कोकणातील आयुर्वेदीय वनस्पती व त्यांचे औषधी उपयोग

ayurvedic-plants-and-their-medicinal-use-in-konkan

निसर्गसौंदर्याने नटलेल्या, नानाविध वनस्पतींनी, फळा-फुलांनी बहरलेल्या कोकणात आयुर्वेदीय वनस्पतींचे भांडारच आहे. पूर्वांपार येथील लोक या वनस्पतींचा विविध आजारांवर आयुर्वेदिक औषध म्हणून वापर करत आलेले आहेत. अशा कोकणात आढळणाऱ्या काही वनस्पती वेली यांचे आयुर्वेदिक महत्त्व विशद करणारा लेख –

– आयुर्वेद महोपाध्याय दाजीशंकर पदेशास्त्री

अंबाडी

ही कोकणसह भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. अंबाडीच्या पानांची भाजी करतात. अंबाडीचे खोड मुळाशी धरून झोडपतात आणि वाळल्यावर त्यांपासून वाख करून त्यांचे दोरखंड वळतात.

कोवळी असतांना ह्याच्या पाल्याची भाजी करतात.याच्या बियांपासून तेल काढतात. त्यास ‘हॅश ऑईल’ असे म्हणतात. यात टेट्राहायड्रोकॅनॉनिबॉल(टीएचसी) या रसायनाचे प्रमाण जास्त असते. त्यात ओमेगा ३ व ओमेगा ६ ही मेदाम्ले भरपूर प्रमाणात असतात. मानवी शरीरासाठी आवश्यक ते गुणोत्तर नेमके यात असते.

सर्वसाधारण – दोऱ्या, सतरंज्या, कागद करण्यास उपयुक्त.

आयुर्वेदानुसार – पित्त, जळवात, अजीर्ण इत्यादी रोगांवर


अक्कलकारा

ही वनस्पती साधारणपणे २० – ५० सेंमी. उंचीची असते. या वनस्पतीचे खोड व फांद्या केसाळ असतात. पाने साधी असून समोरासमोर, अंडाकृती, दातेरी व देठाकडे निमुळती असतात. फुलांची लंबगोल, पिवळट लाल स्तबके नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात येतात. यामध्ये भोवतालची किरण-पुष्पके स्त्रीलिंगी व मधली बिंब-पुष्पके द्विलिंगी असतात.

आयुर्वेदानुसार – दांतदुखी, मुतखडा, अपस्मार, जिव्हारोग इत्यादी

यापासून बनणाऱ्या औषधी – अक्कलकादि चूर्ण व काढा


अघाडा

आघाडा ही वनस्पती पावसाळ्यात उगवते आणि अगदी रस्त्याच्या कडेला सहजपणे उपलब्ध होते. हे झुडूप एक ते तीन फूट उंचीपर्यंत वाढते.

आघाड्यात पांढरा, लाल व पाणअघाडा असे तीन प्रकार आहेत. या वनस्पतीच्या पानांचा मंगळागौरीच्या पूजेतील पत्रींमध्ये समावेश असतो.

झाडाच्या काड्या दांत घासण्यासाठी म्हणून उपयोगी पडतात.

दांतदुखी, मस्तकरोग, कफ, रातांधळेपणा, कावीळ, पोटदुखी, खोकला, इत्यादी रोगांवर. दात दुखत, हलत असतील तर आघाड्याच्या काड्यांचा व पानांचा रस दातांना चोळतात.

पोटदुखीवर आघाड्याची चार-पाच पाने चावून खातात किंवा पानांचा रस काढून पितात.. पित्त झाल्यास आघाड्याचे बी रात्री ताकात भिजत घालून सकाळी ते वाटून रुग्णाला दिल्यास पित्त बाहेर पडते किंवा शमते. त्यानंतर तूपभात खाणे श्रेयस्कर असते.

खोकला व कफ खूप झाला असेल, कफ बाहेर पडत नसेल, तोंडात चिकटून राहत असेल तर आघाड्याची झाडे मुळासकट उपटून ती जाळून त्याची केलेली राख थोडी थोडी मधात घालून त्याचे चाटण रुग्णाला देतात.. त्यामुळे कफ पातळ होऊन तो बाहेर पडतो व खोकलाही कमी होतो. खोकला झाल्यास आघाड्याचे चूर्ण व मिरी समभाग घेऊन मधातून चाटण देतात. खोकला व कफ यामुळे ताप आला असेल तर आघाड्याच्या पंचांगाचा काढा मधातून देतात.

सर्दीमुळे खोकला, पडसे झाल्यास, नाक चोंदल्यास, नाकाची आग होत असल्यास, नाकाचे हाड वाढल्यास आघाड्याचे बी घेऊन त्यात सैंधव, मेंदीचा पाला व जाईचा पाला समभाग घालून वाटतात. त्यात त्याच्या अर्ध्या प्रमाणात तिळाचे तेल घालून ते निम्मे आटवतात. हे तेल दिवसातून दोन-तीन वेळा नाकात घातल्यास सर्दी आटोक्यात येते..

आघाड्याच्या तुऱ्यांपासून वा मुळ्यांपासून विंचवाची विषबाधा, डोळे येणे आदींवर उपयोगी पडणारी अन्य औषधे बनतात.

