डिजिटल चलनाबाबत जाणून घ्यायलाच हव्यात अशा काही गोष्टी.

रिझर्व बँकेने दिलेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक १ नोव्हेंबर पासून काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर डिजिटल चलन वापरले जाईल. डिजिटल रुपया सर्वप्रथम १ नोव्हेंबरला घाऊक प्रमाणात वापरण्यात आला. आता हाच प्रयोग भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ बरोडा, युनियन बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक आयडीएफसी फर्स्ट बँक या बँकात केला जाणार आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने मागच्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात चलनात असलेल्या नोटांबरोबरच डिजिटल चलनाचा सुद्धा जास्तीत जास्त वापर करावा असा सल्ला केंद्र सरकारला दिला होता. त्यानुसार केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी लवकरच डिजिटल चलन वापरात आणले जाईल असे सभागृहात सांगितले. डिजिटल चालनाविषयीचा हा निर्णय बहुप्रतीक्षित होता.

अर्थमंत्र्यांच्या मते CBDC ची योजना अमलात आणल्यामुळे डिजिटल अर्थव्यवस्था तसेच तंत्रज्ञानाला चालना मिळणार आहे. आणि हे सर्व ब्लॉक चेन तंत्रज्ञानावर आधारित आहे.

  

CBDC म्हणजे काय?

रिझर्व्ह बँकेने सांगितलेल्या व्याख्येप्रमाणे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजे सेंट्रल बँकेने जारी केलेल्या डिजिटल स्वरूपातील नोटा किंवा पैसे. म्हणजेच भारतीय रुपया. ज्याची कोणत्याही चलनातील पैशांसोबत अदलाबदल केली जाऊ शकते उदा अमुक रुपये देऊन त्याच किमतीचे डॉलर किंवा युरो घेता येतात. जे आपल्याला परदेशातील व्यवहारांसाठी उपयोगी पडतात. हे एक प्रकारचे आभासी चलन आहे. ज्याची अदलाबदल ब्लॉक चेन वॉलेट द्वारे करता येते.

ब्लॉक चेन तंत्रज्ञान म्हणजे काय?

ब्लॉक चेन तंत्रज्ञान म्हणजे माहिती साठवण्याची अशी जागा जिथे एकदा भरलेली माहिती बदलता येत नाही. किंवा तिचा गैरवापर करता येत नाही. हे एक प्रकारचे डिजिटल लेजर आहे जे ब्लॉक चेन वर असणाऱ्या प्रत्येक उपकरणात असते. सोप्या शब्दात सांगायचे तर यामुळे डिजिटल चलनात व्यवहार करणे सोप्पे जाते. ब्लॉक चेन मध्ये सहसा कोणतेही गैरप्रकार आढळत नाहीत. त्यामुळे हे सर्वात सुरक्षित तंत्रज्ञान आहे.

रिझर्व्ह बँक CBDC चा पर्याय का अंमलात आणत आहे?

CBDC चा पर्याय अंमलात आणण्याचा मूळ उद्देश हाच की सध्या वापरात असलेल्या चलनी नोटांबरोबरच ग्राहकांना डिजिटल पेमेंटचा पर्याय उपलब्ध करून देणे. डिजिटल पैशांनी होणाऱ्या व्यवहारांमुळे डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना मिळून पेमेंट यंत्रणा आणखी सुधारेल असा विश्वास रिझर्व्ह बँकेला वाटतो. भारतामध्ये CBDC च्या वापराला बऱ्यापैकी वाव आहे. त्याची कारणे खालील प्रमाणे.

  1. a)प्रत्यक्ष रोख रक्कम सांभाळताना होणाऱ्या खर्चात घट.
  2. b)रोख रकमेचे व्यवहार कमी करून डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देणे.
  3. c)आर्थिक व्यवहार करण्याच्या पद्धतीत नावीन्य आणणे.
  4. d)परदेशातील व्यवहार करण्यासाठी CBDC कितपत योग्य आहे याचे परीक्षण करणे.
  5. e)CBDC चा आर्थिक व्यवहारात समावेश करणे.
  6. f)आभासी चलनात व्यवहार करताना ग्राहकाच्या मनात विश्वासार्हतेची भावना निर्माण करणे.

