– शरद मेस्त्री
मुंबईत एकेकाळी गुंडाराज माजले होते पण काही काळानंतर पोलिसांनी एकएका गुंडाना वेचून वेचून ठार मारायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांचे गुंडाराज आपोआप बंद झाले. या नक्षल्यांचे, माओवाद्यांचे व काश्मीरातील दंगेखोरांचे असेच केले पाहिजे. एकदा जबरदस्त धाक बसला की मग पुढे कुणी डोके वर काढणार नाही. येणाऱ्या काळात मोदी अशी कृती करतील का?
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यामध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या पंचवीस जवानांची नक्षलवाद्यांकडून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात राहून, त्या देशातीलच कायदे-कानून न पाळता आपल्या काही मागण्यांसाठी हाती शस्त्र घेऊन सरकार व व्यवस्थेविरुद्ध- सशस्त्र बंड करणे, दहशत माजवण्यासाठी लोकांच्या, नेत्यांच्या वा सुरक्षा दलाच्या जवानांच्या खुलेआम हत्या करणे हे कुठल्या संस्कृतीत बसते? एवढे करूनही अशा नराधमांना पाठीशी घालणारा, त्यांना समर्थन देणारा एक मोठा वर्ग आपल्या भारतात निर्माण झालेला आहे. हे हरामखोर देशात ंिनदनीय कृत्य करणाऱ्यांना नेहमी पाठीशी घालत असतात. पाकिस्तानी दहशतवादी कसाबने मुंबईवर हल्ला केल्यानंतर त्याला फाशी देतानाही हे करंटे त्याला फाशी देऊ नये म्हणून गळे काढत होते. दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणानंतरही त्या पीडित तरुणीविषयी सहवेदना न दाखवता त्यातील सहभागी कसे अल्पवयीन आहेत, त्यांचे आयुष्य बरबाद होईल त्यांना मोठी शिक्षा होऊ नये म्हणून आटापिटा करत होते. ही आणि अशी एक दोन उदाहरणे नाहीत तर प्रत्येकवेळी या लोकांनी असंगाला साथ दिलेली आहे. मग तो संसदेवर हल्ला करणारा असो, इंदिरा गांधींचे, राजीव गांधींचे मारेकरी असोत, काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले करणारे असोत. अशा सर्वांना हे पाठीशी घालत असतात. याउलट नुकतीच पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना फाशीची सजा सुनावली तेव्हा, वा कालच्या सुकमातील नक्षली हल्ल्यानंतर या सोकॉल्ड लोकांच्या दातखिळ्या बसल्या आहेत. काश्मीरात दररोज भारतीय लष्करावर मुस्लीम दहशतवादी व तेथील तरुण हल्ला करत असतात. जवानांना पळवून पळवून त्यांच्यावर दगडफेक करतात. नुकतीच काश्मीरात अशी घटना घडली. त्यानंतर ती दगडफेक करणाऱ्या दहशतवाद्याला लष्कराने पकडून जिपला बांधून फिरवले. हा व्हिडिओ व्हायरल होताच या लोकांनी गजहब माजवला. म्हणजे हे लोक भारतात राहून, भारताचे खाऊन भारताचेच दात घशात घालायला टपून बसलेले आहेत.
