श्री. प. प. टेंब्ये स्वामी महाराज

swami-maharaj

श्री दत्तसंप्रदयामध्ये श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामींचे कर्तृत्व व स्थान मोठे आहे.श्री दत्तात्रेयांचा प्रथम अवतार श्री श्रीपाद श्रीवल्लभ होय व द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती होय.

श्री नृसिंह सरस्वतींच्या पादुका नृसिंहवाडी व गाणगापूरला आहेत.ही स्थाने फार प्रसिध्द आहेत.श्री दत्त संप्रदायामध्ये या स्थानांना फार महत्त्व आहे.

श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मगांव पीठापूरम (आंध्रप्रदेश) व कर्मभूमी कुरवपूर (कर्नाटक) ही स्थाने श्री. प. प. टेंब्ये स्वामीमहाराजांनी शोधून प्रसिध्दीस आणली.तसेच श्रीपाद श्रीवल्लभांनी सांगितलेला ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा’ हा महामंत्र पुनरूज्जीवित केला.तसेच श्री नृसिंह सरस्वती जन्मस्थान लाड कारंजा, (जि. वाशिम) हे ही त्यांनी शोधून प्रसिध्दीस आणले.

संपूर्ण भारत वर्षांत पायी प्रवास करून श्री दत्तसंप्रदायातील वरील सर्व स्थाने व अन्य महत्वाच्या श्री दत्त स्थानांमधील नित्यक्रम रचना सुरू करून दिली. इंग्रजांच्या काळांत धर्म संस्थापनेचे कार्य श्री टेंब्ये स्वामींनी केले.

श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांनी विपुल ग्रंथ संपदा तयार केली.प्राधान्याने संन्यासानंतर चार्तुमास काळात ग्रंथसंपदा,स्तोत्रे स्वामी महाराजांकडून लिहिली गेली.

श्री दत्त संप्रदायाचा आधारभूत ग्रंथ श्री गुरूचरित्राच्या ग्रंथात साडेसात हजार ओव्या आहेत.  एवढा मोठा ग्रंथ फक्त दोन हजार ओव्यामध्ये संस्कृत भाषेंत याच श्री क्षेत्री माणगांव येथे पूर्वाश्रमांत लिहिला. या ग्रंथाला द्विसाहस्त्री गुरुचरित्र असे म्हणतात. या द्विसाहस्त्री ग्रंथाचे तेलगूमध्ये फारपूर्वीच भाषांतर झाले असून त्यांची नियमित पारायणे आंध्र प्रदेशमध्ये होतात. स्वत: जवळ मूळ ग्रंथ नसताना या द्विसाहस्त्री ग्रंथातील प्रत्येक श्लोकावर संस्कृतमध्येच टिका (विवरण) प्रभास व द्वारका येथे इ.सन १८९९ साली लिहिली. इ.सन १९०२ मध्ये ब्रह्मावर्त येथे श्री गुरू संहिता म्हणजेच समश्लोकी म्हणजे गुरूचरित्रातील श्लोकांचे संस्कृतमध्ये भाषांतर केले. हे सर्व मोठे ग्रंथ तयार झाले असल्याने व श्रीगुरूचरित्र सर्वांनाच वाचता येणार नसल्याने समाजातील सर्व लोकांना कमी वेळात पारायण करता यावे म्हणून सात हजार ओव्यांत असलेला ग्रंथ १/१० एवढा संक्षिप्त करून ७०० शे.ओव्यांत १९०४ साली ब्रह्मवर्त येथे लिहिला. हा ग्रंथ म्हणजे श्री सप्तशतीगुरुचरित्रसार. समाजातील सर्व भक्तांसाठी हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाची रचना करताना यातील प्रत्येक ओवींतील तिसरे अक्षर उभे एकत्र वाचले असता गीतेचा १५ वा अध्याय तयार होतो.

