‘गांधी गोडसे || एक वैचारिक पातळीवरील युद्ध चित्रपटाचे परीक्षण || भरकटत गेलेला कल्पना विस्तार.

जो चित्रपट ‘दुसरा इतिहास’ घडवेल अशा अपेक्षा होत्या, तोही शेवटी ‘वन लायनर’ च ठरला. काही वर्षांपूर्वी शाळेत असताना आम्हाला निबंधाचे विषय असायचे. ‘अमुक एक व्यक्ती आज जिवंत असती तर’ किंवा ‘तमुक व्यक्ती भूतकाळातून भविष्यकाळात आली तर तिच्या आजच्या जगाबद्दलच्या काय कल्पना असतील ‘वैगरे वैगरे.  आणि ती व्यक्ती खरोखरच आपल्या डोळ्यासमोर उभी आहे अशी कल्पना करून आम्ही निबंध लिहायचो.  असे विषय शाळेमध्ये निबंध लेखनासाठी असल्यामुळे तशाच पद्धतीचा विचार करण्याची सवय लागली होती. असाच एके दिवशी एक विचार माझ्या मनात आला. ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधींवर श्री नथुराम विनायक गोडसे यांनी केलेल्या हल्ल्यातून जर गांधीजी वाचले असते तर पुढे काय झाले असते. 

वय वाढत गेले तसे निबंधलेखन मागे पडले. पण इतिहासाच्या पुस्तकात ‘वनलायनर’ ठरलेल्या नथुराम गोडसेंविषयी मनातले कुतूहल वाढतच गेले. त्यातूनच मग त्यांच्याविषयी जे मिळेल ते वाचत गेलो. तेव्हा असे लक्षात आले की नथुराम गोडसेंनी केलेला गांधीहत्येचा प्रयत्न हा काही पहिला प्रयत्न नव्हताच. या आधीही एक दोन वेळा असे प्रयत्न करण्यात आले होते. पण ते अयशस्वी झाले. आणि खरोखर ज्या दिवशी गांधींचा खून झाला त्याच्या काही दिवस आधीच त्या मारेकऱ्याला अटक करण्यात आली.

      

एखाद्या माणसाच्या अंगात अहिंसा किती मुरलेली असावी पहा. त्या अयशस्वी ठरलेल्या हल्लेखोरांचे सुद्धा गांधीजींनी कौतुक केले. म्हणाले “पोरं आहेत. त्यांना आता समजत नाहीये. पण मी मेल्यावर एक दिवस त्यांना नक्की कळेल की म्हातारा बरोबर बोलत होता”. म्हणूनच श्री राजकुमार संतोषी ‘अशा’ विषयावर चित्रपट बनवत आहेत. हे कळल्यापासून मला चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली होती. मनात एक भिती पण होतीच. कारण विषय तसा ‘गंभीर’ आहे. पण मला जी भिती वाटली होती तसे चित्रपटात काहीच दाखवलेले नाही. गेल्या काही वर्षात नथुराम आणि गांधी म्हटलं की लोकांच्या त्याविषयीच्या प्रतिक्रिया पाहता या चित्रपटात गोडसेंविषयी तसेच काहीतरी पाहायला मिळेल अशा अपेक्षा होती. पण या चित्रपटातील गोडसेंचे पात्र मात्र अतिशय सौम्य दाखवले आहे. थोडक्यात इकडे गांधींपेक्षा गोडसेंचे पारडे जड आहे. ‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट श्री असघत वजहत यांच्या गोडसे@गांधी. कॉम या नाटकावर बेतलेला आहे. नाटकाच्या नावावरूनच लक्षात येते की यात गांधींच्या नजरेतून गोडसेंकडे पाहिले आहे.

तर चित्रपटात मात्र याच्या अगदी विरुद्ध पाहायला मिळते. चित्रपटाची संहिता खूपच रटाळ आहे. चित्रपटातील दृश्य आणि संवाद नाटकातून जसेच्या तसे उचलले आहेत. जे मुद्दे नाटकात दाखवण्यात आलेले नाहीत पण चित्रपटात आहेत. त्यावर सुद्धा नीट भाष्य केलेले नाही. काही अशी दृश्ये आहेत ज्यात आपल्याला थोर नेतेमंडळी (त्यावेळची) दिसतात. जसे की श्री जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, डॉ बाबासाहेब आंबेडकर, जे बी कृपलानी हे सर्व महत्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करताना दाखवले आहेत. पण ते शाळेच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांसारखे दिसतात. आणि एकसूरीपणे बोलतात. काही गंभीर विषय हाताळताना उगाचच विनोदनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच फाळणीनंतरची दिल्लीतील काही दृश्ये ज्यात नथुराम गोडसेंचे महत्व आणखी अधोरेखित केले आहे. 

