आरोग्य दायी आणि सुखकर २०२२ साठी १० चांगल्या सवयी.

आरोग्य दायी आणि सुखकर २०२२ साठी  १० चांगल्या सवयी. प्रणित शिळीमकर प्रणित शिळीमकर फिटनेस तज्ञ् आणि फिटनेस टॉक ची ज्यांनी सुरुवात केली ते सांगत आहेत की तुमच्या जीवनात कोणते छोटे छोटे बदल केल्याने तुमचे आरोग्य उत्तम राहू शकते.

           

फोटो- प्रणित शिळीमकर सांगतात २०२२ साठी चांगला व्यायाम आणि शिस्त किती महत्वाची आहे. २०२२ ची सुरुवात होते आहे. अशा वेळी २०२१ कडे मागे वळून पाहताना हे वर्ष आपल्या सर्वांसाठीच शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या किती थकवणारे कठीण गेले हे पाहणे महत्वाचे आहे. नवीन वर्षात प्रवेश करताना आपण आपल्या जीवनशैलीत मोठा बदल करायला हवा. जसे की आपल्या सवयी, व्यायामाच्या पद्धती आणि खाण्यापिण्याच्या सवयी बदलायला हव्या. प्रत्येक सरत्या वर्षासोबत आजकालच्या सुखासीन जीवनशैलीमुळे आजार बळावत असल्याचे समोर आले आहे. २०२२ ला आनंदी आरोग्यदायी बनवण्यासाठी आपल्या तब्येती संदर्भात १० चांगल्या सवयी लावून घेणे आवश्यक आहे.

1. व्यावसायिक ट्रेनर कडून फिटनेस साठी सल्ला घ्या 

तुमच्या व्यायामाच्या सवयी आणि आहार याविषयी स्वतःच काही न ठरवता फिटनेस ट्रेनर चा सल्ला घ्या. म्हणजे तुम्ही योग्य प्रकारे पुढे जात आहात हे कळेल. कारण ज्या सवयींना आपण चांगल्या समजतो त्या खरतर वाईट असू शकतात. आणि आरोग्याला घातक ठरू शकतात. जेव्हा आपण एखाद्याने फॉलो केलेले डायट जसे च्या तसे फॉलो करायला जातो तेव्हा अपूर्ण ज्ञान आणि चुकीची माहिती घातक ठरू शकते. आहारतज्ज्ञ किंवा तुम्हाला तुमच्या तब्येतीचे निरीक्षण करून योग्य ते डायट आणि कोणता व्यायाम करावा हा सल्ला देतील.

जेणेकरून २०२२ आणखी सुखावह होईल. आणि आरोग्यदायी होईल. आरोग्यविषयक सल्ला घेण्यासाठी तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टर कडे जाऊ शकता. आणि तुमच्या फिटनेस बाबत सल्ला घेऊ शकता. जर तुम्ही फिटनेस बद्दल जागरूक असाल तर तुमच्या दिवसाचे योग्य नियोजन करण्यासाठी आणि त्यानुसार जीवनशैली बदलण्यासाठी तुम्ही पर्सनल ट्रेनर आणि  डायटिशिअन (आहारतज्ज्ञ) यांची मदत घेऊ शकता.

2. संतुलित आणि परिपूर्ण आहार घेणे

कोणत्याही व्यक्तीला जर खुश ठेवायचा मार्ग हा त्याच्या पोटातून जातो. किंवा आधी पोटोबा मग विठोबा अशा म्हणी आपल्या मराठीत आहेत. सांगण्याचा मुद्दा हाच की जेवढे पौष्टिक, रुचकर अन्न तुम्ही खाल तेवढी तुमची तब्येत उत्तम राहील. रोज शिळं अन्न खाल्लं तर तब्येतीच्या तक्रारी सुरु होतात. तेव्हा मस्त खा आणि स्वस्थ राहा. रुचकर आणि पौष्टिक आहार घेतल्याने शरीराचे पोषण होते ज्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते आणि प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. काही वेळा आपल्या आहारा मध्ये काही त्रुटी असतात पण आपल्याला त्या माहित नसतात त्यांच्या बद्दल जाणून घेऊन योग्य तो आहार घेतला तर जास्त फायदा होऊ शकतो. जंक फूड आणि अरबट चरबट पदार्थ खाण्यापेक्षा पौष्टिक., रुचकर. घरचे जेवण करण्यावर भर द्या.

3. रोजच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये सातत्य ठेवा

तुमचा रोजचा व्यायाम किंवा शारीरिक मेहनतीची कामावर तुमचा फिटनेस अवलंबून असतो. काही वेळा सुरुवातीला लोक नियमित व्यायाम करतात. मधेच काही दिवस करत नाहीत. आणि इतके दिवस व्यायाम केला नाही तो भरून काढण्यासाठी अति व्यायाम करतात. अशा अनियमित पणा मुळे तब्येती वर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. दुखणी मागे लागू शकतात. समजा तुम्ही आरशासमोर उभे आहात आणि तुम्हाला जाणवलं की आपण अचानक बारीक व्हायला लागलोय. व्यायाम करायचो तेव्हा चांगली होती की तब्येत. असं झालं तर त्याचा तुमच्या मनावर परिणाम होऊ शकतो. म्हणून नियमित व्यायाम आणि आहार आणि शिस्त  हे २०२२ मध्ये महत्वाचं आहे.

