समाजामध्ये जातीपातीवरून भेदभाव केला जाऊ नये म्हणून सावरकरांनी केलेला संघर्ष.

एखाद्या व्यक्तीमध्ये असलेले गुण वा कौशल्य या गोष्टी अनुवांशिक नसून व्यक्तीमध्ये ते अंगिभूतच असतात. उदा. एखाद्या व्यक्तीचे आजोबा खापरपणजोबा समजा कमालीचे हुशार असतील तर जरुरी नाही की ती व्यक्ती सुद्धा हुशार असायला हवी असे नसते. हुशारी हा संबंधित व्यक्तीमध्ये मुळातच असावा लागतो. त्यामुळे गुण कला कौशल्य या गोष्टी आपल्याला अनुवंशिकतेने मिळत नाहीत. तर त्या कमवण्यासाठी बुद्धी बरोबरच मेहनत ही घ्यावी लागते, असं सावरकरांचं मत होतं. त्याचप्रमाणे समाज सुधारल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही असेही सावरकर म्हणत असत.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे २६ फेब्रुवारी १९६६ रोजी देहावसान झाले. त्या गोष्टीला आज ५६ वर्षे झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे असा माणूस होता जो नेहमीच काळाच्या पुढचं पाहू शकत असे. म्हणजेच त्यांचे विचार काळाच्या पुढचे होते. म्हणूनच तर आपण त्यांना ‘कालजयी सावरकर’ असे म्हणतो. राष्ट्रीय एकात्मता हेच त्यांच्या जीवनाचे तत्व होते.

 

एकात्मता म्हणजे सर्वांना समान हक्क, परस्परांमध्ये एकजुटीची भावना असणे. राष्ट्रीय एकात्मतेचे तत्व हे समता, परस्पर बंधुभाव एवढ्यापुरते मर्यादित नसून परस्परांमध्ये समरसतेची भावना यामुळे निर्माण  होते. सोप्या शब्दात याला सामाजिक समरसता म्हणतात. जी या देशाच्या मातीत खोलवर रुजलेली आहे.  समरसता या शब्दाचा अर्थ असा आहे. समता म्हणजेच कोणताही भेदभाव न करणे. उदा. वारकरी संप्रदायात समोर उभा असलेला व्यक्ती लहान असो वा मोठा त्याच्या पाया पडण्याची पद्धत आहे. ती ही समता. म म्हणजे ममत्व. समोरच्या बद्दल आपुलकीची भावना बाळगणे. र म्हणजेच प्रामाणिकपणा. स म्हणजेच समानता. सर्व समान आहेत. त म्हणजे तारतम्य. सद्सद्विकबुद्धी जागृत ठेऊन समोरच्या व्यक्तीशी वागणे.

समरसता ही सातत्याने सुरु राहणारी क्रिया आहे. जेणेकरून समाजातील सर्वच घटकांना समान वागणूक मिळू शकेल. तसेच कोणताही भेदभाव केला जाणार नाही. एका कर्मठ चित्पावन ब्राह्मण कुटुंबात जन्माला येऊनही तात्यारावांनी हिंदू धर्मातील वाईट प्रथांचा नेहमीच निषेध केला. पूर्वीच्या काळी काही विशिष्ट पदार्थ खाल्ले असता ’माणूस बाटला’ किंवा त्याचा धर्म भ्रष्ट झाला असे  मानण्यात येई. उदा. एखाद्याने समजा पाव, ब्रेड खाल्ला तर त्याने धर्म बुडविला, तो भ्रष्ट झाला असे  समजण्यात येई. पण तात्याराव याच्या विरोधात होते. त्यांचे असे म्हणणे होते कोणताही विशिष्ट पदार्थ खाल्ला म्हणजे धर्म भ्रष्ट होतो असे काही नाही. धर्म हा प्रत्येकाच्या मनात असायला हवा, पोटात नव्हे.

