काळीमिरी, दालचिनी, जायफळ व लवंग यासारखी किमती मसाला पिके कोकणामध्ये उत्कृष्ट प्रकारे येऊ शकतात हे विद्यापीठाने सिद्ध केले आहे. जायफळाच्या ‘कोकण स्वाद’, ‘कोकण सुगंधा’, ‘कोकण श्रीमंत’ तर दालचिनीच्या ‘कोकण तेज’ व ‘कोकणात शक्य तेथे नारळ, सुपारी बागांमध्ये होणे आवश्यक आहे. ही पिके कोकणातल्या शेतकऱ्याला उत्तम प्रकारे आर्थिक स्थिरता देऊ शकतात.
– डॉ. किसन लवांडे
नारळ आणि सुपारी ही कोकणातील मुख्य बागायती पिके आहेत. नारळाखाली सुमारे ३३,००० हेक्टर इतके तर सुपारीखाली ३५०० हेक्टर इतके क्षेत्र कोकणामध्ये आहे. कोकणातील बदलत्या हवामानाला समर्पकपणे प्रतिसाद देणाऱ्या पिकापैकी नारळ हे एक पीक आहे. मात्र नारळाची सध्याची कोकणामधील उत्पादकता देखील अपेक्षित उत्पादकतेपेक्षा बरीच कमी आहे. नारळामध्ये मसाला पिकांची मिश्र पद्धतीने लागवड करणे हा नारळाची उत्पादकता वाढविण्याचा सर्वांत प्रभावी उपाय आहे. जायफळ, दालचिनी, काळीमिरी नारळ बागेमध्ये उत्तम प्रकारे येऊ शकतात. या सर्व पिकांच्या सुधारित जाती व लागवडीचे तंत्रज्ञान विद्यापीठामध्ये उपलब्ध आहे; मात्र नारळ व मसाला पिकांची लागवड केल्यानंतर त्यांचे अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. नारळाची फळे सध्या तरी माणूस झाडावर चढून काढतो. ही बाब दिवसेंदिवस जिकिरीची होत चालली आहे. विद्यापीठाने नारळाची फळे काढणीसाठी शिडी विकसित केली आहे. मात्र ती छोट्या शेतकऱ्यांसाठी अधिक सुटसुटीत कशा प्रकारे करता येईल, याबाबतचे संशोधन केले जाईल. नारळाच्या गेंड्या भुंगा, सोंड्या भुंगा, पाने खाणारी काळ्या डोक्याची अळी व इरिओफाईड कोळी या मुख्य किडी आहेत. विद्यापीठाने यांच्या नियंत्रणासाठी नावीन्यपूर्ण अशा जैविक नियंत्रण पद्धती विकसित केल्या आहेत. उदाहरणार्थ, गेंड्या भुंग्यासाठी बॅकिसो व्हायरस, सोंड्या भुंग्यासाठी रक्षक-२ व पाने खाणाऱ्या काळ्या डोक्याच्या अळीसाठी गोनिओझस नेफॅन्टीडीस यांचा वापर मोठ्या प्रमाणावर करणे आवश्यक आहे. भविष्यात कोकणामध्ये नारळाची लागवड वाढविण्यासाठी बुटक्या व अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची आवश्यकता आहे. याबाबतच्या सुरू असलेल्या संशोधनाचे बळकटीकरण करण्यात येईल. त्या प्रमाणे नारळामधील कीड व रोगनियंत्रण, यांत्रिकीकरण या बाबीवरील अधिक भर देण्यात येईल.
कोकणात विशेषतः ठाणे जिल्ह्यातील चिकू प्रसिद्ध आहे. मात्र सध्या बुरशीजन्य रोगामुळे होणारी फळगळ तसेच बी पोखरणारी अळी यामुळे चिकूच्या उत्पादकता आणि प्रत यावर विपरीत परिणाम झाला आहे. योग्य प्रकारे झाडाचे शाखीय व्यवस्थापन, तसेच कीड व रोगांपासून संरक्षणासाठी उपाय यावर अधिक संशोधन भविष्यात हाती घेतले जाईल. कोकणासाठी कालीपत्ती बरोबरच सुधारित जातींवर देखील संशोधन हाती घेण्यात येईल.
