मोरपंखी आठवणी आखाजीच्या

खान्देशातील अक्षय्यतृतीया (आखाजी) म्हणजे सासुरवाशिणीचा मुक्तीदिनच. मुली महिलांचा आनंदोत्सव! एवढेच नव्हे तर लग्न होऊन सासरी गेलेल्या विवाहितेला माहेरी येऊन सासरचा थकवा, सल, बोच, कढ व्यक्त करण्याचे मोकळेपणसुद्धा. चैत्र वैशाखाच्या उन्हासोबत तिची माहेरची हुरहूर, ओढ वाढावी अन् माहेरच्या वाटेकडे डोळे लागावे अशी भावावस्था.

– लतिका चौधरी, दोंडाईचा, जि.धुळे

भारतीय सण, बोलीभाषा, रितीरिवाज, परंपरा ही स्वतंत्र सांस्कृतीक वैशिष्ट्ये जपून आहेत. त्यात अक्षय्यतृतीया म्हणजेच आखाजी हा सण वैशाखशुद्ध तृतियेस साजरा केला जातो. याच दिवशी कृतयुग प्रारंभ होतो असे म्हणतात. या दिवशी , हा पवित्रदिन म्हणून विविध धर्मकृत्ये, पुण्य, दानधर्म, हवन, सत्कर्म करून पुण्यसंचय केला जातो. परशुराम जयंती याच दिवशी असते. देव, पितर निमित्ते केलेले दान, हवन अक्षय्य, अविनाशी होते. चैत्रात बसविलेल्या गौराई (गौरी) चे विसर्जन याच दिवशी होते.

खान्देशातील अक्षय्यतृतीया (आखाजी) म्हणजे सासुरवाशिणीचा मुक्तीदिनच. मुली महिलांचा आनंदोत्सव! एवढेच नव्हे तर लग्न होऊन सासरी गेलेल्या विवाहितेला माहेरी येऊन सासरचा थकवा, सल, बोच, कढ व्यक्त करण्याचे मोकळेपणसुद्धा. चैत्र वैशाखाच्या उन्हासोबत तिची माहेरची हुरहूर, ओढ वाढावी अन् माहेरच्या वाटेकडे डोळे लागावे अशी भावावस्था.

आज परिस्थिती खुप बदलली आहे. आजच्या मुलींचे पसंतीचे लग्न, शिक्षण, समज उमज असल्याने सासर बाबत भीती, दडपण हा भाग खुप कमी आहे. आजच्या सासूबाई आधुनिक असल्याने सुनेला कोण चांगलं वागवतं, प्रेम देतं ही चढाओढ असते. पूर्वी सासु चांगली मिळावी म्हणून प्रयत्न असायचे आता सून चांगली म्हणजे कुटुंबास धरून चालणारी, समंजस मिळावी यासाठी चिंता असते. त्यामागे अनेक कारणं आहेत. अपवाद असतातच. पण  पूर्वीचा सासुरवास आज नाही हे खरे.

१९८०/८५ चा काळ, ते सासरचे दिवस, सासुरवास आठवला तर अंगावर शहारे येतात. आठवू नये हेच बरे . पण आपली भारतीय परंपरा चांगल्याचा उल्लेख करून वाईटाचा अव्हेर करायला शिकवते. म्हणूनच बालपण आणि बालपणीची आखाजी (अक्षय्यतृतीया) आजही हृदयाच्या कोपऱ्यात घर करून आहे. ती शेअर करावी वाटते. वय वर्ष ६ ते १४ पर्यंतचे बालपण आजही मनाला मोरपिसाचा मुलायम स्पर्श करून जाते. जातपात, उच्चनीच, गरीब-श्रीमंतचा भेद, दरी कळत नसलेल्या निष्पाप, निर्मळ जीवनाचा काळ म्हणजे बालपण. असा हा निरागस, सोनेरी, फुलपंखी काळ मीही जगले. त्या मोरपंखी आठवणीतील एक आठवण म्हणजे बालपणीची आखाजी.

सर्व जातीधर्मातील लोकं एकत्र नांदत असलेल्या गल्लीतील आम्ही पोरी, मैत्रिणी, बालसख्या एकत्र खेळत असू.घरघर (भातुकली म्हणजे भांडीभांडी) खेळणे, आट्यापाट्या, दोरीउड्या, लंगडी, हूतुतू, फुगड्या, लुपाछुपी, चौपट, कवड्या, लगोऱ्या, कचकडे, बिटट्या, बाहुला बाहुली, नवरा नवरी, गाण्यांच्या भेंड्या, उखाणी असे विविध खेळ खेळत असू.

