गेल्या काही दिवसांत देशभरात विशेषत: महाराष्ट्रात महिलांना अनादराने वागवण्याचे काही घृणास्पद प्रकार उघडकीस आले आहेत. या सगळ्या प्रकाराकडे पाहिले म्हणजे शिक्षणात आघाडीवर असलेला महाराष्ट्र महिलांच्या बाबतीत किती असहिष्णु होत चाललेला आहे याचे प्रत्यंतर येते. या प्रत्येक प्रकरणामध्ये महिलांची छेड काढणे, त्यांची बेईज्जत करणे, त्यांना अनुदारपणे वागवणे आणि गुन्हेगार समजून त्यांना हीन वागणूक देणे असे प्रकार घडलेले आहेत.
उस्मानाबाद येथे १४ वर्षे वयाच्या एका मुलीने, तिच्याच सावत्र मामाने छेडाछेडी केल्यामुळे बेइज्जत होईल, या भयाने जाळून घेऊन आत्महत्या केली. ही मुलगी काही दिवस मृत्यूशी झुंज देत होती. या प्रकरणामध्ये विनयभंग किंवा बलात्कार असा काही गंभीर प्रकार घडलेला नाही. मात्र हा मामा आपल्या या भाचीकडे वाईट नजरेने पहात होता आणि त्याने तिला अन्य एका नात्यातल्या बाईच्या समोर कथित प्रेमपत्र दिले. शहरामध्ये असा प्रकार घडला असता तर त्याचे फार काही वाटले नसते. पण खेड्यातले वातावरण या बाबतीत फार वेगळे असते.
एक तरुण मुलगी आणि मुलगा हे परस्परांशी बोलतात ही घटना सुद्धा तिथे संशयाला बळ देणारी ठरू शकते आणि अशा मुलीच्या उत्तर आयुष्यामध्ये तिचे लग्न जमण्यात अडचणी येऊ शकतात. ग्रामीण भागात आता काही ठिकाणी नोकरी करणाऱ्या महिला दिसायला लागलेल्या आहेत. परंतु त्यांना सुद्धा फार जपून रहावे लागते. कोणी समोर नसताना एक बाई एका पुरुषाशी बोलते ही घटना गावाला तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यास पुरेशी असते. अशा वातावरणात या मुलीला तिच्या मामाने चिठ्ठी दिली ही घटना त्या मुलीसाठी धोकादायक ठरू शकते. म्हणून तिला आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला.
ग्रामीण भागातल्या वातावरणाचे हे फलित आहे. त्या वातावरणात मुलींची एवढी घुसमट होत असते की, त्या आपल्यावर गुदरलेल्या अशा प्रसंगाच्या बाबतीत आपल्या घरातल्या लोकांशी सुद्धा मोकळेपणाने बोलू शकत नाही. त्यामुळे तर त्यांचा पिच्छा पुरवणाऱ्या गावगुंडांचे चांगलेच फावत असते. म्हणूनच ग्रामीण भागात मुली वयात आल्या की, त्यांची पटापट लग्ने उरकून देतात. एकदा हात पिवळे केले की, आई-बाप तरुण मुलगी सांभाळण्याच्या जोखमीतून मोकळे होत असतात.
सध्या मुली लवकरच वयात यायला लागलेल्या आहेत. कायद्याला मात्र हे मान्य दिसत नाही. म्हणून कायदा १८ वर्षाच्या आतील मुलीचा विवाह वैध मानण्यास तयार नाही. मुलगी अकराव्या-बाराव्या वर्षी वयात येते आणि तिला अठराव्या वर्षापर्यंत सांभाळावे लागते. ग्रामीण भागात फुकटच्या पैशावर श्रीमंत झालेल्या टग्यांची काही कमतरता नाही, त्यातच वातावरण बिघडलेले. अशा अवस्थेत मुलगी १८ वर्षाची होईपर्यंत वाट पाहणे म्हणजे गरीब आई-बापांना किती मोठे संकट वाटत असेल याची कल्पना आपण करू शकतो. म्हणूनच बनावट जन्माचे दाखले आणून का होईनात पण मुली कमी वयात उजवल्या जातात आणि अशा संकटामुळेच लोकांना मुलगी नको असते. कारण ती बिघडण्याची शक्यता असते. अशा संबंधांमध्ये मुलेही गुंतलेली असतात पण बिघडलेल्या मुलाकडे बघण्याचा आणि मुलीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन मुलीवर अन्याय करणारा असतो.
मुलगी बिघडते ती मुलामुळेच बिघडते. परंतु बिघडलेल्या मुलीचे भवितव्य धोक्यात येते तसे बिघडलेल्या मुलाचे भवितव्य धोक्यात येत नाही. मोकळ्या सोडलेल्या सांडासारखा मुलीच्या मागे फिरणाऱ्या मुलाचे लग्न होत नाही असे कधी घडत नाही. परंतु केवळ एक चिठ्ठी दिली म्हणून मुलीच्या लग्नात मात्र अनेक अडचणी येतात. चिठ्ठी जिला दिली तिचा काही दोष नसताना ती चारित्र्यहीन ठरू शकते. मात्र चिठ्ठी देणारा लंपट तरुण मात्र पुरुषार्थी ठरतो.
महिलांकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन अजून बदललेला नाही. समाज मोकळा मात्र होत चाललेला आहे. मुलींना शिकवले पाहिजे ही जाणीव वाढत आहे. परंतु या शिक्षणातून जे मोकळे वातावरण निर्माण होते त्या वातावरणाचा आपण शुद्ध मनाने स्वीकार करू शकत नाही. घराच्या बाहेर पडणारी महिला कितीही कर्तबगार असली तरी तिच्यापेक्षा कर्तबगारीत उणे असणारे पुरुष सुद्धा तिच्याकडे केवळ एक बाई म्हणूनच बघतात. याच मानसिकतेतून आपल्या समाजात महिलांवर अत्याचार करण्याची प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. या प्रकारांमध्ये सर्वात मोठी शोकांतिका अशी की, अशा गुन्ह्यांचा तपास करणारे पोलीस आणि अन्य तपास यंत्रणासुद्धा या घटनेकडे पुरुषी मनोवृत्तीतूनच पहात असतात. त्यामुळे एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याचा तपास करण्यात सुद्धा हयगय केली जाते. त्यामुळे अन्याय होऊन सुद्धा महिलांना न्याय मिळण्याची शक्यता कमी असते.
