काश्मीर फाइल्स हा आता फक्त चित्रपट राहिला नसून तो लोकांचा चित्रपट झाला आहे. ‘या चित्रपटामुळे माझ्यात अंतर्बाह्य बदल झाला.

श्री विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे श्री. दर्शन कुमार प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. श्री दर्शन कुमार यांनी आपल्या चित्रपटातील कारकिर्दीची सुरुवात प्रियांका चोप्रा यांच्या मेरी कोम या चित्रपटापासून केली होती. यात त्यांनी प्रियांका चोप्राच्या नवऱ्याची भूमिका केली होती. जो तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. NH10, मिर्झा जुलिएट या चित्रपटांमध्ये काम करून सुद्धा त्यांना हवी तशी भूमिका मिळत नव्हती. पण द काश्मीर फाइल्स हा चित्रपट श्री दर्शनकुमार यांच्या चित्रपट कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट म्हणता येईल.

‘माझ्या मनात पंडितांविषयी अपार कृतज्ञतेचे भाव दाटून आले आहेत. आम्ही कलाकारांनी तर फक्त भूमिका वठवल्या आहेत. पण प्रत्यक्षात त्या लोकांना कोणत्या भयानक परिस्थितीतून जावे लागले असेल या विचारानेच मला आतून हादरवून टाकले आहे. त्यांच्या वेदना मी माझ्या अभिनयाच्या माध्यमातून लोकांपर्यंत थोड्याफार प्रमाणात पोहचवू शकलो हेच माझ्यासाठी खूप आहे‘.

  

‘द काश्मीर फाइल्स’ हा आता एक चित्रपट नसून एक ‘चळवळ’ झाली आहे. या चळवळीचा भाग होऊन तुम्हाला कसं वाटतंय?

मला तर अजूनही हे खरं वाटत नाहीये. पण हो हे खरंच आहे. आता हा फक्त एक चित्रपट नसून ‘लोकांचा चित्रपट’ झालाय. लोकच चित्रपटाची प्रसिद्धी करतायत आणि त्याला पाठिंबाही देतायत. लोकांकडून मला जे प्रेम आणि पाठिंबा मिळतोय त्याने मी भारावून गेलोय. हा चित्रपट नेहमीच माझ्या अत्यंत जवळचा चित्रपट असेल.

तुम्हाला ही भूमिका कशी मिळाली?

मला कास्टिंग डायरेक्टर श्री तरण बजाज यांचा फोन आला. नंतर मी विवेकजी अग्निहोत्री (दिग्दर्शक) आणि सौ पल्लवी जोशी (अभिनेत्री) विवेकजींच्या पत्नी. यांना भेटलो. त्यांनी मला त्या ७०० कुटुंबांचे काही हृदय द्रावक व्हीडिओज दाखवले. आणि त्या दोघांनी मला सांगितले की ते अशा एका प्रमुख कलाकाराच्या शोधात आहेत जो या भूमिकेला न्याय मिळवून देऊ शकेल. पुढच्या क्षणाला मी भूमिका करायला होकार दिला.

तुम्ही मूळचे दिल्लीचे आहात. हा चित्रपट करण्याआधी तुम्हाला काश्मिरी पंडितांबद्दल कितपत माहिती होती?

खरं सांगायचं तर मला काश्मिरी पंडितांबद्दल खूपच कमी माहिती होती. हे सांगतानाही आता मला माझीच लाज वाटतेय. प्रेक्षकांप्रमाणेच मी सुद्धा खूप गोंधळलेला होतो. कारण काही माहीतच नव्हतं.

मला तेव्हाच कळलं जेव्हा विवेकजीनी आणि पल्लवीजीनी मला काश्मिरी पंडितांच्या पहिल्या पिढीतील पीडितांचे व्हिडिओज दाखवले. मला खरोखरच त्यावेळेस खंत वाटली. आणि वाटलं की हेच सत्य आणखी किती काळ लोकांपासून लपवलं जाणार आहे. मग मी मनाशी विचार पक्का केला. हे सत्य लोकांसमोर आपण आणायला हवं. आणि म्हणूनच या चित्रपटाच्या प्रवासाचा भाग झालो.

हा चित्रपट केल्यामुळे तुमच्यात कोणता बदल झाला ?

चित्रपट करण्यापूर्वीचा मी आणि चित्रपट केल्यानंतरचा  मी यात जमीन अस्मानाचा फरक  आहे. या चित्रपटामुळे माझ्यात अंतर्बाह्य बदल झाला. जस आता कोविड महामारीच्या काळात त्या विषाणूने एका देशात जन्म घेतला. आणि संपूर्ण जगात धुमाकूळ घातला. पण त्याचबरोबर आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तींची काळजी घ्यायला आणि त्यांना भरभरून प्रेम द्यायलाही आपल्याला शिकवलं. रशिया युक्रेन युद्धामुळे संपूर्ण मार्केट खाली आलं. आणि उलथापालथ झाली. त्याचप्रमाणे चित्रपटात अमानवी अत्याचार केले की त्याचे परिणाम काय होतात. याबाबतचं कटू सत्य आणि दुःख दाखवलं गेलं आहे. हे खूपच हृदयद्रावक आहे. या चित्रपटाचं तात्पर्य फक्त मलाच नाही तर रसिक प्रेक्षकांना हे सांगून जातं की शांततेने जगायला शिका.आणि हे जग राहण्यायोग्य बनवा.

काश्मिरी पंडितांवरील स्वगतासाठी तुम्ही काय तयारी केली?

एक कलाकार म्हणून १३ पानांचं स्वगत माझ्यासाठी खूप महत्वाचं आणि आव्हानात्मक होतं. चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसापासून मला याच दृश्याची चिंता वाटत होती. कारण काश्मीर मध्ये नेमकं काय घडलं हे मला त्यातून सांगायचं होतं आणि तेही लोकांना कळेल अशा भाषेत. ते दृश्य लांबलचक होतं त्यामुळे विवेक सर मला म्हणाले आपण हे दृश्य दोन दिवसात टप्याटप्याने चित्रित करू. पण त्यामुळे सलगता येणार नाही याची मला भीती होती. मला मनापासून लोकांना सांगायचं होतं. तरच ते प्रेक्षकांच्या मनाला भिडलं असतं. हे स्वगताच दृश्य एका टेकमध्ये पूर्ण झालं. याचा मला आनंद आहे.

या स्वगताबद्दल तुम्हाला काय प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या ?

मला असं वाटत की जे तुमच्या मनातून येत तेच प्रेक्षकांच्या काळजाला भिडतं. मला प्रेक्षकांकडून स्टँडिंग ओव्हेशन मिळतं, काही प्रेक्षक येऊन मला मिठी मारतात, काही आशिर्वाद देतात. ज्यामुळे माझं मन कृतज्ञतेने भरून येतं.

Related posts

Leave a Comment