एकमेकींशी भांडत, गट्टी फुकरत, रागरुसवा विसरत पुन्हा एकत्र येत असू.  त्यातच चैत्र वैशाखातील गौराई (गौर) बसवणे हा अविस्मरणीय सण असायचा. महिनाभर रोज बालसख्यांनी सकाळी एकत्र येणे, झाडाचा झोका, गाणी, झगडणे आजही मनात पिंगा घालते.

चैत्र पौर्णिमेला सर्व गल्लीतल्या गावच्या मुली गौराई बसवत असू. लाकडाची गौर, प्रतिमा न्हावूमाखू घालून लाल वस्त्र पाटावर टाकून पूजा करून बसवत असू. हळद,कुंकू,अक्षता वाहून फुलहार चढवला जायचा. मोठी बहीण, भाऊ ओट्यावरचं कोनाडं सजवायला मदत करायचे. मी शेंडेफळ म्हणून घरकामात सुट  मिळायची. पण तो वेळ शाळा, पाटी-पुस्तक, अभ्यास, आवडीनिवडी यात जास्त घालवायला आवडायचा. स्वाध्याय, पाढे तोंडपाठ झाल्यावर संध्याकाळी ओट्यावर, अंगणात, झाडाखाली आवडीचा खेळ खेळायचो. गौराईच्या दिवसात सकाळी लवकर जागायचो. तांब्याचा तांब्या मातीने,राखेने  चकचकीत घासायचा. त्यात पानी भरायचे.  नागवेलीची किंवा आंब्याच्या झाडाची पाने तांब्याच्या तोंडावर ठेवायची. मध्ये बसेल असा काळ्या चिकण्या मातीचा घट्ट गोळा पानाच्या मध्ये ठेवायचा. त्यावर सुती कापड ठेवुन कोरडी माती गाळून चिकन लेप द्यायचा. तांब्याच्या भोवती चंदन, हळदकुंकुची बोटे ओढायची. नारळाशिवायचा हा बालपणीचा मंगलकलश असायचा.

रुमालाची किंवा जुन्या फडक्याची चुंबळ डोक्यावर ठेवून त्यावर कलश ठेवायचा. डोक्यापेक्षा चुंबळ मोठी असायची. गल्लीतील सर्व बालसख्या एकत्र जमायचो. हातात टिपऱ्या घेऊन गौराईची गाणी म्हणत नदीवर ‘पानी आणायला’ निघत असू. त्या नदीवरून कलश भरून आणलेल्या पाण्याने गौराई न्हाणवायचो.

अमरावती व  भोगावती या दोन नद्यांच्या ‘डाच्यात’(तोंडात) वसलेले गाव म्हणून आमच्या गावाचे नाव ‘दोंडाईचा’. अमरावती नदी राहत्या घरापासून लांब म्हणून जवळच्या भोगावती नदीत, नदीच्या पुढील आमराईत गौर खेळायला, ‘पानी भरायला’, टिपऱ्या खेळायला जायचो.

आम्ही सख्या-स्कर्ट, परकर पोलकी घालून, हातात नया पैशाच्या प्लास्टिकच्या रबरी बांगड्या, गळ्यात द्राक्षरंगाचे काचेच्या मण्यांची माळ, कानात साधे डूल, पायात गिल्लटचे काळेकुट्ट चाळ (पैंजण) असे काचकथिलही सोन्याचा, हिऱ्यामोत्याचा आनंद देत असे. अर्थात ते माहीतही नव्हतं. तो आनंद, ते रमणीय बालपण, तो निरागसपणा, निष्पाप जगणं सोन्याचं आयुष्य घडवत होतं. त्यावेळी पार्लर, मेकअप हे गावीही नव्हतं. कुंकू ओला करून ओठ लालसर करायचो. चुलीवरच्या तव्यावरचं काळं काजळ म्हणून हौसेनं डोळ्याच्या कडांना लावायचो. आईच्या हातचा धपाटाही खायचो. कुठलं तरी खाकी पावडर एखाद्या मैत्रीणीकडे असलं म्हणजे आमच्या मानाने ती खुप श्रीमंत, सुखदायी गोष्ट. भाव खात ती थोडंसं आम्हालाही देई. केसांना कधी तेल तर कधी पानी लावून चापूनचुपून, करकचून दोन वेण्या रिबिनी लावून बांधून दिल्या जायच्या. एखाद्या सिनेमाचं पोस्टर बघून, नखरा म्हणून हिरोईनसारखे दोन्ही कानाजवळ केसांच्या बटा काढून सोडायचो व मखडवायचो. आईच्या शिव्या, मोठ्या भावाचा मार त्यासोबत असायचे. एकंदरीत असं नटूनथटून, मुरडत, हसत खेळत नदीवर जात असू. हसत खेळत, नाचत गात, टिपऱ्या खेळत महिनाभर मजा करायचो.