4. ध्यानधारणा, योगासनं महत्वाची

फिटनेस चा आणखी एक महत्वाचा पैलू ध्यानधारणा जी केल्याने तुमचे आयुष्य बदलू शकते. रोज ध्यानधारणा केल्याने तुमचे मानसिक आरोग्य उत्तम राहील तसेच मानसिक आजारांपासून तुम्ही लांब राहाल .बरेच खेळाडू त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी ध्यानधारणा करतात म्हणजे चित्त एकाग्र होण्यास मदत होते. ध्यानधारणा केल्याने मानसिक ताणतणाव दूर होण्यास मदत होते. जे वजन वाढण्याचे मुख्य कारण आहे.

5. आपले मानसिक आरोग्य जाणीवपूर्वक सांभाळा

बऱ्याचदा आपल्या बाबतीत शारीरिक आरोग्य बिघडतं कारण आपलं मानसिक आरोग्य ठीक नसतं आपण असं म्हणू हवं तर की शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघांचा समतोल योग्य रीतीने साधला जायला हवा. एकाचा जरी बिघडला तर संपलंच सगळं. सतत कुठल्या न कुठल्या गोष्टीची काळजी करणे, नैराश्य, यामुळे तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे ताण वाढू शकतो आणि ध्येयापासून तुमचे लक्ष विचलित होऊ शकते. लवकरात लवकर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या म्हणजे वर्षाची सुरुवात सकारात्मक होईल.

6. स्वतःच्या क्षमता वाढवण्यावर लक्ष द्या 

थोडीशी जास्त मेहनत घेण्याचा हा काळ आहे. अंगावरील वाढीव चरबी कमी करण्यासाठी लोक नको तेवढा कार्डिओ करतात. ज्यामुळे स्नायूंवर ताण येतो. स्ट्रेंथ ट्रेनिंग मुळे मन आणि स्नायू यांच्यावर आपला कंट्रोल राहतो. ज्यामुळे प्रतिकारशक्ती सुधारते. चांगला कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते आणि तब्येत सुदृढ राहण्यास मदत होते.

7. फिजिओथेरपिस्ट चा सल्ला घ्या

जुनी चिकट दुखणी, जाडी , कोणत्याही कारणाने तुम्ही अस्वस्थ असाल तर तो तुमच्या फिटनेस मध्ये अडथळा ठरू शकतो. फिटनेस म्हणजे सातत्य आणि प्रगती आणि त्यासाठी तुमच्या शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. चांगला फिजिओ थेरपिस्ट दुखणी बरी करायला मदत करतोच पण त्याच बरोबर तुमच्या कामगिरीवर परिणाम करणाऱ्या गोष्टींवरही उपचार करतो. रिहॅबिलेशन प्लॅन आणि स्ट्रेंथ ट्रेनर ही चांगल्या फिटनेस ची गुरुकिल्ली आहे.

8. चांगली झोप आणि हायड्रेशन

तब्येत चांगली राहण्यासाठी हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत जे नेहमीच दुर्लक्षित राहतात. चांगली झोप हा तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी खूप गरजेची आहे. तुम्ही कितीही बिझी असलात तरी सात ते आठ तास तरी झोप घेणे महत्वाचे आहे. चांगल्या आरोग्यासाठी भरपूर पाणी पिणेही महत्वाचे आहे. तुम्हाला लवकरच लक्षात येईल की तुम्ही पुरेसे पाणी प्यायला तर तुम्हाला भूक लागत नाही. तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा तुम्ही जास्त वेळ बाहेर राहणार असाल तर पाण्याची बाटली सोबत न्यायला विसरू नका.

9. तुमचा दिनक्रम ठरवा 

फिटनेस आणि आरोग्य म्हणजे काय तर व्यवस्थित नियोजन करणे आणि   त्यादृष्टीने सातत्याने प्रयत्न करणे. मद्यपान आणि काहीबाही खाऊन फक्त वीकएंड ला केलेला व्यायाम हा काही उपयोगाचा नसतो. आणि आपल्याला हवे तसे परिणाम देऊ शकत नाही. तुमचा आहार, झोपेचे वेळापत्रक, व्यायामाचे वेळापत्रक ठरवा. तसेच एखाद्या आजारातून, दुखण्यातून तुम्ही किती लवकर बरे होता याचे निरीक्षण करा. तुम्ही काय खाता आणि बाहेरच्या जगातील घटनांचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो याकडे लक्ष असू द्या. एकदा का तुम्ही स्वतःवर ताबा मिळवायला शिकलात की तुमच्या फिटनेस गाठण्याच्या ध्येयापासून  तुम्ही विचलित होणार नाही.

10. यश आणि अपयश स्वीकारा 

एखाद्या दिवशी डायट स्किप करून बाहेरच खाल्लं म्हणून तुमची तब्येत लगेच बिघडणार नाही किंवा एखाद्या दिवशी एक एक्सट्रा पुश अप काढलात म्हणून तुमची तब्येत लगेच सुधारणार नाही. असं असलं तरी प्रत्येक केलेली चांगली गोष्ट आणि चुकीची गोष्ट यांची नोंद ठेवली पाहिजे त्यातून काय फायदा झाला, नुकसान झाले तेही लक्षात ठेवले पाहिजे. तरच तुमची प्रगती होईल. तेव्हा निराश होऊ नका आणि ओव्हर कॉन्फिडन्ट ही राहू नका. संय्यम ठेवा ज्याची तुम्हाला नवीन वर्षात सर्वात जास्त गरज पडणार आहे. तुमच्या शरीराशी मैत्री करण्यासाठी तुमच्या कडे ३६५ दिवस, ३६५ संधी आहेत. तेव्हा हार मानू नका.

Related posts

Leave a Comment