कामाचा ताण, कौटुंबिक समस्या व बेरोजगारी

work-stress-family-problems-and-unemployment

गेल्या २५ वर्षांत जागतिकीकरण आणि खाजगीकरणामुळे नोकरदारांच्या जीवनपद्ध-तीत अमूलाग्र बदल झाला आहे. सर्वच उद्योग, व्यवसाय, आस्थापनांच्या कार्यालयात ‘कामाची वेळ काटेकोरपणे पाळली जात आहे,’ असं चित्र नाही. पूर्वी साडेसहा, आठ तास ड्युटी असायची. अनेक ठिकाणी कार्यालयीन कामाचा हा नियम नीटपणे पाळला जायता. आजमात्र कमीत कमी कामगार कर्मचाऱ्यांकडून जास्तीत जास्त काम करून घेण्याची व्यवस्थापनाची प्रवृत्ती वाढली आहे. त्यामुळे कोणत्याही वाढीव वेतन वा भत्त्याशिवाय कर्मचाऱ्यांना १२-१२/१४-१४ तास काम करावं लागत आहे. शिवाय निवासाचं ठिकाण नोकरीच्या ठिकाणापासून दूर असल्यामुळे प्रवासातही माणसांचा वेळ अधिक जातो. नोकरी टिकविण्याच्या आणि पैसे कमविण्याच्या या धडपडीमुळे माणसांच्या आणि समाजाच्या स्वास्थ्यावर जो परिणाम झालाय, होतोय तो पाहिल्यावर असं सांगावं लागेल की  ही बाब नक्कीच गांभीर्यानं विचार करण्यासारखी आहे. अन्यथा माणसांबरोबर सामाजिक स्वास्थ्यही बिघडणार आहे.

जास्त वेळ काम केल्यावर काय होतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपलं पोलीस खातं. पोलीस पूर्वीपासूनच १२ तास काम करीत आहेत. या अधिक कामाचे त्यांच्या कार्यक्षमतेवर झालेले परिणाम आपण पाहतो आहोतच. पोलीस खात्यातील माणसं अकार्यक्षम नाहीत. मात्र अधिक काळ ड्युटी केल्यामुळे आलेल्या थकव्यामुळे ती निरुत्साही वाटतात. आणि तशी वागतातही.

मुंबईत नोकऱ्या करणारी माणसं मुंबई लगतच्या शहरातून राहतात. तिथून नोकरीच्या ठिकाणी येण्याजाण्याचा कालावधी लक्षात घेतला तर नोकरी करणारी व्यक्ती १२ ते १४ तास कुटुंबापासून दूर, घराबाहेर असते. इतका वेळ घरापासून दूर राहिल्यामुळे पती-पत्नींचा संवाद कमी होतो. आठवडाभर नोकरीच्या चक्रात गुरफटलेले असल्यामुळे कौटुंबिक जीवन हे सुट्टीच्या दिवसापुरतंच राहतं. त्यामुळे पती पत्नींमध्ये विसंवादी वृत्ती वाढायला लागते. कित्येकदा हा विसंवाद लग्न मोडण्यापर्यंत पोहोचतो. घरापेक्षा ऑफिसमध्ये माणूस अधिक काळ असल्यामुळे घरापेक्षा ऑफिसातील माणसांबरोबरचा संवाद वाढतो. यामुळे कुटुंबबाह्य संबंध वाढीला लागतात. पती-पत्नी वेगळे होण्याला तेही एक कारण होऊ शकतं.

