प्रत्येक काळात माणसाच्या गरजा बदलत असतात. सामाजिक स्तरानुसार त्या वेगवेगळ्या असतात. आजच्या मुंबईकरांच्या गरजा वेगळ्या आहेत. उंच उंच टॉवरमध्ये आणि श्रीमंत वस्तीत राहणाऱ्या लोकांना जी कामं करून हवीत ती मध्यम वर्गातील स्त्रीपुरुष स्वत: करतात. तर मध्यमवर्गातील कुटुंबाना ज्या कामासाठी नोकर ंिकवा व्यक्ती हवी असते ती कामं निम्न स्तरातील माणसांच्या अंगवळणी पडलेली असतात. आय.टी.मध्ये काम करणाऱ्याच्या अडचणी वेगळ्या. नवरा बायको नोकरीला असतील तर त्यांच्या अडचणी वेगळ्या, अमाप पैसा असणाऱ्या श्रीमंतांच्या मागण्या वेगळ्या. त्या नमेकेपणे अभ्यासल्या आणि त्या सोडविण्यासाठी तयारी ठेवली तर चोख पैसा देणारा स्वयंरोजगार सुरू करणं कठीण नाही. महिला वर्गासाठी तर स्वत:चं घर, कुटुंब सांभाळून करता येण्यासारखे अनेक उद्योग आहेत.
सात बेटांची आगरी कोळ्यांची मुंबई इंग्रजांच्या ताब्यात आली आणि तिच्या विकासाची-प्रगतीची सुरुवात झाली. पश्चिम किनाऱ्याच्या दलदलीनं वेढलेल्या भूभागाची भौगोलिक रचना बंदर म्हणून किती उपयुक्त ठरू शकते याचा नेमका अंदाज दर्यावर्दी इंग्रजांच्या लक्षात आला. आणि त्यादृष्टीनं कामाला सुरूवात केली. १९ व्या शतकाच्या मध्याला मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू झाली. तेव्हापासून मुंबईत औद्योगिकीकरणाची सुरुवात झाली. मँचेस्टर सारखं हवामान असल्यामुळे मुंबई ही कापड उद्योगासाठी योग्य ठिकाण आहे हे इंग्रजांनी अचूकपणे जाणलं होतं. त्यामुळेच अधिकाधिक कापड गिरण्या सुरू करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं. काही वर्षातच मुंबई देशातील कापड उद्योगाचं महत्त्वाचं केंद्र बनली. त्याच दरम्यान मुंबापुरीत शैक्षणिक, सामाजिक, नागरी सुविधानी वेग घेतला. शाळा महाविद्यालये सुरू झाली. प्रशासकीय कामं करण्यासाठी खातं-विभागांची स्थापना होऊ लागली. न्याय निवाड्यासाठी कोर्टांची योजना झाली तर शहर सुरक्षेसाठी पोलीस खांत सज्ज करण्यात आलं. त्याच काळात रेल्वे सुरू करण्याचा निर्णय इंग्रजांनी घेतला. १८५३ मध्ये मुंबई-ठाणे मार्गावर रेल्वे धावू लागली. उद्योगविकासाच्या दृष्टीनं ती महत्त्वाची घटना होती. नैसर्गिक सुरक्षिततेमुळे मुंबई बंदराची भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या महत्त्वाच्या बंदरात गणना झाली. जागितक व्यापार-व्यवहार मुंबई बंदरातून होऊ लागले. बंदर व्यवस्थेसाठी पोर्ट ट्रस्टची स्थापना झाली. मालाची चढउतार मोठ्या प्रमाणात होऊ लागली. ठाण्यापर्यंत पोहोचलेल्या रेल्वेने हळूहळू पाय पसरले. देशातील अनेक भागा शहरांशी मुंबई रेल्वे मार्गानं जोडली गेली. दळणवळणाच्या प्रगतीमुळे उद्योजक मुंबईला पहिली पसंती देऊ लागले. कापड गिरण्यांबरोबर, मुंबई आणि परिसरात, यंत्र उद्योग, रासायनिक कंपन्या, औषध निर्मिती कारखाने निघू लागले. मोठ्या कंपन्या कारखान्यांच्या बरोबरीनं छोटे छोटे उद्योग-कारखाने शहरात चालू झाले. वेगवेगळ्या