महिनाभर रोज गौराईला वेगवेगळी माळ (हार, सर) करून गळ्यात घातली जायची. जसे-मुरमुरे, शेव, भुईमूग शेंगा माळ, डांगरच्या बियांची माळ, टरबूज बियांची माळ केल्या जायच्या. गौर म्हणजे पार्वती. म्हणजे माहेरी आलेली मुलगी. सासरहून आलेल्या मुलीला सर्व पौष्टिक अन्न मिळावं, मान सन्मान मिळावा, सासुरवासात राहून आलेल्या मुलीला सर्व सुखें, पोषक आहार मिळावा हा हेतू असावा.

वैशाख द्वितीयेला कुंभाराघरी वाजतगाजत सन्मानाने ‘शंकर’ आणायला जायचो. सर्व आपापल्या परीने सजून सवरून, नटूनथटून तयार व्हायचो. एवढ्या लहान वयात मापाचे पोलके कोठून मिळणार? म्हणून मोठ्या वहिनीचा, बहिणीचा, आईचा डगला पोलका किंवा फ्रॉकवरच साडी गुंडाळून घ्यायचो. साडी घालताच पोक्तपणाचा आव यायचा, झटके मारत, मुरडत चालत असू. तो स्वर्गानंद आज नाही. ‘शंकर’ आणण्यासाठी ताट घेऊन त्यात हळद, कुंकू, अक्षता, पांढऱ्या कापडाच्या चिंध्याना हळद लावून पिवळे करून फेटा, धोती,   उपरणे बनवण्यासाठी न्यायचो. गौरी कलश पुढील ‘धान्या’ पूजेला असायच्या. कुंभाराला त्याने ‘शंकर’ (काळ्या मातीचा) घडवला म्हणून मोबदला नया पैसा, एक पै, दोन पै, तीन पै, पाच पैसा, दहा पैसे पैकी नाणेरुपात द्यायचो.

कुंभाराघरी पोरींची झुंबड असायची. शंकर घेऊन घरी परत येताना उत्साहाने टिपऱ्या वाजवत, गौराईची गाणी म्हणत, आनंदात, उत्साहात परतायचो. गौराई शेजारी शंकर बसवून त्यास नैवेद्य दिला जायचा.माझी माय गोड गव्हाचे काटके (जाड शेवया), दूध शेवया, सांजोरी मोठ्या उत्साहाने बनवायची. काटके (जाड शेवया) लाकडी फळीवर वळण्यासाठी दुपारी गल्लीतल्या बाया एकमेकींना मदत करायच्या. शेवया तोडून खाटेवर टाकण्यासाठी आम्ही बालगोपाल मंडळी हौसेने बसायचो.

अक्षय्यतृतीयेच्या दिवशी घरात ‘घागर’ पुजली जायची. घागरमध्ये पाणी, पाण्यात हळद, कुंकू, अक्षता, फुल, नाणं टाकून आंब्याच्या डहाळ्या, त्यावर ताटात पुरणपोळी, आंब्याचा रस, सार भात, रंगीत कुरडया पापड, भजे ठेवले जायचे. डांगर छोट्या कळसावर पूजेला असायचे. पितर पूजा, सवाष्ण पूजा व्हायची. संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन उत्साहाने, आनंदाने सण साजरा होत असे.

आम्ही बच्चेकंपनी अंगणातल्या झाडाला बांधलेल्या झोक्यावर बसून झोके घ्यायचो, खायचो. कुणीतरी मोठा झोका द्यावा म्हणून कोकलत असू. सासरहून आलेल्या मोठ्या बहिणीची दादागिरी चालत असे. कधी आईच्या मांडीवर, कधी मोठ्या बहिणीच्या मांडीवर बसून झोके खाण्यात स्वर्गानंद असे. आमचे भाऊही आमच्यात मिसळून आनंद घेत. उंच झोका देण्यासाठी हौसेनं पुढे येत. उंचच उंच गेलेला झोका ठोका चुकवत असे. घाबरून किंचाळ्या मारत असू. सासुरवाशिणी माहेरी आलेल्या मुली, आम्ही लहान मोठ्या मुली, आई, गल्लीतल्या बाया सर्व आखाजीची गाणी म्हणायचो.

१)    चैत्र वैशाखाचं ऊन व माय, वैशाखाचं ऊन धरणी  तापून झाली लाल व माय, तापून झाली लाल……
आईच्या पायाला आले फोड व माय, पायाला आले फोड…

२)    आथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वं कैरी तुटनी खडक फुटना झुय झुय पानी व्हाय    वं……

३)    गेली माळीच्या मळ्यात माझी गौराई २
फुल तोंडीलं चाफ्याचं माझी गौराई २
माळी आला का धावत माझी गौराई २
माळी बोलला रागात माझी गौराई २…..

अशी अनेक गाणी पोरी, वयस्क बायका, मुली तालासुरात म्हणायच्या. आम्ही त्यांच्यामागे सूर धरायचो.  ते सूर धरता धरता ते संस्कार, भाव अलगद मनावर अक्षय्य कोरले गेले.

