सर्सामान्य करदात्याला आयकर (इनकम टॅक्स ) भरतानाची प्रक्रिया सोप्पी करण्याच्या दृष्टीने सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT) ने मंगळवारी सर्व करदात्यांसाठी एकच सामायिक फॉर्म चा कच्चा मसुदा सादर केला. आय टी आर ७ व्यतिरिक्त बाकीचे सगळे आयटी आर फॉर्म भरण्या ऐवजी आता हा एकच फॉर्म भरला तरी पुरेसा आहे. आयटी आर १ आणि आयटीआर ४ हे फॉर्म मात्र पूर्वीसारखेच वापरता येतील.
CBDT ने दिलेल्या प्रस्तावानुसार आता कर भरणाऱ्या व्यक्तीला आयटीआर रिटर्न्स च्या वेळी भराव्या लागणाऱ्या फॉर्म्स मध्ये पर्याय उपलब्ध असतील. म्हणजे हा नवीन येणारा सामायिक फॉर्म भरायचा की आयटीआर १ किंवा आयटीआर ४ चा फॉर्म भरायचा हे आता कर भरणारी व्यक्ती ठरवू शकेल.

आता पर्यंत व्यक्तीच्या उत्पन्नाच्या प्रकारानुसार आणि वर्गीकरणानुसार आयटीआर १ ते ७ यामध्ये रिटर्न्स भरले जात असत. आतापर्यंत आयटीआर चा फॉर्म भरताना करदात्याला सर्वच माहिती भरावी लागत होती. मग ती माहिती त्या कर भरणाऱ्या व्यक्तीस लागू पडत नसेल तरी ती भरावी लागायची. त्यामुळे साहजिकच आयटीआर रिटर्न्स भरणे हे करदात्यांना अडचणीचे आणि वेळखाऊ काम वाटत होते.
CBDT आयटीआर फॉर्मचा जो कच्चा मसुदा सादर केला आहे तो आंतरराष्ट्रीय इनकम टॅक्स रिटर्न्स फाईल करण्याच्या सर्वोत्तम पद्धतीनुसार तयार केला गेला आहे. आणि त्यानुसार आयटीआर ७ व्यतिरिक्त फॉर्म चे सर्वच प्रकार एकाच फॉर्म मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. जेणेकरून कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि कमी वेळखाऊ होईल.