खात्या विभागांच्या कार्यालयात आणि गिरण्या कंपन्या कारखान्यांतून नोकरी मिळतेय म्हटल्यावर मुंबईकडे गरजू माणसांचा ओघ सुरू झाला. कामगार-कर्मचाऱ्यांच्या चाळी-घरं उभी राहू लागली. वस्त्या वाढत गेल्या, मुंबईची लोकसंख्या वाढत गेली. वाढणाऱ्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण कण्यासाठी वेगवेगळे व्यवसाय मुंबईत स्थिरावले, वाढत गेले. बाजार आले, रुग्णालये सुरू झाली, वाहतूक व्यवस्था आकाराला आली. हा हा म्हणता मुंबई एक उद्योगनगरी बनून गेली. काही वर्षातच देशातील महत्त्वाचं औद्योगिक शहर म्हणून मुंबईकडे पाहिलं जाऊ लागलं. भारताची राजधानी दिल्ली असली तरी आर्थिक राजधानीचा मान मुंबईलाच मिळाला आणि आजही तो कायम आहे. औद्योगिकीकरणाच्या सुरुवातीलाच ‘हमखास रोजगार मिळवून देणारं शहर’ अशी जी मुंबईची ओळख निर्माण झाली ती आजही कायम आहे. म्हणूनच आजही भारताच्या कानाकोपऱ्यातून माणसं हातावर पोट घेऊन मुंबापुरीत येत आहेत आणि ही मुंबईनगरी काही ना काही काम करण्याची संधी त्यांना देत आहे.
उद्योग व्यवसायाच्या वाढीबरोबर मुंबईत येणाऱ्या महाराष्ट्राच्या विविध भागातील माणसांच्या बरोबरीनं परप्रांतीयही येऊ लागले. अलिकडच्या काळात बांगलादेशातूनही माणसे रोजगाराच्या शोधात मुंबईत येत असतात. परप्रांतीयांची ही समस्या आजकालची नाही. मुंबईत औद्योगिकीकरण सुरू झालं तेव्हापासूनच मुंबापुरीत येणाऱ्या माणसांची संख्या आणि गर्दी वाढत गेली. उपलब्ध नोकऱ्या आणि रोजगार इच्छुकांची संख्या याचं गणित मुंबईसाठी नेहमीच व्यस्त राहिलं आहे. त्यामुळे मुंबईसाठी बेकारीची समस्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपीच झाली आहे. रोजच्या रोज मुंबईत येऊन आदळणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंढ्यामुळे तर ही समस्या अधिकाधिक उग्र बनत चालली आहे. १९६० साली मराठी भाषिकांच्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मात्र त्यानंतरही स्थानिक मराठी भाषिकांच्या नोकरीचा हक्क नाकारला ंिकवा दुर्लक्षिला जाऊ लागला. त्यावेळी स्थानिकांच्या रोजगार हक्काचा प्रश्न घेऊन शिवसेना उभी राहिली. शिवसेनेच्या माध्यमातून स्थापन झालेली स्थानिय लोकाधिकार समिती स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून झगडू लागली. महाराष्ट्र विधान सभेनं स्थानिकांना ८०% नोकऱ्या मिळण्याचा कायदा संमत केला. त्या कायद्यामुळे आणि स्थानिय लोकाधिकार समितीच्या आंदोलनामुळे बँका, विमा कंपन्या, शासकीय-निमशासकीय कार्यालयात स्थानिक आणि मराठी भाषिक कर्मचाऱ्यांची संख्या वाढली. तरी बेकारीचं पूर्णपणे निर्मूलन झालं, मुंबईतील प्रत्येकाला कामधंदा मिळाला असं काही झालं नाही. परप्रांतियांच्या लोंढ्यामुळे मुंबईच्या रोजगारविषयक तसेच नागरी समस्या वाढत आहेत हे समजूनही ते थांबविण्यासाठी कोणताही कटू निर्णय न घेतल्यामुळे मुंबईतील बेरोजगारीचा प्रश्न अधिकाधिक गंभीर होत चालला आहे.
