नेताजी सुभाचंद्र बोस
भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हजाराेंनी विविध प्रकारे प्रयत्न केले. कोणी अहिंसेच्या मार्गाने लढा दिला तर कोणी क्रांतीचा मार्ग अवलंबला. पण सशस्त्र सेना उभारून देशाच्या उंबरठ्यापर्यंत धडक मारणारे आणि इंग्रज सरकारच्या उरात धडकी भरवणारे सुभाषचंद्र बोस हे एकमेवद्वितीयच.त्यांना यश मिळाले नसेल पण त्यांनी जी झेप घेतली ती केवळ अविस्मरणीय आहे.
नेताजी सुभाचंद्र बोस हे एक महान देशभक्त होते. ब्रिटिश शासनापासून मुक्ती व पूर्ण स्वातंत्र्य हे त्यांचे लक्ष्य होते. तुम्ही मला रक्त द्या. मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देतो, या घोषणेद्वारे स्वातंत्र्यसेनानींमध्ये स्वातंत्र्याचा महामंत्र फुंकणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भारतीय संस्कृतीवर अतूट विश्वास होता. ते म्हणायचे, आमच्याजवळ विश्वाला देण्यासाठी तत्त्वज्ञान, साहित्य, कला, विज्ञान यातले खूप काही आहे. सगळे विश्व आपल्याकडे आशेने बघत आहे. आम्ही आपल्या रक्ताच्या अभिषेकाने स्वातंत्र्य मिळवू. हे करत असतानाच आपण राष्ट्रीय एकात्मतेचा पाया रचू. आपले स्वातंत्र्य चिरकाल कायम ठेवण्यात आम्ही तेव्हाच यशस्वी होऊ जेव्हा ते आम्ही बलिदानाने व रक्ताच्या शिंपणाने मिळवलेले असेल.
सुभाषचंद्र यांचा जन्म एका संपन्न परिवारात २३ जानेवारी १८९७ रोजी झाला. सन १९१९ला त्यांनी दर्शनशास्त्रात बी.ए. केले. ही परिक्षा प्रथम श्रेणीत पास झाल्यावर त्यांची इच्छा एम. ए. करायची होती. पण वडिलांची इच्छा होती की त्यांनी इंग्लंडला जाऊन आय सी एस व्हावे. वडीलांच्या अत्यंत आग्रहाखातर त्यांनी इंग्लंडला जाऊन आय. सी. एस.ची परिक्षा पहिल्या श्रेणीत पास केली. आठ महिन्यांच्या छोट्याशा कालावधीत सुभाषबाबू आयसीएसच्या परिक्षेबरोबरच केंब्रिज विश्वविद्यालयातील दर्शनशास्त्राची ऑनर्सची परिक्षापण उत्तीर्ण झाले. आपली स्वप्ने सोडून सरकारी नोकरी करायची आणि आरामाचे आयुष्य जगायचे की राष्ट्रहितासाठी ते सर्व सोडून द्यायचे ? या द्विधा मनःस्थितीत काही दिवस गेले. त्याचबरोबर त्यांनी विख्यात बंगाली नेता देशबंधू चित्तरंजन दास यांच्याबरोबर पत्रव्यवहार सुरू केला व त्यांना आपली सेवा देऊ केली. शेवटी सुभाषचंद्र बोस यांनी निर्णय घेतला की ते कोणत्याही परिस्थितीत सरकारी नोकरी करणार नाहीत.
ते भारतात येऊन देशबंधू चित्तरंजन दास यांना भेटले व काँग्रेसमध्ये सहभागी झाले. काँग्रेसमध्ये समाविष्ट झाल्यावर त्यांनी जे पहिले मोठे काम केले ते म्हणजे १९२१ ला प्रिंन्स ऑफ वेल्स भारतात येणार होता त्याच्या बहिष्काराचे संगठन होय. काँग्रेसच्या उच्च समितीने या बहिष्काराचा निर्णय घेतला होता. तो देशभर आयोजित केला गेला. तो अत्यंत यशस्वी झाला. त्यामुळे सरकार घाबरले. त्यांनी देशबंधू चित्तरंजन दास, सुभाष बोस व इतर शेकडो लोकांना अटक केली. सुभाष डिसेंबर १९२१ ला पहिल्यांदा तुरूंगात गेले. असे म्हटले जाते की १९२१ नंतर १९४१ साली भारत सोडून जाईपर्यंत वीस वर्षांत ते अकरा वेळा तुरूंगात गेले. १९२४ च्या ऑक्टोबरमध्ये लॉर्ड लिंटनने बंगाल ऑर्डीनन्स अॅक्ट काढला. सुभाषबाबुंनी याचा विरोध केला. आंदोलनाची भाषा केल्यामुळे त्यांना कैद केले गेले. कोणताही खटला चालवल्याशिवाय त्यांना ब्रह्मदेशातील मंडाले येथे जेलमध्ये पाठवले गेले. तिथे ते अडीच वर्षे होते. १९३० साली सविनय कायदेभंगाच्या आंदोलनात त्यांना पुन्हा जेलमध्ये जावे लागले. १९३१ ला ते जेलमधून मुक्त झाले. डिसेंबर १९३१ला गांधीजी गोलमेज परिषदेतून निराश होऊन परत आले. त्यांनी आंदोलन परत सुरू केले. ४ फेब्रुवारी १९३२ला सुभाष यांना पुन्हा बंदी बनवले गेले.