काळीमिरी, दालचिनी, जायफळ व लवंग यासारखी किमती मसाला पिके कोकणामध्ये उत्कृष्ट प्रकारे येऊ शकतात हे विद्यापीठाने सिद्ध केले आहे. जायफळाच्या ‘कोकण स्वाद’, ‘कोकण सुगंधा’, ‘कोकण श्रीमंत’ तर दालचिनीच्या ‘कोकण तेज’ व ‘कोकणात शक्य तेथे नारळ, सुपारी बागांमध्ये होणे आवश्यक आहे. ही पिके कोकणातल्या शेतकऱ्याला उत्तम प्रकारे आर्थिक स्थिरता देऊ शकतात. या पिकांच्या उत्तम जातींची कलमे/रोपे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. या बरोबरच वेलची, हळद, आले या पिकांना देखील कोकणात उत्तम वाव आहे. भविष्यात या पिकांवर अधिक संशोधन हाती घेण्यात येईल.
कोकम, फणस, करवंद, पपनस, रामफळ, जांभूळ ही कोकणात पूर्वापार होत असलेली पिके आहेत; मात्र या पिकांची व्यापारी तत्त्वावर लागवड म्हणावी तशी झालेली नाही. किरकोळ प्रमाणात घरगुती स्तरावर किंवा अन्य मुख्य झाडांच्या बागेमध्ये ही पिके लावल्याचे दिसून येते. या पिकांची लागवड आंबा, काजूसारख्या मुख्य पिकांच्या बागेत किमान २० ते २५ टक्के क्षेत्रावर होणे आवश्यक आहे. कोकम व फणसासारखी पिके प्रक्रिया उद्योगासाठी अत्यंत पूरक आहेत. संपूर्ण जगात यांच्या मूल्यवर्धित पदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सद्य:स्थितीत या पिकांची मुळातच लागवड अत्यल्प असल्यामुळे या फळांची काढणी केल्यानंतर ती एकत्र गोळा करणे, वाहतूक व साठवण खूपच त्रासाचे होते. परिणामी, बऱ्याच फळांचा नाश होतो व प्रक्रिया करण्यास मर्यादा पडते. या पिकांची एकत्रित लागवड मोठ्या प्रमाणावर झाल्यास कोकणातील प्रक्रिया उद्योगासाठी चांगल्या प्रकारे कच्चा माल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ शकेल. महत्त्वाचे म्हणजे बदलत्या हवामानाचा आंबा व काजूसारख्या पिकांवर विपरीत परिणाम होताना या पिकांपासून उत्पन्न मिळून एक प्रकारची शाश्वती व आर्थिक स्थैर्य शेतकऱ्याला मिळेल. करवंदासारख्या पिकाचा विचार बागेच्या कुंपणासाठी करणे आवश्यक आहे. ज्यामुळे बागेचे रक्षण होऊन उत्पन्नदेखील मिळेल. या पिकांमधील सुधारित जाती निर्माण करणे, त्यांची मोठ्या प्रमाणावर कलमे/रोपे निर्मितीसाठी अभिवृद्धीचे तंत्रज्ञान विकसित करणे, शास्त्रोक्त व्यवस्थापन पद्धती विकसित करणे या बाबींवर सुरू असलेले संशोधन अधिक बळकट करण्यात येईल.
मिरची, वांगी, टोमॅटो ही व्यापारी भाजीपाला पिके कोकणातसुद्धा उत्तम प्रकारे होऊ शकतात; मात्र मर रोगाचा प्रादुर्भाव या तिन्ही पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. कारली, काकडी, शिराळी, पडवळ, भेंडी, दुधीभोपळा या भाजीपाला पिकांबरोबरच स्थानिक भाजीपाला, जसे की वाली, तोंडली, करटोली ही वैशिष्ट्यपूर्ण भाजीपाला पिके कोकणात करण्याला फार मोठा वाव आहे. विशेषतः मोठ्या व मध्यम बंधाऱ्यांच्या लाभक्षेत्रामध्ये भाजीपाला लागवडीस चांगलं स्थान आहे. भविष्यात या भाजीपाला पिकांवर अधिक संशोधन हाती घेण्यात येईल.
कोकणात कणगर, घोरकंद, सुरण, रताळी इत्यादी कंदपिके उत्तम प्रकारे होतात. मात्र या पिकांखाली लागवडीचे क्षेत्र नगण्य आहे. या पिकांखालील क्षेत्रात वाढ होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बियाणे/ रोपे निर्मिती करणे आवश्यक आहे. याबाबतचे संशोधन हाती घेण्यात येईल. कोकणामधील मुख्य पिकांमध्ये ज्या ठिकाणी शक्य आहे. त्या ठिकाणी भाजीपाला व कंदपिके आंतरपिके म्हणून घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे उपलब्ध क्षेत्राची उत्पादकता वाढू शकेल, तसेच पूरक उत्पन्नाचे साधन निर्माण होईल.
(लेखक दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आहेत.)