सावरकरांचे विचार किती जहाल स्वरूपाचे होते पहा. १९०६ साली जेव्हा तात्याराव गांधीजींना प्रथम  लंडन मध्ये भेटले तेव्हा तात्याराव घरी स्वयंपाक करत होते. त्यांनी प्रॉन्ज/ कोळंबी शिजवायला ठेवली  होती. तेवढ्यात गांधीजी घरी आले. तात्यारावांनी विचारले खाणार का? चित्पावन ब्राह्मण असून सुद्धा  सावरकर मांसाहार करतात हे गांधीजींना खटकले. गांधीजी ‘शुद्ध शाकाहारी’ असल्यामुळे साहजिकच  त्यांनी खायला नकार दिला. तात्याराव हसून म्हणाले.‘ जर तुम्ही माझ्यासोबत हे खाऊ शकत नसाल तर तुम्ही माझ्यासोबत पुढे काम कसं करणार? वास्तविक हा फक्त उकडलेला मासा आहे, आता या क्षणी आपल्याला, आपल्या देशाला अशा व्यक्तींची गरज आहे जे ब्रिटिशांना जिवंत खायला तयार असतील’

अस्पृश्यता, स्त्रियांवरील अत्याचार, जातीपातीवरून केले जाणारे राजकारण या सगळ्या कृष्णकृत्यांपासून  आपले राष्ट्र कायमचे मुक्त व्हावे असे सावरकरांना नेहमी वाटत असे. आपल्या देशामध्ये सर्वाना समान अधिकार असावेत, तीनिहाय समाजाची वाटणी केली जाऊ नये उदा. पूर्वी समाजाची रचना चार स्तरांमध्ये विभागली होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. अशी विभागणी न करता सर्वांना समान वागणूक मिळायला हवी. जेणेकरून परस्पर बंधुत्वाची भावना वाढीस लागेल. एकूणच तात्यारावांना अशी एक समाजव्यवस्था निर्माण करायची होती ज्यात हे चार स्तरच नसतील. आणि संपूर्ण राष्ट्र हिंदू राष्ट्र किंवा हिंदुस्थान म्हणून ओळखले जायला हवे असे तात्यारावांना वाटे. सावरकरांचे लिखाण आपण बघितले तर त्या लिखाणात आपल्याला हिंदुस्थान हा शब्द जास्त वेळा वापरलेला दिसून येईल. असा हिंदुस्थान जिथे दलितांना सुद्धा आनंदाने राहता येईल.

अंदमान मध्ये असताना त्यांच्या भावाला पाठवलेल्या पत्रात सावरकर लिहितात ‘जाती व्यवस्थेवर आधारलेला समाज देशासाठी घातक ठरू शकतो. तेव्हा ही जातीव्यवस्था समूळ नष्ट व्हायला हवी’ नारायणरावांना पाठवलेल्या दुसऱ्या एका पत्रात सावरकर लिहितात.‘ समाजामध्ये पाळल्या जाणाऱ्या  स्पृश्यास्पृश्यतेच्या विरोधात, जातीवरून केल्या जाणाऱ्या भेदभावाच्या विरोधात आवाज उठवण्याची  गरज आहे. ज्या तीव्रतेने ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची गरज आहे त्याच तीव्रतेने समाजातील स्पृश्यास्पृश्यता कमी व्हावी म्हणून लढण्याची गरज आहे’ असे मला वाटते. ‘हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी समाजातील जातपात व्यवस्था नष्ट व्हावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत  इतकेच नव्हे तर या व्यवस्थेचे चटके ज्या