मानवी शरीरातील मूत्रवाहिनी, मूत्रपिंड यामध्ये बारीक काटे असणारे मुतखडे- युरिनरी स्टोन निर्माण होतात, त्यामुळे संबंधित रुग्णास पाठीत व कंबरेच्या भागात विलक्षण वेदना होतात. अशा वेळेस आघाड्याच्या पानांचा रस प्राशन केल्यास एक-दोन दिवसांत मुतखड्याचे बारीक कण विनासायास बाहेर पडतात आणि रुग्णाला बरे वाटते.


अडुळसा

बहुतेक ठिकाणी उत्पादित, काही ठिकाणी पडीत जागेत वाढते.

गुणविशेष आणि उपयोग : मूळ गर्भ निष्क्रमणोपयोगी, उन्हाळे लागणे, श्वेतप्रदर यात मूळ उपयोगी. झाड कडू जहाल, गारवा उत्पन्न करणारे. वातकारक, श्वासनलिकेच्या दाहात उपयोगी. कुष्ठरोग, रक्ताचा अशुध्दपणा, हृदयविकार, तृषा, दमा, ताप, वांती, स्मृतीभ्रंश, कोड, क्षय, कावीळ, अर्बुद, मुखरोग यात उपयोगी (आयुर्वेद). मुळे मूत्रवर्धक, खोकला, दमा पितप्रकोप वांती, नेत्रविकार, ताप, परमा यात उपयोगी, पाने: आर्तवजनक फुले रक्ताभिसरण सुधारून उन्हाळ्या व कावीळ कमी करण्यासाठी उपयोगी (युनानी).

स्थानिक  उपयोग : मूळे, पाने व फुले स्वदेशी औषधात सर्दी, कफ, श्वासनलिकेचा दाह आणि दम्यात उपयोगी. पानांचा रस आले किंवा मधाबरोबर जुनाट श्वासनलिकेचा दाह व दमा यात गुणकारी. वाळविलेली पाने सिगारेट बनवून दम्यात वापरतात. पानांचा रस अतिसार व आमांशात वापरतात. पानांची भुकटी दक्षिण भारतात हिवतापात वापरतात. पाने संधिवातात पोटीस म्हणून सांध्यावर तसेच सूज आणि तंत्रिकाशूलात वापरतात. क्षुद्र दर्जाच्या जीवांना पाने विषारी, पानांचा अल्कोहोलमध्ये बनविलेला अर्क माशा, पिसू, गोम, डास व इतर किटकांना विषारी (वॅट). या औषधाचा फुफ्फुसांवर अपाय होत नाही.

आयुर्वेदानुसार – खोकला, काविळ, दमा, श्वास, कफ, क्षय, त्रिदोष, मुख, मुत्रघात, सुज इत्यादी रोगांवर गुणकारी.


अर्जुन वृक्ष

अर्जुनाचे झाड वयात आले की एखाद्या दधीची ऋषींसारखी, त्याची साल आपोआप गळून पडते. मानवाच्या आरोग्यासाठी ती देवासारखी उपयोगी पडते म्हणून त्या झाडाला देवसाल, शक्रतरू, इन्द्रू अशी इंद्राची नावे आहेत.

अर्जुनाची साल पांढरट, किंचित लालसर वर्णाची असते. अर्जुनाच्या सालीचा चटकन तुकडा पडतो. त्यात तंतुमय रेषा नसतात. त्यामुळे त्याचे चूर्ण एकदम गुळगुळीत शंखजिरे चूर्णासारखे असते. अर्जुन वृक्ष ६० ते ८० फूट उंच असणारे तपस्वी ऋषींसारखे उभे असतात. अर्जुनाची सालच प्रामुख्याने औषधी प्रयोगाकरिता वापरली जाते. वजनाने ती हलकी असते, अशी ही साल तुरट रसामुळे घट्ट बनलेली असते. अर्जुनाचा डिंकही पौष्टिक, हृदयाला बल देणारा (हृद्य) आहे.

आयुर्वेदानुसार अर्जुनाची साल हृदयरोगावर गुणकारी आहे. तसेच त्याच्या फुलांपासून उत्तम नेत्रांजन बनते.


आपटा

आपटा पानझडी वनांत आढळणारे झाड आहे.

आपट्याचे झाड सरळ न वाढता वेडेवाकडे वाढत असते. याला भरपूर फांद्या असतात. याची पाने जुळी असतात, ती काळसर हिरव्या रंगाची असतात. याच्या शेंगा या लंबगोल व चपट्या आकाराच्या असतात.

आपटा हे झाड बहुगुणी औषधी वनस्पती आहे. याची पाने, शेंगांच्या बिया, फुले व झाडाची साल औषध म्हणून वापर केला जातो. सालीपासून दोरखंड बनवतात. झाडापासून डिंकही मिळवला जातो. या झाडापासून टॅनिन मिळते. पानांचा उपयोग विडी बनविण्याकरिता केला जातो.

आपट्याचे अश्मंतक हे नाव दोन अर्थांनी महत्त्वाचे आहे. अश्मंतक म्हणजे दगडाचा, खडकाचा नाश करणारा. त्याची मुळे जमिनीत खोलवर जातात. खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक दुभंगतात, अक्षरशः फुटतात. त्यामुळे खडकाळ, मुरमाड, उघड्या, बोडक्या टेकड्यांवर आणि माळांवर वनीकरणासाठी हे एक आदर्श झाड आहे. अश्मंतक याचा दुसरा अर्थ मूतखडा (किडनी स्टोन) होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा, मूत्रावाटे बाहेर काढण्यास मदत करणारा होय. धन्वन्तरी निघण्टूमध्ये आणखी औषधी उपयोग असे दिले आहेत.

