रामायणात रावणाला ‘दशानन’ असे संबोधले गेले आहे. कारण त्याला दहा डोकी, एक मान आणि एक शरीर होते. पाकिस्तानला मात्र ६ डोकी, एक मान आणि एक शरीर आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर पाकिस्तानची ६ डोकी कोणती तर त्यांचे लष्कर, त्यांचे राजकारणी, नोकरशाही, जहागीरदारी, धार्मिक समूह आणि मोठमोठे व्यवसाय. मान – पाकिस्तानातील मध्यमवर्गीय माणूस. शरीर- पाकिस्तानातील दुर्लक्षित गरीब जनता. हे जे ६ मुद्दे किंवा आतापुरते बोलायचे तर डोकी. यातील एकही बाबतीत पाकिस्तान स्वतःचे वर्चस्व सिद्ध करू शकत नाही. लष्कर हा प्रमुख मुद्दा आहे जे नेहमीच पडद्यामागील भूमिका निभावत असते.
पाकिस्तानात एक वेगळीच संकल्पना अस्तित्वात आहे. ‘आवश्यकतेचा सिद्धांत’. यामध्ये समजा लोकशाही यंत्रणा नीट काम करत नाही असे जर पाकिस्तान सरकारला वाटले तर पाकिस्तानी सरकारला मार्शल लॉ घोषित करण्याचा अधिकार आहे. असे अनेक वेळा झालेले आहे. त्यामुळे अर्ध्याहून अधिक वेळा लोकशाही यंत्रणे ऐवजी पाकिस्तानातील लष्करच देश चालवते की काय? असे कोणालाही वाटेल. म्हणूनच लष्कराला आव्हान देण्याची कोणाची हिम्मत नाही. पाकिस्तानातील नेतेमंडळींना लोकशाही पद्धतीने निवडून दिले जाते. पण ते लष्कराच्या मर्जीनुसार काम करतात. थोडक्यात कोणी निवडून यायचं हे सुद्धा लष्करच ठरवते. पाकिस्तानचे भूतपूर्व पंतप्रधान श्री इम्रान खान यांची निवड सुद्धा याच पद्धतीने झाली होती असे म्हणतात.

तेथील नोकरशाही प्रशासकीय व्यवस्था सांभाळते म्हणजेच चोरीसाठीची यंत्रणा. जहागीरदार जमिनीची आणि मतांची काळजी घेतात. उदा. मोठमोठ्या जमिनी अशा कुटुंबांच्या नावावर करण्यात आल्या आहेत जी कुटुंबे राज्यकर्त्यांशी म्हणजेच आधी मुघलांशी आणि मग ब्रिटिशांशी एकनिष्ठ होती. उदा- भुट्टो कुटुंबाकडे सिंधमधील २,५०,००० एकर जमीन आहे. त्यामुळे जहागीरदार मंडळींचा गावातील जनतेवर वचक राहतो. शेवटी गावातील लोकांनीच त्यांना निवडून दिलेले असते. म्हणजे थोडक्यात शिवाजी महाराजांच्या काळात वतनदारीची पद्धत होती नंतर महाराजांनी ती बंद केली. तसा काहीसा प्रकार.
मराठीत एक म्हण आहे, माकडाच्या हाती कोलीत. पाकिस्तान मधील धार्मिक समूहाच्या हातात सुद्धा असे एक कोलीत आहे. ज्याचा वापर ते त्यांना हवा तसा, हवा तेव्हा करून मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण करू शकतात. उदा- त्यांनी इस्लामाबाद महामार्ग बंद पाडला होता. तेव्हा ना राजकारणी काही करू शकत होते ना पोलीस. शेवटी लष्कर प्रमुखांना मध्ये पडावे लागले. त्यांनी आंदोलन करणाऱ्यांना पैसे दिले आणि परिस्थिती पूर्ववत केली.