लोकांना बसले आहेत त्या लोकांच्या पाठीशीही कार्यकर्त्यांनी उभे राहायला हवे.’ १९३१ साली प्रकशित झालेल्या ‘हिंदू समाजातील ७ बेड्या’ या त्यांच्या पुस्तकात सावरकर लिहितात,  व्यक्तीमधील गुण, कला, कौशल्य हे त्याच्या पूर्वजांकडून व्यक्तीमध्ये येतात असे म्हणणे चुकीचे आहे. या उलट व्यक्तीचे  चारित्र्य, त्याच्या अंगीचे गुण त्याच्या सभोवतालच्या वातावरणामुळे त्याच्या मध्ये येत असतात. उदा. एखाद्या व्यक्तीला चोऱ्यामाऱ्या करण्याची सवय असेल तर त्यात त्या व्यक्तीचा दोष नसून त्याच्या भवतालचे वातावरण आणि व्यवस्थेचा आहे. जाती व्यवस्थेचा पुरस्कार करणाऱ्या ‘मनुस्मृती’ च्या विरोधात सावरकर होते. सावरकरांच्या मते असे धार्मिक ग्रंथ म्हणजे सत्ता गाजवणाऱ्यासाठी हत्यार असते ज्याचा उपयोग ते स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी करतात.

‘जात’ हे असे न दिसणारे शस्त्र आहे ज्यामुळे हिंदू समाजाचे नुकसान होऊ शकते, असे सावरकरांचे मत होते. स्पृश्यास्पृश्यता आणि समाजातील जातीनिहाय भेदभाव नष्ट व्हायला हवा हे नुसतेच बोलून सावरकर  थांबले नाहीत तर त्यांनी ते आचरणातही आणले. रत्नागिरी जिल्ह्यात तात्यारावांनी ‘पतित पावन’ मंदिर बांधले. जिथे हिंदूंबरोबर दलितांना सुद्धा प्रवेशास मुभा होती. जाती व्यवस्थेपासून मुक्त  असा समाज निर्माण करणे शक्य आहे हे सावरकरांनी यातून दाखवून दिले. त्यांनी हिंदू समाजातील ७ बंधनांचा तितकाच विरोध केला जेवढा त्यांनी ब्रिटिशांचा केला. बाबासाहेब आंबेडकरांनी सावरकरांच्या या प्रयत्नांचे कौतुक केले. ‘समाजसुधारणेसाठी आपण करत असलेल्या कामाची मी या निमित्ताने प्रशंसा करू इच्छितो.

अस्पृश्य समाज जर हिंदू समाजाचा एक भाग व्हायला हवा असेल तर फक्त स्पृश्यास्पृश्यता हटवून उपयोगाचे नाही तर आपल्याकडील चातुर्वणीय व्यवस्था मूळापासून नष्ट करायला हवी. तुम्हाला हे इतक्या लवकर लक्षात आले या गोष्टीचा मला आनंद आहे’.मानवी जीवन मूल्यांचा सावरकरांवर फार मोठा प्रभाव होता. सामाजिक सुधारणा आणि राजकीय स्वातंत्र्य याविषयी एका चर्चासत्रात बोलताना ते म्हणाले होते. ‘समाज सुधारल्याशिवाय जर आपल्या  देशाला स्वातंत्र्य मिळालं तर ते ३ दिवसही टिकणार नाही.’ म्हणूनच समाजामध्ये समानता आणि समता ही मूल्ये रुजवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

सावरकरांचे आणखीही काही पैलू आहेत ज्यांच्यावर प्रकाश टाकणे गरजेचे आहे. हिंदुत्वाचा प्रसार करणे  हा त्यांच्या जीवनाचा फक्त एक पैलू होता. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे असं एक  व्यक्तिमत्व होतं ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन भारतीय समाज स्पृश्यास्पृश्यता आणि जातीनिहाय समाजव्यवस्था यातून मुक्त कसा होईल या उद्दिष्टाप्रती समर्पित केलं होतं. हिंदुत्वाचा प्रसार करण्याव्यतिरिक्त समाजसुधारक, लेखक, कवी, एक खरा राजकीय नेता, स्वातंत्र्य सेनानी आणि दूरदृष्टीने विचार करणारा माणूस असं विविधरंगी व्यक्तिमत्व सावरकरांचं होतं.

Related posts

Leave a Comment