गिरण्या, यांत्रिक उद्योग, औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या यामुळे निर्मितीक्षम उद्योगांचं शहर अशी मुंबईची प्रतिमा विसाव्या शतकातील आठव्या दशकापर्यंत होती. १९८२ साली मुंबईच्या गिरणी कामगारांनी संप केला. दीर्घकाळ चाललेल्या त्या संपामुळे शंभराहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या कापड उद्योगावर अरिष्ट आलं. एक एक करीत मिल्स बंद पडत गेल्या. मुंबईतील कापड उद्योग, लघुउद्योगाच्या स्वरूपात ंिभवडी, सुरतसारख्या शहरांकडे गेला. कापड उद्योग बंद पडल्यामुळे मुंबईतील मोठा कामगार वर्ग बेकार झाला. ही बेकारी गिरणी कामगारांपुरतीच मर्यादित राहिली नाही. गिरण्यांवर अवलंबून असलेले अनेक लहान मोठे उद्योग-कारखान्यांना टाळी लागली. ठाणे भागातील औद्योगिक पट्ट्यातील नावाजलेल्या कंपन्या बंद पडल्या. अनेक मोठ्या उद्योगांनी आपल्या काही उत्पादनांची निर्मिती बंद केली. अल्पावधित बेरोजगारांची संख्या कितीतरी पटीनं वाढली.
१९९० च्या दरम्यान जागतिकीकरण, खाजगीकरणाची मोठी लाट मुंबईवरही आदळली. सर्वच क्षेत्रात संगणकानं शिरकाव केला. हळूहळू माणसांपेक्षा संगणक प्रधान झाला. एक कॉम्प्यूटर अनेक काम अल्पावधीत आणि बिनचूकपणे करू लागला. उद्योग-व्यवसायातील माणसांची गरज कमी होत गेली. मोठे कारखाने, कंपन्या, कार्यालयात संगणकराज सुरू झालं. संगणकाची व्याप्ती इथवरच थांबली नाही तर लघु आणि कुटीर उद्योगातही संगणक ‘आवश्यक’ झाले. वेगानं झालेल्या यांत्रिकीकरण आणि संगणकीकरणामुळे विसाव्या शतकातील शेवटचं दशक हे उच्चांकी बेरोजगारीचं ठरलं.
जागतिकीकरणामुळे माहिती तंत्रज्ञान उद्योगाचं नवीन दालन तरुणाईला उपलब्ध झालं. मुंबईत गिरण्या-कारखान्यांच्या जागी उभ्या राहिलेल्या इमारतींमध्ये आयटी कंपन्यांचं बस्तान बसू लागलं. जागतिक स्तरावर होणाऱ्या बदलातून बहुराष्ट्रीय कंपन्या निर्माण होऊ लागल्या. जागतिक स्तरांवर बलाढ्य समजल्या जाणाऱ्या कंपन्यांनी मुंबईत आपलं बस्तान बसविलं. माहिती तंत्रज्ञानामुळे मागील पंधरा-वीस वर्षात मुंबईत अनेक नवनवीन कंपन्या सुरू झाल्या. जागतिक स्तरावर संपर्क कार्य करणारी कॉलसेंटर्स मुंबईत आली. गिरण्या कारखान्यांच्या काळात. निर्मिती केंद्र-प्रॉडक्शन सेंटर म्हणून असलेली मुंबईची प्रतिमा गेल्या दोन दशकात पूर्णपणे बदलली आणि मुंबईचं रूपांतर व्यवसाय आणि व्यापार केंद्रात झालं. या बदलाचा अंदाज आलेल्या तरुणाईनं त्याच दिशेनं आपल्या शिक्षणाची दिशा ठरविली. संगणकीय कामकाजाचं कौशल्य त्यांनी आत्मसात केलं. त्यामुळे बेरोजगारी, बेकारी हे शब्द त्यांच्याजवळ आले नाहीत. मात्र त्यांना कधीच बेरोजगारीला सामोरं जावं लागणार नाही असं म्हणता येणार नाही.
पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक तरुण-तरुणी आज व्यवस्थापकीय मॅनेजमेंट शिक्षणाकडे वळतात. कॉमर्स ग्रॅज्युएट्सच्या बरोबरीन इंजिनीयर्स, विज्ञान विषयाचे पदवीधर, कलाशाखेचे ग्रॅज्युएट एम.बीए फायनान्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यास धडपडत असतात. त्या विषयात एमबीए करण्यासाठी पाच पाच-दहा-दहा लाख रुपये देणग्या देण्याची त्यांची तयारी असते. एमबीए झाल्यानंतर फायनान्स कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी धरायची आणि वर्षा-दोन वर्षांत देणगीची रक्कम वसूल करायची अशी त्यांची गणितं असतात. आवड म्हणून एखादी शाखा निवडलीय अशी वृत्ती या तरुणाईत पाहायला मिळत नाही. त्यामुळे पैशाचं टारगेट पूर्ण झालं की अधिक पगाराची नवी नोकरी धरण्यासाठी ती मंडळी मोकळी असतात.
माहिती तंत्रज्ञानाच्या कंपन्यांनी मुंबईतील तरुण-तरुणींना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिला ही बाब दुर्लक्षित करता येणार नाही. त्या क्षेत्रात काम केलं तर मोठा पगार मिळतोय हे तरुणाईसाठी आकर्षण आहे. पगाराची रक्कम प्रधान मानणारी ही पिढी दीर्घकाळ एकाच कंपनीत राहिल याची खात्री नसते. त्याचबरोबर गरज संपल्यावर कोणत्याही क्षणी व्यवस्थापन ‘उद्यापासून येऊ नका’ असं सांगेल तेही कुणाला सांगता येत नाही. कामाचे तास ठरलेले असले आणि नेमणूक पत्रात ते नमूद केलेले असले तरी त्यावेळेत काम संपत नाही आणि कर्मचाऱ्यांना काम पूर्णतेसाठी अतिरिक्त वेळी द्यावी लागते.
व्यवस्थापनाचे शिक्षण देणारी कॉलेजेस कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांच्या नोकरीची व्यवस्था करीत असतात. त्यामुळे त्या क्षेत्रातील तरुणाईवर बेकारीची वेळ येत नाही.
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी अलिकडे फॉरेन रिटर्न मंडळी उत्सुक असताना दिसतात. भारतातून पदवीधर झाल्यानंतर काही विद्यार्थी परदेशी जाऊन मास्टर डिग्री मिळवितात. काही वर्ष परदेशी नोकरी केल्यानंतर तेथील औद्योगिक अस्थिरतेमुळे भारतात परततात आणि पगार कमी मिळत असला तरी आयटी कंपन्यांमध्ये नोकरी धरतात. या मंडळींमुळे भारतातील आयटी पदवीधर थोडेफार बाजूला पडतात. आज जरी आयटी क्षेत्रात आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून शिक्षित उच्च शिक्षितांना मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळत असल्या तरी जागतिक अस्थिरतेचा विचार करता हीच स्थिती कायम राहिल असे ठामपणे म्हणता येणार नाही.