नोकरीच्या ठिकाणापासून वास्तव्याचं ठिकाण दूर असलं की प्रवास हा अपरिहार्य असतो. मुंबईकरांना तर रेल्वेचा धकाधकीचा आणि गर्दीचा प्रवास टाळणं शक्यच नाही. विरारला राहणारी व्यक्ती अंधेरी नाहीतर वांद्र्याला नोकरीला येत असेल तर तिला दिवसाचे दोन तीन तास प्रवासात घालवावेच लागतात. वांद्रे, अंधेरी, बोरीवली या स्टेशनांच्या मधल्या स्टेशनवरून स्लो ट्रेन पकडणे म्हणजे अग्निदिव्यच असते. तीन-तीन ट्रेन सोडूनही ट्रेनमध्ये प्रवेश मिळत नाही. कित्येकदा वेड्यावाकड्या स्थितीत उभ्याने प्रवास करावा लागतो. त्या धडपडीत आपल्या पेशी-स्नायूंवर ताण पडत असतो. त्यातूनच अकाली सांधेदुखीसारखे आजार होऊ शकतात. आजकाल या शारीरिक आजाऱ्यांच्या संख्येत खूपच वाढ झाली आहे. सर्वसाधारणपणे व्यक्ती वयाच्या २५ ते ३० व्या वर्षी नोकरीला लागते आणि ५८ ंिकवा ६० व्या वर्षी निवृत्त होते. या कार्य करण्याच्या वर्षांतील बराचसा काळ माणसांना हा प्रवासाच्या धकाधकीत घालवावा लागतो आणि त्याची भेट म्हणून त्याला वेगवेगळ्या व्याधी आजारांना सामोरं जावं लागतं.

पूर्ण कार्यशक्तीचा वापर करायचा असेल तर माणसाला काही तासांची विश्रांती आवश्यक असते. अधिक तास नोकरी, प्रवासात जात असल्यामुळे माणसाला हवी तितकी झोप नि विश्रांती मिळत नाही. त्याचा परिणाम म्हणून कामाच्या ठिकाणी सोपविलेली कामं नीटपणे करणं जमत नाही.  ‘एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही’ ही भावना मनाला घेरून राहिली की मानसिक ताण वाढतो. ताण कमी करण्यासाठी माणूस मनाचं रंजन करण्याचे मार्ग शोधायला लागतो. त्यातला एक मार्ग म्हणून व्यसनाकडे वळतो. हळूहळू हा उपाय अपाय ठरतो. माणूस पूर्णपणे व्यसनाच्या आधीन होऊन जातो.

नोकरीच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी दूर राहणाऱ्यांना लवकर घर सोडावं लागतं. इतक्या लवकर पोळी भाजी तयार होणं शक्य असतच असं नाही. त्यामुळे अनेकजण दुपारचा डबा घेतच नाहीत. स्वाभाविकच दुपारचं जेवण, अधिक काळ काम करावं लागत असेल तर संध्याकाळचं खाणं हे हॉटेलात ंिकवा इतर ठिकाणाहून घ्यावं लागतं. हे बाहेरील पदार्थ शारीरिक आरोग्याच्या दृष्टीनं हितकारक असतीलच याची खात्री नसतं. पण पोटासाठी काही तरी खायला हवं म्हणून अनेकांना हॉटेलमधील ंिकवा रस्त्यावरचे पदार्थ खावे लागतात. ते खाणंही वेळवर घेतलं जाईल याची खात्री नसते. आहारातील या बेशिस्तीचे परिणाम आता मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत. पूर्वी तुरळक दिसणाऱ्या रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, संधीवात या आजारांच्या रुग्णात या दोन दशकात प्रचंड संख्येनं वाढ झाली आहे. आजार म्हटले की उपचार आला. हे औषधोपचारही कायमस्वरुपी असतात, त्यासाठी होणारा खर्च ही मोठा असतो. मग त्या खर्चामुळे उपचारामुंळे नवीन ताण निर्माण होतो. आणि ताणतणावाचं हे चक्र विस्तारात जातं. या सगळ्यामुळे माणसंही थोडी आक्रमक व्हायला लागलीत. रोजच्या ताणतणावामुळे लोक इतके त्रस्त झालेले आहेत की गंभीर सामाजिक घटनांकडेही ते व्हायचंच अशा निर्ढावलेल्या भूमिकेतून पाहू लागले आहेत.

