राजधानीत राजभाषेची दुर्दशा व उपाय

mayanagari-prestige-money

–      सतीश सिन्नरकर

परवाच सामाजिक क्षेत्रात देशभर वावरणाऱ्या एका वयस्क व्यक्तीची भेट झाली. हे सतत मुंबईचा उल्लेख बंबई करत होते आणि ऐकणाऱ्यांमध्ये कोणीच त्यांना अडवत नव्हते. शेवटी मी त्यांना मध्येच थांबवून मुंबई म्हणण्याची विनंती केली. ती त्यांनी लगेच स्वीकारली पण आजुबाजूच्या इतर अमराठी लोकांना मात्र तो माझा आगाऊपणा वाटला.

अशीच एक भेट मुंबईतील एका मोठ्या शिक्षण संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झाली. या संस्थेत २५०००विद्यार्थी आहेत. सर्व इंग्रजी माध्यम. मराठी शाळा होती. पण हळूहळू योजनापूर्वक बंद केली. पुरेसे विद्यार्थी नाहीत असे सांगत व स्थानिक मराठी अभिमानी नेत्यांचे ‘सहकार्य’ घेत दरवर्षी एकेक वर्ग बंद केला. मराठी शिक्षक आहेत आणि विद्यार्थीही आहेत. पण माध्यम इंग्रजी! मराठी शाळेत जे विद्यार्थी होते ते गुणवत्तेत सरस होते. पण पालक, शिक्षक आणि शाळा यांनी मिळून त्यांना इंग्रजी माध्यम सक्तीने घ्यायला भाग पाडले.

१८ फेब्रुवारीला मटा हातात आला तर पहिल्याच पानावर पूर्ण जाहिरात. शेझवानच्या जाहिरातीत डिप, स्प्रेड, कुक, मिक्स, फ्राय, सर्व्ह असे अनेक शब्द पसरलेले. जणू यांना मराठीत चांगले प्रतिशब्दच नाहीत.

दैनंदिन जीवनातली अशी अनेक उदाहरणे आपल्या या मुंबईत पदोपदी, दररोज आपण पाहतो आणि डोळे मिटून घेतो. मराठीपणाचे राजकारण करायचे, भाषणे ठोकायची आणि राजभाषा दिनानिमित्त फलक लावायचे एवढीच मुंबईच्या मराठीची ओळख राहिली आहे. अमराठी लोकांसाठी तर मराठी भाषा आणि मराठी माणसे म्हणजे चेष्टेचा विषयच असतो. मुंबई जरी महाराष्ट्राची राजधानी असली तरी मुंबई आणि ऊर्वरित महाराष्ट´ यात जमीन अस्मानाचा फरक आहे. मुख्य फरक तर भाषेचाच आहे. पुण्यासारखी शहरेही आता मुंबईच्या पावलावर पाऊल ठेवत रस्त्यावर हिंदी बोलू लागले आहेत. असेच जर सर्व शहरात होऊ लागले तर ज्या आधारे महाराष्ट्रात मराठीचा डंका वाजतो आहे तोच नष्ट होईल. मराठीच्या बाजूने अनेक विधायक मुद्दे सांगण्यासारखे असले तरी त्यास दुजोरा देण्यात मराठीची राजधानी कमी पडते आहे, हे आजचे वास्तव आहे.

मराठीसाठी मुंबई काय करू शकते? किंवा मुंबईत मराठीचे स्थान कसे असावयास हवे याचा काहीतरी विचार आजच्या मराठी राजभाषा दिनाच्यानिमित्ते करणे उचित होईल. कारण केवळ नकारात्मक मुद्दे मांडून आपण आपली सुटका करुन घेऊ  शकत नाही.

सर्वात प्रथम म्हणजे मराठीचा राजकीय वापर होऊ देणे बंद झाले पाहिजे. समाज जोडण्याचे काम राजकारणाने कधीच केलेले नाही. उलट आजपर्यंत समाजात भेद निर्माण करण्याचेच काम राजकारणाने केले आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि येथील ७५ टक्के लोक अमराठी आहेत. राजकारणामुळे त्यांना मराठी भाषेविषयी आपुलकी वाटून शिकण्याची इच्छा होण्याऐवजी त्यांच्या मनात राग व गैरसमजच निर्माण झाले आहेत. यामुळे मराठी ही येथे दैनंदिन व्यवहाराची भाषा होत नाही. राजकारणामुळे अमराठी लोक मराठी माणसाकडे संशयाने, भीतीने किंवा आकसाने बघतात. आता मराठी टक्का २५ वरून पुढे वाढविणे आपल्याला शक्य नाही. म्हणून मुंबईत मराठीची महत्ता वाढवायची असेल तर इतर भाषिकांना मराठी बोलणे सुगम करावे लागेल. मराठीचे राजकारण न करणे ही एक अत्यंत कडू गोळी असेल पण मराठीच्या उज्जवल भवितव्यासाठी ती घ्यावी लागणार आहे. मुंबईतील मराठी नेते आणि जागरुक मराठी जनता यांनी आत्मचिंतन करून या दिशेने पावले उचलली पाहिजेत.

दुसरे काम म्हणजे मुंबईतील मराठी संस्था मजबूत केल्या पाहिजेत. यात शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व संस्थांचा समावेश होतो. आर्थिक मजबुती, सुंदर व प्रशस्त इमारती, जाणते संचालक, सर्वसमावेशक अशा या संस्था जेव्हा मराठी अमराठी असे भेद न करता दर्जेदार कार्य करतील तर हा हा म्हणता मराठीचा डंका मुंबईत वाजू लागेल यात आम्हाला शंका वाटत नाही. या कामात सरकार, मराठी धनिक व प्रसारमाध्यमे याचा मोठा सहभाग लागेल. पण ५ ते १० वर्षांची चांगली योजना बनवली तर हे प्रत्यक्षात आणणे कठीण नाही.

तिसरा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे मराठी भाषेच्या वाढत्या दैनंदिन उपयोगासाठी खास योजना बनविणे. यासाठी साहित्यिक, पत्रकार, शिक्षक, प्राध्यापक, नेते आणि जागृत मराठी माणसे यांना मोठे योगदान करता येईल. आपल्याकडे कल्पकतेला तोटा नाही. एकदा का ठरले की मराठीच्या लोकप्रियतेसाठी कार्य करायचे की तरूण मंडळीच एवढ्या नवनवीन संकल्पना पुढे आणतील की ती एक चळवळच बनेल.

असे काहीतरी धोरण मराठी राजभाषा दिनानिमित्त ठरविण्याची सुबुद्ध-ी कुसुमाग्रजांचा आत्मा समस्त मराठी जनांस देवो हीच त्यांच्या चरणी विनम्र प्रार्थना!

Related posts

Leave a Comment