आणि एक उपकथानक जे खरतर नाटकाचा भाग होते पण चित्रपट आणखी परिणामकारक होण्यासाठी वगळले असते तरी चालले असते, तेही दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या कलाकारांनी सुमार अभिनय केला आहे. खासकरून तनिषा संतोषी जिने सुषमाचे पात्र साकारले आहे. तनिषा अशी एक मुलगी आहे जिला गांधीजींच्या सेवेत आयुष्य घालवायचे आहे. आणि अनुज सेनी  ज्यांनी सुषमाच्या प्रियकराची नरेनची भूमिका केली आहे. नथुरामच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर यांनी जीव ओतून काम केले आहे. पण ही भूमिका नाटकाच्या भूमिकेच्या विरुद्ध आहे. कारण नाटकाचे प्रयोजन मुळात नथुराम गोडसेंना कोणत्याही देवमाणसाच्या स्वरूपात दाखवण्याचे नव्हते. नथुराम गोडसेंनी शस्त्र हातात घेतले कारण तसे करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. 

 उलट नाटकामध्ये गोडसेंना अचानक गर्दीतून समोर येऊन गांधीजींवर ३ गोळ्या झाडणारा माथेफिरू म्हणूनच दाखवले आहे. चित्रपटातील गोडसेंची व्यक्तिरेखा ‘गांधीच अखंड हिंदुस्थानच्या फाळणीला जबाबदार आहेत. कारण ते हिंदूंचा द्वेष आणि मुस्लिमांवर प्रेम करतात’ या एकाच वाक्याभोवती फिरताना दाखवली आहे. तर दुसरीकडे चित्रपटात गोडसेंना ते होते त्यापेक्षा हुशार दाखवण्यात आले आहे. 

मग प्रश्न हा उरतो की नथुराम गोडसे नेमके होते कसे? गोडसे खूप कमी शिकलेले होते. गोडसेंना दहावीच्या परीक्षेत इंग्रजीत कमी गुण मिळाले होते. आणि त्यामुळे ते परीक्षेत नापास झाले होते. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘त्यांच्या लहरीपणामुळे त्यांनी शाळा कायमची सोडलेली होती’. गोडसेंची हुशारी फक्त त्यांनी दिलेल्या कबुलीजबाबात दिसून येते. ज्यात त्यांनी गांधींना मारण्याची कारणे सांगितली आहेत.

पण गांधींचे पणतू श्री तुषार गांधी यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे तो कबुलीजबाब गोडसेंनी दिलेलाच नव्हता. कारण गोडसेंच भाषेवर प्रभुत्व नव्हतं. त्यांच्या लिखाणाची पद्धत भडक होती. ज्यात शिव्यांचा पुरेपूर वापर केला होता. आणि थोडीशी दादागिरीची झलक त्यात होती. लोकांच्या विचारांवर प्रभाव पाडण्यासाठी आणि त्यांच्या भावनेला हात घालण्यासाठी हा कबुलीजबाब अत्यंत हुशारीने लिहिण्यात आला होता. श्री तुषार गांधी यांच्या मते नथुराम गोडसेंचा हा कबुलीजबाब स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी लिहिला असावा. कारण भाषेवर अशा प्रकारचे प्रभुत्व असणारी त्याकाळात एकमेव व्यक्ती होती आणि ती म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.

या चित्रपटात गोडसेंना जितके धाडसी दाखवण्यात आले आहे, तितके धाडसी गोडसे नव्हतेच. सुरुवातीला जेव्हा गांधींना मारण्याचा कट रचण्यात आला त्यावेळी बंदूक हातात घेऊन चाप ओढण्यासाठीही गोडसेंनी नकार दिला होता. लेखक श्री मनोहर मालगावकर आपल्या ‘गांधींना मारलेला माणूस’ या पुस्तकात नथुराम गोडसेंनी ही योजना कशी आमलात आणली या विषयी सविस्तर लिहिले आहे.  बिरला हाऊस जिथे गांधीजी प्रार्थना सभेसाठी यायचे त्याच्या बरोबर समोरच्या  खोलीतील खिडकीतून  गांधीजी प्रार्थनेसाठी कुठे बसले आहेत हे स्पष्ट दिसायचे. तिथूनच त्यांच्यावर गोळी झाडायची असे ठरले. गोडसेंचे साथीदार श्री दिगंबर बडगे हे बंदूक चालवणार होते आणि सभागृहात बाँम्ब टाकणार होते. आणखी एक टोळीतील सहकारी श्री मदनलाल पहावा लोकांमध्ये घबराट पसरवण्यासाठी सौम्य गोळीबार करतील असे ठरले होते. टोळीचे बाकीचे सदस्य म्हणजे स्वतः नथुराम, त्यांचा भाऊ गोपाळ गोडसे आणि विष्णू करकरे हिंदू महासभेचे नेते. आणि शंकर बडगे यांचे नोकर. अशी ती एकंदर पाच जणांची टोळी होती.

