चरैवेति! चरैवेति!

charavaiti

०६ नोबेल पुरस्काराचा मानकरी स्पॅनिश कवी पाब्लो नेरूदा यांनी ‘यू स्टार्ट डाईंग स्लोली’ ही अर्थपूर्ण कविता जगाला दिली आहे. कवि म्हणतो की आपण हळूहळू मरू लागतो, जर आपणास जीवनाचे सूर ऐकू येणे बंद झाले असेल, किंवा जर आपण आपला स्वाभिमान मारून टाकला असेल, किंवा जर आपण आपल्या सवयींचे गुलाम झालो असू किंवा आवेग व अशांत भावनांमुळे आपले नेत्र भरून येऊन हृदयाची धडधड वाढत नसेल तर आपण नक्कीच हळूहळू मरत असतो.

पत्रकार या नात्याने जगणाऱ्या प्रत्येकास ही कविता शंभर टक्के लागू पडते. महानगरी वार्ताहर हे नियतकालिक आज २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असताना आमच्या मनात याच भावनांचे ताण्डव चालू आहे व अंतर्मुख होऊन विचार करावयास भाग पाडत आहे. आपल्या सभोवती घनदाट अंधार असताना ज्या जिद्दीने आपण एक मिणमिणती पणती हातात घेऊन एक वाटचाल सुरू केली, त्यातील दैनंदिन रूटीनचे आपण गुलाम तर नाही ना झालो? पणतीच्या प्रकाशातअनेक गोष्टी दररोज, दरक्षणी दिसतात. त्या घटनांचा तोचतोचपणा पाहून आपण निर्ढावलो तर नाही? स्मशानात काम करणारा जसा निर्विकारपणे काम करतो आणि तेथेही मृताच्या नातेवाईकांकडून ‘लाभा’ची अपेक्षा ठेवतो, ती स्थिती तर आपली झालेली नाही ना? हे विचार मनात येताच एक मन हादरले; पण दुसरे मन म्हणाले, अरे, तुझ्या क्षेत्राकडे पहा! हेच तर चालू आहे. मरणाऱ्याच्या जातीला महत्त्व आहे, नुसत्या मरण्याला नव्हे! जमावाने ठेचून मारलेला जर अमुक जातीचा किंवा धर्माचा असेल तर आग ओकायची, पण तो जर आपल्या लाडक्या जाती-धर्माचा नसेल तर चक्क दुर्लक्ष करायचे! आपले अग्रणी हेच तर करीत आहेत. प्रशासनावर अंकुश आणू पाहणाऱ्या सरकारी हुकुमांना पाठिंबा द्यायचा नसतो, उलट कडक अंमलबजावणीमुळे जनतेचे कसे हाल होत आहेत त्याचे भडक वर्णन करायचे असते. निसर्गाचा कोप शासनाच्या हातात नाही. पण निसर्ग कोपून नुकसान झाले तर सरकारला हादरविणे, शक्य असेल तर पाडणे हा खेळ खेळायचा! जातिभेद नको म्हणता म्हणता मोर्चे व आरक्षण यांचे बिनदिक्कत समर्थन करायचे. भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या नेत्यांनी इतरांवर केलेल्या आरोपांना ठळक प्रसिद्ध-ी द्यायची. सतत पक्ष बदलणाऱ्या टोपी फिरव्या लोकांना महत्त्व द्यायचे वगैरे वगैरे.

याचवेळी आपापल्या अल्पमती व अल्पशक्तीनुसार काम करणाऱ्या मिणमिणत्या पणत्या डोळ्यापुढे तरळू लागल्या. १८ वर्षे पूर्ण होऊन अनाथाश्रमातून बाहेर पडावे लागलेल्या मुलामुलींना आधार देणारे हात, दहशतीने पोळलेल्या भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून काम करणारे हात, घरून पळून जाणाऱ्या मुलामुलींची समजूत घालून त्यांना त्यांच्या कुटुंबामध्ये परत पाठवणारे हात, आदिवासी लोकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देणारे हात, दुर्लक्षित

भटक्या विमुक्तांना आयुष्यात स्थिरता देण्याचा प्रयत्न करणारे हात… अशा या पणत्या आठवून मनाने पुन्हा उभारी धरली. ते पुन्हा ताळ्यावर आले. काय केले आपण गेल्या २५ वर्षात? समाजाच्या उपयोगी पडेल अशी सक्षम यंत्रणा उभी करू

शकलो का? याचे उत्तर बऱ्याच अंशी नकारार्थी आहे. व्यवस्था उभी करतानाच दमछाक होते. समविचारी जुळवणे व टिकविणे हेच मुख्य काम बनले. पुढची पायरी क्वचितच चढता आली. वाचकांना काय हवे याचा विचार करायचा की आपल्याला जे म्हणायचे आहे ते त्यांना कसे पटवून द्यायचे? या बाबतीत मार्गदर्शक म्हणून कोणाच्या तोंडाकडे पहावे? मूळ पत्रकारितेच्या मूल्यांवर आधारित कोण वाटचाल करतो आहे? बरेच जण थकून मधेच थांबले आहेत. मग पुढे जाण्यासाठी कान व डोळे बंद करून घ्यावे का? अंत:चक्क्षुने पाहता येईल? अरे देवा! काय हा गोंधळ? अगदी अर्जुनासारखी स्थिती झाली. पण त्या श्रीकृष्णाने दाखविलेला मार्ग आहे ना! चला. कोणतीही अपेक्षा न ठेवता, केवळ कर्तव्यबुद्ध-ीने कर्म करीत राहू! जे व्हायचे असेल ते होईल! ते त्याच्यावर सोपवून देऊ आणि जमेल तसे पुढे जात राहू! ‘महानगरी’च्या वाटचालीत ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत खांद्याला खांदा लावून साथ दिली, त्या विेशासावर पुढे चालत राहू!

Related posts

Leave a Comment