आव्हानांना थेट भिडणारे नेतृत्व

ग्रामपंचायतीपासून दिल्लीपर्यंत विविध स्तरांवर आणि विविध पक्षांमध्ये जी मंडळी जनतेचे नेतृत्व करीत आहेत, त्यांच्या यादीवर नजर टाकली तर समाजाचे व देशाचे प्रश्न सोडविण्याची क्षमता, धमक आणि कौशल्य यापैकी किती जणांमध्ये असेल याची दाट शंका यावी असे देशाच्या राजकारणाचे विषण्ण करणारे आजचे वास्तव आहे. लोकशाही राज्यव्यवस्थेचे इतके अवमूल्यन गेल्या ५०-६० वर्षांत झाले आहे की, दमदार नेतृत्व निर्माण करण्याची शक्ती एकाही राजकीय पक्षामध्ये दिसत नाही; आणि म्हणूनच नरेन्द्र मोदींसारखा एखादा अपवादात्मक दिसणारा आशेचा किरण लोकांना आश्वासक वाटतो. वास्तविक इतक्या वर्षांच्या लोकशाही व्यवस्थेतून प्रत्येक पक्षात आणि प्रत्येक राज्यात दमदार, विचारशील, आचारशील तरुण नेतृत्वाची फळी उभी राहिलेली दिसावयास हवी होती. हरित क्रांती, धवल क्रांती यासारखी नेतृत्व क्रांती देशात का झाली नाही याचा लेखाजोखा घेतला तरच सत्य बाहेर पडेल. एकीकडे विक्राळ समस्यांचा विळखा आहे तर दुसरीकडे समर्थ नेतृत्वाचा पूर्ण अभाव आहे. म्हणजे दोन्हीकडून. मारच बसणार कुंपणच शेत खात असल्याने कोणी कोणाकडे जाब मागायचा?

नेतृत्वाबद्दलचे असे विचार आमच्या मनात आले ते एका निमित्ताने, श्री. सुभाष देसाई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. ते आज ८० व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. गेली अनेक वर्षे राजकीय व सामाजिक जीवनात परिवर्तन व्हावे यासाठी चाललेली त्यांची वाटचाल आम्ही जवळून पहात आहोत. ‘महानगरी वार्ताहर’ तर्फे गेली अनेक वर्षे विशेषांक प्रसिद्ध- करून आम्ही श्री. देसाई यांचे विचार, कार्य आणि त्यांच्याबद्दलच्या लोकांच्या भावना वाचकांसमोर आणत आहोत. लढाऊ पण विचारी असे श्री. देसाईंचे जे नेतृत्व आहे आणि मराठी अस्मिता व हिंदुत्वाची जी बांधिलकी त्यांनी जपली आहे, त्याचा आदर्श इतरांनी घ्यावा हीच या सर्व प्रयत्नांच्या मागची प्रेरणा आहे. महाराष्ट्राच्या आजच्या राजकारणात जे थोडे विचारी नेतृत्त्व शिल्लक आहे आणि ज्यांची जनतेशी असलेली बांधिलकी अद्यापही टिकून आहे अशा दुर्मिळ झालेल्या नेत्यांमध्ये शिवसेनेचे श्री. सुभाष देसाई यांचे नाव घेता येईल. गेली अनेक वर्षे मराठी अस्मिता आणि हिंदुत्व या तत्त्वांवर ठाम राहून आपल्या पक्षाला मजबूत करण्याचे काम श्री. देसाई अव्याहतपणे करत आहेत. त्यांचे विचार याबाबतीत खूप उद्बोधक आहेत.


‘‘राजकीय नेत्यांची विश्वासार्हता निश्चीतच कमी होतेय. कमी झालेली आहे. पण त्याचा शोक करत बसायला नको. शेवटी आपण एक व्यवस्था स्वीकारलेली आहे. कोणीतरी सरकार बनवणार, कोणीतरी विरोधी राहणार. तेव्हा या उपलब्ध व्यवस्थेतूनच आपला पर्याय निवडावा लागेल. काही लोक यावर एक भयानक उपाय शोधून काढतात. ते म्हणतात, सर्वच राजकीय पक्ष नालायक आहेत म्हणून आम्ही मतदानच करत नाही. पण हा रोगापेक्षा उपाय भयंकर आहे. हे करणाऱ्यांत सुशिक्षित मतदारांचाच भरणा जास्त असतो. त्याच्यामुळेच मग अल्पमतातलं सरकार माथी मारलं जातं. असं घडता कामा नये. हा नाही तर तो नवा मार्ग शोधावा लागेल. पत्ते पिसावे लागतील. नव्या लोकांना, पर्यायी नेत्यांना संधी देऊन बघितलं पाहिजे. निवडणुका लढवणं हे एक तंत्र बनलं आहे. त्याची एक पद्ध-त ठरली आहे. सुशिक्षित , विद्वान माणसांचा त्यात निभाव लागणं कठीण आहे. पण मा. बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र या बाबतीत बरेचदा काही वेगळे प्रयोग केले होते. त्यांच्यामुळेच तर विद्याधर गोखले, नारायण आठवले अशी माणसं निवडून जाऊ शकली. सारस्वत बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ सुरेश प्रभू यांना शिवसेनेनेच सिंधुदुर्गातून तिकीट दिले. निवडून आणले. केद्रात मंत्रीही बनवले. त्यांनी त्याकाळी घेतलेल्या काही निर्णयांचे आजही कौतुक होते. पण त्यांनाही जनतेने परत निवडून दिले नाही. तेव्हा शिवसेना नेहमीच असे प्रयोग करायला तयार असते. पण शिवसेनेच्या धाडसाला, प्रयोगांना लोकांनीही साथ दिली पाहिजे.’’

Related posts

Leave a Comment