या श्रीगुरुचरित्राचे १९०१ मध्ये ३०७ गेयतायुक्त विविध छंदामध्ये संस्कृत श्लोकांमध्ये त्रिशती गुरुकाव्य तयार केले. त्या शिवाय दत्तपुराण इ.स.१८९२ मध्ये ब्रह्मावर्ती लिहीले. याचेच भाषांतर म्हणून दत्तमहात्म्य मराठी मध्ये लिहीले. श्री दत्तचंप्पू, शिशात्रयम् (कुमारशिक्षा, युवाशिक्षा, वृध्दशिक्षा) पंचपाक्षिक हा ज्योतिषशास्त्र विषयक संस्कृत ग्रंथ तयार केला. तसेच स्त्री शिक्षा,  लघुमननसार (मराठी), माघमहात्म्य (मराठी) हे ग्रंथ मराठीत तयार केले.

स्तोत्रादी संग्रहमध्ये मराठी व संस्कृत रचना आहेत. या मध्ये श्री गणेश  देवतेवर ४ स्तोत्रे, श्री देवी सरस्वतीवर २ स्तोत्रे, पंचायतन महात्म्यामध्ये ६ स्तोत्रे, श्री देव शंकरावर १९ स्तोत्रे, श्री देव विष्णूवर १९ स्तोत्रे, श्री देवी वर ७ स्तोत्रे, गंगा यमुना नर्मदा इ. विविध नद्या व विविध तीर्थक्षेत्रे यावर ४१ स्तोत्रे तर वेदांतावर ६ स्तोत्रे, श्री दत्तात्रेयांवर ४६ स्तोत्रे अशी एकूण १५० स्तोत्रे या संग्रहात आहेत. तसेच याचबरोबर पंचपदीसह करुणात्रिपदी, नित्यउपासनाक्रम, श्री दत्तात्रेय षोडशावतार चरित्र, श्री सत्यदत्तपूजा व कथा आहेत.

अशाप्रकारे श्री दत्तसंप्रदायामध्ये भरीव वाङमय तयार केले. एवढे असूनही हे वाङमय आपण लिहीले नसून श्री दत्त महाराजांच्या कृपेने जशी समोर अक्षरे दिसतात तशीच आपण लिहून काढली असे महाराज विनम्रपणे सांगत असत. अशा या थोर विभूतीने गरुडेश्वर येथे नर्मदा किनारी आषाढ शुध्द प्रतिपदा दि. २४.६.१९१४ रोजी  समाधी घेतली व अशा रितीने माणगांवातील निर्मला नदी ते नर्मदा नदी असा प्रवास संपन्न झाला.

श्री स्वामी महाराजांचे जीवन चरित्र अलौकिक व अदभुत असे आहे. स्वामी महाराजांचे शिष्य श्री. प. प. गांडा महाराज म्हणजेच श्री. प. प. योगानंद सरस्वती होत. (जन्म–शके १७९० मार्गशीर्ष पौर्णिमा श्री क्षेत्र तलंगपर जि. सुरत, समाधी – शके १८५० फाल्गुन वद्य १२ श्री क्षेत्र गुंज जि. परभणी) गांडा महाराज हे स्वतः स्वामी महाराजांबरोबर शेवटची काही वर्षे एकत्र होते. अशा गांडा महाराजांनी श्री. टेंब्ये स्वामी महाराजांवर श्री गुरुमूर्ती चरित्र हा ग्रंथ लिहीला. श्री. प. प. टेंब्ये स्वामी महाराजांच्या जयंती वर्षात श्री गुरुप्रतिपदा शके १९२६ दि. २५.२.२००५ रोजी श्री. प. प. दामोदरानंद सरस्वती स्वामी महाराजांनी या ग्रंथाचे पुनर्प्रकाशन केले.

या ग्रंथामध्ये १४४०६ ओव्या व ४७७ श्लोक मिळून १४८८३ अशी श्लोकसंख्या आहे. यामध्ये कर्मविभाग ३१ अध्यायांचा, उपासना विभाग ४० अध्यायांचा तर ज्ञानविभाग ६४ अध्यायांचा असून एकंदर अध्यायसंख्या १३५ होते. या ग्रंथाचे वाचन करुन भक्तांनी स्वामी महाराजांबद्दल अधिक माहिती मिळवावी.