व्यावसायिक बाजारावर नियंत्रण ठेवतात. या सहा मुद्द्यांमध्ये ( डोक्यांमध्ये) एक गोष्ट सामायिक आहे. त्यांना पैसे कमवायचे आहेत. त्यामुळे गोष्टी आहेत तशा सुरु ठेवण्यावर त्यांचा भर आहे. त्यांच्याकडे परदेशांचे पासपोर्ट आहेत. दोन देशांच्या नागरिकत्वाला पाकिस्तानात मान्यता आहे. इतकेच काय न्यायाधीश आणि लष्करातील महत्वाच्या पदावरील व्यक्तींकडे सुद्धा पासपोर्ट आहेत. पाकिस्तानची ‘चिंता’ ही सहा डोकी मिळून करतात.
मग त्यासाठी कोणत्याही थराला जावे लागले तरी चालेल. पण मग ते सहकार्य का करत नाहीत? सरतेशेवटी त्यापैकी १३०० हुन अधिक कुटुंबे उच्चभ्रू आहेत. जी विवाहाद्वारे एकमेकांशी बांधली गेली आहेत. सध्या पाकिस्तान उधारीवर जगतोय असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. जुनी कर्जे फेडण्यासाठी नवी कर्जे घेतली जातायत. माजी लष्करप्रमुखांचे म्हणणे आहे की त्यांनी सैन्याला जास्त वेळ देण्यापेक्षा बाहेरच्या देशातून पैसा आणण्यात जास्त वेळ घालवला आहे. असा कोणता जादूचा मंत्र आहे जो पाकिस्तानला एवढे सगळे होऊनही कोलमडण्यापासून वाचवत आहे.? आणि त्यावरील अरब देशांचे आक्रमण टाळतो आहे.? याचे उत्तर आहे भारत !

गेल्या ७५ वर्षांपासून पाकिस्तानात एकच संदेश ऐकायला मिळत आहे. ‘भारत आपला शत्रू आहे. आणि आपल्याला मुळापासून संपवण्यावर टपलेला आहे’. आणि हे सारखं लोकांच्या मनावर बिंबवले जात आहे. भारताने आपला काश्मीर आपल्यापासून हिरावून घेतला. १९७१ साली भारताने आपल्या देशाला धूळ चारली. काश्मिरी जनतेचा छळ केला जात आहे. भारतीय गुप्तहेर अतिरेक्यांना पैसे पुरवतात वैगरे अशी वाक्ये कानावर पडतात. भारताबद्दलचा द्वेष पाकिस्तानी जनतेच्या मनात रुजवला गेला आहे. आणि ही सहा डोकी आग शमवण्याऐवजी आगीत तेल ओतायचे काम करत आहेत. भारत हे सुनिश्चित करत आहे की त्यांचे लष्कर तारणहार राहील. आणि बाकी सहा जण आपल्या तालावर नाचतील. आणि आपली प्रगती होईल.
तिकडे प्रत्येक जण पैसे कमावण्यात गर्क आहे. फक्त जहागीरदार, व्यावसायिकच नव्हे तर लष्कर प्रमुख, राजकारणी, धार्मिक गुरु सगळ्यांना परदेशी देणग्यांमधून आपला हिस्सा मिळतोय. पाकिस्तानातील कोणालाच हे जाणवत नाही का ? काही मध्यमवर्गीयांना जाणवतंय पण त्यांनाही पैसा कमवायचा आहे. जनता काही करत नाही तिच्यासाठी काय तर ” इंडिया दुश्मन है” आणि “अल्ला हू अकबर” या दोन घोषणा अफूच्या गोळ्याप्रमाणे काम करतात. पुढे काय ? हे असच सुरु राहिलं तर एक ना एक दिवस यंत्रणा कोसळणार हे सगळ्यांना माहित आहे.
त्यामुळे परदेशी पासपोर्ट तयार करून आणि पैसे परदेशात पाठवून सुरुवातीपासूनच तयारी केली जात आहे. अंदाजे दरवर्षी US$ १२ बिलियन एवढे पैसे देशाबाहेर जातात. जर यंत्रणा कोसळली तर विमानातून पळून जायची तयारी त्यांनी ठेवली आहे. गोष्टी खराब होत चालल्या आहेत. पाकिस्तान देशोधडीला लागण्याच्या मार्गावर आहे. मला जास्त खोलात जायची गरज नाही. तुम्ही सुज्ञ आहात.