पित्त आणि कफदोषांवर गुणकारी; दाह, तृष्णा आणि प्रमेह यांवर विजय मिळवणारा.


आमसूल

रातांब्याची फळे

आमसूल यालाच कोकम किंवा रातांबा असेही म्हणतात.

हा एक छोटा व झुकलेल्या फांद्यांचा वृक्ष असतो. याची पाने २.५ ते ३.५ इंच लांब व गडद हिरव्या रंगाची असतात.

आयुर्वेदानुसार – अर्श, शूल, उदरकृमी, अरुची, पित्त इ. रोगांत. आमसुलापासून तेलही निघते. ते व्रणरोपक व तळपायांच्या भेगांवर उपयोगी आहे.

इतर उपयोग – स्वयंपाकात-आंबटपणासाठी, उन्हाळ्यात सरबत म्हणून. आमसुलाचे सार करतात, त्याला कोकमसार म्हणतात. चांगल्या पचनासाठी हे जेवताना अधूनमधून पितात.


उंबर

उंबराच्या झाडाला पार बांधलेला असेल तर त्या झाडाला औदुंबर म्हणतात. या झाडापाशी दत्ताचे स्थान असते असे हिंदुधर्मीय समजतात आणि त्या वृक्षाला पवित्र मानतात. याची सावली अतिशय शीतल असते. याचा पाला, फळे, साल गुरांना चारा म्हणून वापरतात. पक्षी, कीटक, खारी यांचे आवडते वसतीस्थान उंबराचे झाड. माणसे फळे खातात व औषध म्हणून झाडाचा उपयोग करतात. जिथे उंबर असतो तिथे पाण्याचा स्रोत असतो हा समज बहुतेक ठिकाणी खरा ठरतो.

सूर्योदयाच्या आधी झाडाला खरवडले तर खोडातून चीक येतो. हा चीक गालगुंड झालेल्या गालाला लावला तर आराम मिळतो. हा शीतगुणांचा असून त्यायोगे दाहाचे शमन होते. रक्तस्त्राव थांबविण्यासाठी तसेच विषावर उतारा म्हणूनही याचा उपयोग करतात. उन्हाळे लागले असता उंबराच्या मुळांचे पाणी देतात.


एरंड

एरंड हे झाड साधारण २ ते ४ मीटरपर्यंत उंच वाढणारे असते. हे झाड रानटी अवस्थेत आढळते तसेच याची शेतात लागवड केली जाते. याची पाने, बिया, मूळ आणि तेल यांचा औषधी उपयोग केला जातो.

रंगावरून प्रकार

पांढरा – यात दोन उपप्रकार आहेत अ) लहान – याच्या बियांचे तेल व मूळ औषधांत वापरतात. ब) मोठा – याची पाने औषधात वापरतात.

तांबडा – याचे तेल अधिक तीव्र असते, विशेष औषधांत वापरतात.

चवीनुसार प्रकार

गोड.

कडू.

वातविकार, कावीळ, दीर्घकालीन बद्धकोष्ठता, मूळव्याध, अजीर्ण, आमवात-संधिवात, उदरशूल, योनिशूल, मेदोरोग, हत्तीरोग, सर्प विष, अन्य विष, सूज येणे, कृमि होणे, झोप न येणे, पायाची आग होणे, इ. अनेक विकारांवर एरंडचा औषधी उपयोग केला जातो.

एरंडाची पाने, बिया, तेल वगैरे अति प्रमाणात किंवा जास्त काळ सेवन केल्यास उलट्या होणे, जुलाब होणे, आमाशय व आतड्यांना अशक्तपणा येण्याचे दुष्परिणाम दिसून येतात.


ओवा

पाचक औषधांमध्ये महत्त्वाचे स्थान असणारा ओवा एक उत्तम मसाल्याचा पदार्थ आहे. ओवा पाचक असतो, रुचकर असतो, चवीला तिखट, आंबट, कडवट, वीर्याने उष्ण व तीक्ष्ण, तसेच लघू गुणांचा असतो. अग्नीला प्रदीप्त करतो, वात, तसेच कफदोषाचे शमन करतो, पोटात वायू धरणे, उदररोग, गुल्म, प्लीहावृद्धी, तसेच जंत होणे वगैरे तक्रारींत हितकर असतो. मात्र अतिप्रमाणात सेवन केल्यास पित्त वाढवतो, शुक्रधातूला कमी करतो.


कडुलिंब

नैसर्गिकरीत्या उगवणारे, एक बहूपयोगी झाड आहे. याला लिंबाच्या रंगाची छोटी छोटी कडू चवीची फळे लागतात, म्हणून याचे नाव कडूलिंब. या झाडाची पाने, फळे, बिया, साल, मुळे सर्व कडू असतात. याच्या अनेक उपयोगामुळे हे सर्वांचे आवडते झाड आहे. कडू असल्यामुळे ‘जंतुघ्न’हा याचा गुणधर्म पशुपक्षी, पीक, मानव या सर्वांसाठी वापरला जातो. गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी याची कोवळी पाने, फुले, लहान कोवळी फळे, जिरे, मिरे, सैन्धव मीठ, ओवा, गूळ, हिंग, चिंच हे सर्व एकत्र वाटून त्याची गोळी करून खातात.