कोकणातील सावंतवाडी संस्थानातील माणगांवातील श्री. गणेशभटजी टेंब्ये व सौ. रमाबाई यांच्या पोटी शके १७७६ श्रावण कृष्ण पंचमीस रविवार दि. १३ ऑगस्ट १८५४ रोजी वासुदेव अर्थात नंतर श्री वासुदेवशास्त्री व संन्यासानंतरचे श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती यांचा जन्म झाला. वयाच्या ८व्या वर्षी मुंज झाली. त्यानंतर त्रिकाल संध्या, अग्निकार्य, नित्य गुरुचरित्र वाचन करत असत. कोरी भिक्षा मागून स्वत: स्वयंपाक करून वैश्वदेव पंचयज्ञ– नैवेद्य करुन भोजन करत असत. नित्य आन्हिक त्यांच्याकडून होऊ लागले. त्याचबरोबर वेदाध्ययन, याज्ञिक, संस्कृत, ज्योतिषाभ्यास तसेच अष्टांग योगाभ्यासही सुरु केला. वासुदेवचा श्री वासुदेवशास्त्री झाला. आपल्या मंत्रसिध्दीवर (व भक्तांना उपासना देऊन) त्यांनी अनेकांच्या भूतबाधा सोडविल्या. अनेकांना पिडामुक्त केले व अनेक भक्तांना उपासना देऊन सन्मार्गी लावले.

रांगणागडाचे हवालदार बाबाजीपंत गोडे यांच्या बयो नावाच्या मुलीशी ती पायाने अधू असतानांही केवळ गुरुजींच्या आज्ञेखातर मुलगी न बघता विवाहास मान्यता दिली. विवाहानंतर शास्त्रानुसार नित्य पंचायतन पूजा,पंचयज्ञ व स्मार्ताग्निची उपासना करु लागले. याच कालावधीत त्यांनी गायत्री पुरश्चरण केले. एकदा स्वप्नदृष्टांतानुसार नृसिंहवाडीला गेले असता तेथे गोविंदस्वामी या ब्रह्मज्ञानी संन्यासांचा कृपानुग्रह होऊन श्री दत्तसंप्रदायाची दीक्षा व गुरुमंत्र वासुदेवशास्त्रींना लाभला. यानंतर इ.स.१८८३ वैशाख शुध्द पंचमी कागलहून आणलेल्या श्रीदत्तमूर्तींची सात दिवसांत मातीने बांधलेल्या मंदिरात माणगांवी स्थापना केली. साक्षात श्री दत्तप्रभू या मंदिरात राहिले. सात वर्षाच्या कालावधीत श्री दत्तप्रभूंनी येथे विविध लीला केल्या. मंदिर भरभराटीला आले. दर गुरुवारी व शनिवारी प्रचंड गर्दी होत असे. यानंतर श्री दत्तप्रभूंच्या  आज्ञेने पत्नीसह नेसत्या वस्त्रासह हे दांपत्य माणगांवहून नरसोबाच्या वाडीस राहायला गेले. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. अन्नपूर्णाबाई गरोदर होत्या. नरसोबाच्या वाडीला गेल्यानंतर योग्य वेळी त्या प्रसुत झाल्या. पण मुलाला जन्म दिला तरी तो मृत होता. संसारातून मुक्त होण्यासाठी कदाचित अशी योजना श्री दत्त महाराजांची असावी असे वाटते. श्री दत्ताज्ञेने उत्तरेस जा या आज्ञेवरुन कोल्हापूर, औदुंबर, पंढरपूर, बार्शी अशी तीर्थक्षेत्रे करीत गोदावरी काठी गंगाखेड येथे आले. या ठिकाणी कॉलराच्या साथीमुळे त्यांच्या पत्नी अतिशय आजारी झाल्या. वासुदेवशास्त्रींनी त्यांच्या पत्नीच्या या आजारपणाच्या काळात सेवा केली. येथे शके १८१३ वैशाख कृष्ण १४ शुक्रवार रोजी दुपारी पतीच्या पायावर मस्तक ठेऊन सौ. अन्नपूर्णाबाईनी देहत्याग केला. यानंतर ‘अनाश्रमी न तिष्ठे’ या शास्त्रवचनानुसार पत्नीच्या मृत्युनंतर १४ व्या दिवशी लगेचच वासुदेवशास्त्रीनी संन्यास घेतला. उज्जयिनीत गेल्यावर श्री नारायणानंद सरस्वती स्वामी महाराजांकडून दंड दीक्षा घेतली व वासुदेवशास्त्रींचे ‘श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती ‘स्वामी महाराज असे नामकरण झाले.