जागतिकीकरण, संगणकीकरण, खाजगीकरण आदी मुद्यामुळे एकंदरीत सर्वच रोजगार क्षेत्रावर परिणाम झाला आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, विमा कंपन्या यामधून १९८०-१९९० नंतर मोठी भरती झालेली नाही. त्यामुळे त्या आधी सर्वसामान्यपणे कायम नोकरीचा आग्रह धरणाऱ्यांना आपल्या अपेक्षा बदलणं भाग पडलं. वाढत्या प्रशासकीय खर्चाना आळा घालण्यासाठी म्हणून अनेक आस्थापनांनी आऊटसोर्सिंगचे निर्णय घेतले. त्यामुळेही असलेल्या मनुष्यबळावर काम चालविणे शक्य झाले. या बदललेल्या रोजगार संधीचा फायदा घेऊन काही मंडळींनी आऊट सोर्सिंगची कामे स्वीकारली आणि स्वत:चा स्वतंत्र रोजगार सुरू केला.
रोजगाराच्या दृष्टीनं कामगार-कर्मचाऱ्यांचे मुख्यत्वे तीन भाग केले जाता. स्वयंरोजगार करणारी मंडळीनियमित पगार वा वेतन मिळविणारे कायम कर्मचारी आणि तात्पुरते कर्मचारी गेल्या दोन अडीच दशकात अनेक खात्या विभागात कर्मचारी भरतीच न झाल्यामुळे कायम कामगार कर्मचाऱ्यांची टक्केवारी मुंबईत तरी कमी झालेली दिसते. त्याचवेळी तात्पुरते कामगार घेऊन एखादे काम उरकण्याकडे मालकवर्गाचा कल वाढला. त्यातूनच कॉन्ट्रॅक्ट लेबर ही संकल्पना अनेक उद्योग व्यवसायात रुजली.
तसे पाहिले तर काळानुरूप जगाच्या गरजा बदलत असतात. त्या गरजा ओळखून त्या पुरविण्याचं काम करायचं ठरविलं तर ‘मला काम नाही’ असं सांगण्याची वेळ माणसांवर क्वचितच येईल. जेव्हा कापड गिरण्या सुरू होत्या त्यावेळी आपला कुटुंबकाबिला गावी ठेवून गाववाल्यांच्या गाळ्यावर राहून नोकरी करणारी कितीतरी मंडळी या मुंबईत होती. रोज हॉटेलात खाणं ही त्या काळात पद्ध-त नव्हती आणि मिलमध्ये काम करणाऱ्या कामगारांना ते परवडणारं नव्हतं. त्याकाळी गिरणगावातील काही महिला खाणावळ चालवीत. मिलकामगारांसाठी डबे बनवून देत. अशी कित्येक घरं त्या काळी होती की ज्यांचा संसार खाणावळीच्या पैशावर चालत असे. सुरूवातीला मुंबईकरांना कार्डावर सरकारी दूध मिळत असे. पहाटे उठून केंद्रावर जाऊन दूध आणणं लोकांना कंटाळवाणं वाटू लागलं. त्यातून घरोघर दूध पोचविण्याचं काम काहींनी सुरू केलं. पेपरचा व्यवसाय तर खूपच जुना आहे. नोकरी महत्त्वाची मानणाऱ्या त्या काळातही लोकांच्या वेगवेगळ्या गरजा पुरविण्याची कामं व्यवसाय म्हणून मुंबईतील माणसं करीतच होती. पूर्वी लग्नकार्य चाळीतच व्हायची. पाहुण्या रावळ्यांचं आगत स्वागत करणं, चाळीत जेवणावळी उठविणं कठीण झालं तेव्हा माणसांनी हॉलमध्येच विधीयुक्त लग्न करण्याचं ठरविलं आणि त्यातून कॅटरिंगचा व्यवसाय पुढे आला आणि आता तर जागोजागी, खेड्यापाड्यातही फोफावल्या. प्रत्येक घरातून देवपूजा होत असते. मात्र देवाला लागणारी फुलपुडी आणायला माणसं विसरत. त्यातून फुलपुडी टाकण्याची सेवा सुरू झाली.