पण हे अनेक समस्यांपैकी एक आहे. २०२२ साली पाकिस्तानात जो पूर आला त्यात १५ % भातशेती आणि ४० % कापूस नाश पावला. पाच करोडहून जास्त लोकांची उपासमार झाली. ३० बिलियन डॉलर्स चे नुकसान झाले. परदेशातील देणगीदार मदत करायला तयार नाहीत, कारण पाकिस्तानची काळी कृत्ये आड येतात. त्यांचे अधिकारी परदेशातून आलेला देणगीचा पैसा चोरतात. ९ बिलियन डॉलर्सचा निधी देणगी म्हणून मान्य केला गेला होता. पण तो कधी येईल, कसा येईल काहीच सांगता येत नाही. आश्चर्याची गोष्ट ही की कराची बंदरात आयात केलेल्या भाज्या सडत आहेत, कारण द्यायला डॉलर्स नाहीत. दुसरीकडे पाकिस्तान १०० हुन अधिक मर्सिडीज बेंझ गाड्या आयात करण्याच्या विचारात आहे. तर पंजाबच्या प्रधानमंत्र्यांनी US$ १,००,००० लंडनला जाण्यासाठी एका चार्टर विमानावर खर्च केले.

महागाई तर आकाशाला टेकली आहे. तांदूळ २५० रुपये किलो झालाय. आणि पेशावर मध्ये एका पोळीची किंमत ३० रुपये आहे. तिकडे सामान्य लोक कसे जगत असतील याची कल्पना करा. दिवसेंदिवस अन्नानदशा होत आहे. तेल संपत चाललंय. काही दिवसांनी रेल्वे बंद होईल. कारण इंजिनात भरायला डिझेल नाही, रेल्वे चालकांना द्यायला पगार परवडत नाही. या सगळ्यात भरीसभर म्हणून पाकीस्तानचेच अपत्य असलेल्या TTP (तहरिके तालिबान पाकिस्तान) कडून सीमेपलीकडून त्रास दिला जात आहे. आता ते पाकिस्तानात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. दर दिवशी सैनिक आणि पोलीस मारले जात आहेत. मला आणखी काही सांगण्याची गरज आहे का ?
प्रश्न हा आहे की भारतावर या सगळ्याचा काय परिणाम होईल? ज्या देशाने आपल्यावर सतत आक्रमणे केली त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करावा की त्यांना आहे त्या स्थितीत सोडून द्यावे. मला आठवतंय जेव्हा मी आमच्या युनियन लीडरवर वैतागलो होतो तेव्हा माझे वरिष्ठ मला म्हणाले होते. तुम्हाला माहित नसलेल्या शत्रूपेक्षा माहित असलेला शत्रू उत्तम. आज हा गेला उद्या दुसरा येईल. वाईटात वाईट काय होईल? पाकिस्तान संपण्याच्या मार्गावर आहे. जिहादी रस्त्यावर उतरत आहेत. सोबत आण्विक बॉम्ब आणि क्षेपणास्त्रे आहेत. भारतासाठीही काहीशी चिंताजनक स्थिती आहे. पण असं काही घडणार नाही अशी आशा करूया. साही डोकी जागेवर राहतील. तसेही क्षेपणास्त्रांचा मारा सहन करण्यापेक्षा या छोट्या चिंता परवडल्या.
सध्या भारतासाठी पाकिस्तान हा माहित असलेला जखमी शत्रू आहे. त्यांनी कितीही त्रास दिला तरी आपण प्रगती करायला शिकलो आहोत. काहीवेळा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे चालत राहिलो. आता परिस्थिती आणखी चिघळू नये अशी अपेक्षा करू. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की काहीही झाले तरी पाकिस्तानातील गरीब अशिक्षित जनतेचा (आवाम) दुःखद शेवट ठरलेला आहे. काही झाले तरी पाकिस्तानी जनतेच्या वाट्याला दुःख येणार हे नक्की.
