मध्यंतरी द वायर मध्ये मेटाच्या संस्थापकांबद्दल काही आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आला होता. त्यावरून दिल्ली पोलिसांनी द वायरच्या संपादकांचा आणि पत्रकारांचा छळ केल्याचे उघडकीस आले आहे. हा छळवणूकीचा प्रकार ताबडतोब थांबवा अशी विनंती वृत्तपत्राच्या संपादकांनी आणि पत्रकारांनी पोलिसांना केली आहे. इतकेच नव्हे तर द वायर च्या कर्मचाऱ्यांच्या घरात घुसून झडती घेण्यात आल्याचे कळते.
द वायरच्या संपादकांविरुद्ध दिल्ली पोलिसांकडे पहिली तक्रार भाजपचे आयटी सेलचे प्रमुख श्री अमित मालवीय आणि फौंडेशन ऑफ इंडिपेंडंट जर्नालिझम यांनी केली. द वायरने सुद्धा एका टेक एक्स्पर्टच्या विरोधात त्याने आमची दिशाभूल केली अशी तक्रार केली आहे.
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने द वायर च्या मुख्य संपादक श्री सिद्धार्थ वरदराजन , एम के वेणू आणि श्री सिद्धार्थ भाटिया उपसंपादक जान्हवी सेन, प्रॉडक्ट आणि व्यवसाय विभाग प्रमुख श्री मिथुन किदांबी यांच्या घरांची झडती घेऊन छापे मारले. CrPc कलम ९१ अंतर्गत कारवाई करताना गुन्हे अन्वेषण शाखेने द वायरच्या दिल्ली कार्यालयातील सर्व उपकरणे कोणतीही कल्पना न देता ताब्यात घेतली.

EGI च्या मते दिल्ली पोलिसांनी ज्याप्रकारे द वायरच्या वरिष्ठ पत्रकारांच्या घरात आणि कार्यालयात शोधमोहीम केली तो प्रकार अस्वस्थ करून सोडणारा आहे. EGI ने पोलिसांना उलटतपासणी करताना नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. जेणेकरून कोणत्याही संवेदनशील विषयाची माहिती फुटणार नाही.
पोलिसांनी इतक्या जलद गतीने कारवाई केली की कोणालाही सावरायला वेळ मिळाला नाही. श्री मालवीय यांनी मेटा संबंधित द वायर मध्ये छापून आलेल्या वृत्ताबद्दल तक्रार केली. त्यात असे म्हणले होते की X चेक या कार्यक्रमाअंतर्गत भाजप चे आयटी सेल प्रमुख श्री मालवीय यांना संशयित पोस्ट काढून टाकण्याचे विशेष अधिकार दिले आहेत. पण चौकशी अंती असे लक्षात आले की मेटाबाबत आणि मालवीय यांच्याबाबत छापलेल्या वृत्ताबद्दल कोणताही सबळ पुरावा नव्हता. त्यामुळे द वायर ने ते वृत्त काढून टाकले आहे. आणि वाचकांची माफी मागितली आहे.
पीसीआय सह दिल्ली युनियन ऑफ जर्नालिस्ट प्रेस असोसिएशन, वर्किंग न्युज कॅमेरामन असोसिएशन भारतीय पत्रकार संघटना, KUWJ यांनी सुद्धा द वायर च्या कार्यालयावर आणि कर्मचाऱ्यांच्या घरावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाई बाबत वक्तव्य केले आहे.
मुंबई प्रेस च्या मते मेटा बाबत चुकून छापलेल्या वृत्ताबाबत जेव्हा द वायरच्या संपादकांनी आणि पत्रकारांनी वाचकांची माफी मागितली तेव्हाच खरतर हे प्रकरण संपायला हवे होते. पण श्री मालवीय यांनी द वायरच्या संपादक आणि पत्रकारांविरोधात एफ आय आर दाखल केला. त्यामुळे प्रकरण आणखी चिघळले.

मुंबई प्रेस क्लब ने द वायरला अंतर्गत सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचा सल्ला दिला आहे. प्रेस क्लबच्या मते पत्रकारितेसारख्या क्षेत्राला सध्याच्या काळात ज्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे त्यांना सुद्धा कमी लेखून चालणार नाही. त्यामुळे आम्ही सर्व पत्रकार समुदायाला द वायरच्या पाठीशी खंबीर पणे उभं राहायचं आव्हान करत आहोत. जेणेकरून या प्रकरणाचा निकाल वायरच्या बाजूने लागेल आणि कोणाकडूनही हे प्रकरण दाबलं जाणार नाही.
या छापेमारीचा विरोध करताना बियुजे चे प्रतिनिधी म्हणतात की या गोष्टीबाबत द वायर ला संपूर्णपणे दोषी ठरवता येणार नाही. अलीकडच्या काळात काही प्रकरणात मीडियाने कितीतरी गोष्टी चुकीच्या दाखवल्या आहेत. जसे की नोटांमधल्या नकली चिप्स बद्दलचे वृत्त असेल किंवा कोविड रुग्णांचे जे आकडे दाखवले गेले त्यातले किती खरे होते ते तपासून पाहण्याची गरज आहे. मीडियाच्या असल्या अतिरेकामुळे खरी बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही.
ऑनलाईन पोर्टल वर ज्या बातम्या प्रसारित केल्या जातात त्यांची सत्यता पडताळून पाहायला हवी. तसेच बातमी छापताना जी कागदपत्रे त्यासोबत दिली गेली ती सुद्धा खरी होती की खोटी हे सुद्धा तपासून पाहायला हवे. द वायरच्या संपादकांकडून ज्या काही चुका झाल्या त्या व्हायला नको होत्या. हे खरे आहे. पण त्या कोणीही जाणूनबुजून केल्या नव्हत्या हेही तितकेच खरे आहे.

PUCL ने केलेल्या निवेदनात म्हणले आहे की दिल्ली पोलिसांनी आता हा छळ थांबवावा आणि जी उपकरणे वायर च्या कार्यालयातून, कर्मचाऱ्यांच्या घरातून जप्त केली होती. ती त्यांची त्यांना परत करावीत.
पोर्टल वरच्या ज्या बातम्यांवरून तक्रारी केल्या गेल्या त्या बातम्या पोर्टल वरून केव्हाच काढून टाकल्याचे माहित असून सुद्धा पोलिसांनी ही कारवाई केली. इथेच संशयाला वाव आहे. तसेच कोणत्याही राजकीय घडामोडींबद्दल किंवा संवेदनशील विषयाबाबत चुकीची बातमी छापल्यास परिणाम वाईट होतील. अशी भीती द वायरच्या संपादकांच्या आणि पत्रकारांच्या मनात निर्माण करण्यासाठी हा सगळा खटाटोप केला होता. असे PUCL चे जनरल सेक्रेटरी डॉ व्ही सुरेश यांना वाटते.