मेडिक्लेम बद्दल ही माहिती प्रत्येकाला असायला हवी!

जेव्हा तुम्ही ठरवता की आपल्याला आरोग्य विमा पॉलिसी विकत घ्यायची आहे, तेव्हा तुम्ही भविष्याचा विचार करता. ज्यांना आर्थिक नियोजन चांगले जमते त्यांना त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी आरोग्य विमा घेणे गरजेचे वाटते. आरोग्य विमा पॉलिसीचा महत्वाचा फायदा असा की पॉलिसी एकदा घेतली की त्यात ९०% हॉस्पिटलचा खर्च भागवता येतो. सध्या कॅशलेस विमा पॉलिसीचा बोलबाला आहे. जर तुमच्याकडे कॅशलेस विमा पॉलिसी असेल तर तुम्हाला फक्त हॉस्पिटलची डिपॉझिट रक्कम भरावी लागते. बाकी सर्व खर्चाची काळजी इन्शुरन्स कंपनी घेते. पण आरोग्य विमा घेताना विचार करून घ्यायला हवा. विमा पॉलिसी त्यातील नियम अटी या व्यवस्थित वाचून अभ्यास करून मगच पॉलिसी घ्यावी. मग त्यानुसार पॉलिसी घेणं योग्य की अयोग्य हे ठरवता येतं. म्हणून आरोग्य विमा पॉलिसी घेताना या पाच गोष्टी लक्षात ठेवाव्यात. 

कव्हरेज

 

पॉलिसी घेतल्यावर त्या पॉलिसीच्या अंतर्गत कोणते फायदे आपल्याला मिळणार आहेत, ते आपल्याला पाहायला हवे. पॉलिसीच्या अंतर्गत कोणते आजार कव्हर होतात ते पहा. जेवढे जास्त आजार कव्हर केले असतील तेवढं चांगलं. हे कव्हरेज तुमच्या गरजेनुसार आहे का ते तपासा. एकाच पॉलिसी मध्ये सर्व काही समाविष्ट असेल असे नाही. तुम्हाला गरज असलेल्या गोष्टी पॉलिसी घेतल्यामुळे पूर्ण होतात का ते पहा. या गोष्टी पॉलिसी मध्ये आधी पासून असायला हव्यात. किंवा त्यासाठी पर्याय द्यायला हवेत. पॉलिसी मध्ये समाविष्ट असलेल्या गोष्टींची जशी यादी असते तशीच पॉलिसी मध्ये काय समाविष्ट होत नाही त्याचीही यादी असते. ती तपासा. म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की कोणत्या गोष्टीचा खर्च तुम्हाला करायचा आहे. त्यामुळे क्लेम करताना तुम्ही जर एखादी समाविष्ट नसलेली गोष्ट दाखवली आणि रिजेक्शन आलं तर ते टाळता येईल. तसेच किमान किती रकमेपर्यंत कव्हरेज मिळते हे तपासा. उदा. हॉस्पिटलच्या खोलीच्या खर्चाचं प्रमाण. खोलीच्या खर्चावर मर्यादा नसलेले प्लॅन्स विकत घ्या. कारण रूम रेंट मर्यादित असलेल्या प्लॅन्स मुळे शेवटी मिळणारी रक्कम कमी मिळते. तसेच पॉलिसीच्या अंतर्गत आयुष ट्रीटमेंट, मोतीबिंदू हे सगळं येतं की नाही तपासा. कमी मर्यादा असलेला किंवा मर्यादा नसलेला प्लॅन निवडा.

वेटिंग पिरियड


वेटिंग पिरियड म्हणजे असा काळ ज्यामध्ये पॉलिसी घेणाऱ्याला त्या पॉलिसीच्या अंतर्गत कोणताही क्लेम (दावा ) करता येत नाही. हा वेटिंग पिरियड संपेस्तोवर त्याला थांबावेच लागते. वेटिंग पिरियड सामान्यतः मधुमेह, रक्तदाब, किडनीचे आजार, प्रसूती या सगळ्यांना लागू होतो. डेंगू, मलेरिया, टायफॉईड इत्यादी हंगामी आजारात तुम्हाला क्लेम करण्याआधी ३० दिवस थांबावे लागते. हे आजार जर आधीपासून असतील तर वेटिंग पिरियड २ ते ४ वर्षांचा असतो. जर अपघात झाला तर मात्र उपचार करण्यासाठी कोणताही वेटिंग पिरियड नसतो. म्हणून सगळ्यात कमी वेटिंग पिरियड असणारी पॉलिसी घ्यावी.

