एका प्रसिद्ध सौंदर्य प्रसाधनाच्या जाहिरातीने ‘त्या’ मुलीचं करिअर घडवलं. बाकी चित्रपट, वेबसिरीज तर काय ती आता आता करायला लागली. आजही आपण ती जाहिरात फार आवडीने पाहतो. लग्नाळू मुलं ‘आपली बायको तिच्यासारखीच हवी’ ही अपेक्षा करतात. तर मुली तिच्यासारखं ‘दिसण्यासाठी’ आकाश पाताळ एक करतात. अहो पण आपल्या एक गोष्ट लक्षात येतच नाही. मुळात देवाने तिला रूपच तसं देऊन पाठवलंय. त्याला ती तरी काय करणार… आणि त्यात टीव्हीवरचे स्पेशल इफेक्ट्स असतातच.
त्यामुळे ‘पी हळद आणि हो गोरी’ अशातला प्रकार आपल्याला वाटतो. पण तो खरच तसा असतो का?
आज आपण याच विषयी जाणून घेणार आहोत.
भारतात वापरल्या जाणाऱ्या बहुतांश सौंदर्य प्रसाधनांमध्ये प्लास्टिक आणि हानिकारक सूक्ष्म कण असतात. जे त्वचेसोबत पर्यावरणाला हानिकारक असतात. समुद्री जीवांसाठी तर जास्त हानिकारक असतात असे एका अहवालात म्हटले आहे. हे मायक्रो बीड्स ५ मिमी पेक्षा कमी आकाराचे असतात. जे डोळ्यांना दिसू शकत नाहीत. हे सौंदर्य प्रसाधनांमध्ये त्वचेचा चिकटपणा घालवण्यासाठी, त्वचा उजळ बनवण्यासाठी वापरले जातात. डर्टी क्लिंजरच्या अंतर्गत दिल्लीमधील एका सेवाभावी संस्थेने केलेल्या ३५ सौंदर्य प्रसाधनांच्या चाचणीमध्ये १९ फेस वॉश, ७ फेशियल स्क्रब, ९ बॉडी वॉश तपासण्यात आले. ३५ पैकी २० प्रसाधनात पॉलिमर सापडले.

चाचणी केलेल्या सर्व प्रकारच्या PCCP’s मध्ये सर्वात जास्त मायक्रो प्लास्टिक बीड्स ‘न्यूट्रेजेना डीप क्लीन स्क्रब’ यात तब्बल १७,२५० मायक्रो बीड्स प्रति २० ग्रामच्या नमुन्यात आढळले. त्यानंतर VLCC नॅचरल सायन्सेस रोज स्क्रब फेस वॉशमध्ये ५,५१० बीड्स प्रति २० ग्राममध्ये तर फियामा शॉवर जेलमध्ये ४७२७ मायक्रो बीड्स आढळले. टॉक्झिक लिंक एन्व्हायरोमेंटल रिसर्च आणि एडवोकसी संस्थेने केलेल्या अभ्यासात हे सिद्ध झाले आहे.
एकूण संख्येच्या ७०% स्क्रब्समध्ये ५५% बॉडी वॉशमध्ये आणि २१% फेस वॉशमध्ये मायक्रोबिड्स आढळले आहेत. संशोधनासाठी ३५ नमुन्यांपैकी प्रत्येकातले २० ग्राम नमुने घेण्यात आले होते. आणि FITR प्लास्टिक पार्टिकल्सचे प्रमाण शोधण्यासाठी वापरले गेले.
इतक्या मोठ्या ब्रँड असलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये मायक्रोबीड्स सापडले ही खरतर धक्कादायक गोष्ट आहे. या प्रसिद्ध सौंदर्य प्रसाधनांच्या कंपन्यांनी बाहेरच्या देशातील त्यांच्या उत्पादनात मायक्रो बीड्स वापरणे बंद केले आहे. पण भारतात मात्र ते सर्रास वापरले जातात. कारण त्यांच्या वापरावर बंदी नाही.

मायक्रो बीड्समुळे पर्यावरणाचं होणार नुकसान हा आजच्याघडीला सर्वात नाजूक आणि चिंतेचा विषय आहे. या अभ्यासानुसार या प्रसाधनात जे मायक्रो बीड्स सापडले त्याचे प्रमाण ३२.५५ ते १३०.९२ एवढ्या प्रमाणात होते. हे बीड्स वापरल्यानंतर ड्रेनेज सिस्टिममध्ये सोडले जातात. ते वाहत वाहत सांडपाणी प्रक्रिया केंद्रात येतात. तिथून ते समुद्री जीवांच्या शरीरात जाऊ शकतात.
एकदा मायक्रो बीड्स फेकून दिले की ते परत मिळवण्याचा कोणताही मार्ग नाही. आणि त्यांचे विघटन होत नसल्यामुळे ते पर्यावरणात तसेच राहतात. हे मायक्रो बीड्स माणसाने तयार केलेल्या कचऱ्यासारखे आहेत. ज्यामुळे जलचरांचे जीवन धोक्यात येण्याची शक्यता आहे. ही चाचणी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी गोवा इथे करण्यात आली.
आपण सतत जागरूक राहून सौंदर्यप्रसाधनं खरेदी करायला हवी. खरतर खरेदीच नाही केलीत तर उत्तम. पण त्याचबरोबर ही प्रसाधनं विकत देताना उत्पादकांची सुद्धा ही जबाबदारी आहे की त्यात वापरल्या गेलेल्या घटकांची योग्य ती माहिती त्यांनी द्यायला हवी. आणि पर्यावरणपूरक असे पर्याय शोधायला हवेत. खरं सांगायचं तर माणसाने त्वचेच्या किंवा शरीराच्या सुंदरतेवर प्रेम करण्यापेक्षा मनाच्या सौंदर्यावर प्रेम करायला शिकलं पाहिजे.
