आजकाल गाडीच्या मागच्या सीट्सना सुद्धा सिटबेल्ट्स असतात. चांगली गोष्ट आहे. पण खराब रस्त्यावरून गाडी चालवताना ते आपला बचाव करू शकतील का?

५४ वर्षीय श्री सायरस मिस्त्री यांचा झालेला अपघाती मृत्यू सिटबेल्ट्स विषयी जागृतीची मोहीम सुरु करायला हवी असे सुचवू पाहत आहे. मागच्या सीट्सना जे सिटबेल्ट्स असतात ते लावायला हवेत. पण लोक ते लावताना दिसत नाहीत. आणि म्हणूनच रस्ते अपघातांना लोक बळी पडतात. खरतर गाडी चालवायला शिकवताना प्रशिक्षकाने आपल्याला सिटबेल्ट्सचे महत्व सांगितलेले असते. पण आपण तिकडे दुर्लक्ष करतो. 

प्रसिद्धी माध्यमांवर या अपघाताची चर्चा होताना दिसत आहे. एवढीच सखोल चर्चा जर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी करून त्यावर उपाय शोधले तर बरे होईल. एवढी सखोल चर्चा करून सिटबेल्ट्स न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. एवढाच तोडगा काढणार असतील तर मग सगळंच फुकट जाईल. 

भारतात मागील २ वर्षात खूप द्रुतगती मार्ग, महामार्ग तयार करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणांतर्गत ५५,५२८ किलोमीटर लांबीचे महामार्ग २००० सालापासून बांधण्यात आले आहेत.१२ हजार किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरुस्तीकरणाचं, रुंदीकरणाचं काम सुरु आहे. सरकार रस्तेबांधणी साठी टोल वसूल करण्याचे काम करते पण प्रत्यक्षात मात्र रस्त्यांची अवस्था वाईट आहे.

जिथे हा अपघात घडला त्या ठिकाणाबद्दल अनेक वेळा बोललं गेलं आहे. फॉरेन्सिक टीम कडून रस्त्याच्या डिझाईन मध्ये चूक असल्याची कबुली दिली गेली आहे. त्या रस्त्यावर भरपूर खड्डे सुद्धा आहेत. जवाजवळ प्रत्येक महामार्गाची हीच स्थिती आहे. ‘ नॅशनल क्राईम रेकॉर्ड बयूरो’ च्या अहवालाप्रमाणे दरवर्षी दीड लाख लोक रस्ते अपघातात मरण पावतात. (२०२० पर्यंतची आकडेवारी) त्यातले ५० हजार अपघात राष्ट्रीय महामार्गावर होतात.

आता यावर सरकारचा तोडगा अगदी साधा असतो. वेग तपासणारे कॅमेरे शहरातील रस्त्यावर आणि महामार्गावर लावणे, वाहनांची कमाल/ किमान वेगमर्यादा ठरवणे, दुचाकींना काही उड्डाणपुलावर प्रवेशबंदी करणे, आणि नियमांचे पालन न केल्यास दंड वसूल करणे, रस्ते अपघातांवर अभ्यास करून तोडगा काढण्याचा प्रयत्न कधीच केला जात नाही. वाहतूक आणि संदेश वहन पत्रकासाठी लिहिणाऱ्या श्री अतुल कुमार यांनी  रस्ते अपघाताची ३ कारणे सांगितली आहेत. 

१.) रस्ता वापरणाऱ्या लोकांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. २.) वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले जातात. ३.) महामार्ग विकास करताना डिझाईन मधील चुका. 

रस्त्याचे डिझाईन करताना ते व्यवस्थित असले पाहिजे. चुकीचं डिझाईन केलं गेलं तर अपघाताचं प्रमाण वाढेल. आणि हे बदल सर्वात पहिल्यांदा करायला हवेत मुंबई अहमदाबाद मार्गावर. मिड डे वर्तमानपत्रात श्री हरवंस सिंग नंदे यांनी आपला अनुभव सांगितला. ते अखिल भारतीय वाहन चालक मालक संघटनेचे सदस्य आहेत. ते म्हणतात चारोटी उड्डाणपुलापाशी १०.५० मीटर रुंदीचा रस्ता सूर्या  नदीवरील पुलापाशी अचानक ७ मीटरचा होतो. त्यात ती लेन अरुंद असल्यामुळे बऱ्याच जणांना एल शेप अपघाती वळण दिसत नाही. नवीन चालकासोबत हमखास अपघात होतात.

