गुरू-शिष्य परंपरा हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असून याच परंपरेमुळे मानवी प्रतिभेचा परमोत्कर्ष झाला. आपल्या पूर्वजांनी जीवन समृद्ध- करणारी चिरंतन सूत्रे प्रस्थापित केली. म्हणूनच भारतीय तत्त्वज्ञानात गुरूचे स्थान सर्वोपरि असून प्रत्यक्ष परमेश्वराहून श्रेष्ठ मानले जाते. काय आहे ही संकल्पना?
गुरू हे असे तेज आहे की ते प्रगट होताच सारे संशय, सारा अंधार समाप्त होतो. गुरू वचनांचे अमृत प्राशन केल्यावर सर्व प्रकारची क्षुधा शांत होते. गुरू हा असा एक मृदंग आहे की ज्याचा स्वर उमटताच अनाहत ध्वनी ऐकू येतो. बासरी वाजू लागताच जसे मन तल्लीन होते, तसा निर्भेळ आनंद देणारे गुरूचे सान्निध्य असते.
शिष्याच्या प्राणातून निरंतर वाहणारी नदी म्हणजे गुरू! गुरू म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान, ज्यामुळे आपण निर्भय होतो. गुरू अशी दीक्षा प्रदान करतो की ती ग्रहण केल्यावर हा भवसागर पार करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. ‘सत् चित् आनंद’ ही गुरूची शिकवण आपल्याला ‘मी कोण’ या प्रश्नाचे उत्तर देते. गुरूकृपा हा एक अनमोल असा खजिना असून. गुरूप्रसाद मिळाल्यावर आणखी काही मागण्याची आवश्यकताच उरत नाही. अशा अनेक प्रकारे गुरू महात्म्य सांगता येईल. आपले अहोभाग्य आहे की प्राचीन काळापासून आजपर्यंत अशा सद्गुरूंची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. अध्यात्मामध्ये जितके गुरूचे महत्त्व आहे तितकेच ते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आहे. मग ते संगीत असो, क्रीडा असो, आयुर्वेद असो किंवा शिक्षण असो. शिष्याने आपल्यावर मात करावी आणि पुढे जावे अशीच सद्गुरूंची इच्छा असते.

त्यातच त्यांचा आनंद व समाधान असते. याठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची आहे की गुरू सर्वोपरि असले, मार्गदर्शन करत असले, आत्मपरिचय करून देत असले तरी शेवटी त्या मार्गावर चालण्याचे काम आपणा शिष्यांचेच असते. तिथे आपण कमी पडलो तर गुरू तरी काय करणार? आणि हीच ग्यानबाची मेख आहे. याचबरोबर गुरूसमोर अज्ञानी भाव ठेवून जगण्यातच खरा लाभ असतो. ज्ञान प्राप्तीचा मूळ स्रोत असलेल्या गुरूसमोर अज्ञानी बनून बसलो तरच ते दिव्य ज्ञान मिळू शकते. हा गुरू-शिष्य परंपरेतील- संकेत मानला जातो. हा विषय अत्यंत गहन असून याचा विस्तार अफाट आहे. आणि आमचा प्रयत्न अत्यंत तुटपुंजा, क्षुद्र आहे.

हे म्हणजे समोर अथांग सागर पसरलेला आहे. पहाटेची वेळ आहे आणि आकाशातीलदिव्य आभा यज्ञज्वालेप्रमाणे विलसत आहे. थोड्या वेळाने प्रगट होणाऱ्या सूर्याची प्रभा आसमंत उजळून टाकत असताना आपण छोट्या दिव्याने ओवाळणे हे किती तुच्छ असेल?
जेथे वेदगायनाचे गुंजन झाले, वंदन झाले तेथे एखाद्या गवयाने एखादे गाणे म्हणण्यासारखा हा आमचा अल्प प्रयत्न आहे. हे जरी वास्तव असले तरी आमच्या मनातील भाव हा समर्पणाचा आहे, आराधनेचा आहे. वाचकांनी तो समजून घ्यावा ही विनंती. आपली भारतभूमी ही पुण्यभूमी आहे. प्रत्यक्ष परमेश्वराने येथे अवतार धारण केले. अनेक Fषी, मुनी व तपस्वी साधकांनी हजारो वर्षे तपश्चर्या करून ब्रह्माण्डव्यापी चिंतन केले. जगाला मार्गदर्शन केले. ‘विश्वगुरू’ बनून समस्त मानवजातीला सुखाचे मंत्र दिले. परंतु कालौघात विपरित परिस्थिती निर्माण झाली. शेकडो वर्षांच्या आघातांमुळे आपली संस्कृती निष्प्रभ झाली. आपले तत्त्वज्ञान म्हणजे पोपटपंची ठरू लागली. आमचे तेज लोप पावून सर्वत्र ग्लानी निर्माण झाली. कोणीही उठावे आणि टपली मारून जावे अशी आपली असहाय्य अवस्था झाली. आपण आत्मविश्वास गमावून बसलो. आपले पूर्वज, त्यांचा पराक्रम, त्याग विसरलो. स्वत:ला, ‘विश्वगुरू’ म्हणवून घेणे म्हणजे थट्टा करणे झाले.

परंतु याही परिस्थितीत आपण तग धरला. चिवटपणा ठेवला. मूळ हिऱ्यावर पडलेली राख फुंकून झटकण्याचा प्रयत्न चालू ठेवला. आज पुन्हा आशेचे किरण दिसू लागले आहेत. योग साधना, संस्कृत भाषा, आध्यात्मिक चिंतन, निसर्गाचा समतोल आणि विश्वबंधुत्व अशा विचारसूत्रांचा स्वीकार करायला जगाने प्रारंभ केला आहे. जीवनाचे खरे सुख कशात आहे हे शोधण्यासाठी व समजून घेण्यासाठी सारे जग भारताकडे उत्सुकतेने पाहू लागले आहे. सुदैवाने आपल्या धार्मिक, सामाजिक व राजकीय नेतृत्वास याची जाणीव आहे. आता सर्वसामान्य अशा आपण सर्वांनी यामध्ये साथ देण्याची आवश्यकता आहे. समर्थ, वैभवसंपन्न आणि स्वयंपूर्ण भारत हा आगामी काळात ‘विश्वगुरू’ चे स्थान पुन्हा प्राप्त करेल, असा आमचा दृढ विश्वास आहे.