नोकरीच्या या वाढीव तासांमुळे कुटुंब व्यवस्थाच खिळखिळी होऊ लागली आहे. आईवडील दोघंही नोकरीला असतील तर मनात असूनही ते आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नाहीत. कामावरील ताण घरात आल्यानंतरही कायम असतील तर मुलांशी योग्य तऱ्हेने संवाद साधला जात नाही. घरात सांभाळणारं कुणी नसल्यामुळे मुलांना बेबीसिटींगमध्ये ठेवावं लागतं. तिथले संस्कार मुलं घेतात, त्यातून त्याचं वागणं बोलणं बदलतं. आईवडील आणि मुलांमधील दरी वाढत जाते. आणि या गोष्टीचा ताण पालकांच्या मनावर येतो. स्वाभाविकच ताणातून निर्माण होणारं अस्वास्थ्यही पालकांना स्वीकारावं लागतं. मुलांप्रमाणेच घरात असलेल्या ज्येष्ठांशीही मोकळेपणानं बोलणं होत नाही. आयुष्याच्या उताराकडे सरकलेल्या वृद्ध-ांमध्ये त्यामुळे एकलेपणाची भावना वाढीला लागते. स्वतंत्र राहाण्याच्या आग्रहामुळे वयस्क वृद्ध-ापासून माणसं वेगळी राहतात. स्वाभाविकच एकटं राहाण्याची वेळ वृद्ध-ांवर येते. मग अशा अगतिक एकट्या वृद्ध-ांना लुटण्याच्या, मारण्याच्या घटना घडू लागतात. म्हणजे सामाजिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो.

जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी जगता कुटुंबाच्या, समाजाच्या समवेत जगताना आपल्या आयुष्यात आनंद देणाऱ्या, आनंद निर्माण करणाऱ्या अनेक घटना, प्रसंग घडत असतात. ते आनंदाचे क्षणच आपल्याला जगण्याची उमेद देत असतात. पण नोकरीच्या चक्रात गुरफटलेल्याकडे कुटुंब आणि समाजाला देण्यासाठी वेळच नसतो. त्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षणच नसतात.

त्यामुळे मिळालेल्या कमी वेळात अधिकाधिक विरंगुळा शोधण्याच्या प्रयत्नात ते व्यसनाच्या दारी पोहोचत आणि सवय वाढत जाऊन व्यसनाधिन होतात.

आपल्या शरीराची क्षमता किती आहे हेच आपण विसरून गेलो आहोत. ती क्षमता योग्य प्रमाणात न वापरता आपण अधिक काळ काम केलं तर शरीर लवकर थकणार, लवकर आजार येणार आणि मन आणि शरीराचं संतुलन बिघडायला लागणार.

मला माझ्या वडिलांबद्दल इथं सांगावसं वाटतं. माझ्या वडिलांना खूप मोठा पगार नव्हता. पण त्या तुटपुंज्या पगारात घर संसार चालवूनही ते सुखी दिसायचे. आनंदी दिसायचे. कारण त्यांचं अनेक नातेवाईकांकडे येणंजाणं होतं, मित्रमंडळी होती. त्यांच्यात सातत्यानं बोलणं चालणं असायचं. त्यातून त्यांना समाधान मिळायचं. म्हणजे त्यांचा हॅपीनेस इंडेक्स मोठा होता. मागच्या पिढीच्या तुलनेत आजची पिढी नातलग, मित्रमंडळीशी जोडलेली आहेत का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आपण आपला हॅपीनेस इंडेक्स तपासायला हवा. तो जर शून्याच्या जवळ असेल तर तुम्ही किती पैसे कमावताय, तुमचं घर किती मोठं आहे, तुमच्याकडे लक्झरी गोष्टी कोणकोणत्या आहेत याला काहीच अर्थ नसतो. नोकरीसाठी आपण ही अतिरेकी धडपड का करतोय? हा प्रश्न आपण आपल्याला विचारतच नाही. आपल्याला पैसे मिळविण्यासाठी खूप काही करायचं आहे हेच आपण लक्षात ठेवलं आहे. आपण ही जिवघेणी धावपळ का करतोय? आपल्या जगण्याचा उद्देश काय? हे प्रश्न मनातही न आणता आपण फक्त धावतो आहोत. याचा अवास्तव परिणाम आपल्या शरीराबरोबर मनावरही दिसू लागला आहे.

