इथं वाहक चालणाऱ्यांना श्रेष्ठ मानतात अशी संस्कृती आहे इथली. सिग्नलवर पादचारी रस्ता ओलांडताना वळण घेऊन जाणाऱ्या वाहनांना तेथून पुढे जायची परवानगी असते परंतु वाहक नेहमीच पादचाऱ्यांना आधी जाऊ देतो. ती लांबलचक भव्य गाडी सहजच अदबीने मागे थांबताना तुम्हाला अदबीने रस्ता ओलांडायची विनंती करीत असते. गाडीवाला अरेरावीत आधी पुढे निघून गेलाय असं एकदाही माझ्या पाहण्यात आलेलं नाही. नियमाप्रमाणे त्याला जायचा अधिकार आहे. परंतु पादचाऱ्यांना श्रेष्ठ मानणं हे वर्षान् वर्षाच्या त्यांच्या उच्च संस्कृतीवरून आलं असलं पाहिजे.
-नि.श. गुळवणी, जपान
झं सारं बालपण सत्तरच्या दशकात कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्या खेडेगावात सोळांकूरात अगदी मजेत गेलं. खेळ, मस्ती, गोष्टी, सभोवतालच्या हिरव्यागार निसर्गसृष्टीशी सुसंवाद अन् थोड्याफार उरलेल्या वेळात काय तो अभ्यास असा तो एकंदरीत बालपणीचा सुखाचा काळ होता. शाळेत दाखल झालो अन् इतिहासाशी विशेष गट्टी जमली. चहूबाजूला सह्याद्री पसरलेला अन् शाळाही टेकडीवर असं असताना तो सह्याद्री घोंघावणाऱ्या वाऱ्यातून महाराजांच्या अन् मावळ्यांच्या गुजगोष्टी सांगतोय असंच वाटायचं. इतिहास म्हटलं की महायुद्ध-ं यायची अन् महायुद्ध-ं म्हटलं की अणुबॉम्बॅनं घायाळ हिरोशिमा अन् नागासाकीची चित्रं दिसायची. अमेरिका, रशियासारख्या बलाढ्य राष्ट्रांच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या या महाराष्ट्राएवढ्या छोट्या राष्ट्राची उगाचच सहानुभूती बालवयातच वाटायची. पुढे या राष्ट्राच्या भन्नाट प्रगतीच्या, उत्तम दर्जाच्या जगभर पसरत चाललेल्या ‘मेड इन् जपान’ च्या बातम्या बहुतेक साऱ्या माध्यमांद्वारे कानावर पडू लागल्या. अन् या पूर्वेकडील छोटेखानी देशाबद्दलची उत्सुकता वाढत्या वयाबरोबर निरंतर वाढतच राहीली. तशात मी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला अन् मग जपानची औद्योगिक प्रगती, त्यांच्या रचना, त्यांचे कौशल्य, काम करायच्या पद्ध-ती, व्यवस्थापन याविषयी खूप काही कानी पडू लागलं, वाचायला मिळू लागलं. आणि त्यातूनच उरात धगधगू लागलं जपानी माणसानं साध्य केलेलं असं हे असाध्य वाटणारं यश प्रत्यक्षात पाहण्याचं स्वप्न!…. आज ते स्वप्न प्रत्यक्षात उतरलंय. गेल्या जून महिन्याच्या अखेरीस, मी कंपनीच्या कामाकरिता उग्र निसर्गाशी नेहमी दोन हात करीत प्रगतीचं शिखर गाठणाऱ्या महान् उगवत्या सूर्याच्या देशात दाखल झालो.