एक प्रवासी श्री भूषण म्हाप्रळकर सांगतात, सूर्या नदीवर ज्या ठिकाणी हा रस्ता अरुंद होत जातो त्या ठिकाणी कोणतेही सूचना फलक बसवलेले नाहीत. श्री नंदे यांनी सुद्धा वारंवार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला या विषयी पत्रे लिहिली. माहिती अधिकाराअंतर्गत खटला सुद्धा दाखल केला. पण काही उपयोग झाला नाही. पोलिसांनी सुद्धा तक्रारी केल्या. श्री सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर सरकारला जाग आली आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी म्हणाले की यापुढे गाडीमध्ये जो कोणी सीटबेल्ट लावलेला दिसणार नाही त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.  मग तो पुढच्या सीटवर बसलेला असुदे किंवा मागच्या सीटवर. 

तसेच आता जसा पुढच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने बेल्ट न लावल्यास गाडीतील अलार्म वाजतो तसाच आता मागच्या सीट वरील व्यक्तीने सीटबेल्ट न लावल्यास अलार्म वाजेल. आणि दुसरा उपाय म्हणजे गाडीमध्ये जास्तीच्या एअर बॅग्स लावणे हा होय.

६ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या सिव्हिल इंजिनियर्सच्या बैठकीत गडकरी म्हणाले की रस्ते अपघात हे चुकीचे प्रोजेक्ट रिपोर्ट दिल्यामुळे होतात. काही कंपन्यांनी तयार केलेले रिपोर्ट वाईट असतात. त्यामुळेच अपघात होतात. प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवावा याचे प्रशिक्षण कंपन्यांना दिले गेले पाहिजे. त्यांचे हे विधान अर्थातच वृत्तवाहिन्यांनी दाखवले. ज्या आधीच सिटबेल्ट्स लावण्याचे फायदे तोटे वैगरे विषयांवर चर्चा करत होत्या. यात काही आश्चर्य नाही की गडकऱ्यांच्या मंत्रिमंडळाने १० हजार किलोमीटरची महामार्गाची कंत्राटे अशा चुकीच्या प्रोजेक्ट रिपोर्ट्सच्या आधारे मिळवली आहेत. आणि त्याची किंमत आपण सगळे टोल भरून चुकवणार आहोत.

श्री सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर तरी श्री नितीन गडकऱ्यांनी महामार्गाचे संपूर्ण सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश द्यायला हवेत असे वाटते का? त्याचबरोबर अचूक डिझाईन, दिव्यांची व्यवस्था, सूचना फलक हे सुद्धा महामार्ग बांधताना दिसतील असे लावायला हवेत.

वाहन चालकांनी नियम तोडण्याचे आणि महामार्गावर डावीकडील बाजूने ओव्हर टेक करण्याचे कारण म्हणजे अवजड वाहनांची गर्दी. ही अवजड वाहने २० किमी प्रतितास या वेगाने चालतात. आणि ३ पदरी रस्त्यांवरच्या मार्गिका अडवून ठेवतात. त्यामुळे वाहनचालकाला त्यांच्या मध्ये असलेल्या बारीक फटीतून गाडी न्यावी लागते. त्यांनी जर तसे केले नाही तर तासंतास ट्राफिक मध्ये अडकून राहावे लागते. आणि प्रवासाचा वेळ वाढतो. अवजड वाहने रात्रीच्या वेळी दिवे नसलेल्या रस्त्यावर बंद पडतात हे सुद्धा रस्ते अपघाताचं कारण आहे.

ही तर महामार्गांची गोष्ट झाली. शहरांमध्ये एकाच दुचाकीवर बसून ३ ते ४ लोक लहान मुलांना घेऊन प्रवास करत असतात. त्यांनी हेल्मेट घातलेले नसते. किंवा सुरक्षेचे कोणतेही उपाय केलेले नसतात. याबद्दल विचारले असता गडकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. जशी वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अशा दुचाकी स्वारांवरसुद्धा सरकारने कारवाई करायला नको का?

Related posts

Leave a Comment