एकंदरीत दिनचर्येबद्दल बोलायचं तर माणसाला पुरेशी झोप मिळणं शरीर आणि मनासाठी गरजेचं आहे. नोकरीनिमित्त १४-१४ तास घराबाहेर राहिल्यानंतर घरी आल्यावर स्नान, जेवण यासाठी काही वेळ द्यावा लागतो हे सगळं झाल्यानंतर माणसांकडे झोपेसाठी पाच तासांचा वेळ मिळतो. म्हणजे झोप लागेपर्यंत उठण्याची वेळ होते. आता मुद्दा असा की पाच तास झोप घेणारी व्यक्ती चौदा तास किती उत्साहानं काम करू शकेल? आपल्याकडे कोणत्याही गोष्टींकडे गंभीरपणे पाहिलं जात नाही. माणसांना कार्यक्षम ठेवायला माणसांना पुरेशी झोप मिळायला हवी हे जगभरानं मान्य केलं आहे. जपानमध्ये कामगार-कर्मचाऱ्यांना दुपारी एक तास झोपण्यासाठी कारखाने-आस्थापनात व्यवस्था केलेली असते. शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक संतुलनासाठी योगाची खूपच मदत होते. जगभरात ही गोष्ट मान्य होऊ लागली आहे. आपण मात्र योगाबद्दल आपल्या आध्यात्माबद्दल तितकेसे गंभीर नाही. उलट आपण त्यापासून दूर जात आहोत.

एका बाजूला नोकरदाराच्या या ंिचता वाढविणाऱ्या समस्यांनी माणसं आणि समाज अस्वस्थ आहे तर दुसऱ्या बाजूला बेरोजगारांना वेगळ्याच प्रश्नांना सामोरं जावं लागत असतं.

‘कुठे नोकरी पाहतोस की नाही? प्रयत्न चालू आहेत की नाही? काही तरी कर. नाहीतर पुढे कसं होणार तुझं?’ अशा प्रश्नांनी बेरोजगार बेजार होत असतो. रोजगार नसल्यामुळे त्याच्या हाती पैसा नसतो. त्यामुळे तो खर्च करू शकत नाही. नोकरी मिळत नाही तोवर तो स्थिर होऊ शकत नाही. स्थिर नाही म्हणून लग्न नाही. लग्न उशीरा झालं की मुलांचा प्रश्न उभा राहतो. म्हणजे बेकारीमुळे बेकारांनाही ताणतणाव सहन करावे लागतात. तणवांमुळे बेरोजगार चुकीच्या मार्गनं वाटचाल करू लागतात. कारण त्यांच्यासाठी पैसा महत्त्वाचा असतो मार्ग नाही. तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळण्याला बेकारी हे एक महत्त्वाचे कारण आहे. हे एक सामाजिक सत्य आहे. बेरोजगारीमुळे आर्थिक असमतोल निर्माण होतो. त्यामुळे ज्या देशात बेरोजगारांची संख्या अधिक असेल तेवढा तो देश अधिकाधिक अशांत आणि अस्थिर होत जाईल हे समाजशास्त्रानंही मान्य केलं आहे.

आज अनेकांना नोकरी व्यवसाय नाहीत. त्याचवेळी अनेक उद्योगांमध्ये कामं करायला माणसं मिळत नाही. वर्षानुवर्षे चालत आलेल्या शिक्षण पद्ध-तीला आपण चिकटून राहिल्यामुळे व्यवसाय उद्योगांसाठी लागणारे मनुष्यबळ देऊ शकत नाही. व्यवसायाभिमुख शिक्षणाने हा प्रश्न काही अंशी सुटण्याची शक्यता आहे.

रोजगार प्रांतातील बदललेल्या पद्ध-तीमुळे उद्भवलेल्या समस्या प्रश्नांकडे गंभीरपणे पाहून योग्य ते निर्णय घेतले तरच, आपण कौटुंबिक, सामाजिक स्वास्थ्याचे प्रश्न मार्गी लावू शकतो. त्या दिशेने संयमित वाटचाल करणं महत्त्वपूर्ण ठरू शकेल.

शब्दांकन – प्रकाश कामत

Related posts

Leave a Comment