– सतीश सिन्नरकर.
हिन्दी सिनेमाच्या इतिहासात ‘मुघले आझम’ सिनेमाची निर्मिती म्हणजे एक महद् आश्चर्य मानले जाते. के. असिफ यांनी आपले सर्वस्व ओतून सतत ९ वर्षे मेहनत केली व हा अद्वितीय चित्रपट बनविला. त्या काळच्या चित्रपट निर्मितीच्या खर्चाचा विचार केला तर मुघले आझमचा खर्च किमान १०० पट जास्त झाला. या सिनेमाची कहाणी म्हणजे एक स्वप्ननगरी असून प्रत्येक बाबतीत तिचे अनोखेपण अधोरेखित होते. पहिला सिनेमा कृष्णधवल असूनही २५ आठवडे सतत चालला व त्यानंतर ४४ वर्षांनी २००४ मध्ये हा चित्रपट रंगीत केला त्यावेळीही तो २५ आठवडे चालून त्याने लोकप्रियतेचे शिखर गाठले.
हा सिनेमा बनण्यापूर्वी याच कथानकावर आधारित ‘अनारकली’ हे नाटक बनले होते. ते नाटक पाहूनच असिफ यांना चित्रपट करण्याची प्रेरणा मिळाली. आज या घटनाक्रमाचे चक्र पूर्ण होत असून पुन्हा एकदा नाट्यरुपात ही कथा नव्याने प्रेक्षकांसमोर आली आहे. नाटकाचा कृष्णधवल चित्रपट, कृष्णधवल चित्रपटाचा रंगीत चित्रपट आणि आता रंगीत चित्रपटाचे पुन्हा नाट्य रुपांतर असा हा मोठा मनोरंजक प्रवास आहे.
आज जे नाट्य बनले आहे ते प्रत्यक्ष पाहाण्याची संधी मला मिळाली व ते पहात असताना एका विलक्षण भव्यतेची अनुभूती आली. एकतर एनसीपीएचे भव्य नाट्यगृह आणि आजबाजूचा भारदस्त परिसर! त्यामुळे नाट्यगृहात प्रवेश करतानाच आज आपल्याला काहीतरी भव्यदिव्य पहायला व ऐकायला मिळणार असे वाटत होते. तिकिटांचे दर जास्त असूनही पूर्ण नाट्यगृह वेळेवर भरले. प्रेक्षकांकडे पाहताच त्यांच्या रसिकतेची खात्री होत होती. ठीक वेळेवर नाटक सुरू झाले आणि सर्वजण इतिहासकाळात रममाण झाले.
एखादा भव्य संकल्प कसा पूर्ण होऊ शकतो त्याचे ‘मुघले आझम’ हे आजच्या काळातले एक उत्तम उदाहरण आहे. ‘जाणता राजा’ ंिकवा ‘बाहुबली’ पाहताना जो अनुभव येतो तसाच अनुभव हे नाटक पाहताना येतो.
प्रचंड खर्चाचे हे नाटक सादर करताना निर्माते व दिग्दर्शक यांनी गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही कसूर ठेवलेली नाही. फिरोज अब्बास खान यांच्या कुशल दिग्दर्शनाचा प्रत्यय क्षणोक्षणी येतो. मग ते संगीत असो, अभिनय असो वा नेपथ्य असो. या नाटकासाठी त्यांनी प्रत्येक क्षेत्रातले नामवंत निवडले आहेत. वेशभूषेसाठी मनीष मल्होत्रा, प्रकाश योजनेसाठी डेव्हिड लँडर, नृत्य दिग्दर्शनासाठी मयूरी उपाध्याय आणि संगीतासाठी पियुष कनोजिया अशा दिग्गजांना आणले आहे. मूळ सिनेमात जी अजरामर झालेली गाणी आहेत ती त्याच संगीतामध्ये प्रत्यक्ष सादर होतात, तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात. अनारकलीच्या भूमिकेसाठी ज्या दोघींना निवडले आहे त्यांचे सौंदर्य, आवाज आणि अभिनय तोडीस तोड आहे.
नाटकात जे सेट उभारले आहेत ते अगदी हुबेहुब वाटतात. मग ती युद्ध-भूमी असो की राजमहाल. पायऱ्या असलेले स्टेज यापूर्वी कधी पाहण्यात आले नव्हते. या सर्व संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी जॉन नरून या जगविख्यात तज्ज्ञाची सांगड घातल्याने हे नाटक जगातील कोणत्याही ऐतिहासिक भव्य नाटक अथवा सिनेमाच्या तुलनेत कुठेही कमी पडत नाही.
नाटकाची कथा आपणा सर्वांनाच माहीत आहे. पण प्रस्तुतीचा हा नवा पायंडा नाट्यक्षेत्राला खूप पुढे नेणारा ठरू शकेल. सतत १० दिवस दररोज दोन खेळ ठेवून सुद्ध-ा सर्व खेळ आगावू नोंदणीतच हाऊसफुल्ल होणे म्हणजे एक रेकॉर्डच आहे. यामुळे हे नाटक व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरल्याचेच द्योतक आहे. याचे शेकडो खेळ देशभर होत राहणार यात शंका नाही.