या पाचही जणांकडे बॉम्ब होते. बडग्यांनी गांधींवर गोळी झाडल्यावर लोकांच्या जीवाची पर्वा न करता हे बॉम्ब गर्दीत फेकायचे असे ठरले होते. या टोळीचे प्रमुख होते नथुराम गोडसे आणि नारायण आपटे. ज्यांना  नंतर ‘महात्मा’ गांधींच्या खुनासाठी फासावर जावे लागले. खरे तर त्यांच्या हातात त्यावेळी कोणतेही शस्त्र नव्हते. आपल्या चमूला या सर्व मोहिमेदरम्यान मार्गदर्शन करणे एवढेच या दोघांचे काम होते. पण चित्रपटात मात्र नथुराम गोडसे आपल्यासमोर क्रांतिकारक म्हणून उभे राहतात.

सुरुवातीला २० जानेवारी १९४८ ला गांधींना मारायचे असे ठरले होते. त्याप्रमाणे सर्व जण बिरला हाऊस इथे पोहोचले. पण नेमक्या वेळी बडगेंचे हातपाय गार पडले. त्यामुळे ते गोळी चालवू शकले नाहीत. पण आधीच ठरल्याप्रमाणे पहावानी बंदुकीचा स्फोट घडवला. आणि त्या प्रयत्नात त्यांना अटक झाली. बाकीचे साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले. मध्ये १० दिवस गेले. हातात घेतलेले काम तर तडीस न्यायला हवे होते. म्हणून मग नाईलाजाने का होईना नथुराम गोडसेंनी हे काम स्वतःच करायचे असे ठरवले. आणि १० दिवसांनी म्हणजेच ३० जानेवारी १९४८ रोजी ‘भित्र्या’ नथुराम गोडसेंनी स्वतःच्या हातातील बंदुकीतील ३ गोळ्या झाडून गांधींची हत्या केली.

गांधींची हत्या केल्यानंतर शरणागती न पत्करता गोडसेंनी पळून जायचा प्रयत्न केला पण ते पकडले गेले. नाटकात दाखवल्याप्रमाणे नथुराम गोडसे कोणी ‘गुरुजी’ नामक व्यक्तीचे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आभार मानतात. त्यामुळे नथुराम गोडसे ही कोणी बुद्धिमान व्यक्ती न वाटता एक मोठी योजना अमलात आणण्यासाठी विशिष्ट पद्धतीने काही शिकवलेली व्यक्ती वाटते. आणि या सततच्या शिकवण्यामुळेच गोडसेंचे विचार प्रभावित होऊन त्यांनी ही हत्या केली असावी असे वाटते. पण चित्रपटात असे काहीही दाखवलेले नाही.

नाटकातले संवाद जसेच्या तसे चित्रपटात दाखवताना काही गोष्टी राहून गेल्या आहेत. त्या म्हणजे जेव्हा गांधीजी गोडसेंना सावरकरवादी असण्याविषयी विचारतात आणि जिथे गांधी गोडसेंना सांगतात की अखंड हिंदुस्थानचा नकाशा हा खरेतर ब्रिटिशकालीन भारताचा नकाशा आहे. जिथे एकेकाळी आर्य आणि मौर्यांचे राज्य होते. नाटकातील दृश्यात गोडसेंना बेजबाबदार आणि बेफिकीर दाखवले आहे. चित्रपटात ही दृश्ये न घेतल्याने गोडसेंची व्यक्तिरेखा अधिक प्रभावी वाटते. तर दुसरीकडे चित्रपटात गोडसे नेहरूंचा अपमान करताना दाखवले आहेत. एका दृश्यात गोडसे गांधींना विचारतात ‘तो’ तुमचा कोण ‘तो’? काय नाव आहे त्याच? त्यावर गांधीजी दबक्या आवाजात उत्तर देतात जवाहर.. चित्रपटगृहात हास्याची लकेर उठते…