सुकमातील नक्षली हल्ल्याला चोवीस तास उलटत नाही तोवर त्याचे राजकारण सुरू झालेले आहे. अशा सर्व तथाकथित नेत्यांचा नुसता निषेध करुन उपयोगाचे नाही तर त्यांची थोबाडे फोडली पाहिजेत. नक्षलवाद्यांची विचारसरणी काहीही असली तरी त्यांनी पत्करलेला मार्ग ंिहसक असल्याने ते दहशतवादीच आहेत. अशांवर दयामाया न दाखवता कठोर कारवाई व्हायला हवी. गेली कित्येक वर्षे भारतातील काही भागात नक्षलवाद्यांचा, माओवाद्यांचा नंगानाच सुरू आहे. त्यांच्या पारिपत्यासाठी आजपर्यंत लाखो कोटी रुपये व सैनिक खर्ची पडले, शहीद झाले. पण थोडेसे कारवाईचे नाटक केले जाते व नंतर ते आपलेच भारतीय नागरिक आहेत असे समजून सरकार त्यांच्या कारवाईकडे कानाडोळा करते. पण ही बाब फारच गंभीर आहे. आपलाच माणूस आपल्याच माणसांना विनाकारण ठार मारत असेल तर तो आपला कसला? काश्मीरातही जो दहशतवादाचा, दगडफेकीचा नंगानाच सुरु आहे तेथील लोकांनाही भारत आपले नागरिक समजते. पण ते स्वत:ला भारतीय नागरिक मानतात का? नाही. मग अशांना कसली दयामाया दाखवता?
आम्ही म्हणतो अशा नराधमांना मग ते नक्षली असोत वा काश्मीरातील दंगेखोर वा केरळातील माओवादी एकदाच लष्करी कारवाई करून ठेचून काढले पाहिजे.
आतापर्यंत एवढ्या दहशतवादी कारवाया करूनही आपले भारत सरकार काहीच ठोस कारवाई करत नाही हे पाहूनच या नक्षल्यांचा, माओंचा व काश्मीरातील हल्लेखोरांचा धीर चेपला आहे. यांचा समूळ नायनाट केल्याशिवाय भारतात शांतता नांदणार नाही. कारण या लोकांना साथीला घेऊनच चीन, पाकिस्तानी परकीय शक्ती भारतात अराजक घडवत आहेत. जर असे लोकच भारतात शिल्लक राहिले नाही तर मग परकीय शक्तीही भारताचे काही वाकडे करु शकत नाही. आपण प्रत्येकवेळी शिवाजी महाराजांचे उदाहरण देतो. पण शिवाजी महाराजांनी राज्यकारभार करताना, तो सुरळीत चालवताना अराजक निर्माण करणाऱ्या आपल्याच लोकांना आपले आहेत म्हणून सोडून दिले नाही की कानाडोळा केला नाही. जो जो स्वराज्याच्या आड आला मग तो नातलग असू दे नाही तर संस्थानिक महाराजांनी अशा लोकांना अशा काही शिक्षा सुनावल्या होत्या की तेच काय त्यांच्या पुढच्या चार पिढ्या परत कोणतेही गैरकृत्य करण्यास धजावणार नाहीत.
आजच्या घडीला भारताची लढाई ही परकीय देशांशी नाहीच मुळी; ती आहे अंतर्गत शक्तींविरुद्ध-च. सर्व बाजूंनी देश पोखरत चालला आहे. बाहेरच्या दहशतवाद्यांना आसरा, पाठबळ, अंतर्गत माहिती देतो कोण? देशातीलच काही लोक. मग असे करणारे आपले कसे? त्यांना आपले का मानायचे? जे आपल्याच निष्पाप बांधवांचे बळी घेतात त्यांना भारतात जगण्याचा, लोकशाही उपभोगण्याचा, भारतातील साधन-संपत्ती वापरण्याचा काय अधिकार? अशांवर एकच उपाय म्हणजे आपले न समजता कठोरात कठोर शासन केले पाहिजे आणि तेही त्यांच्या गुन्ह्यानुसार सार्वजनिक स्थळी. मुंबईत एकेकाळी गुंडाराज माजले होते पण काही काळानंतर पोलिसांनी एकएका गुंडाना वेचून वेचून ठार मारायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांचे गुंडाराज आपोआप बंद झाले. या नक्षल्यांचे, माओवाद्यांचे व काश्मीरातील दंगेखोरांचे असेच केले पाहिजे. एकदा जबरदस्त धाक बसला की मग पुढे कुणी डोके वर काढणार नाही. येणाऱ्या काळात मोदी अशी कृती करतील का?
