अनुभवाचे बोल

Experience-Speech

– डॉ. भा. वा. आठवले देवगड, सिंधुदुर्ग,

९४२२४३५३३८

जुने कागदपत्र सहज चाळतांना, माझे वडील बापू ऊर्फ  कै. वामन धोंडदेव आठवले यांनी स्वानुभवावर लिहिलेली टिपणे सापडली. माझे वडील प्राथमिक शिक्षक होते. त्याच्या जोडीला वैद्यक व्यवसाय करीत, पण तसा तो आतबट्ट्याचा होता. पैसा मिळविणे हा त्यांचा हेतूच नसल्यामुळे रोग्याला बरे वाटणे हाच आपला मुख्य मोबदला अशा भावनेनें ते उपचार करीत. खूप दूरच्या ठिकाणाहून  लोक श्रद्ध-ेने त्यांच्याकडे येत असत.

साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी याप्रमाणे त्यांचे एकूण आचरण होतें.

इ.स. १९५६ साली मी देवगड, जि.ंिसधुदुर्ग येथे व्यवसायाला सुरुवात केली. त्या काळात या परिसरांत एकही सर्जन नव्हता. मी एकमेव सर्जन होतो. त्यामुळे अगदी मोतिंिबदू, अॅपेंडिक्स पासून प्रसूतीतंत्र, फ्रॅक्चर्स इत्यादि अनेक लहान मोठ्या शस्त्रक्रिया करण्याची संधी मला मिळाली होती.

माझ्या वैद्यक व्यवसायाला पूरक अशी काही त्यांच्या अनुभवातून मिळविलेली माहिती माझ्या वडिलांनी लिहून पाठविली होती. आज सर्वच कागदपत्र उपलब्ध नाहीत. जे तुरळक कागदपत्र सापडले त्यातील काही भाग आजच्या वाचकांसाठी येथे देत आहे – त्यांच्याच शब्दांत.

कुणाला ते पटो वा न पटो, ही माहिती सांगोवांगी नसून त्यांच्या अनुभवांतून, प्रदीर्घ अनुभवांतून घेतलेली आहे, एवढेच या संदर्भात सांगायचे आहे.

तर आता आपण त्यांच्याच शब्दांतील पुढील भाग वाचूं –

समुद्रापासून १२ मैलपर्यंतच्या हवामानांत तान्ह्या मुलांना व प्रौढ यांनी कसे वागावें यांचे विवरण –

१. एक वर्षाचें मूल होईपर्यंत चौविस तासांत चारसहा वेळां निर्भेळ खोबरेल तेल ताळवेस (टाळूस) वापरून ते तेल मधले बोटाने वरून खाली पांच सहा वेळां करणें – याला ताळू भरणें असें म्हणतात.

२. ताळू तापणें, धडधड उडणें असे होऊ लागल्यास त्याला ताळू पडणें म्हणतात; पण वरील प्रमाणे खोबरेल वापरीत गेल्यास ताळू पडत म्हणजे बिघडत नाही व पांढरे जुलाबही होऊ लागत नाहीत.

३. हळदीची वस्रगाळ पूड खोबरेल तेलांत मिसळून तान्ह्याच्या सर्व अंगास मालिश करून, हातपाय लववून, तान्ह्याला आपल्या सोडलेल्या पायांवर घेऊन साधारण कोमट पाण्याने आंघोळ घालणे. ताळवेस (टाळूस) हातांची ओंजळ धरून पाणी धरणें. त्याला उपडें (पालथें) घेऊन पाणी घालणे. कानांत आंघोळीचे वेळीं तेल (खोबरेल) घालणे व ताळवेवर तेल घालणें.

सायंकाळी सहा वाजता म्हशीचे तूप अंगास लावणे. ताळवेस थोडे लावणे, टोपडे बांधून झोपवणे. तेल हळद याने रक्त शुद्ध- होऊन रक्ताभिसरण छान होते. पुरळ वगैरे रक्तदोष होत नाहीत.

४.चौविस तासांत तान्ह्या मुलाला तीन ते चार वेळा द्रवरुप शौचास झाले पाहिजे, कारण दुधाचा मळ पातळच हवा. दुधाचा पातळ मळ हा दुध पचनाचा असतो. घणसर मळ हा अपचनाचा. त्यामुळे ताप, कफ, लिव्हर वगैरे आजार होऊन मुले दगावतात.

५. नऊ ते अकरा महिन्यांत तान्ह्यास दात येऊं लागतात. त्यावेळीं हिरवे व पातळ शौचाला होते. त्यास अवरोधक (शौच थांबण्याचे) इलाज करूं नयेत. दाढा व दांत येतांच शौच सुधारते.

६. दात येताच ते मूल अन्नग्रहणास योग्य.

७. दोन वर्षांकरिता दुधभात, तूपभात देणे. आंबट, तिखट, तेलकट पदार्थ देऊ नयेत.

८. मुलांचे (तान्ह्यांचे) वय वाढेल तसा आहार देणे. भूक वाढत जाते. तेव्हां अंगावरचे दूध भूक भागण्याइतके मिळते का या गोष्टीकडे लक्ष हवें. जर भूक न भागेल तर ती रडतात. शौचास होत नाही. पोटांत भर नाही मग मळ कोठचा?