को पेमेंटचा पर्याय


को पेमेंट म्हणजे दाव्याचा काही हिस्सा तुमच्या खिशातून भरणे. हे पैसे तुमच्या खिशातून जाणार असल्याने तुम्हाला याबाबत पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. आरोग्य विम्यामध्ये दोन कारणासाठी को पे चा पर्याय असतो. 1) जर पॉलिसी विकत घेताना तुमचे वय ६० वर्ष आणि त्यापेक्षा जास्त असेल. आणि पॉलिसी मध्ये विमित व्यक्तीच्या नावात तुमचे नाव असेल. 2) जर तुम्ही लोअर झोन मध्ये पॉलिसी विकत घेऊन उपचार हायर झोन सिटी मध्ये घेत असाल.) पहिला नियम टाळण्यासाठी तुम्हाला तरुण वयात इन्शुरन्स घ्यावा लागेल. आणि दुसरा मुद्दा टाळण्यासाठी तुम्हाला योग्य ती इन्शुरन्स पॉलिसी घ्यावी लागेल. असा इन्शुरन्स प्लॅन घ्यावा की ज्यामध्ये विभागवार को पेमेंट नसतील आणि तुम्हाला दाव्याची रक्कम जास्त मिळेल. आणि स्वतःच्या खिशातून जास्त रक्कम भरावी लागणार नाही.

हॉस्पिटल नेटवर्क


आता सर्वांनाच माहित आहे की कॅशलेस क्लेम केल्यास क्लेमचे पैसे लवकर मिळतात. आणि तुम्हाला तुमच्या बचतीतून कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. कारण बिलाचे सर्व पैसे विमा कंपनी भरते. आणि त्यामुळे कागद्पत्रही कमी लागतात. पण कॅशलेस क्लेम हे नेटवर्क हॉस्पिटल मध्येच उपलब्ध असते. म्हणून विमा कंपनीच्या यादी मध्ये कोणती नेटवर्क हॉस्पिटल आहे ते बघावे. जेवढी जास्त नेटवर्क हॉस्पिटल यादीमध्ये असतील तेवढे तुमच्या शहरात वैद्यकीय सुविधा मिळण्यास सोप्पे जाते. तुम्ही उपचार घेत असलेले हॉस्पिटल नेटवर्कचा भाग आहे का ते तपासावे.

परस्परातील विश्वासार्हता


विमा कंपनी ही विश्वासार्हतेच्या तत्वावर काम करत असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही पॉलिसी घेता तेव्हा कंपनीला सर्व माहिती खरीखुरी देणे आवश्यक आहे. कोणतीही लपवाछपवी करू नये. त्या माहितीत खालील गोष्टी येतात. तुमची जीवन शैली, सवयी, मद्यपान करणे, धूम्रपान करणे, तंबाखू खाणे इत्यादी. पूर्वी काही क्लेम केला असल्यास त्याची माहिती देणे. आणखी कोणती विमा पॉलिसी सुरु असल्यास.
मागे काही क्लेम किंवा पॉलिसी रिजेक्ट झाली असल्यास सध्या काही आजार असल्यास.

यामुळे कंपनीला पॉलिसी देताना सोप्प जाईल. जर तुम्ही माहिती लपवली आणि विमा कंपनीला नंतर कळलं तर तुमची पॉलिसी रद्द होऊ शकते. क्लेम रिजेक्ट होऊ शकतो. तसेच तुम्ही या आधी भरलेले सर्व हप्ते अवैध ठरू शकतात. म्हणूनच आरोग्य विमा घेताना थोडा अभ्यास करावा लागतो. विमा पॉलिसी घेताना बाकीच्या पर्यायांची तुलना करून मगच योग्य फायदे देणारी पॉलिसी घ्यावी. म्हणजे मग ज्या उद्देशाने तुम्ही पॉलिसी घेण्याचा विचार केला असेल तो उद्देश सफल होईल. आणि तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा आर्थिक सुरक्षितताही मिळेल.

Related posts

Leave a Comment