मी जपानमध्ये दाखल झालो अन् जपानी संस्कृतीत सहजच मिसळून गेलो. इथली भाषा, नीटनेटकेपणा, सुविधा दर्जा, स्वच्छता, नम्रता, माणसं अन् एकंदरीत जपानी संस्कृती मनमोहून गेली अन् गेल्या सहा महिन्याच्या टोकीओतील माझ्या वास्तवात त्यामध्ये अगदी आकंठ बुडालो. मी हिरोशिमा, क्योटो, नारा, ओसाका, वाकायामा पर्यंत धडक देत जपानचं मनोभावे दर्शन घेतलं. आज या साऱ्यांबद्दल लिहायचं झाल्यास तो एक पूर्ण ग्रंथ होईल. तेव्हा टोकीओतील अन् एकंदरीत जपानमधील अपघातविरहीत सडक-वाहतूक अन् त्याच्या चलन प्रक्रियेसंबंधीचे माझे अनुभव मांडणार आहे. आता इथेही अधी-मधी अपघात होत असतील नाही असे नाही परंतु इथे कार्यरत असलेली अन् मुख्यत्वे लोकांनी काटेकोरपणे अमंलात आणलेली पद्ध-ती पाहता मी नक्कीच याला ‘अपघात विरहीत’ पद्ध-तीच म्हणेन. एकतर गेल्या सहा महिन्याच्या माझ्या इथल्या वास्तव्यात शेकडो मैल प्रवास केला. पण अपघात तर खूप दूर राहिला, साधं एखादं वाहन दुसऱ्या वाहनाजवळ येत कचकन ब्रेक लावून थांबलंय वा घाईघाईने चाललेल्या माणसाच्या जवळून भुर्रकन् वाहन निघून गेलंय असं अपघातसदृश्य कधी पाहिल्याचं आठवत नाही. प्रवासात ना कधी पुढे अपघात झाल्यामुळे वाहतूक संथ वा थांबल्याचं पाहिलं, ना रस्त्यात एखादं अपघातग्रस्त वाहन नजरेस पडलं. असं असताना या उच्चतम् ‘सडक-वाहतूक’ संस्कृतीला ‘अपघातविरहीत’ सडक-वाहतूक पद्ध-ती मानणं हे अतिरंजीत वा अतिधाडसाचं असं काहीतरी नक्कीच ठरू नये.
मी २८ जून २०१५ ला टोकीओच्या नरीटा विमानतळावर उतरलो अन् सर्वप्रथम माझ्या नजरेत भरली इथली उत्तम ‘सडक-वाहतूक’ संस्कृती आणि त्याच्या प्रथमदर्शनाने मी सुखावलो आणि एवढ्याचकरिता सर्वप्रथम पाहिलेल्या या उच्चतम ‘सडक-वाहतूक’ संस्कृतीसंबंधी आपल्या पुढे मांडायचं ठरविलं. शिवाय यातील काही मुलभूत वाहतूकसंबंधीचे नियम आपल्या देशातील पादचाऱ्यांनी अन् वाहकांनी स्वत:पासून सुरूवात करताना पाळायचे ठरविले तर थेंबे-थेंबे तळे साचताना त्याचा महासागर होत जाताना आपल्या देशातही अपघातमुक्त रस्ते निर्माण होऊ शकतील हे काही फार मोठं ‘रॉकेट-विज्ञान’ नाही.
मी माझ्या पत्नीसह नरीटा विमानतळावरून टोकीओतील रूप्पोंगी येथील माझ्या राहण्याच्या निवासस्थानाकडे लिमोझिन बसने गेलो. बस एका आलीशान होॅटेलच्या महाद्वाराजवळ थांबली. मी मग पत्नीला सामानासह तिथे सोडताना टॅक्सीचा शोध घेण्याकरिता निघालो अन् ते दृश्य पाहिलं. रस्त्याच्या दुतर्फा दुरान्वयेही वाहन दिसत नसतानाही बरेच जपानी स्त्री-पुरुष रस्ता ओलांडण्याकरिता हिरवा सिग्नल पडण्याची वाट पाहात थांबले होते. त्यात लहान मुलेही होती. आखून दिलेल्या रेषेपुढे कोणी अर्धेदेखील पाऊल टाकले नव्हते. माझ्या संपूर्ण ह्यातीत मी ते तसं काहीतरी प्रथमच पाहत होतो, खरं सांगतो मी ते पूर्वी ऐकलं होतं पण प्रत्यक्ष पाहणं. हा अनुभव काही वेगळाच होता. वृक्षावरून खाली येणाऱ्या सफरचंदामध्ये न्यूटनला विश्वव्यापी गुरुत्वाकर्षणाचा नियम दिसला अन् मला त्या छोट्या घटनेत देशाची प्रतिमा उंचावत नेणारे देशप्रेमी नागरिक दिसले. अपघातमुक्त रस्ता वाहतूक संस्कृतीचं ते मला झालेलं पहिलं दर्शन अन् रोज टोकीओत फिरताना या उच्च संस्कृतीचं अध्ययन चालू केलं.