या नंतर भारतात विविध ठिकाणी त्यांचा अनवाणी पायी प्रवास झाला. या काळात २३ चातुर्मास पूर्ण झाले. वर सांगितल्याप्रमाणे विविध ग्रंथाची, स्तोत्रांची, आरती, व्रतवैकल्ये, पदे आदिंची श्री दत्त महाराजांच्या कृपेने निर्मिती झाली. असे हे स्वामी महाराज संन्यासाश्रमाचा आदर्श, मूर्तिमंत वैराग्य, एकांतिक दत्तभक्ती, आयुष्यभर सगुणोपासना करणारे, उत्तम वैद्य, मंत्रसिध्दी, यंत्रतंत्र सिध्दीयुक्त, उत्कृष्ट ज्योतिषी, मराठी व संस्कृत आध्यात्मिक वाडमय निर्मितीकार, प्रतिभावान व परतत्वस्पर्शी सिध्दकवी, उत्कृष्ट वक्ता, सिध्द हठयोगी व उत्कट दत्तभक्त होते.

अशा या श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी अखेर गुजरात मधील नर्मदा तीरावरील श्री क्षेत्र गरुडेश्वर येथे आषाढ शुध्द प्रतिपदा शके १८३६ मंगळवार दि. २४.६.१९१४ रोजी दीर्घ प्रणवोच्चार करुन देहत्याग केला. या श्री क्षेत्र गरुडेश्वर गुजरात येथे महाराजांची समाधी मंदिर आहे.

अशा या थोर विभूतीचे जन्मगांव व जन्मस्थान तसेच आयुष्यातील पहिली ३५ वर्षे याच क्षेत्री श्री स्वामी महाराजांच्या वास्तव्यामुळे ही भूमी पवित्र व पावन झाली आहे. आपले भाग्य असे की, आपण या भूमीत आत्ता आहात. या सर्वांचे भान ठेऊन आपण सर्व भक्तांनी स्वयंशिस्तीने व शुचिर्भूतपणे वागावे ही नम्र विनंती.

भारतीय समाजाला जागृत करुन सनातन वैदिक धर्माची जाणीव करुन देण्यासाठीच एक महान श्री दत्तावतारी त्रिमुर्ति श्री.प.प.वासुदेवानंद टेंब्ये स्वामी महाराज. १९ व्या शतकाच्या मध्यात भूतलावर माणगांव येथे अवतरली.

कठोर तपश्चर्या, धर्माचरण व प्रगाढ श्री दत्तभक्ती याच्या बळावर प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूंच्या मार्गदर्शनाखाली योग,धर्म,कर्म व वेद यांचे ज्ञान मिळवून श्रींच्या आज्ञेनुसार संन्यासाश्रम स्वीकारून भारतभर पायीच प्रवास करून, सर्व भक्तांचे परम कल्याण केले.मराठी व संस्कृत भाषांतून, श्री दत्तप्रभूंच्या आज्ञेने दत्तपुराण, शिक्षात्रय, द्विसाहस्त्री, दत्तमहात्म इ. विविध प्रासादिक आणि दार्शनिक वाङमय तसेच मंत्रगर्भ स्तोत्रे आणि भावपूर्ण गेय पदे यांची रचना केली. जणू काही प्रति आद्य शंकराचार्यच.

Leave a Comment