अभ्यासक्रमातील पाठयपुस्तकात खूप चांगले बदल करण्यात आले आहेत. तुघलक, खिलजी, लोदी, आणि मुघल साम्राज्यकर्त्यांशी संबंधित सगळे धडे अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आले आहेत. फोटो- १६ व्या शतकातील एक चित्र ज्यामध्ये मुघल सम्राट बाबर जेवताना दाखवला आहे. भारत सरकार NCERT च्या अभ्यासक्रमात बदल करणार आहे. भाजप पक्ष बऱ्याच काळापासून सांगत आला आहे की इतिहासामध्ये मुघल शासकांना वाजवीपेक्षा जास्त महत्व दिले जात आहे. NCERT द्वारे केल्या जाणाऱ्या या बदलात बऱ्याच मुघल शासकांविषयी माहिती वगळली जाणार आहे. त्यांच्याबद्दल कमीत कमी माहिती कशी दिली जाईल हे बघितलं जाणार आहे. आमच्या प्रतिनिधीने सहावी ते बारावीच्या इतिहासाच्या सहा पाठयपुस्तकांची तपासणी केली. आणि NCERT च्या अभ्यासक्रमातील बदलांशी तुलना केली.
तपासणीत असं आढळलं की पुस्तकात मुस्लिम राजांशी संबंधित बरेच बदल करण्यात आले आहेत. सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकातील दिल्ली साम्राज्याची माहिती असलेली बरीच पाने वगळण्यात आली. ज्यामध्ये तुघलक, खिलजी, लोदी अशा मुस्लिम राज्यकर्त्यांविषयी धडे होते. या बदलांसंदर्भात जेव्हा NCERT ला विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की सरकारी संस्थाच या संदर्भात निर्णय घेतात. आताच्या अभ्यासक्रमात करोनामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. ज्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान भरून निघेल.
१० जूनला एका पुस्तकाच्या झालेल्या प्रकाशन समारंभात केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शाह म्हणाले की देशाच्या इतिहासात पांड्य, चौल, मौर्य, गुप्त यांचा इतिहास मोघलांच्या तुलनेत कमी दाखवला गेला आहे. पण आता आपला इतिहास पुन्हा एकदा प्रकाशात आणण्याची वेळ आली आहे. आणि हे करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही.

पाठयपुस्तकात केले गेलेले महत्वाचे बदल. सातवीच्या पुस्तकातील ( आपला इतिहास) भारतातील सोमनाथ मंदिरावरील हल्ला करणाऱ्या महमद गजनीच्या नावातून सुलतान शब्द काढून टाकण्यात आला आहे. एका धड्याचे नाव मुघल साम्राज्य होते ते बदलून मुघल केलं गेलं. त्याच बरोबर अकबराच्या साम्राज्याशी संबंधित बरेच धडे वगळण्यात आले. दिल्ली सुलतान या धड्याचं नाव बदलून दिल्ली १२ वे ते १५ वे शतक करण्यात आले.
मुघलांची राज्ये जिथे जिथे होती जसे की अवध, बंगाल, हैद्राबाद, यांची नावे काढून राजपूत, मराठा, शीख यांच्याविषयीचे धडे तसेच ठेवण्यात आले आहेत. अकरावीच्या अभ्यासक्रमातून द सेंट्रल इस्लामिक लँड्स हा धडा काढला गेला आहे. कारण त्यात इस्लामचा विस्तार अफगाणिस्तानापर्यंत होता असे सांगण्यात आले आहे.