टोकीओवासी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर विसंबून असतो. घरापासून रेल्वेस्थानक वा बस स्थानकापर्यंत पायी, पुढे बस वा रेल्वे अन् पुन्हा पुढे उतरल्यानंतर पायी. इथं भरपूर चालावं लागतं अन् इथं चालणं हा अत्यंत सुखद अन् सुरक्षित अनुभव असतो. मुख्य सडकांच्या दुतर्फा पुरेसे रूंद पादचाऱ्यांना अडखळता चालता येऊ शकतील असे मार्ग संपूर्ण टोकीओभर आहेत. ठरावीक उच्चभ्रू भागात अशी व्यवस्था आहे अन् इतरत्र नाही, असं नाही. ंिकबहुना इथं टोकीओत सर्वत्र शहरभर विकास समसमानच वाटतो. उच्चभ्रू, मध्यमवर्गीय, गरीबांची वस्ती असं इथं वर्गीकरण करताच येत नाही. सर्वत्र रस्ते, फूटपाथ समसमान आहेत. कोणताही व्यवसाय फुटपाथवर चालत नसल्याने तुम्ही न अडखळता डोळे बंद करूनही संपूर्ण टोकीओभर फुटापाथवरून पायी फिरू शकता. अर्थात तसं करायचं झाल्यास तुम्हाला शेकडो किलोमीटर पायी फिरावं लागेल कारण टोकीओ हे जगातल्या सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे. सर्वत्र मुख्य वाहतूकीची सडक अन् फुटपाथ यांच्यामध्ये ठरावीक उंचीचे बॅरीटेक्स अर्थात कुंपण असते. हे कुंपण गंज न चढणाऱ्या स्टेनलेस स्टीलसारख्या धातूचे व्यवस्थित रस्त्याच्या किनाऱ्यांना दुर्तफा उभे केलेले असते. जिथं रस्ता ओलांडायचा असतो तो भाग सोडता सर्वत्र असे कुंपण दिसते. कोणीही या कुंपणाच्या दांड्यामधून घुसून पलिकडे रस्त्यावर उतरताना दिसणार नाही. खरं तर इथं असं काहीतरी कल्पनेच्याही पलिकडलं आहे. सारे पादचारी आखून दिलेल्या फुटपाथवरच ये-जा करीत राहतात अन् वाहनं सडकेवरून ये-जा करीत राहतात. यांच्या प्रवाहात कुठेही अदला-बदल होत नाही. फुटपाथवरून आंधळे, व्हिलचेअरवरून पांगळे अगदी सुरक्षितपणे ये जा करीत असतात. त्यांना कोणताही अडथळा होत नाही.