प्रत्येक काळात माणसाच्या गरजा बदलत असतात. सामाजिक स्तरानुसार त्या वेगवेगळ्या असतात. आजच्या मुंबईकरांच्या गरजा वेगळ्या आहेत. उंच उंच टॉवरमध्ये आणि श्रीमंत वस्तीत राहणाऱ्या लोकांना जी कामं करून हवीत ती मध्यम वर्गातील स्त्रीपुरुष स्वत: करतात. तर मध्यमवर्गातील कुटुंबाना ज्या कामासाठी नोकर ंिकवा व्यक्ती हवी असते ती कामं निम्न स्तरातील माणसांच्या अंगवळणी पडलेली असतात. आय.टी.मध्ये काम करणाऱ्याच्या अडचणी वेगळ्या. नवरा बायको नोकरीला असतील तर त्यांच्या अडचणी वेगळ्या, अमाप पैसा असणाऱ्या श्रीमंतांच्या मागण्या वेगळ्या. त्या नमेकेपणे अभ्यासल्या आणि त्या सोडविण्यासाठी तयारी ठेवली तर चोख पैसा देणारा स्वयंरोजगार सुरू करणं कठीण नाही. महिला वर्गासाठी तर स्वत:चं घर, कुटुंब सांभाळून करता येण्यासारखे अनेक उद्योग आहेत.
बेबी सिटींग, घरी थांबून मुलं सांभाळणे, एखाद्या सहनिवासातील मुलं शाळेत पोहोचविणं, घरी भाज्या आणून त्या साफ करून त्यांची पॅकेट्स तयार करून चार घरी नेऊन देणे. हल्ली पिठाच्या गिरण्यांची संख्या कमी होतेय. घरी घरघंटी आणून आसपास राहाणाऱ्या कुटुंबांचं दळण दळून देणं, शिक्षित असली तर शिकवण्या घेणं. एक ना दोन अशी कितीतरी कामं करून स्त्रिया पैसे कमावू शकतात. ज्या स्त्रियांना नोकरी करायची आहे, त्यांनाही आता अधिक क्षेत्रं उपलब्ध झाली आहेत. पोलिसांच्या वाहतूक शाखेत आता महिला पोलीस असतात. बस आणि एसटीत महिला कंडक्टर नेमले गेले आहेत. काही स्कूल बसेसमध्ये मुलांना चढविण्या उतरविण्याचं काम महिला करतात. विमान तळावरही सेवा करणाऱ्या महिला वर्गात वाढ झाली आहे. घरातील वृद्ध-ाना सांभाळण्याचाही व्यवसाय महिलांसाठी रोजगार उत्पन्न करणारा आहे. एखादी महिला धाडस करून रिक्षा आणि टॅक्सीही चालवू शकते. भाजी विक्री, फुले विक्रीच्या व्यवसायात महिला अनेक वर्षांपासून आहेत. ऑफिसेसच्या भागात हल्ली अनेक स्त्रिया, नास्ता-जेवणाचे पदार्थ विकताना दिसतात. घरगुती अन्नपदार्थ पुरविण्याच्या या स्वयंरोजगाराला नोकरदारांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतो. शोधकदृष्टी आणि मेहनत करायची तयारी असली की पैसे देणारे उद्योग-व्यवसाय आपोआप सापडतात. आणि कित्येकदा हे व्यवसाय नोकरीच्या पगारापेक्षा अधिक पैसे देणारे ठरतात.
