स्वातंत्र्यवीर सावरकर….इंद्रधनुष्यासम शोभिवंत चमत्कार…. एक उत्कट देशभक्त, प्रतिभासंपन्न लेखक, उत्तुंग कल्पनाविलासी कवी, दशसहस्रेषु वक्ता, इतिहासकार, बुद्धि-निष्ठ विचारवंत, क्रियाशील समाज क्रांतिकारक…. किती पैलू वर्णावे. सावरकरांच्या या अनेक पैलूंवर भरपूर लिहिलं गेलंय आणि जाईल. जितकं लिहावं, वर्णावं, बोलावं तितकं कमी पडेल असं त्यांचं कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व होतं. पण त्यांच्या जीवनपटाचा जितका अभ्यास करू तितका एक मुद्दा ठळकपणे समोर येतो आणि तो म्हणजे, ‘ते मुळात एक संपूर्ण क्रांतिकारक होते.’
सर्वसाधारणत: क्रांतिकारक हा शब्द आपण देशभक्ती आणि भारताचा स्वातंत्र्यलढा या संदर्भात योजतो. पण सावरकरांच्या अनेक विषयातल्या विचार आणि कृती अभ्यासल्या तर या शब्दाची खरी व्याप्ती ध्यानात येते.
खरं तर भावनाप्रधानता आणि तर्कशुद्ध-ता एका ठिकाणी नांदत नाहीत. परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ठायी हे दोन्ही परस्परविरोधी गुण एकत्र नांदत होते. वयाच्या चौदाव्या वर्षी घरातल्या अष्टभुजा देवीसमोर राष्ट्रकार्याची शपथ घेणं ही उत्कट भावना होती पण ‘भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतु उभारून मारिता मारिता मी मरेतो झुंजेने’ अशी अत्यंत सुस्पष्ट विचारांची शपथ ही केवळ भावना कधीच नव्हती. ‘जयोस्तुते श्रीमहन्मंगले’, ‘जय देव जय देव जय जय शिवराया’ ‘श्री बाजी देशपांडे यांचा पोवाडा’ यासारखं अत्यंत प्रतिभावान काव्य भावनेतून स्फुरलं हे खरं, पण या काव्यनिर्मितीमागे तरुणांना प्रेरित करणं आणि राष्ट्र कार्यासाठी वळवून घेणं हा सुनिश्चित हेतू होता हेही तितकंच खरं.
आपण सारे त्यांच्या त्रिखंडात गाजलेल्या मार्सेलिसला बोटीतून समुद्रात मारलेल्या उडीचं अफाट कौतुक करतो, त्यांच्या धैर्याने अचंबित होतो. पण खुद्द सावरकरांच्या मनातला हेतू मात्र विसरतो. फ्रान्सच्या किनाऱ्यावर पोहोचून हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेण्याचा त्यांचा हेतू होता. म्हणून सुटकेच्या प्रयत्नासाठी मार्सेलिस बंदराची त्यांनी योजना केली होती. त्यानंतर ब्रिटिशांच्या न्यायाधीशांकडून शिक्षा मिळणारच याची जाणीव झाल्यावर सर्व आरोपांचे पितृत्व स्वत:कडे घेण्यात त्यांची धीरोदात्त भावना तर होतीच पण आपण कैदेत गेल्यावर निदान सहकारीतरी राष्ट्रकार्यासाठी मोकळे राहातील हा विचारही होता. सावरकरांच्या आयुष्यातलं प्रत्येक पान इतकं जाज्ज्वल्य आणि प्रेरणादायी आहे की त्याबद्दल लिहिताना, बोलताना वाहून जायला होतं. पण आता मूळ मुद्याकडे येतो.
राष्ट्रकार्याच्या आणि स्वातंत्र्यलढ्याच्या संदर्भातली त्यांची क्रांतिकारकता आपण सगळे जाणतोच आणि त्यांनी ते ध्येर्य त्यांच्या शपथेमध्येच सांगून ठेवलंय. पण भारताचा स्वातंत्र्यलढा म्हणजे ब्रिटिशांचा विरोध हे सोपं समीकरण असताना दुसऱ्या महायुद्ध-ात हिंदुस्थानी सैनिकांना ब्रिटिशांच्या बाजूने लढायला सावरकरांनी प्रवृत्त केलं. त्याबद्दल ‘रिक्रूटवीर’ अशी त्यांची हेटाळणीही आपल्याच लोकांकडून झाली. पण ‘आधी बंदुका चालवायला शिका मग कुठल्या दिशेने फिरवायच्या हे आपोआप कळेल’ असा दूरदर्शी क्रांतीकारक विचार त्यामागे होता. स्वतंत्र हिंदुस्थानचे पहिले जनरल करियप्पा आणि थिमय्या हे सावरकरांच्या प्रेरणेने ब्रिटीश सैन्यात सामील झाले होते. नेताजी सुभाषचंद्र बोसांनीहीआझाद हिंद सेनेमध्ये सावरकरांच्या प्रेरणेने सैन्यात सामील झालेल्या भारतीयांमुळे मोठी मदत झाली असं म्हटलं आहे.
अंदमानहून सशर्त सुटका झाल्यावर त्यांना रत्नागिरीत स्थानबद्ध- करण्यात आलं होतं. राजकारणात सहभाग घेण्यास बंदी होती. तेव्हा तिथे त्यांनी प्रचंड समाजक्रांती घडवून आणली. विज्ञाननिष्ठ निबंधांचा आणि जात्युच्छेदक निबंधांचा पाऊस पाडला. सर्व हिंदुसाठी खुले असणारे हिंदुस्थानातलं पहिले मंदिर रत्नागिरीत सावरकरांच्या प्रेरणेने उभं राहिलं. तिथेही त्यांनी संपूर्ण अस्पृश्यता निवारणाचा आग्रह धरला. केवळ ब्राह्मण-महार नव्हे तर महार-मांग, महार-चांभार भेदसुद्ध-ा नष्ट करण्याचा विक्रम केला. ही केवळ समाज सुधारणा नव्हे तर समाजक्रांती होती.
या सर्वांबरोबरच भाषाशुद्ध-ी-लिपिशुद्ध-ी, त्यांच्या नाटकांची नावे, ‘अभिनव भारत’ या संघटनेचे कार्य संपल्यानंतर स्वहस्ते तिची सांगता अशा अनेक घटनांमधून स्वा. सावरकरांची क्रांतीकारी भूमिका आपल्यासमोर येते.
सावरकर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. तेव्हा अध्यक्षीय भाषणातून ‘लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या’ असा क्रांतिकारक संदेश दिला. ज्या देशाचा इतिहास दुबळा त्याचं साहित्यही दुबळं होतं तेव्हा आधी देश बलशाली करा’ असा जाज्वल्य क्रांतिकारी विचार त्यांनी मांडला.
अशा या शतपैलू व्यक्तिमत्त्वाला, त्यांच्या विचारांना आपण समजून घेणं आणि यथाशक्ती त्याचं अनुकरण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या महान क्रांतिकारकाच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस सादर प्रणाम.