काड्या दांत घासण्यास उपयोगी, लाकूड इमारतीसाठी

आयुर्वेदानुसार – जंतुनाशक, सापाच्या विषावर, गर्मीवर, रक्तदोषहारक, विषमज्वरावर, कृमिनाशक, दाहावर, महारोगावर, बाळंतरोगावर, अफूच्या उतारासाठी, जखमेवर, मुळव्याध, इ. अनेक रोगांवर.

यापासून बनणाऱ्या औषधी – पंचनिंबचूर्ण, अनेक औषधांमधील एक प्रमुख घटक


कारले

कारले ही द्विलिंगाश्रयी (एकाच वेलीवर नरफुले व मादीफुले येणारी) शाखायुक्त वनस्पती असून तिच्या खोडांवर खाचा असतात.

कारल्याचे फळ थंड व पौष्टिक असून ते खाल्ल्यावर पचनक्रिया सुधारते.

खोकला, पित्त, सांधेदुखी, त्वचारोग, कुष्ठरोग, बद्धकोष्ठता, मधुमेह इ. विकारांवर ते गुणकारी असते.

कारल्याचे किंवा कारल्याच्या रसाचे नियमित सेवन करणाऱ्याचे वजन कमी होते.

कारल्यात अ, ब आणि क ही जीवनसत्त्वे असतात.


कारिवणा

ही जमिनीवर पसरणारी वेल आहे. ही सर्वत्र पावसाळ्यांत उगवते व पाणी मिळाल्यास वर्षभर जगते. ताणे लांबवर जातात व त्यांस पेरापेरांवर मुळे, पाने, फुले आणि फळे येतात; प्रत्येक पेरावर एकच पान असते; पान अखंड, मूत्रपिंडाकृति, दांतेयुक्त व सुमारे १ ते १ १/२ इंच मोठे; पानावर ७ शिरा असतात व कोवळेपणी खालचे अंगावर लव असते; पानाचे देठ लांब असतात; फुले लहान व साधी. ही वेल गुरे, बकरी, डुकरे वगैरे जनावरे खातात. ताजी वनस्पती चुरडल्यास सुवास येतो; चव किळसवाणी कडू व तिखट; पाने सुकविली म्हणजे वास व रूची जातात. औषधांत मुळासकट अखंड वेल वापरली जाते.

कारिवणा कुष्ठघ्न, व्रणशोधन, व्रणरोपण, मूत्रजनन, स्तन्यशोधन, संग्राहक, बल्य व रसायन आहे. मोठ्या मात्रेंत कैफजनक आहे. ह्याने डोके दुखते, भोवळ येते व कैफ चढतो. त्वचेंतील रक्तवाहिन्यांचे विकासन होते व त्यांमधून रक्त लवकर वाहते. त्वचा लाल होते व फार खाज सुटते. सुमारे एक आठवड्यानंतर भूक वाढते. ह्याच्यांतील तेल मूत्रपिंडांतून बाहेर पडते म्हणून मूत्राचे प्रमाण वाढते.

त्वचेच्या रोगांत कारिवणा उत्तम गुणकारी आहे.

सर्व त्वचेच्या रोगांत कारिवणा पोटांत देतात व त्याचा लेप करतात.

मार किंवा ठेच लागून रक्त सांकळले असल्यास किंवा सूज आली असल्यास कारिवण्याचा लेप करतात.

कारिवण्याने लघवीचे प्रमाण वाढते खरे तरी त्यास मूत्रजनन म्हणून स्वतंत्र वापरता येत नाही. कारण त्याने मूत्रपिंडास दगा होतो व इतर कांहीं त्रास होतात.

उन्हाळ्यांत लहान मुलांस रक्तमिश्रित जुलाब होतात व लघवीस त्रास होतो किंवा लघवी कमी होते तेव्हां २ ते ४ पानांचा रस जिरे आणि खडीसाखरेबरोबर देतात व कारिवणा वाटून त्याची पोळी बेंबीखालीं पोटावर बांधतात. ह्या रोगांत ज्वर असल्यास मलबारांत कारिवणा मेथीच्या फांटाबरोबर देतात.

बोबडे बोलणाऱ्या मुलांस शब्दोच्चार स्पष्ट होण्यास पाने चावण्यास देतात.


कुडा

कुडा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.

पांढरा कुडा किंवा ‘इंद्रजव’ किंवा ‘कुटज’ (इंग्लिश: केश्ररीीहशपरर् ीिलशील-शपी) मूळव्याध, रक्तस्राव, अतिसार, आमांश, अग्निमांद्य या विकारांतील आयुर्वेदिक औषधीमध्ये कुड्याचा वापर होतो. १० ते १५ फूट उंच वाढणाऱ्या या झुडुपास प्रत्येक फांदीच्या टोकाशी मंद सुवास असलेल्या पांढऱ्या रंगाच्या फुलांचे गुच्छ येतात. या फुलांची भाजीसुद्धा करतात. या झाडाला लांबट शेंगा जोडीजोडीने येतात. कुड्याच्या सालीचा त्वचाविकारातही उपयोग होतो. कुटजारिष्ट हे प्रसिद्ध औषध कुडाच्या सालींपासून बनते.


