पोलीस कॅडेट्सच्या प्रशिक्षणा दरम्यान मुस्लिम विद्यार्थ्यांनी ‘हिजाब’ घातल्यास धर्मनिरपेक्षतेवर परिणाम होण्याची शक्यता: केरळ सरकारचे मत. एका मुस्लिम विद्यार्थिनीने दाखल केलेली पोलीस कॅडेट प्रशिक्षणादरम्यान ’हिजाब’ (हाफ स्कार्फ) घालण्याची परवानगी मागणारी याचिका केरळ सरकारने फेटाळली आहे. या प्रशिक्षणादरम्यान अशा प्रकारची सूट दिली तर धर्मनिरपेक्षतेवर त्याचा परिणाम होईल. असे केरळ सरकारने म्हटले आहे.
काही विद्यार्थी पोलीस कॅडेट दलातील प्रशिक्षण घेताना. केरळ/ sudentpolicecadet.org SPC हा शालेय अभ्यासक्रमातील एक प्रकल्प आहे. ज्यामध्ये शाळेतील तरुण विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी प्रशिक्षित केले जाते. आणि त्यांना कायद्याचा आदर राखणे, नागरी शिस्त पाळणे इत्यादी गोष्टी शिकवल्या जातात.
त्या मुलीने दाखल केलेली याचिका तपासून त्यात काहीही तथ्य नसल्याचे केरळच्या गृहमंत्रालयाने म्हटले आहे. तसेच स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रशिक्षणादरम्यान अशा प्रकारच्या सवलती दिल्या गेल्या तर सैन्यातील इतर दलांमध्ये सुद्धा अशा प्रकारची सूट देण्यात यावी. अशी विचारणा होऊ शकेल. ज्याचा परिणाम राज्याच्या धर्मनिरपेक्षतेवर होण्याची शक्यता आहे.

म्हणूनच स्टुडन्ट पोलीस कॅडेटच्या युनिफॉर्ममध्ये धर्माशी संबंध दाखवणारी कोणतीही गोष्ट घालू नये (उदा. देवी देवतांचे लॉकेट्स इत्यादी) असा आदेश केरळ सरकारने दिला आहे. स्टुडन्ट पोलीस कॅडेटच्या युनिफॉर्म मध्ये हाफ स्कार्फ आणि पूर्ण बाह्यांच्या ड्रेसचा समावेश असावा ही त्या विद्यार्थिनीने केलेली याचिका केरळ हायकोर्टाने फेटाळल्या नंतर त्या मुलीने राज्य सरकारकडे याचिका दाखल केली आहे. त्या विद्यार्थिनीने रिट याचिकेमध्ये आपले म्हणणे सरकारपुढे सादर करावे असे हाय कोर्टाने तिला सांगितले. हायकोर्टाने दिलेल्या निर्णयासह तिने आपले निवेदन राज्य सरकार पुढे सादर केले होते.