  डिजिटल पैशाची वैशिष्ट्ये

  1. a)CBDC हे असे चलन आहे जे सेंट्रल बँकांनी त्यांच्या चलनविषयक धोरणानुसार जारी केले आहे.
  2. b)सेंट्रल बँकेच्या आर्थिक ताळेबंदात ते एक कर्ज म्हणून दिसते.
  3. c)हे पेमेन्टचे एक माध्यम म्हणून नागरिकांनी, संस्थांनी, आणि सरकारी कार्यालयात स्वीकारले गेले पाहिजे. व्यावहारिक दृष्टीने ते अतिशय सुरक्षित आहे.
  4. d)बँकांनी दिलेले पैसे CBDC मध्ये अतिशय सोप्प्या पद्धतीने रूपांतरित करता येतात.
  5. e)CBDC वापरणाऱ्या ग्राहकाकडे बँक खाते असण्याची गरज नाही.
  6. f)CBDC मुळे प्रत्यक्ष नोटांच्या स्वरूपातील आर्थिक व्यवहार कमी होण्याची शक्यता आहे.

 

डिजिटल रुपया आणि डिजिटल पैसे यातील फरक काय ?

डिजिटल रुपया आणि डिजिटल पैसे यातील फरक स्पष्ट करताना रिझर्व्ह बँक सांगते की आता लोक जे डिजिटल स्वरूपातील पैसे वापरत आहेत त्यात काही गैरव्यवहार झाल्यास ती जबाबदारी बँकांची असते. पण डिजिटल रूपयाच्या बाबतीत असा प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी रिझर्व्ह बँकेची असेल. इतर कोणत्याही बँका त्याला जबाबदार असणार नाहीत.

CBDC चे दोन प्रकार आहेत.

किरकोळ CBDC जी सर्वांनाच वापरायला उपलब्ध असेल.

घाऊक वापरातील CBDC व्यवहार जे फक्त काही आर्थिक संस्थांपुरते मर्यादित असतील.

डिजिटल रुपया विरुद्ध आभासी चलन

आभासी चलनातील व्यवहार करताना आणि डिजिटल स्वरूपाचे व्यवहार करताना जे फायदे मिळतात. तेच CBDC मध्ये व्यवहार करताना मिळणार आहेत. आभासी चलन हे कधीच फाटत नाही, जाळता येत नाही, किंवा त्याची नासधूस करता येत नाही. CBDC स्वरूपातील पैसे सुद्धा कधी हरवत नाहीत. चलनी नोटांच्या तुलनेत त्यांचे आयुष्य मोठे असते.

डिजिटल रुपया आणि आभासी चलनातील फरक

आभासी चलन ही एक प्रकारची आभासी मालमत्ता आहे जी ब्लॉक चेन तंत्रज्ञानावर आधारित आहे. पण ते बरेच वादग्रस्त सुद्धा आहे त्यात गैरव्यवहार होण्याची शक्यता असते. कारण आभासी चलनात व्यवहार करताना त्यात कोणत्याही बँकेचा समावेश होत नाही. या उलट CBDC ही रिझर्व्ह बँकेने जारी केलेली डिजिटल स्वरूपातील नोट आहे.

डिजिटल रुपया हा बिटकॉइन पेक्षा वेगळा आहे. कारण बिटकॉइनवर सरकारकडून कधीही बंदी आणली जाऊ शकते. पण डिजिटल रुपया हा भारत सरकारचा उपक्रम असल्यामुळे सुरक्षित आहे. आणि दुसरे म्हणजे डिजिटल रुपयाला आजच्या चलनातील नोटांएवढीच किंमत आहे.

डिजिटल स्वरूपातील रुपयाचे फायदे

डिजिटल रुपयामुळे प्रत्यक्ष आर्थिक व्यवहाराची किंमत कमी होईल तसेच जोखीमही राहणार नाही. शिवाय सरकारला अधिकृत नेटवर्क मध्ये सुरु असलेल्या सर्व व्यवहारांवर लक्ष ठेवता येईल. डिजिटल व्यवहारामुळे सरकारी बडग्यापासून कोणीही वाचू शकणार नाही. त्यामुळे सर्व व्यवहार हे कायद्याला धरूनच होतील. देशातून बाहेर जाणाऱ्या आणि बाहेरून देशात येणाऱ्या पैश्यावर सरकारचे नियंत्रण राहील.त्यामुळे आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित होतील.

रिझर्व्ह बँक सेंट्रल बँकेच्या डिजिटल चलनाच्या धोरणातील फायदे तोटे अभ्यासत असून त्यानुसार डिजिटल रुपयाची अंमलबजावणी टप्याटप्याने करण्यात येईल असे सांगण्यात आले.

Related posts

Leave a Comment