गवती चहा

गवतासारखी वाढणारी ही बहुवर्षायू व एकदलीय वनस्पती १.५-२ मी. उंच व झुबक्यांनी वाढते. खोड ( मूलस्तंभ ) आखूड व जमिनीत वाढते आणि काही भाग जमिनीवर येतो. मुळे आखूड, तंतुमय आणि मोठ्या संख्येने व दाटीवाटीने वाढलेली असतात. पाने (पाती) १-१.५ मी. लांब, टोकाला निमुळती होत गेलेली आणि हिरवी असतात.

ऊर्ध्वपातन पद्धतीने पानांतील तेल काढले जाते. या तेलात सिट्रल, सिट्रोनेलॉल, मिरसीन आणि निरोल हे घटक आहेत. तेल सारक, उत्तेजक, शामक असल्यामुळे जंतनाशक, रेचक, उपदंश, त्वचाविकार, कुष्ठरोग, अपस्मार, पोटातील वात वगैरे विकारांवर उपयुक्त आहे. तेल काढलेल्या पानांच्या चोथ्यापासून लिहिण्याचा किंवा छपाईचा कागद बनू शकतो.

हे तेल सांधेदुखीवर पण उपयुक्त आहे

कफ आणि वात विकारांवर या वनस्पतीचा उपयोग होतो.

पानांचा काढा घाम आणणारा व ज्वरनाशक आहे. सुगंधी तेलाचा उपयोग सौंदर्य़प्रसाधनांत, तसेच अत्तर म्हणून होतो.

साठवण्याच्या धान्यांमध्ये आणि कीटकनाशक म्हणून पानांचा वापर करतात.


गोखरू

ही जमिनीवर सरपटत वाढणारी वनस्पती आहे. या वनस्पतीच्या खोडावर व फांद्यांवर दाट लव असते. फांद्या जवळपास ९० से.मी. लांबीच्या असतात.

किडनी ट्रान्सप्लान्ट : ज्या लोकांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा वैद्यकीय सल्ला देण्यात आलेला आहे ते हा प्रयोग करुन पाहू शकतात. २५० ग्राम गोखरू (फळ) घेउन, त्यास थोडे कुटून, त्यात ४ लिटर पाणी टाकावे व त्यास इतके उकळावे कि पाणी १ लिटर राहील. याला मग थंड झाल्यावर गाळून एका काचेच्या स्वच्छ बाटलीत ते गाळलेले पाणी भरून ठेवावे.चोथा फेकून द्यावा. रोज सकाळी, काहीही न खातापिता, अनशा पोटी (रिकाम्या पोटी) त्यापैकी १०० मिली पाणी पिण्याजोगे गरम करून ते घ्यावे. तसेच संध्याकाळीही, (दुपारच्या जेवणानंतर ५-६ तासांनी) या प्रमाणेच १०० मिली पाणी घ्यावे. हा काढा घेतल्यानंतर १ तास काहीही खाऊ पिऊ नये. तसेच, आपला नेहमीचा औषधोपचार, जेवण वगैरे पूर्ववतच सुरू ठेवावे. त्रास कमी झाल्यावर ८-१० दिवसांनी याचे प्रमाण सकाळी फक्त १ वेळा असे करता येईल.


गोरखमुंडी

गोरखमुंडी किंवा मुंडीगोरखमुंडी ही भारतात उगवणारी एक सुगंधी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ही भारतभर भातशेती सारख्या सखल जागेत आणि आर्द्र हवामानात उगवते.

ही वनस्पती साधारण ३० सेंटिमीटरपर्यंत उंच वाढते. खोड व फांद्या दंडगोलाकार, दातेरी, गाठी असलेल्या आणि केसाळ असतात. पाने अवृंत अधोगामी व फुले संयुक्त असून लंबवर्तुळाकार असतात. फुले नोव्हेंबर ते जानेवारी या काळात येतात.

गोरखमुंडी गोमूत्राबरोबर घेतल्याने ज्वराचा नाश होतो.

ह्या वनस्पतीच्या पानांचा रस जठराच्या विकारांवर उपयोगी आहे.

बियांची आणि मुळांची पूड कृमिसारक असून मुळांचा अर्क छातीच्या दुखण्यावर, खोकल्यावर आणि मलाशयाच्या तक्रारींसाठी गुणकारी आहे.


चित्रक

हे बहुवर्षायू सदाहरित लहानसर झुडूप आहे. ह्याचे खोड गोल असून त्याला पुष्कळ फांद्या फुटतात. फांद्या पसरलेल्या असताना जेव्हा जमिनीवर पडतात तेव्हां पेरापेरास मुळे फुटतात. पाने एकाआड एक अशी, अखंड, देठरहित, लंबगोल, हिरवीगार, मोगऱ्याच्या पानासारखी, जाडसर व मजबूत आणि घट्ट असतात. फुलांचे तुरे असतात. फुले पांढरी, नियमित, स्त्री व पुरूष इन्द्रिये एकत्र असलेली आणि गंधरहित असून, पुष्पपात्रावर अनेक लहान लहान ग्रंथी असतात.

चित्रकाच्या मुळाच्या सालींत एक दाहजनक द्रव्य आहे. ते अल्कोहोलमध्ये सहज, उकळलेल्या पाण्यांत बरेच मिसळते, परंतु थंड पाण्यांत तितकेसे मिसळत नाही.

