असं म्हणतात की महाशिवरात्रीला थंडी ‘शिव शिव’ असं म्हणत परतीच्या मार्गावर जायच्या तयारीला लागते. आणि साधारण होळीपर्यंत ती काढता पाय घेते. पण या वर्षी वेगळाच प्रकार झाला. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उष्णतेची प्रखर लाट आली. १२ मार्च दरम्यान मध्य भारतातील तापमान अचानक वाढलं. सौराष्ट्र, कोकण, कच्छ, पश्चिम राजस्थान, पूर्व राजस्थान, ओडिशा या भागात तापमानात वाढ झाली. हवामान खात्याने येत्या काही दिवसात हीच परिस्थिती कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे. (गंमतीचा भाग हा की आजकाल हवामान खात्याचे सर्वच अंदाज अचूक ठरतायत) अर्थात यात तंत्रज्ञानाचाही मोलाचा वाटा आहेच.

पश्चिम राजस्थान मध्ये काही भागात उष्णतेची लाट अखेर मार्च पर्यंत कायम असण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण, सौराष्ट्र, कछ. गुजरात, राजस्थान या प्रदेशात मार्चदरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.आता सूर्याचे उत्तरायण सुरु झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र ते ओडिशा या भागात मार्च महिन्यापासून उन्हाळा सुरु होतो. १ मार्च ला हवामान खात्याने सांगितलं होतं की पश्चिम आणि मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागात तापमान सरासरीपेक्षा वाढेल. त्यामुळे गुजरात, महाराष्ट्र ते ओडिशा पर्यंतउष्णतेची लाट येईल.
हवामान खात्याचे संचालक श्री. मृत्युंजय महोपात्रा यांनी म्हटले आहे. नेहमीच्या तापमानापेक्षा इथे जास्त तापमान आहे. कारण वारे वाहण्याची पद्धत. या भागातील वारे दक्षिणोत्तर वाहतात आणि ते सोबत उष्ण हवा आणतात. उलट उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारे वारे थंड हवेचे असतात. दक्षिणेकडील वारे हे बेटावरून आग्नेय दिशेला वाहतात. तेलंगणा आणि कर्नाटक येथून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्र आणिविदर्भ इथे उष्णतेची लाट येण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. श्री. महोपात्रा पुढे असेही म्हणाले की सौराष्ट्र, कच्छ, राजस्थान येथील उष्णतेची लाट सुद्धा दक्षिणेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळेच आली आहे.

हवामान खात्याच्या नोंदीप्रमाणे १४ मार्च ला ३९ डिग्री सेल्सिअस ते ४१ डिग्री सेल्सिअस तापमान गुजरात राजस्थान या भागात होतं. तर ३८ ते ४० डिग्री तापमान विदर्भ, कोकण, गोवा या भागात होतं. उष्णतेची लाट सौराष्ट्र ते कच्छ, कोकण ते गोवा, पश्चिम राजस्थान आणि गुजरातच्या काही भागात अनुभवायला मिळाली. नेहमी पेक्षा ३ ते ६ डिग्री जास्त तापमानाची नोंद पंजाब, उत्तराखंड, जम्मू काश्मीर मधील काही भाग, लडाख मुझफराबाद, हिमाचलप्रदेश मधील काही हिस्सा, राजस्थान, सौराष्ट, कच्छ आणि पूर्वेकडील काही प्रदेशात झाली.