एका फुटपाथवरून दुसऱ्या फुटपाथवर जाताना रस्ता ओलांडणे गरजे आहे आणि इथे पादचारी अन् वाहन एकाच पथावर असल्याने अपघात सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते हे समजून उत्तम सिग्नल पद्ध-ती सर्वत्र टोकीओतच काय अंतर्गत जपानमध्ये जिथंपर्यंत मी गेलो तिथंही एकाच उत्तम दर्जाची सिग्नल पद्ध-ती पाहिली. किशी एक छोटं खेडेगाव. तिथंही सिग्नल बसविलेले पाहून मी थक्कच झालो. सुरक्षेला इथं खूप महत्त्व दिलं जात हे यावरून स्पष्ट दिसतं. रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणी मशीनने आखलेले पांढरे पट्टे रस्ता ओलांडायचा भाग दर्शवितात. परंतु केवळ असे सिनग्न बसवून वा रस्त्यावर चिन्हे उभी करून अपघात थांबत नाहीत. या साऱ्या सिग्नलच वा रस्त्यावरील चिन्हांच नागरिक किती कसून पालन करतात त्यावरच खरंतर या साऱ्या उत्तम वाहतूक प्रणालीचं यश अवलंबून असतं अन् त्याबाबतीत हा देश कितीतरी पुढे अग्रस्थानी उभा आहे हे सहजच लक्षात येतं. इथं सारे नागरिक सैन्यशिस्त पाळतात असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. गेल्या सहा महिन्यात मी कोणालाही सिग्नल तोडून रस्ता ओलांडताना पाहिलं नाही. वाहकही वाहनं आखून दिलेल्या रेषेबाहेर सिग्नल मिळाल्याखेरीज आणताना कधी पाहिलं नाही. इथं सारंकाही काटेकोर नियमांद्वारे चालतं. मोठ्या गजबजलेल्या चौकातही असंख्य पादचारी वाहनं कसलाही गडबड गोंधळ न करता ये-जा करीत असताना पाहून कधीकधी आपण दुसऱ्या एखाद्या ग्रहावर आहोत का अशीही शंका मनात उत्पन्न होते.
चालण्याबरोबरच टोकीओतील मुख्य वाहन आहे सायकल. प्रदूषण न करणारी, शारीरिक कसरतीचीही हौस वा गरज भागविणारी सायकल ही या जगातल्या आधुनिक शहराचं मुख्य वाहन आहे. इथं स्कुटरसारखी इंधनावर चालणारी वाहनं अभावानेच दिसतात. फुटपाथवरून पादचाऱ्यांबरोबर ये-जा करणाऱ्या सायकलींची रेलचेल अधिक. पादचारी अन् सायकलस्वार या दोघोंनाही सामावून घेण्याइतके इथे फुटपाथं रूंद आहेत. सायकलवरून तुम्ही संपूर्ण टोकीओभर फिरू शकता. पूल ओलांडण्याकरिता पादचाऱ्यांना जिने असतात तर सायकलस्वारांकरिता उतरते निमुळते रस्ते दिलेले असतात. तुम्ही चाकं लावलेली सामानाची बॅग रस्त्यावरून ओढत खुशाल टोकीओभर फिरू शकता. कुठेही बॅग उचलून हातात वागवत ंिहडावे लागत नाही.
इथ छोट्या मुलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जाते. सायकलवर मुलांकरिता खास बैठक बसविलेली असते अन् त्याला कमर पट्टा असतो. मुलांना सुरक्षित अशा बैठकांवर बसवून मग आई वा वडील सायकलवरून फिरवत असतात. पाच-सात वर्षांची बालकं पुढे मग आईच्या सायकलमागे स्वतंत्रपणे छोट्या सायकलवरून ये-जा करीत राहतात. पण सारे मोठ्या माणसांचे अनुकरण करताना उगाचंच नसता व्रात्यपणा न दाखविता नियमांचे काटेकोर पालन करीत राहतात. इथं नियमांचे पालन हेच साऱ्यांच्या मुळाशी प्रामुख्याने येते. छोट्या शाळकरी मुलांना हातात पिवळा झेंडा फडकवीत बोटाला धरून रस्ता ओलांडणाऱ्या शिक्षकांना मी कैकवेळा पाहिलय. सुरक्षिततेच्या बाबतीत हे जपानी कोणतीही जोखीम उठवताना दिसत नाहीत. त्याला काय होतंय, असं म्हणत ते निष्काळजीपणे काम करताना आढळत नाहीत.