मान्य आहे की गांधींबद्दलचे काही गैरसमज दूर करण्याचा चित्रपट प्रयत्न करतो. पण तसे करताना मूळ इतिहासाला बऱ्याच ठिकाणी धक्का लावण्यात आला आहे. २७ जानेवारी १९४८ म्हणजे हत्येच्या ३ दिवस आधी गांधींनी एक चिट्ठी लिहिली होती ज्यात त्यांनी लिहिले होते की काँग्रेस पक्षाचे सर्व राजकीय कार्य आता संपलेले आहे. त्यामुळे काँग्रेस आता यापुढे कोणतेही काम करणार नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष लोकसेवा संघात विलीन करण्यात यावा. पण तो काही त्यांचा आदेश नव्हता तो काँग्रेसच्या संविधानाचा कच्चा मसुदा होता जो गांधीजी पक्ष बैठकीत मांडणार होते. पण तो मसुदा सभेत मांडण्यापूर्वीच गांधीजींची हत्या झाली.

गांधी हत्येनंतर तो मसुदा पत्रकारपरिषदेत वाचण्यात आला. आणि त्यावरूनच आज गांधी काँग्रेसच्या मुळावर उठले होते असे पसरवले जात आहे. श्री तुषार गांधी यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे त्या मसुद्यात गांधींना असे म्हणायचे होते की भिन्न विचारसरणी घेऊन कोणताही पक्ष पुढे जाऊ शकत नाही. पक्ष टिकवायचा असेल तर पक्षात समविचारी माणसे असणे गरजेचे आहे. त्यामुळे सध्याची असलेली युती तोडून काँग्रेसला समविचारी पक्षात विलीन करण्यात आले तर अधिक चांगले होईल. नाटकात सुद्धा हा भाग आहे. पण तो चित्रपटात दाखवताना अधिक काळजी घेऊन योग्य प्रकारे मांडता आला असता.

इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण सुषमाने नरेनशी लग्न करण्याला गांधीजी विरोध करतात. आणि ही त्यांची सर्वात मोठी चूक आहे हे नथुराम गोडसे त्यांना कशाप्रकारे लक्षात आणून देतात हे चित्रपटात चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे.  नाटकामध्ये कस्तुरबा गांधी बापूजींच्या स्वप्नात येऊन त्यांना या निर्णयाबद्दल कठोरपणे सुनावतात. आणि सांगतात की त्यांच्या या निर्णयामुळे सुषमाने जीवाचं काही बरंवाईट करून घेतलं तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही गांधीजींची असेल. आणि मग गांधींना आपली चूक समजते. वास्तविक पाहता कस्तुरबांचे मनोगत गोडसेंच्या तोंडून सांगितल्यामुळे तो पती पत्नीतील संवाद न राहता नथुराम गोडसेंनी गांधींना दिलेला ‘उपदेश’ वाटतो आणि अर्थातच त्यामुळे गोडसे गांधींपेक्षा वरचढ ठरतात.

चित्रपटाचा शेवट आणि नाटकाचा शेवट सारखा नाही. शेवट बघताना प्रेक्षकांना कमल हसनच्या ‘हे राम’ चित्रपटाची आठवण येते. ज्यात एक हल्लेखोर गांधींच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्या विचारांच्या प्रभावामुळे आंतर्बाह्य बदलून जातो. पण असा बदल करत असताना कथेत सुद्धा त्याप्रकारची खोली असणे गरजेचे आहे. हे लक्षात घ्यायला हवे. आणि तिथेच चित्रपट मार खातो. थोडक्यात चित्रपट पाहताना रंगमंचावरील नाटकच आपण मोठ्या पडद्यावर पाहत आहोत असे वाटत राहते.

नाटकामध्ये भडक अभिनय, हलका विनोद हे सर्व करण्यास मुभा असते. पण तोच विषय मोठ्या पडद्यावर आणताना मर्यादा पाळणे गरजेचे आहे. एकूणच ‘नथुराम गोडसे’ नावाच्या व्यक्तीभोवती गेली अनेक वर्ष जे गूढ वलय तयार करण्यात आले आहे ते दूर होऊन गोडसेंविषयीच्या काही अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे मिळतात का हे शोधण्यासाठी चित्रपट पाहायला गेलो होतो. पण त्याबाबतीत मात्र निराशाच झाली.  पण असा नाजूक आणि गंभीर विषय मोठ्या पडद्यावर आणण्याचे धाडस केल्याबद्दल श्री राजकुमार संतोषी यांचे आभार. आणि श्री शरद पोक्षेंच्या ‘नथुराम गोडसेंचा’ वारसा पुढे नेणारा ‘नथुराम’ आपल्याला श्री चिन्मय मांडलेकरांच्या रूपात मिळाला आहे, अशी आशा ठेवायला हरकत नाही.

Related posts

Leave a Comment