१९३७ ला ते पुन्हा युरोपला आले. ते परदेशात असतानाच त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा सभापती निवडले गेले. फेब्रुवारी १९३८ला भारतात येऊन त्यांनी हरिपुरा भारतीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले. ही गोष्ट त्यांच्या जीवनातीलच नव्हे तर भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अर्थपूर्ण क्रांतीकारी घटना समजली जाते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी कडक संघर्षाचे आवाहन केले. आपल्या उग्र क्रांतीकारी विचारांमुळे त्यांनी ब्रिटिश शासनाला अडचणीत आणले. त्यांनी देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा अर्थ समजावून सांगितला. १९३९ साली काँग्रेसचे ४४ वे अधिवेशन त्रिपुरा येथे झाले. त्यात अध्यक्षपदासाठी त्यांना गांधीजींचे प्रतिनिधी डॉ. पट्टाभि सीतारामय्या यांच्याशी लढावे लागले. निवडणुकीत सुभाषबाबू निवडून आले. त्यांचा विजय गांधी समर्थकांना सहन झाला नाही. अंतर्गत संघर्ष समाप्त करण्यासाठी सुभाष यांनी मे १९८९ला फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली व स्वतःला काँग्रेसपासून वेगळे केले. सप्टेंबर १९३९ ला युद्ध- सुरू झाले. फॉरवर्ड ब्लॉकने सुभाषबाबुंच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशविरोधी प्रचार सुरू केला. जेव्हा सरकारला ही जाणीव झाली की फॉरवर्ड ब्लॉक हे विरोधाचे व्यासपीठ बनत आहे तेव्हा शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांना अटक केली. सरकारने त्यांच्यावर खटला चालवला नाही. नजरकैदेत ठेवले. २६ जानेवारी १९४१ ला ते नजरकैद तोडून पळून जाण्यात यशस्वी ठरले. रात्रीच्या अंधारात निघून ते बर्दवानमार्गे पेशावरला गेले. नंतर ते काबूलला व नंतर तेथील इटलीच्या राजदूताच्या मदतीने इटलीला पोहोचले. जवळ जवळ एका वर्षानंतर एप्रिल १९४२ला जनतेने त्यांचा आवाज बर्लिन रेडीओवरून ऐकला. त्याचबरोबर भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक रोमहर्षक पर्व सुरू झाले.
युरोपातून निघून सुभाषचंद्र बोस पूर्व आशियात आले. जपानच्या सरकारने त्यांचे स्वागत केले. तिथे त्यांची भेट प्रसिद्ध- क्रांतीकारी नेता रासबिहारी बोस यांच्याशी झाली. नंतर आझाद हिंद सेनेची निर्मिती झाली. ५ जुलै १९४३ ला आझाद हिंद सेनेची विधिवत घोषणा करण्यात आली. २१ ऑक्टोबर १९४३ ला आझाद हिंद सरकारची स्थापना केली गेली. त्यावेळी घोषणापत्र वाचताना ते म्हणाले, आम्ही ज्या वीरांनी भारतात वीरता व बलिदानाची परंपरा निर्माण केली त्यांच्या नावे आवाहन करतो की आपण सगळे एका झेंड्याखाली एकत्र येऊ या. भारतीय स्वातंत्र्यासाठी लढू या.
आझाद हिंद सेनेला जर्मनी, स्वतंत्र बर्मा, फिलिपाईन्स, चीन, इटली, मंचूरिया आणि जपानने मान्यता दिली होती. ३० डिसेंबर १९४३ ला आझाद हिंद सेनेने भारतीय भूमीत म्हणजे अंदमान निकोबार बेटांवर राष्ट्रध्वज फडकवला. जानेवारी १९४४ ला आझाद हिंद सेनेचे कार्यालय बर्मा येथे हलवण्यात आले. सुभाषबाबूंसमोर अनंत अडचणी होत्या पण त्यांनी हिमतीने त्यांचा सामना केला. जपानी सेनेबरोबर आझाद हिंद सेनेच्या शूर सैनिकांना त्यांनी युद्ध-मोच्र्यावर नियुक्त केले. कठीण परिस्थिती व भूक-रोगराई यांचा सामना करत आझाद हिंद सेना लढली आणि १६ मार्च १९४४ ला त्यांनी भारताच्या सीमेत पाऊल ठेवले. ५ जुलैला विजयी सैनिकांनी सुभाषचंद्र बोस यांचे अभूतपूर्व स्वागत केले. त्याचवेळी जपानद्वारे हत्यारांची मदत बंद केली गेली. युद्ध-ात ब्रिटिश सरकार जिंकण्याच्या स्थितीला येऊन पोहोचले.
६ ऑगस्ट १९४५ला अमेरिकेने हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब टाकला. ९ ऑगस्टला दुसरा बॉम्ब टाकला. जपानने शरणागती पत्करली.आझाद हिंद सेनेसमोर आता आपली सर्व कारवाई थांबवण्यावाचून दुसरा कोणताही उपाय नव्हता. जपानने आत्मसमर्पण केल्यावर युद्ध- चालू ठेवणे शक्य नव्हते. नेताजी सिंगापूरला गेले. १७ ऑगस्ट १९४५ला नेताजी सेंगॉनला जात होते. त्यानंतर पाच दिवसांनी टोकीओ आकाशवाणीने घोषणा केली की १८ ऑगस्ट १९४५ला जपानला जाताना फारमोसा विमान दुर्घटनेत सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले.
भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हजारोनी विविध प्रकारे प्रयत्न केले. कोणी अहिंसेच्या मार्गाने लढा दिला तर कोणी क्रांतीचा मार्ग अवलंबला. पण सशस्त्र सेना उभारून देशाच्या उंबरठ्यापर्यंत धडक मारणारे आणि इंग्रज सरकारच्या उरात धडकी भरवणारे सुभाषचंद्र बोस हे एकमेवद्वितीयच.त्यांना यश मिळाले नसेल पण त्यांनी जी झेप घेतली ती केवळ अविस्मरणीय आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या निधनाने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक तेजस्वी पर्व संपले.