इथं वाहक चालणाऱ्यांना श्रेष्ठ मानतात अशी संस्कृती आहे इथली. सिग्नलवर पादचारी रस्ता ओलांडताना वळण घेऊन जाणाऱ्या वाहनांना तेथून पुढे जायची परवानगी असते परंतु वाहक नेहमीच पादचाऱ्यांना आधी जाऊ देतो. ती लांबलचक भव्य गाडी सहजच अदबीने मागे थांबताना तुम्हाला अदबीने रस्ता ओलांडायची विनंती करीत असते. गाडीवाला अरेरावीत आधी पुढे निघून गेलाय असं एकदाही माझ्या पाहण्यात आलेलं नाही. नियमाप्रमाणे त्याला जायचा अधिकार आहे. परंतु पादचाऱ्यांना श्रेष्ठ मानणं हे वर्षान् वर्षाच्या त्यांच्या उच्च संस्कृतीवरून आलं असलं पाहिजे. सिग्नलवर उभ्या गाड्यांमध्ये तीन-ते चार मीटरचे अंतर नेहमीच असतं. एकाला एक चिकटून गाड्या कधी उभ्या नसतात. सिग्नल मिळाल्यानंतर हे वाहक भर्रकन वेगाने, घाईघाईने गाड्या पुढे काढण्याचा प्रयत्न करताना कधीच दिसत नाहीत. क्षण-दोन क्षण थांबून पुढे कोणी रस्ता ओलांडत नाही याची खात्री करीतच ते गाड्या पुढे काढतात. इथल्या कोणत्याही चौकात जा, कोणत्याही सिग्नलजवळ पहा तुम्हाला हेच एक दृश्य दिसेल. अपवादानेही एखादा वाहक वाहन पुढे काढताना दिसत नाही. बाईकवरील तरुण पोरंही बेफाम न होता शांतपणे, डोकं थंड ठेवूनच गाड्या चालविताना दिसतात. याचा अर्थ ही मुलं भन्नाट वेगाने गाड्या चालवित नाहीत असे नाही. मी दुचाकी वाहनांना शंभरच्या वर वेगाने जाताना सर्रास पाहिलंय पण आवश्यक तिथे सारेच नियमांच काटेकोर पालन करताना दिसतात.
इथं चालक तर सोडाच टॅक्सीत मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांनाही सीट बेल्ट बांधावा लागतो. टॅक्सीत बसल्यानंतर चालक प्रथम तुम्हाला कमरपट्टा बांधण्याची विनंती करतो. लांबच्या प्रवासात बसमध्ये विमानासारखी कमरपट्टा बांधण्याची उद्घोषणा होते. आता दुचाकी वाहनांवर हेल्मेट घालावे लागते हे वेगळं सांगायला नको. इथं हे सारं तपासायला जागोजागी पोलीस उभे नसतात कारण कोणी कधी नियम मोडतच नाही. सरकारी तिजोरीत नियमभंग केल्यामुळे होणाऱ्या दंडाद्वारे कधी काळी काही रक्कम जमा झाली असावी का हीच मुळी शंका येते.
तुम्ही रात्री बाहेर पडलात तरी, तुम्हाला टोकीओत वावरताना कुठेही अडचण येत नाही. एकतर रस्त्यात कुठंही अंधार नसतो अन् रस्ता कुठेही बेवारशासारखा खोदून ठेवलेला नसतो. वा सांडपाण्याचे झाकण उघडे सोडलेले नसते. आश्चर्य म्हणजे इथं मला आजपर्यंत रस्त्यात छोटा देखील खड्डा दिसलेला नाही. मी हमरस्ते पाहिले, छोटे रस्ते पाहिले, गल्लीबोळही निरखून पाहिले. पण एकही खड्डा आढळत नाही. खरंच असं कोणतं तंत्रज्ञान हे लोक वापरतात कळत नाही पण खड्डा शोधून सापडत नाही हे बाकी सोळा आणे सत्य!
