रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाची किंमत जागतिक पातळीवर वाढली आहे. परिणामी भारतात सुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये २२ रुपये प्रतिलिटर एवढी वाढ अपेक्षित आहे. युद्धाचे संकट तसेच कच्च्या तेलाची वाढती मागणी आणि मागणीच्या प्रमाणात न होणारा पुरवठा या सर्व कारणांमुळे ब्रेंट इंडेक्स मध्ये कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. तेलाचा पुरवठा कमी होईल की काय या भितीमुळे गेल्या तीन दिवसात कच्च्या तेलाच्या किंमती २०% नी वाढल्या आहेत. ब्रेंट इंडेक्स नुसार कच्च्या तेलाच्या किंमती साडेतीन टक्क्यांनी वाढून $१२५ प्रति बॅरेल एवढ्या झाल्या आहेत.
सद्यस्थितीत कच्च्या तेलाचे उत्पादन करणारा रशिया हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. पण रशिया मधील सध्याची परिस्थिती पाहता तेलाचा पुरवठा कमी होत जाईल अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी आर्थिक प्रगतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात केली जाते. त्यामुळे कच्च्या तेलाच्या वाढणाऱ्या किंमती या भारतासाठी नक्कीच विचार करायला लावणाऱ्या आहेत. तेल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी सध्याच्या तेलाच्या किंमती बदलायच्या ठरवल्या तर डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती २० ते २२ रुपयांनी वाढणार आहेत.
“पश्चिमी देश रशियावर अधिकाधिक निर्बंध लादत आहेत. म्हणूनच कच्च्या तेलाचा पुरवठा कमी होण्याच्या भितीने आतापासून तेलाच्या खरेदीसाठी चढाओढ लागली आहे. OPEC शी संलग्न राष्ट्रांनी ठरवलेल्या तेल उत्पादनात कोणताही बदल न केल्याने तेलाच्या जागतिक पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.” “प्रति बॅरेल मागे अजून $१२५ एवढी वाढ अपेक्षित आहे. राजकीय ताणतणाव कमी पुरवठा जास्त मागणी या सगळ्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतील.”

“कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे (-)२.६ दशलक्ष बॅरेल्स कमी पडल्याचं EIA ने आदल्या दिवशी जाहीर केलं.” तसेच सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीचा सामना करता यावा यासाठी रशिया कडे जो राखीव निधी आहे त्यात रशिया वाढ करणार असून परिणामी तेलाच्या निर्मितीत सुद्धा रशिया कडून घट होण्याची शक्यता आहे.