महिलांपेक्षा पुरुषांना स्वयंरोजगाराच्या संधी अधिक आहेत. वाढलेल्या वाहन संख्येमुळे बेजार झालेल्या मुंबईत ‘ड्रायव्हर्स’ कमी आहेत. घाई गर्दीच्या दैनंदिन वेळापत्रकात घरच्या घरी इस्त्री करणे जिकिरीचे होऊन बसले आहे. सहकारी हाऊंिसग सोसाट्यांमध्ये अचानक इलेक्ट्रीकल, प्लंिबग, सारख्या अडचणी निर्माण होतात आणि योग्य तो कामगार वेळेवर मिळत नाही. तसे कामगार तातडीने पुरविणे हेही पैसे देणारे काम ठरू शकते. अनेक गृहसंकुले, कार्यालयांना सुरक्षा रक्षक नेमायचे असतात. साफसफाई कामगार हवे असतात. ते पुरविणारी एजन्सी सुरू करून चार पैसे गाठीशी येऊ शकतात. अनेकांना काही कार्यक्रम, वाढदिवस सोहळे, समारंभ साजरे करायचे असतात त्यासाठी लागणारी सगळी तयारी करून देणे याचीही गणना स्वयंरोजगारात करता येईल. पर्यटन संस्थांमधून फिरायला जाण्याऐवजी स्वतंत्रपणे भटकण्याची काहीजणांची इच्छा असते. त्यांच्या टूर प्लॅन करून देण्याचं काम स्वतंत्रपणे करता येईल. रेल्वेची तिकीट बुकींग संगणकाच्या मदतीनं होण्याच्या आधीच्या काळात आमचे एक मित्र वैयक्तिक आणि ग्रूप टूर आखणीचं काम करायचे. कुठे जायचं, कसं जायचं, कुठं राहायचं या साऱ्याची व्यवस्था ते करून द्यायचे आणि त्याबद्दल आपलं सेवा शुल्क घ्यायचे. रेल्वे आणि हॉटेल बुकींग ऑनलाईन होईपर्यंत त्यांचा हा व्यवसाय सुरू होता. आताही अनेकांना अशा मार्गदर्शन, मदतीची गरज आहे. सरळसोट पर्यटनापेक्षा आडवाटेची गावं ठिकाणं पाहाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी तसे कार्यक्रम आखून दिल्यास पर्यटन सेवेतील ते वेगळं पाऊल ठरू शकेल. नोकरीच्या धावपळीत घरातील बिल वेळेवर भरणं कठीण होऊन बसतं पण ज्यांच्याकडे वेळ आहे अशांसाठी हा ‘उद्योग’ ठरू शकतो. आजही वेळेचा गजर करणारी घड्याळं घराघरात आहेत मात्र त्याच्या किमती इतक्या कमी असतात की ती बिघडली तर दुरुस्त करण्याऐवजी नवीनच घेतली जातात. त्यादृष्टीनं घड्याळ दुरुस्ती ही आऊटडेटेड झाली आहे मात्र त्यांची जागा आता मोबाईलने घेतली आहे. मोबाईल नसलेली व्यक्ती मुंबई शहरात सापडलं कठीण. लोकांना आपल गुलाम बनविणारं हे आधुनिक काळातील सर्वव्यापी उपकरण बिघडलं की माणसं वेडीपिसी होतात. मोबाईल दुरुस्ती हा आताच्या काळातील चलता उद्योग आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. वेळेवर मोबाईल रिचार्ज केला नाही तर संपर्कात अडचणी येऊ शकतात. कधी कधी रिचार्ज करणारं दुकान आपण जिथं असतो तिथ उपलब्ध नसतं. एखाद्यानं आपले क्लायंट ठरवून घेतले त्याच्या रिचार्चच्या दिवसांची नोंद ठेवली आणि वेगवेगळ्या पॉलीसीजचा प्रिमियम-हप्ता ज्या पद्ध-तीनं वीमा एजंट डायरी ठेवून भरतात तसं मोबाईलच्या बाबतीत केलं तर ती सेवा वेगळी म्हणता येईल. शोधत गेलं की मार्ग सापडतात. उद्योगाच्या दिशा आणि व्यवसायाच्या संधी नजरेच्या टप्प्यात येतात. त्या दिशेनं पावलं टाकण्याची गरज असते. पोटाचा प्रश्न महत्त्वाचा मानून परराज्यातून मुंबईत आलेल्या माणसांचं एकच लक्ष्य असतं, काहीही करायचं, कोणतही काम करायाचं. पण जगण्यासाठी लागणारा पैसा मिळवायचाच. लाज शरम हा भाग त्यांच्या लेखी असत नाही. त्यामुळे त्यांना रोजगाराचा मार्ग सापडतो आणि काही दिवसांच्या मेहनतीनंतर ते धंद्यात आणि मुंबईतही स्थिरावतात. स्थानिकांच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी आहे. आसपास ओळखीचा आणि ओळखणारा समाज असल्यामुळे पैसे देणारा असला तरी कोणताही व्यवसाय करायची त्यांची इच्छा नसते. २५ वर्षांपूर्वी वसई परिसरात जेव्हा नवीन इमारती उभ्या राहात होत्या. त्या इमारतींमधून माणसं राहायला येत होती तेव्हा दादर भागात येऊन भाजी विकणाऱ्या एका वसईवाल्याला म्हटलं, तासाभराचा प्रवास करून मुंबईत यायचं आणि भाजी विकायची त्यापेक्षा वसईत नवनवीन हाऊंिसग सोसायट्या उभ्या रहात आहेत तिथं फिरून धंदा का नाही करीत? त्यानं दिलेल्या उत्तरातून स्थानिकांची मानसिकता लक्षात आली. ‘साहेब आपण ज्या भागात राहातो तिथं धंदा नाही करायचं, आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागतो.’