इथं रस्त्याची कामं केली जात नाहीत असं नव्हे. परंतु बाजूने जाणाऱ्या वाहनांची सायकलस्वारांची, पादचाऱ्यांची सुरक्षा अग्रस्थानी राखत ही कामे पार पाडली जात असताना मी नेहमीच पाहत आलोय. प्रथम रस्त्याचं काम करण्याचं क्षेत्र चहूबाजूंनी रेखांकित करीत ते बंदिस्त करतात अन् दुतर्फा काम करण्याचं क्षेत्र चहूबाजूंनी रेखांकित करीत ते बंदिस्त करतात अन् दुर्तफा दोन सुरक्षारक्षक हाती लाल दिवे घेऊन वाहतुकीला सावध करण्याकरिता उभे असतात. काम आटोपल्यानंतर रस्ता पूर्ववत झाल्याची खात्री करतच ते सर्व बाजूंनी उभे केलेले तात्पुरते कुंपण हटवतात अन् रस्ता वाहतुकीला खुला करतात. सर्वत्र खरंतर मानवरहीत मशीनद्वारे काम चालतं परंतु रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवताच दोन्हीकडे दोन सुरक्षारक्षक तैनात केले जातात. त्यामध्ये कुठेही कामगारकपात केलेली आढळत नाही. एका रस्त्याचे मोठे काम सुरू होते. ते बरेच दिवस चालले. तिथं कायम तीन सुरक्षा रक्षक डोळ्यात तेल घालून उभे राहत गस्त घालताना वाहतुकीला मार्गदर्शन करताना भेटायचे. ते कधीही आडोसा पाहून बसलेले वा चहा पीत उभे असलेले असे कधीच दिसले नाही. नेहमीच तत्परतेने त्यांच्या कामात पूर्ण रंगलेले असायचे.
रस्त्यात कुठेही कधीही वाहन थांबवून चालक उतरलाय असं दृश्य इथं दिसत नाही. गाड्या नियुक्त केलेल्या पार्किंगच्या जागेतच उभ्या केल्या जातात. पार्कींगच्या जागेवरून गाड्या मुख्य रस्त्यावर यावयाच्या झाल्यास इथं गाड्यांना फुटपाथ ओलांडावा लागतो आणि ही अपघात सदृश्य परिस्थिती जाणून पार्कींग जागेच्या फाटकाच्या दोन्ही बाजूला दोन सुरक्षारक्षक सदैव तैनात केलेले असतात. त्यांना तिथं बसायला खुर्च्या नसतात. दिवसभर तयारीत उभे राहत ते त्यांचं काम चोख बजावण्याचा निरंतर प्रयत्न करीत राहतात. या सुरक्षा रक्षकांना मी सकाळी कामावर जाताना तन्मयतेने काम करतांना पाहतो अन् सायंकाळी परतताना त्याच तन्मयतेने काम करताना ते दिसतात. कुठंही हयगय त्यांच्या कामात कधी दिसली नाही. देशानं लोकांच्या सुरक्षिततेची फार मोठी जबाबदारी आपल्या शिरावर टाकली असल्यासारखंच त्याचं एकंदरीत वागणं असतं.
गर्दीच्या ठिकाणी अनावश्यक आवाज, कोलाहल, गोंधळ असेल तर वाहकांच्या, पादचाऱ्यांच्या भावना उद्दिपित होऊन अपघात सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. इथं वाहक अगदीच आवश्यक वाटलं तरच हॉर्न वाजवतो. सायकलस्वार पादचाऱ्याच्या मागून गुपचूप येत राहतो पण, घंटी वाजवीत नाही, अगदीच त्याला ओलांडून जायचंच असेल तर तो सुमीमासेन म्हणजे मला क्षमा करा असं हलक्या आवाजात म्हणेल अन् तुम्ही त्याला मार्ग दिलात की शांतपणे पुढे निघून जाईल. गजबजलेल्या चौकात वाहनांचे, पादचाऱ्यांचे लाऊडस्पीकरचे वा इतर कोणतेही कर्कश ध्वनी एकदाही ऐकल्याचं माझ्या स्मरणात नाही. मुंग्या ज्या शिस्तीने एका मागोमाग एक चालत असतात त्या शिस्तीने शातंपणे कसलाही कोलाहल न करता चालत असतात. मुलं कमी असल्यानं हल्ली जोडपी प्राणी पाळतात अन् हे सर्वत्र जगभर चाललंय. इथं कुत्री, मांजरांवर पुत्रवत प्रेम केलं जातं अन् हे श्वानमहाशय मालकीणीबरोबर शांतपणे येणाऱ्या-जाणाऱ्यावर न भूंकता फिरत असतात. त्यांचाही कुठे कोलाहल दिसत नाही.