लहान प्रमाणात सेवन केले असताना चित्रकाने पचननलिकेच्या श्लेष्मलत्वचेस उत्तेजन येते व आमाशय आणि उत्तरगुद ह्यांचे रक्ताभिसरण वाढून त्यांना शक्ती येते. चित्रकाने पोटांत उष्णता उत्पन्न होते व पचनक्रिया वाढते. गुदांतील मूळव्याध अर्श उत्पन्न करणाऱ्या आकुंचनावर चित्रकाची प्रत्यक्ष क्रिया होते आणि त्याने आकुंचन कमी होऊन, शिथिलता नाहीशी होते व थोडासा मलावरोध होतो. ह्याने यकृतास उत्तेजन येऊन पित्त नीट वाहू लागते, म्हणून चित्रक दिल्यानंतर मळ नेहमी पिवळा होतो.

चित्रक हे एकूण उत्तम औषध आहे. हे कडू, तिखट, उष्ण, दीपक, पाचक, वायुहर, अर्शोघ्न, पित्तस्रावी, स्वेदजनन, ज्वरघ्न आणि गर्भाशयाचा संकोच करणारे आहे. मात्र, चित्रकाच्या लेपाने त्वचेवर फोड उठतो व फार दुखतो. त्वचा काळी पडते व त्यामुळे पडलेला व्रण लवकर भरून येत नाही.

चित्रक हे वात आणि पित्तयुक्त ज्वरांत, पचननलिकेच्या रोगांत आणि गर्भाशयाच्या क्रियेसाठी वापरण्याचा प्रघात आहे.

विषमज्वरांत मुख्यत्त्वे यकृत व प्लीहा ह्यांची वृद्धि झालेली असेल तर चित्रक वापरल्याने फार फायदा होतो. ज्वरात सुगंधी पदार्थाबरोबर चित्रकाच्या मुळाचे चूर्ण तांदळाच्या पेजेंत उकडून वस्त्रगाळ करून देतात.

शिथिलताप्रधान पचननलिकेच्या रोगांत चित्रक हेच उपयुक्त औषध होय. ह्याने अन्नाची गेलेली वासना उत्पन्न होते, भूक लागते, अन्न पचते व सर्व ठीक चालले आहे अशी मनाला शांतता वाटते.

थंड पाणी व थोडे मीठ ह्यांत चित्रकाचे मूळ उगाळून त्याचा पातळ लेप आमवातामुळे झालेल्या दुःखदायक सांध्यावर करतात. हा लेप १०/१५ मिनिटांत मात्र पुसून टाकला पाहिजे. चित्रकाची मुळी उकडून तयार केलेले तेल आघातयुक्त वातरोगांत व आमवातात चोळतात.


जव

जवाचे रोप ७० ते ९० सेंटिमीटर उंचीचे असून पुष्कळ अंशी गव्हाच्या रोपासारखे असते. याची पाने गव्हाच्या पानापेक्षा खरखरीत असतात. पर्णपत्राची लांबी १५ ते ३० सेंटिमीटर असते. रोपाला तुरे (मंजिऱ्या) येतात. तुऱ्यांचा देठ चपटा असतो आणि त्या देठावर रांगेने कळ्या लागाव्यात तशा जवाच्या साळी लागतात. एका देठावर दोन्ही बाजूंना १० ते १५ साळी असतात. साळीमधे जवाचे दाणे असतात. जवापासून माल्ट बनवतात. सातूची खीर आणि लापशीही करतात.

आजारी लोकांना विशेषतः मधुमेही रोग्यांना पथ्यकर म्हणून या धान्याचा उपयोग होतो.


जांभूळ :

जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. तसेच ते अतिसार थांबविणारे औषध आहे. जांभळीच्या पानांचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम औषध आहे. परंतु ते तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावे. जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. शौचास साफ होत नसेल तर त्यावर जांभळीची साल देतात. ही साल चांगली तीन तोळे ठेवून पाण्यात एक अष्टमांश काढा करावा. व त्यात अर्धा तोळे तूप, ३ मासे दूध व पैसाभर खडीसाखर घालून घ्यावा. दिवसातून दोन वेळा असा घेतल्यास पाच-सात दिवसांत अतिसार व आव थांबते. स्त्रियांच्या अंगावर जाणारे पाणीदेखील वरील काढ्याने थांबते. चांगल्या पिकलेल्या जांभळाचा रस काढून बरणीत भरून ठेवतात व एक वर्ष जाऊ द्यावे. अशा रसाला जांभळाचा शिरका, जांभळाची आंब, खाटी किंवा जांभळाचे आसव असे म्हणतात. जांभळाचे आसव अर्धा तोळा चौपट पाणी घालून घ्यावे, त्याने मोडशी व पोटदुखी बरी होते. जांभळाचा मुख्य उपयोग मधुमेहावर होतो. मधुमेहाच्या रोग्यांनी जांभळाच्या बियांचे चूर्ण दर चार चार तासांनी एक एक मासा घोटभर ऊन पाण्याबरोबर घ्यावे. असे दोन महिने घेऊन पथ्याने राहिल्यास लघवीतून साखर जाण्याचे प्रमाण बरेच कमी होते. जांभळाच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्या केल्यास आलेले तोंड बंद होते. तोंडावर उठणाऱ्या मुरमाच्या पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ रक्त शुद्ध करते.


