आपल्याकडे काही विषय असे आहेत की त्यावर प्रत्येक कलेच्या माध्यमातून सादरीकरण करता येते. महात्मा गांधी यांच्यावर आजपर्यंत पुस्तके, कविता, सिनेमा, नाटके सर्व झाली आहेत. पण या विषयावर संगीत नाटक होऊ शकते असा मात्र कधी विचार कोणाही कलाकाराच्या मनात आला नसेल. पण हे आव्हान दानेश खंबाटा या व्यक्तीने स्वीकारून त्याचे लेखन व दिग्दर्शन करीत ‘गांधी-द म्युझिकल’ हे इंग्रजी संगीत नाटक सादर केले आहे. दोन तासांच्या अवधीत संपूर्ण गांधी चरित्र संगीताच्या माध्यमातून सादर करणे हे एक मोठेच आव्हान होते. पण हे नाटक पाहिल्यानंतर त्याच्या यशस्वी प्रयोगाने मन प्रसन्न होते आणि आश्चर्यचकितही! मुंबईच्या प्रख्यात एनसीपीए नाट्यगृहात सलग १६ दिवस दररोज हे नाटक सादर झाले. असंख्य लोकांनी त्याचा आस्वाद घेतला. ‘गांधी’ सिनेमाने ज्याप्रमाणे गांधी चरित्राला एका उंचीवर नेले, तेच काम या नाटकाने देखिल केले आहे. यातील कलाकार, संगीतकार, नृत्य दिग्दर्शक, नेपथ्य इत्यादी सर्वच बाबी उत्कृष्ट असून एक वेगळा अनुभव देणाऱ्या आहेत. या नाटकाने इतिहासाची पाने पुन्हा उलगडली गेली आहेत.
युरोपातील ब्रॉडवे पद्ध-तीच्या या नाटकाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेत होते. तरूण गांधी येथे दिसतात ते आधुनिक वेशभूषेत. अभिषेक कृष्णन या कलाकाराने ही भूमिका साकारली आहे. पण पूर्वार्धात नाटक पकड घेत नाही. नेपथ्य, संगीत, गायन सर्व उत्तम असूनही नाटक भावत नाही. प्रेक्षकांशी नाते जोडण्यात नाटक येथे कमी पडते. परंतु नंतरच्या उत्तरार्धात जेव्हा पंचा नेसून आपला गोल चष्मा घालून नवे गांधी अवतरतात, तेव्हा अंगावर काटा येतो. हा गांधी आपले संपूर्ण लक्ष वेधून घेतो. चिराग व्होरा या गुजराती रंगभूमीवर विविध भूमिका करणाऱ्या कसलेल्या कलाकाराने आपणा सर्वांना माहित असलेले गांधी सादर केले आहेत. हुबेहुब दिसणाऱ्या या कलाकाराने आपल्या अभिनयाने गांधींचे व्यक्तिमत्त्व जिवंत केले आहे. हातात काठी, खादीचा पंचा असा साधा वेश असला तरी आवाजाची फेक, संवादांचे शब्द आणि जोडीला अप्रतिम संगीत व नेपथ्य यामुळे प्रत्येक प्रसंग अक्षरश: अंगावर येतो.
दांडी मार्च सादर करताना गांधी प्रेक्षकांमध्ये येतात व त्यातच बसविलेले त्यांचे साथीदार एकेक करून त्यांना सामील होतात हे पहाणे मोठे उद्बोधक होते. या सर्वांनी मिळून जे क्षणचित्र सादर केले, त्याने दांडी मार्चचा इतिहास मनावर कोरला जातो. असाच वेगळा प्रकार देशाच्या विभाजनाच्या प्रसंगी दिसतो. दोरीच्या एका टोकास गांधींना बांधले आहे आणि दुसऱ्या टोकास आहेत बंडखोर तरुण! आपल्या आमरण उपोषणाने बापू बंडखोरांना शांत करतात व त्या दोरीचे रुपांतर अशोकचक्रात होते. यावेळचे संवादही रोखठोक आणि नेमके आहेत.
भारतास स्वातंत्र्य मिळाल्याचा प्रसंग जेव्हा साकार होतो तेव्हा सर्व प्रेक्षागृह उठून उभे राहते आणि मानवंदना देते. हा अनुभवही विलक्षण! सहजपणे प्रेक्षक नाटकात सहभागी होतात.
ब्रॉडवे नाटकाची जी वैशिष्ट्ये आहेत त्यातून प्रेरणा घेऊन अनेकांनी त्यात नवनवीन संकल्पनांची भर घातली आहे. ज्यांनी हा प्रकार पहिल्यांदा पाहिला त्यांनी तो नुसता स्वीकारलाच नाही तर त्याचे कौतुकही केले. या प्रकारामुळे एनसीपीएने एका नवीन क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध- केले आहे असे म्हणावयास हरकत नाही.
नाटकानंतर प्रमुख भूमिका साकारणाऱ्या चिराग व्होराशी बोलताना काही गोष्टी ध्यानात आल्या. या नाटकासाठी ज्याप्रकारे संशोधन करून प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे तो चांगलाच यशस्वी झाला आहे. गांधीजींची समर्पक उत्तरे, त्यांची शारीर भाषा, चालणे, बोलणे आणि त्यांच्या आवाजाचा पुन:प्रत्यय मिळणे याचा फार मोठा प्रभाव निर्माण करण्यात कलाकार व दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत. पूर्वार्धात वेगवेगळी संसाधने व वेशभूषेचे विविध प्रकार पाहून आश्चर्य वाटत असले तरी नाटकात मन गुंतत नव्हते. उत्तरार्धात मात्र याची कसर भरून निघते. शेवटी तर सर्व प्रेक्षक उभे राहून कलाकारांना मानवंदना देतात.
यातील उल्लेखनीय प्रसंग म्हणजे गोलमेज परिषद, असहकार आंदोलन, कस्तुरबांचा मृत्यू, थोरल्या मुलाशी त्यांचे नाते अशी देता येतील. ही सर्व अनुभवण्यासारखीच आहेत. या नाटकात १६ गाणी व १२ नृत्ये असून भव्य सेटस् उभारलेले आहेत.
या संगीत नाटकात रॉक, जॅझ, क्लासिकल आणि प्रेमगीते हे सर्व प्रकार असल्याने नवीन पिढीला आवडणारे आहेत.
गांधी – एक श्रद्ध-ास्थान, एक तत्त्वप्रणाली या नात्याने मनावर ठसणारे हे नाटक झाले आहे. याचे संगीत नरिमन खंबाटा व राहुल पैस यांनी दिले असून नेपथ्य फलि उनवाला यांनी रचले आहे. नृत्य दिग्दर्शनाचे काम बर्टविन डिसोझा यांनी केले असून गांधींची भूमिका चिराग व्होरा, तरूण गांधी-अभिषेक कृष्णन्, कस्तुरबाच्या भूमिकेत निवेदिता बौन्थियाल, तरूण कस्तुरबा-निशी दोशी आणि हरिलालच्या भूमिकेत हर्षपाल ंिसह आहेत. लेखन व दिग्दर्शन दानिश खंबाटा यांचे आहे.
