-प्रशांत असलेकर
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक निःशब्द क्रांती घडते आहे. कृषी पदवी घेतलेले तरूण प्रत्येक तालुक्यात तयार होत आहेत. शेतीबाबत नवनवे प्रयोग करीत आहेत आणि त्यांच्या प्रयोगांना चांगले यशही मिळत आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या वाचल्या की वाटते की शेतीची परिस्थिती अतिशय निराशाजनक आहे.एका दृष्टीने पाहिले तर प्याला अर्धा रिकामा आहे. परंतू नवनवे प्रयोग करणाऱ्या या शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचल्या की वाटते सगळीच आशा अजून संपलेली नाही. बरेच काही आशादायकही घडत आहे. तोच प्याला अर्धा भरलेलाही आहे. एक नवा महाराष्ट्र घडतो आहे.
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राची ओळख टँकरच्या देशा अशी बनत चालली आहे. दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीपासूनच राज्यातील ३६ हजार खेड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. गेल्या वर्षी लातुरला पाणी एक्सप्रेस पाठवण्याची वेळ आली होती. भरघोस पाऊस असलेल्या कोकणातही गेल्या काही वर्षांत पाणीटंचाईची समस्या उग्र रूप धारण करते आहे. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात तर बाजारभाव न मिळाल्याने प. महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरलाय. एकूण वरवर पाहता कृषीक्षेत्राचे सगळे चित्र निराशजनकच दिसते. मात्र अशाही परिस्थितीत याच महाराष्ट्रातले काही शेतकरी बुध्दीचा वापर करून शेतीत नवनवे प्रयोग करत आहेत आणि उपलब्ध पाणी व जमिनीतच कृषीउत्पादन वाढवून स्वतःचे उत्पन्न वाढवित आहेत. अशा धीरोदात्त शेतकऱ्यांमुळे वाटते की योग्य नियोजन केल्यास शेती अजूनही किफायतशीर ठरू शकते. सगळीच परिस्थिती अजून हाताबाहेर गेलेली नाही, आशेला अजून बराच वाव आहे.
यातले एक उदाहरण म्हणजे लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावच्या शेतकऱ्यांनी चालवलेला समूह शेतीचा प्रयोग. १९९३च्या भीषण भूकंपासाठी प्रसिध्द असलेला किल्लारी परिसर आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. तेव्हा भूकंपात किल्लारी हे गावच नष्ट झाले होते. आज किल्लारी परिसरातील शेतकऱ्यांनी सामूहिक शेतकरी मंडळ स्थापन करून समूह शेती करून चांगली प्रगती साधली आहे.
एकट्याने शेती करण्यात अनंत अडचणी येतात. खूप वाटण्या झाल्याने शेतकरी अल्पभूधारक बनला आहे. त्यामुळे शेती तोट्यात जाऊ लागली. तेव्हा किल्लारीच्या दीपक शामराव पाटील या तरूण शेतकऱ्याने गावातील लोकांना समूहशेतीचे आवाहन केले. त्याचे आजोबा रावसाहेब पाटील हे गावातील सर्वमान्य नेते होते. त्यांच्या तरूणपणी त्यांनी डोंगरउतारावर धूप थांबवण्यासाठी आडवी पेरणी, एकसंघ शेती असे प्रकल्प किल्लारी तालुक्यात राबवले होते. १९७२च्या दुष्काळात सगळ्या पंचक्रोशीला धान्य वाटले होते. अशा आजोबांचा नातू असलेल्या दीपकने गावकऱ्यांना समूहशेतीसाठी राजी केले. गावातील तरूणांनी ङ्करावसाहेब पाटील शेतकरी मंडळाङ्खची स्थापना केली. प्रथम ते दर आठवड्याला एकत्र येऊन शेतीवर चर्चा करत. इतर संस्थाशी संपर्क करत. शेतीविषयक सहली काढत. त्यातून त्यांनी पंचक्रोशीतील पाच गावच्या २६५ शेतकऱ्यांना एकत्र करून सामूहिक शेतीत सहभागी केले. या समूहाने एकूण शेतीचे भाग पाडून प्रथम सोयाबीन व निर्यातक्षम मिरचीची पेरणी केली. प्रत्येकाला कामे वाटून दिली. प्रत्येकाने आपापली जबाबदारी नीट पार पाडायची असे ठरले. त्याप्रमाणे काम करताना सोयाबिनचे भरघोस उत्पादन आले व एका कंपनीने ते जागेवरच खरेदी केले. पीक बाजारात नेण्याचा खर्चही वाचला. तीच गोष्ट सिमला मिर्चीबाबत घडली. एका निर्यातदार कंपनीने या शेतकरीसमूहाची मिरची जागेवर आणि ठरलेल्या किमतीपेक्षा जास्त बोनस देऊन खरेदी केली. एकाच अटीवर की पुढल्या वर्षीही आम्हालाच मिरची द्या.
आता किल्लारीच्या रावसाहेब पाटील शेतकरी मंडळाची सामूहिक शेती चांगलीच स्थिरावली आहे. हे मंडळ सगळ्या शेतीचे गट पाडून त्यात विविध पिकांचे एकत्र उत्पादन घेते. एकाच पिकावर अवलंबून राहत नाही. त्यामुळे एखाद्या पिकाला नीट बाजारभाव मिळाला नाही तरी ते नुकसान इतरत्र भरून येते. पाच गावातील शेतीचे उत्पन्न एकत्र करून सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाच्या व जमिनीच्य प्रमाणात पैसे वाटप केले जातात. सर्व कारभार पारदर्शी पध्दतीने होतो. सर्व शेतीला लागणारे बियाणे, मल्चिंग पेपर, कीटकनाशके, रोपे एकत्र खरेदी केली जातात.