टोकीओतील मेट्रो रेल्वे ही भुयारी मार्गातून चालते अन् जिथे ती क्वचित प्रसंगी भुयारांमधून बाहेर जमिनीवर येते तेव्हा ती काही मीटर जमिनीपासून उंच पुलावरून जाते. टोकीओभर सर्वत्र स्थानिक रेल्वेचं जाळं आहे पण कुठंही वाहन, रस्ते अन् रेल्वेमार्ग एकमेकांसमोर येत नाहीत. वाहनांची सुरक्षितता लक्षात घेऊन या दोन्ही वाहतुकप्रणाली पूर्णपणे स्वतंत्र आहेत.
संपूर्ण जगात साधारणपणे २०-२५ सेकंदाला रस्त्यावरील अपघातात एकाचा मृत्यू ओढवतो. हा मामला फारच गंभीर आहे. फुकूशिमा अणू अपघाताला जगभर अमाप प्रसिद्ध-ी मिळाली. परंतु कुफुशिमा अपघातात एकही माणूस दगावला नाही. दररोज हजारो माणसं रस्त्यावरील अपघातात त्यांचा जीव गमावताना वर्षोन् वर्षे दिसत असताना याबाबतचे सुरक्षा विषयक मुलभूत नियम जपानसारखे काही देश काटेकोरपणे पाळताना दिसतात. रस्त्यावरील अपघातांशी संबंधित वेग, हेल्मेटचा वापर, कमरपट्ट्याचा वापर, मुलांची काळजी अन् दारू पिऊन वाहन चालविणे या चार प्रमुख कारणांवर जपानसारख्या देशांनी लोकजागृतीतून अन् शिक्षणाद्वारे चांगलेच नियंत्रण प्राप्त केलेले दिसते. अन् त्यातून विकसित झालेल्या उच्च अपघातविरहीत सुरक्षा संस्कृतीत वाढलेला जपानी सायंकाळी सुरक्षित कामावरून घरी परतताना दिसतो अन् घरच्यांनाही त्याची काळजी वाटत नाही.
एक भारतीय या नात्यानं ही उच्च सडक सुरक्षा संस्कृती मला भावलीच शिवाय मी ती रोज टोकीओत अनुभवतो आहे. आपल्या देशातही याबाबतीत जनजागृतीचे प्रयत्न निरंतर केले जात आहेत अन् त्याचा एक भाग म्हणजे हे टोकीओतील अनुभव कथन, इथं प्रत्येक नियमांचे काटेकोर पालन करतो हेच खरं तर आधी अधोरेखित करायला हवं. संबंधित संस्थांवर आगपाखड करण्यापूर्वी रस्ता सुरक्षिततेबाबतचे मुलभूत नियम स्वत:पासून आरंभ करून पाळताना कुटुंबाला, सगे सोयऱ्यांना, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना, व्यवस्थापकांनी कामगारांना आणि इतरेत्र शक्य त्यांना पाळावयास आग्रहाने सांगितल्यास हळूहळू मुंबई, पुणे, ठाणे या शहरांचे टोकीओ व्हायला फारसा काळ जावा लागणार नाही. या साध्या नियमांच्या पालनांमुळेच रस्त्यावरील अपघाताचं प्रमाण कमी होईल. आम्हा सर्वांचीच सायंकाळी घरी सुरक्षित येण्याची कोणीतरी वाट पहात असतं याची हे मुलभूत नियम पाळताना सर्वांनाच सदैव आठवण राहील. टोकीओतून खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे
