मुंबईची विकास वाहिनी

मुंबई महाराष्ट्राची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी, विकास गंगोत्री, शिक्षण, उद्योग, सेवाक्षेत्र ह्या सर्व क्षेत्रांमध्ये अग्रणी असणारी मुंबई. मुंबईच्या चाकरमान्यांना इप्सित स्थाना पर्यंत पोहचवणारी मुंबई लोकल. मुंबईची लोकल ही मुंबई ची जीवन वाहिनी आहे. विकास वाहिनी आहे. कारण रोज नोकरीधंद्या निमित्ताने लोक प्रवास करतात आणि लोकल ट्रेन हा वहातुकीचा सोपा, कमी खर्चिक व वेळ वाचवणारा पर्याय आहे.

लाॅकडाऊनचे निमित्त देऊन सर्व सामान्य माणसाकरता ह्या प्रवासावर जी बंदी आणली आहे ती आज सर्वस्वी चूक आहे. नोकरी किंवा चरितार्थाकरिता नाइलाजाने बाहेर पडणारा माणूस लाॅकडाऊनला कुरवाळून बसू शकत नाही. लोकलबंदीचा निर्णय त्याच्या बोकांडी मारल्या सारखे आहे. कारण विरारला रहाणारी व्यक्ती चर्चगेट मध्ये एखाद्या खाजगी कंपनीत काम करत असेल तर त्याने प्रवास कसा करावा? विरार ते चर्चगेट रस्ते मार्गाने प्रवास करणे त्याला परवडणारे आहे का ? तीच अवस्था मालाड, बोरीवली, मुलुंड, घाटकोपरला रहाणार्या सर्वसामान्य माणसांची आहे. त्यांचे आर्थिक गणित व वेळेचे गणित कोलमडून पडत आहे.

अनेक भगिनी सकाळी ६.३० ला घर सोडतात व लोकल प्रवासा अभावी त्यांना घरी यायला अगदी संध्याकाळचे ७.३० ते ८.०० वाजतात. लोकल ट्रेन केवळ इमर्जन्सी सर्विसेस मध्ये काम करणार्यांना साठी! पण चरितार्थ चालविणे अतिमहत्त्वाचे नाही का ? बरं, लोकलने प्रवास करु नका म्हटल्यावर पर्यायाने बस प्रवासावर भार पडतो. तिथे संक्रमणाची भिती नाही का ? केवळ काही तरी करतो आहोत असे दाखवून यातायातीच्या महत्त्वाच्या साधनावर बंदी आणून जनतेला मेटाकुटीस आणणे ही गोष्ट चूकच आहे. कामगारांना कामावर पोहचण्यातच अर्धी शक्ती वाया घालवावी लागत असेल तर त्यांच्या उत्पादकतेचे काय? आग रामेश्वरी व बंब सोमेश्वरी असा हा प्रकार आहे. लोकल गर्दी कमी करण्यासाठी अनेक उपाय करता येतील. कामाच्या वेळांमध्ये बदल, एक दिवस आड कामगारांना कामावर बोलवणे, पूर्ण दिवसभर लोकल प्रवासाची मुभा देणे, ( ठराविक मर्यादा असेल तर नेमकी त्याच वेळी गर्दी होते ) लोकशिक्षण, रेल्वे स्थानकावर सँनिटायझेशन, मार्शल ठेऊन गर्दीचे नियंत्रण वगैरे. सर्वसामान्य माणसाची कुचंबणा थांबविण्यासाठी लोकल सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. झुकझुक रेल्वे गाडी,लोकांना वेळेवर कामावर सोडी, चला पुन्हा पडती अर्थव्यवस्था सावरु या, लोकल पुन्हा सुरू करु या.

Related posts

Leave a Comment