गौराई, आखाजीची सांगता, निरोप संध्याकाळी म्हणजे तिसऱ्या प्रहरला व्हायचा.

दोन नद्यांच्या ऐलाड पैलाडच्या (दोन्ही काठावरच्या) मुली, बायका गौराई घेऊन विसर्जनासाठी यायचो. हातात टिपऱ्या घेऊन धोबीघाटावर, आमराईत समोरासमोर झुंडीने यायचो. दोन गट पडायचे. दोन्ही गटातल्या मुली, बायका एकमेकींना गाण्यातून शिव्या घालत भांडायच्या. एकमेकांना टिपऱ्या दाखवायच्या. गाण्यातून शिव्या घालण्यात मोठ्ठी चढाओढ असायची. पण त्या भांडणात वैर, द्वेष, सुड असे काही नसून खेळकरपणा असायचा. यात मी मात्र सर्वात मागे असायची. कारण बालपणापासूनच शिव्या, घाणेरडे बोलणे याचा तिरस्कार. आईने कधीतरी शिवी दिली तर २/२ दिवस न जेवता रागात रहायची. आई खुप धार्मिक वृत्तीची. तिच्यासोबत संपूर्ण श्रावण महिना कृष्णमंदिरात पोथी, पुराण ऐकण्यात, पारायण, व्रत, उपवास करण्यात जायचा.

त्यामुळे आपोआप चांगले संस्कार, विचार, वृत्ती रुजत गेली. चांगल्यावरचा विश्वास वाढत गेला. म्हणून शिव्या, झगडणे जिभेवर आले नाही, येत नाही. अन्याय होत असताना चिडून मनातल्या मनात मात्र खुप शिव्या देते. पण त्याही साध्या. असो.

तर नदीपैल्याडच्या मुली टिपऱ्या ठोकत, कंबर खोचत ‘झगडण्यासाठी’ तयारीनिशी उतरायच्या. त्या लयबद्ध गाण्यातल्या गच्चाळ शिव्या शिशारी आणायच्या. त्या शिव्या मी उच्चारणं अशक्य व्हायचं. ऐकणेही कठीण व्हायचे. पण आडदांड, जबर मुलींना एकमेकींशी झगडताना, टिपरे खुपसताना, हारलेल्या मुलींना पळून जाताना पाहून मात्र मजा यायची.

मी गांडू, घाबरट म्हणून एखादी संधी साधून माझ्या दिशेने धावत येताना पाहून मी मोठ्या मुलींच्या आड लपून, चकवा देत पळून जात असे. व नदीतल्या महादेव मंदिरातून लपून गम्मत बघत असायची.

अंधार पडल्यावर सर्व मैत्रिणी ओल्याचिंब होऊन घरी परतायचो. दमल्याने कुठे, कसा डोळा लागायचा कळायचे नाही. महिनाभरची एकत्र येऊन केलेली धमाल, गाणी, मस्ती सारं सारं मनात  कितीतरी दिवस रेंगाळत रहायचं. खुप दिवसपर्यंत पोकळी जाणवायची. खुप सारं हरवल्यागत वाटत रहायचं.

आज ते दिवस, ते बालपण, त्या मैत्रिणी, गाणी, सण, उत्सव, हसणे, खिदळणे, राग रुसवाफुगवा, जिव्हाळा, झोका, ओव्या, गौराई, भुलाबाई, सारंच फक्त आणि फक्त आठवणीत उरलं आहे. आधुनिकतेचा बुरखा पांघरून, मुखवटा चढवून, रुक्ष, निर्मम जग जगणे पाहून कुठंतरी सल जाणवते. आजचे आधुनिक जग, जगणे, माणसं पाहून मनाचा गोंधळ होतो की – ‘ते सुख’ खरे की ‘हे सुख’?

आज सकारात्मक खुप असलं तरी त्या भूतकालीन अस्सल, गावरान सुखाच्या आठवणीने मन पाझरतं…ओलावतं…. गार होतं….. आणि स्थिरावतं कागरूपी आभाळावर…. तटस्थपणे ह्या जगाकडे पाहण्यासाठी…. तडजोड स्विकारत…!!!

रुमालाची किंवा जुन्या फडक्याची चुंबळ डोक्यावर ठेवून त्यावर कलश ठेवायचा. डोक्यापेक्षा चुंबळ मोठी असायची. गल्लीतील सर्व बालसख्या एकत्र जमायचो. हातात टिपऱ्या घेऊन गौराईची गाणी म्हणत नदीवर ‘पानी आणायला’ निघत असू. त्या नदीवरून कलश भरून आणलेल्या पाण्याने गौराई न्हाणवायचो.

– एप्रिल २०१८

Related posts

Leave a Comment