जाई

सुगंधी पूजापुष्पे देणारी वेली म्हणून ही प्रसिद्ध आहे. जाईच्या वेलाचे खोड मनगटाएवढे जाड होऊ शकते. इतर वेलीप्रमाणे ही देखील मांडवावर चांगली चढते आणि पसरते.

पाने संयुक्तपर्णी विषमसंख्य असून ५ ते ७ पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. सर्व पर्णिका जवळजवळ सारख्याच आकाराच्या असतात.

जाईची फुले शुभ्र आणि नाजूक असतात. पाकळ्या खालच्या बाजूने फिक्कट गुलाबी-जांभळट असतात.

जाईची फुले नेहमी सायंकाळी फुलतात. फुलांच्या मंद सुगंधामुळे फुलांना महत्त्व प्राप्त झाले आहे. फुले अल्पायुषी असून सुकल्यानंतर लाल होतात.

अंगातील उष्णता वाढल्यावर तोंडात फोड येतात, त्यावर जाईचा पाला चावणे हा एक उत्तम उपाय आहे.

जाईच्या फुलांपासून सुगंधी तेल तयार करतात.


दारुहळद

दारुहळदीचा वृक्ष लहान आणि काटेरी असतो. याचे कांड(खोड) फिकट उदी रंगाचे असून आतून पिवळे असते.

याच्या कांडाचा काढा सर्व प्रकारच्या तापांवर गुणकारी आहे. क्विनाईनपेक्षा हे औषध जास्त गुणकारी आहे. हाडीताप, डेंगी, कावीळ, प्लीहादोष, यकृतविकार, रक्ती मुळव्याध आणि डोळ्यांच्या विकारांवर दारुहळदीचा औषधोपचार करतात. दारुहळदीपासून रसांजन आणि रसोत या नावाची औषधे बनतात.


नागरमोथा

नागरमोथ्याच्या बारीक खोडाला काही ठिकाणी उभट, लंबगोलाकार कंद येतात. त्यातून वासाचे दाट तैलार्क निघतो. या तैलार्कात स्निग्ध अम्ले असल्यामुळे त्यास सुगंध येतो. या तेलाचा वापर सुवासिक उटणी, साबण किंवा अत्तरे बनवण्यासाठी केला जातो.

नागरमोथ्याच्या मुळास छोटा कंद असतो. मराठा पाकपद्धतीतल्या काळ्या मसाल्यात नागरमोथ्याचा कंद घटकपदार्थ म्हणून वापरतात.

नागरमोथ्याच्या कंदांची आणि मुळांची पूड त्वचादोषांवर गुणकारी असल्याचे मानले जाते. त्वचेला सुटणारी खाज, कंड, त्वचेवरील पुरळ इत्यादी त्वचाविकारांवर या पुडीची बाह्य योजना करतात किंवा कंदाचे पाणी पोटातून घेतात. मूत्रविकारांवरही नागरमोथा उपयुक्त असल्याचे मानले जाते.


पारिजातक

पारिजात ही भारतात उगवणारी एक औषधी वनस्पती आहे. ह्याच्या फुलांचा सुगंध मनमोहक आहे. याचे पानावर टोकाकडून देठाकडे बोट फिरविल्यावर, त्यावर काटे असल्याचा भास होतो. या पानांचा उपयोग प्राचीन काळी जखमांच्या उंचावलेल्या कडा घासण्यासाठी केला जात असे.

या झाडाची ४-५ ‘हिरवी’ पाने घेऊन त्याची चटणी करुन त्याला २०० मिली पाण्यात टाकून ते पाणी ५० मिली (१/४ काढा) राहीपर्यंत उकळावे. या पाण्याचे सकाळी काहीही न खातापिता सेवन केले असता, शरीराच्या जोडांचे दुखण्यावर हे प्रभावशाली आहे. चिकुनगुनियामुळे उद्भवणाऱ्या सांधेदुखीवर तसेच गुडघेदुखीवर (आर्थरायटिस) देखील याचा उपयोग होतो. मलेरिया व गृध्रसी (सायटिका) या रोगांवरदेखील हे उपयोगी आहे.


पिंपळ

या वृक्षाची उंची १० ते १५ मीटपर्यंत वाढते. खोड पांढरट गुलाबी, लाल, गुळगुळीत, तंतुमय असते. पाने हृदयाकार, लांब देठाची, कोवळी असताना गुलाबी, तांबूस नंतर हिरव्या रंगाची, आणि वाऱ्याबरोबर सतत हलणारी, सळसळणारी, डोळ्यांना, कानांना सुखावणारी असतात.

हा वृक्ष भोवतालचे वातावरण शुद्ध करतो. याचमुळे याला पवित्र ठरविले असावे. हा कोठेही, कसाही वाढणारा वृक्ष असल्यामुळे तो मोकळ्या जागेत लावणे योग्य असते. तो घराजवळ असल्यास घराच्या भिंती, वासे, खांब यामधे वाढून घराला हानी निर्माण करतो.

पिंपळाच्या झाडापासून ‘लाख’ बनवितात. याच्या औषधाने व्रण बरे करतात. उदरशूल व पोटाचे अन्य विकार यावर पिंपळाच्या फळांचा वापर करतात. याच्या सालींचा काढा पौष्टिक व शक्तिवर्धक असतो. पिंपळाच्या सालीपासून लाल रंग तयार होतो. बौद्धभिक्षू या रंगाने आपले वस्त्र रंगवतात.