‘चांगल्या मार्गाने कमाविलेला प्रत्येक पैसा मोलाचा असतो कारण त्यासाठी आपण मेहनत केलेली असते. हा विचार श्रमाची प्रतिष्ठा रुजविणारा आहे. आपल्याकडे पेपर टाकणाऱ्याला पेपरवाला, दूध टाकणाऱ्याला दूधवाला म्हटलं जातं. पण त्या उच्चारातून कमीपणाचा अर्थ ध्वनित होतो. स्वच्छ व्यवसायातून श्रम करून मिळविलेल्या पैशाचं मोल श्रमाला प्रतिष्ठा देऊनच वाढणार आहे कुठलंही श्रमाचं काम कमीपणाचं नाही हे मानलं तरच स्थानिक माणसांना रोजगाराचा, मार्ग सापडणार आहे.’
गेल्या पंचवीस वर्षांत मुंबईच्या रोजगारविश्वात अमूलाग्र बदल झाले आहेत. नियमित पगार देणाऱ्या नोकऱ्यांची संख्या कमी झालीय. निर्मिती केंद्र म्हणून ओळखली जाणारी मुंबई सेवा उद्योगांमुळे व्यावसायिक, व्यापारी झाली. या बदलानंतरही मुंबईत बेकारीनं कळस गाठलाय असं चित्र निर्माण झालेलं दिसत नाही. माणूस जगतोय आणि जगण्याइतकं कमवतोय. गिरण्या बंद पडल्या तरी बांधकाम उद्योग तेजीत आला. हजारो अशिक्षित अनपढ स्त्री पुरुष आज इमारत उभारणीच्या कामात राहून पोटापुरतं कमवताहेत. तिथं कुशल सुतार, गवंडी, इलेक्ट्रीशियन याची गरज असून ते कामगार मिळत नाहीत. वेटर, कामगार मिळत नाही अशी अडचण मुंबईतील हॉटेल मालक करीत असतात. छपाई उद्योगातही कुशल कामगारांची कमतरता जाणवतेय. लघु उद्योजक कुशल कामगारांच्या शोधात आहेत. नाईलाज म्हणून अकुशल कामगारांना घेऊन काही मालकांनी आपले उद्योग सुरू ठेवले आहेत.
कारकुन निर्माण करणारी इंग्रजांच्या काळातील शिक्षण पद्ध-ती आजही आपण सुरू ठेवलीय. गेल्या काही वर्षात व्यावसायिक दृष्टीनं उपयुक्त ठरेल असं शैक्षणिक धोरण तयार करण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. पण खरी गरज आहे ती व्यवसाय निवडीची आणि त्या व्यवसायासंदर्भात शिक्षण प्रशिक्षण देऊन तरुणांना तयार करण्याची. आवडीनुसार शिक्षण घेऊन तरुणांनी व्यवसाय उद्योग केल्यास मुंबईतील बेकारी, बेरोजगारी कमी होण्यास मदतच होईल. आणि तोच बेरोजगारीच्या समस्येवरील उपाय ठरेल.
