बौद्ध दर्शन तीन मूळ सिद्धांतावर आधारीत आहे.
१. अनिश्वरवाद. २. अनात्मवाद. ३. क्षणिकवाद.
१. अनिश्वरवाद – बुद्ध इश्वरी सत्ता मानत नाहीत. ही जगरहाटी प्रतित्यसमुत्पादाच्या नियमावर चालते असा त्यांचा विश्वास आहे. प्रतित्यसमुत्पाद म्हणजे कार्यकारण भाव. कार्यकारण साखळीमध्ये अनेक चक्र आहेत. त्यांना बारा विभागात विभाजित केले आहे. त्यामुळे हे ब्रम्हांड चालविणारा कुणी एक व्यक्ती नाही. त्याला कोणी उत्पन्न केलेले नाही. कारण उत्पत्तीचा विचार केल्यास अंतही येतो. त्यामुळे प्रारंभही नाही आणि अंतही.
२. अनात्मवाद – अनात्मवाद म्हणजे आत्मा नाही असे नाही. आत्मा म्हणजे चेतनेचा न थांबणारा वाहता प्रवाह. हा प्रवाह जडाशी संपर्कात येऊ शकतो आणि अंधारात लीनही होऊ शकतो. स्वतःला जाणून घेतल्याशिवाय आत्मवान होता येणार नाही. निर्वाणाच्या अवस्थेतच स्वत:ला जाणून घेता येते. मृत्यूनंतर आत्मा महासुसुप्तिमध्ये गायब होऊ शकतो. अनंतकाळ तो अंधारात पडून राहू शकतो वा लगेचच दुसरा जन्म घेऊन पुन्हा एकदा जगरहाटीत येऊ शकतो.
३. क्षणिकवाद – या ब्रह्मांडात सर्व काही क्षणिक आहे. नश्वर आहे. काहीही कायमस्वरूपी रहाणारे नाही. सगळे काही बदलत जाणारे आहे. शरीर आणि ब्रह्मांड म्हणजे रथासारखे आहे. रथाचे घोडे, चाक व पालखी काढून घेतल्यास रथाला अस्तित्व उरणार नाही. तसेच शरीर व ब्रह्मांड परस्परांपासून दूर नेल्यास परस्पर अस्तित्वाला अर्थ उरणार नाही.
वरील तीन सिद्धांत बौद्ध दर्शनाचा पाया आहे. या तीन सिद्धांतातूनच निरनिराळ्या विचारधारा प्रसव पावून सहा उपसंप्रदाय या धर्मात जन्माला आले.
निर्वाण म्हणजे काय?
बौद्ध धर्मात निर्वाण या शब्दाचा अर्थ आहे विझून जाणे. तृष्णेचे विझून जाणे. वासनांचे शांत होणे. तृष्णा आणि वासनाच दुःखाला कारणीभूत असतात. दुःखातून सुटका होणे म्हणजे निर्वाण प्राप्त करणे.
भगवान बुद्धांनी म्हटले आहे, की भिक्षुंनो, जग अनादी आहे. अविद्या व तृष्णा यांनी बाधित होऊन लोक भटकत बसतात. आदी-अंताचा त्यांना थांग लागत ना ही. भवचक्रात अडकून जन्म-मरणाच्या फेर्?यात घिरट्या घालत बसतात.
या जगात सातत्याने जन्म घेऊन प्रियजनांच्या वियोगाने वा अप्रिय लोकांच्या संयोगाने अश्रूपात करावा लागतो. दीर्घकालीन दुःख आणि तीव्र दुःख हेच काय ते पदरी पडते. म्हणूनच यातून सुटका करण्यासाठी आता हे सर्व सोडून देत वैराग्य प्राप्त करा आणि मुक्तीची वाट धरा.
बुद्ध म्हणतात – हे उपाय करून राग दूर होईल.
भगवान बुद्ध यांच्याप्रमाणे संताप केल्याने मनुष्याचा चेहरा कुरूप होऊन जातो. त्याला दुख होतं, तो व्यक्ती चुकीचे कार्य करतो आणि त्याची संपत्ती नष्ट होते. संतापल्याने बदनामी होते. मित्र-नातेवाईक सोडून जातात. अशा प्रकारे अनेक संकटांना समोरं जावं लागतं. भगवान गौतम बुद्ध
यांच्याप्रमाणे राग किंवा संताप उत्पन्न झाल्यावर या ५ प्रकारे त्यापासून मुक्ती मिळू शकते.
१. मैत्री : ज्या व्यक्तीप्रती राग उत्पन्न होत असेल, त्याशी मैत्रीची भावना असू द्या.
२. करुणा : ज्या व्यक्तीप्रती राग उत्पन्न होत असेल, त्याच्याप्रती करुणेची भावना असू द्या.
३. मुदिता : ज्या व्यक्तीप्रती राग उत्पन्न होत असेल, त्याच्याप्रती आनंदाची भावना असू द्या.
४. दुर्लक्ष : ज्या व्यक्तीप्रती राग उत्पन्न होत असेल, त्याला दुर्लक्ष करण्याची भावना असू द्या.
५. कर्म : ज्या व्यक्तीप्रती राग उत्पन्न होत असेल, त्याबद्दल असा विचार करा की तो जो कर्म करत आहे, त्याचे फळ चांगले असो वा वाईट हे त्यालाच भोगावे लागतील.
– एप्रिल २०१८