बाळकडू-मुलांचे, तान्ह्यांचे पोषक औषध

बाळकडवाची औषधे सावशीत (एक बांबूची पेटी) ठेवावीत, कारण सावशीत हवा जात असल्यामुळे ती एक वर्ष टिकतात. डब्यांत ती नासतात.

बाळकडवाच्या औषधांची यादी खालीलप्रमाणें वेखंड, बाळहरडी, जायफळ, मायफळ, ज्येष्ठमध, सागरगोटा, सुंठ, कुड्याचें पाळ, कुड्याची साल, मुरडशेंग, समुद्रफळ, बिब्बा, डिकेमाली, डांिळबाची साल, वावंिडग.

 गुणधर्म

कफनाशक : वेखंड, ज्येष्ठमध, समुद्रफळ, बाळहरडी, सुंठ

ज्वरनाशक : कुड्याचे पाळ, मायफळ, सागरगोटा.

कृमीनाशक : डिकेमाली, बिब्बा, डाळिंबसाल, मुरडशेंग, वावडिंग

प्रकृतीमान, हवामान व आजार या धारणेने जरुरीप्रमाणें बाळकडू वापरावे.

तान परतणें

वाकांडी, कांदे वगैरेची तान लहानास वापरतात. अगर तान परततात. तान परतणें म्हणजे परातींत पाणी ओतून त्यावर तेल ओततात व मुलास पाय धरून उलटे करून त्याची ताळू त्या पाण्यांत ठेवतात. त्याने तान पडून पांढरे जुलाब होत असलेले थांबतात.

मात्र कोणतीच तान घालणेची सवय नको.

अन्न खाऊं लागले वाचून तान पडत नसते. या हवेंत मुलांस शेक देऊं नये. पित्तकर हवेत शेक वाईट.

आहार विचार

१. फळभाज्या, पालेभाज्या, निरनिराळ्या प्रकारे तयार करून वापरणे.

२. भाज्यांबरोबर भाकरी खाणे चांगले.

३. भाज्या नसतील तर कडधान्यें भिजत घालून मोड आलेवर ‘उसळी’ करून वापरणे.

४. ज्या ठिकाणी जे धान्य पिकते तेंच त्या हवेंत खाणे हिताचे असते. या हवेत गहू वारंवार खाऊ नये.

५. हरभरा, गहू, वाटाणे, जोंधळा या हवेंत वारंवार वापरूं नये.

६. नाचणे, उडीद, कुळीथ, तांदूळ, मूग, चवळी, तीळ, तिळणी, खोबरे, धने, मिरची, गोडेतेल, बरग, वरी हीच या हवेंत उत्तम.

तांदळाचे पदार्थ (उकड करून)

– मोदक, पापड्या, शेवया, उकडीच्या पोळ्या

– (रस घालून) रसघावन, खापर पोळ्या, खांडपोळी, आंकोळ्या, पातोळे, सांजणे, उंडे, वडे.

अशा प्रकारे निरनिराळे पदार्थ खाण्यांत आले की रोगप्रतिबंध होऊन शक्ती वाढते. भूक छान लागते. एकंदरीत आरोग्य छान टिकतें. दुध दुभतें भरपूर हवेच.

याशिवाय आणखी पुष्कळ माहिती माझ्या वडिलांनी लिहून ठेवली आहे. शेवटी ते लिहितात –

जरूरीप्रमाणें रोज ंिकवा दोन ते तीन दिवसास स्वयंपाकास एक नारळ वापरीत गेले. घरचे नारळ नव्हते. तीन ते आठ आण्याला एक नारळ या प्रमाणे विकत घेऊन वापरीत होतो.

दूध रोज तीन ते आठ शेर पर्यंत म्हशी बाळगून वापरी.

लत्ताकपडा, सोने रुपे यांत पैसा गुंतवला नाही. जमीन घेणे, झाडे लावणें, कम्पाऊंड करणे, घरांत फर्निचर, पाट वगैरे, शिवाय तांबे, पितळ भांडी भरपूर असे आयुष्य काढले. मात्र या वेळपर्यंत कर्ज मुळींच केलें नाही.

दोनशे रुपये असतील तर शंभरचाच खर्च करणे ही पद्ध-त.

यामुळे अनृणी व अप्रवासी दिवस गेले. प्रवास म्हणजे त्रास, खर्च. कूपमंडुक नव्हे. वाङ्मयामुळे जगाची वगैरे सर्व माहिती मिळते. नाटकें कादंबऱ्या वाचीत नाहीं. भारदस्त केसरी वगैरे वृत्तपत्रे व राजकारण, व्यावहारिक, नैतिक, आध्यात्मिक वाचन यापुढे या वेळपर्यंत आयुष्य छान गेले.

साठसत्तर वर्षापूर्वींच्या एका सुशिक्षित व्यक्तींचे हे लेखन खूप बोलके आहे. आजच्या बदलत्या जमान्यात या लेखनाबद्दल काहींचे मतभेद असू शकतील, पण हे सर्व लेखन प्रत्यक्ष अनुभूतीतून आले असल्यामुळें त्याचे महत्त्व तर नक्कीच आहे.

– अर्थात जाणकारांना!

Related posts

Leave a Comment