पुनर्नवा

पुनर्नव्यापासून पुनर्नवासव हे औषधी आसव बनवतात. शरीराच्या एखाद्या अवयवावरील सुजेवर देवदार, सुंठ व वाळा यांसोबत पुनर्नव्याचा काढा गुणकारी मानला जातो. रातांधळेपणात पांढऱ्या पुनर्नवेची मुळी कांजीत उगाळून अंजन लावण्याचा उपाय काहीजण करतात. लघवीची वरचेवर भावना होत असल्यास पुनर्नव्याचा काढा २० ते ४० मि. लिटर या प्रमाणात रोज दोन वेळा घेतल्यास गुण येतो, असे मानले जाते. तसेच दर चार दिवसांनी येणाऱ्या तापावर श्वेतपुनर्नवाची मुळे दुधात उगाळून देतात.


बेल

याचे फळ पोटाच्या विकारावर फार औषधी आहे. फळाचा मुरंबा करतात. भावप्रकाश, सुश्रुत संिहता, आदी आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये बेलाच्या उपयोगाबाबत माहिती दिलेली आहे. उष्णताहरक, वात कफ शामक, रेचक, दीपनकारी, हृदयास उपकारक, स्तन्भक, शरीरातील मुत्र व शर्करा कमी करणारा अशी बिल्व फळाची ओळख आहे. बेलात साखर कमी करणारा घटक, टनिक असिड, उडनशील तेल, टनीन तसेच मारशेलीनीस आदी घटक असतात. रातांधळेपणा, डोकेदुखी, डोक्यातील उ नाशक, क्षय, बहिरेपणा, हृदयविकार, पोटाचे दुखणे, अजीर्ण, आम्लपित्त, मंदाग्नी, संग्रहणी, रक्तविकार, मधुमेह, जलोदर, त्वचाविकार, वात ज्वर, कमजोरी, अग्निदग्ध, व्रण गलगंड, तृषाविकार, रक्तातीसार, पित्त अतिसार आदी विकारांमध्ये बेल विशेष गुणकारी आहे.


माका

माक्यांत एका जातीची राळ व एक सुगंधी कडू द्रव्य आहे. माका उकडल्यास त्याचा गुण जातो. ह्याचा रस गोंदण्यासाठी वापरतात.

ह्याची पंचांगे (मूळ, साल, पान, फूल व फळ) औषधांत वापरतात.

माका कडू, उष्ण, दीपक, पाचक, वायुनाशी, आनुलोमिक, मूत्रजनक, बल्य, वातहर, त्वग्दोषहर, व्रणशोधक, व्रणरोपक आणि वर्ण्य आहे. माक्यास रसायन मानतात ही अतिशयोक्ति नाही. ह्याची मुख्य क्रिया यकृतावर होत असते. यकृताची विनिमयक्रिया सुधारते, पित्तस्राव नीट होतो, आमाशयांतील आणि पक्वाशयांतील पचनक्रिया सुधारते व ह्या तीन मुख्य ठिकाणच्या क्रिया सुधारल्याने सर्व शरीरास तेज येते. रोज माका खाल्याने वृद्धाचा तरुण होतो ही म्हण केवळ अतिशयोक्ति नाही.

माक्याचा रस यकृताची क्रिया बिघडली असता देतात. यकृताची क्रिया सुधारली म्हणजे कावीळ नाहीशी होते, यकृतवृद्धी आणि प्लीहावृद्धी कमी होते. मूळव्याध आणि पचनाचे विकार बरे होतात व कुपचन नाहीसे होते. कावीळ, मूळव्याध आणि पचन हे बहुतकरून यकृताच्या रोगावर अवलंबून असतात, म्हणून यकृतावर सुपरिणाम करणारी औषधें द्यावी लागतात. यकृताची क्रिया बिघडल्याने, ज्यास आयुर्वेदात आम असे म्हणतात असे एका जातीचे शारीरिक विष शरीरांत जमते व त्यामुळे आमवात, भोवळ, डोकेदुखी, द्दष्टिमांद्य आणि तऱ्हेतऱ्हेचे त्वचारोग उत्पन्न होतात. ह्या रोगांत माका दिल्यास फार फायदा होतो.

जुन्या त्वचारोगांत (उदा:- कंडू, इंद्रलुप्त (चाई) वगैरे) माका पोटांत देतात आणि त्याचा लेप करतात. अकालपलित रोगांतही हाच उपाय करतात.

माक्याच्या रसाने केस वाढतात आणि त्यांचा रंग सुधारतो. माक्याचा रस व हिराकस ह्यांच्या लेपाने केस काळे होतात.

मद्रासकडे विंचवाच्या दंशावर माक्याचा लेप करितात व पोटांत देतात. अग्निदग्ध व्रणावर माका, मरवा व मेंदी यांचा पाला वाटून लावला असता आग नाहीशी होते व नवीन येणारी त्वचा शरीराच्या रंगाची येते. व्रणावर याचा लेप करतात. तान्ह्या मुलाच्या घशांत बोळ जमला असता माक्याच्या अंगरसाचे १-२ थेंब मधाबरोबर जिभेवर चोळतात. ह्याने घशातील घरघर कमी होते.

Related posts

Leave a Comment