक स्थिती नव्हती.
नरेंद्र व नेहा वाकडे चेहरे करून बसले.
रुक्मिणीबाई म्हणाल्या, ‘‘माजं आयका. बाळाच्या मुठी उगडतील, बोटं पसरतील, धा बोटं हवेत नाचतील! पन त्याकरता तुम्ही सुदरा, शिव्या देनं बंद करा. आईच्या प्वाटात असताना, बाळानं शिव्यांची भाशा आयकली; गुंडांचा मोटेपणा आयकला. खिडक्यांच्या काचा फुडल्या तर फुटल्या, त्या नव्या बसवता येतील! तुमी तुमची मनं इटाळलीत, त्यामुळं गुंड मनाचं, मुठी वळवनारं बाळ तुमच्या प्वाटी आलं. माजं आयका, तुम्ही सरळ बोला, वंगाळ बोलू नगा. तुकोबांचे अभंग म्हना, बाळाच्या कानावर स्वच्च, सरळ शब्द पडू लागले की त्याचंही मन शुद्ध- होईल, मुठीचा मुटका मोकळा व्हईल.’’
नरेंद्र व नेहा यांनी माणूस होण्याचा चंग बांधला. भाषेत गोडवा भरला, शिवीगाळ पूर्णपणे वर्ज्य केली, तुकोबा जिभेवर बसवले. आणि काय? या घरगुती उपायानं, बाळाची मूठ सहा महिन्यात, हळू हळू पूर्ण उघडली. उघडलेली मूठ उघडीच राहिली व दहा बोटं हवेत नाचू लागली.
‘‘बाई, तुम्ही पगारवाढ घ्या. तुम्हांला पाहिजे तेवढी घ्या. तुम्ही आम्हांला व बाळाला माणूस बनवलंत.’’ नेहा म्हणाली.
ङ्ग‘मला नगो पगारवाढ. बाळाची मूठ उगाडली, यातच मला पगारवाढ भेटली. मूठ वळवून प्रश्न सुटनार न्हाईत, खुल्या हातानी, पंढरपूरला जानाऱ्या वारकऱ्या परमानं, शुद्द मनानं, मिठी घाला, मानूस व्हा, प्रश्न निरमानच हुनार न्हाईत.’’
