कोकणातली जी काही डेव्हलपमेंट झाली आहे ना ती तेथील लोकांनी आपली स्वत:ची गरज म्हणून केलेली आहे. यात शासनाने काहीही केलेले नाही. शासनाने दाखवावेत कोकणात त्यांनी किती उद्योजक, व्यावसायिक निर्माण केलेले ते… आम्ही समोरासमोर बसून चर्चा करायला तयार आहोत. कोकणात करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. छोट्या छोट्या…. पण सरकारला तसे करायचेच नाही. त्यांना डायरेक्ट अशी सिवर्ल्ड, मरिनपार्क सारखीच मोठीमोठी स्वप्ने पडतात व अर्धवट राहतात, लोकांचा विरोध होतो.
– कृष्णा केसरकर
आपले बालपण व शिक्षण याविषयी सांगा?
मी कृष्णा गजानन केसरकर, मु.पो. माणगाव, सिंधुदुर्ग. माझे आईवडील तेथेच राहतात. माझे शिक्षण माणगावातच झाले. आई शिक्षिका होती. वडील नोकरी करीत. टेक्निशियन डिपार्टमेंटला होते. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. वडीलांची इच्छा होती की मुलांनी उद्योग-धंद्याकडे वळावे. त्यांना रिटायर्डमेंट घेतल्याचे एक लाख रुपये मिळाले होते. ते आम्ही कणकवलीतील कलमठला जागा घेऊन इन्व्हेस्ट केले. मी त्याच वेळी एमएसआयडीसी येथे सिंधुदुर्गात शिबिर लागले होते. मिटकॉन कंपनीतर्फे उद्योजकता शिबिर घेतले होते त्यात मी सहभागी झालो. त्यात आम्हाला उद्योगधंद्याबद्दल माहिती देण्यात आली. उद्योग कसा करावा, सर्व्हे कसा करावा या गोष्टी मला तेथे शिकायला मिळाल्या. मला तसं बिझनेसचं बॅकग्राऊंड नव्हतं. माझे कुटुंब सर्व्हीस करणारे होते. या शिबिराचा मला खूप फायदा झाला. सर्व्हे करता करता चार-पाच प्रोजेक्टचे सर्व्हे मी केले. त्यानंतर आईस फॅक्टरी हा विषय पुढे आला, उद्योगासाठी. कारण आपल्या येथे समुद्रकिनारपट्टी आहे. मोठ्या प्रमाणात मासेमारी चालते त्यामुळे येथे आईस फॅक्टरी या उद्योगाला पुढे वाव मिळेल असे वाटले. त्यानुसार संपूर्ण सर्व्हे करून कलमठ येथे पहिली आईस फॅक्टरी सुरू केली. त्यानंतर दुसरी फॅक्टरी कणकवलीतील वागदे येथे सुरु केली. तिसरी फॅक्टरी देऊळवाडा, मालवण येथे सुरु केली. चौथी फॅक्टरी देवगडला सुरू केली. आज माझ्या चार आईस फॅक्टरी आहेत.
त्यानंतर पुढे काय व्यवसाय करायचा हा विचार करत असताना असा विचार मनात आला की आपण एखादी चांगली टाऊनशिप तयार केली तर? येथे पर्यटनाच्या दृष्टीने होणारी डेव्हलपमेंट, इथला निसर्ग यांचा विचार केला तर उच्च प्रतीचे राहणीमान लोकांना मिळेल. लोकांना चांगल्या सुविधा देता येतील. त्या दृष्टीने मी ‘टाऊनशीप’ कडे वळलो. व ‘कृष्णनगरी’ या नावाने जानवलीला, कणकवली हायवेला टाऊनशीप बनवली. चार एकरचा प्लॉट असून ४८ बंगलोज आहेत. कोकणातील वातावरणाला सुट करतील अशी घरे (बंगलोज) बांधले आहेत. लोड बेअरिंग उतरत्या छपराची घरे आहेत. कमी खर्चात व मजबूत अशी आहेत. त्यानंतर दुसरा प्रोजेक्ट सावंतवाडीला केला. सावंतवाडी रेल्वे सेंटर समोर नंदनगरी म्हणून. त्यात १७० घरे आहेत. त्यापैकी ८० बंगलोज आहेत व बाकी फ्लॅटस् आहेत. तो सात एकरमध्ये प्रोजेक्ट आहे. तिसरा प्रोजेक्ट मी देवगड कुणकेश्वर आणि मीठबावच्या मध्ये करतोय. तो २८ एकरमध्ये आहे व ५०० घरांचा आहे.
कोकणाबद्दल सांगायचे तर सिंधुदुर्गात जी डेव्हलपमेंट व्हायला हवी ती होताना दिसत नाही. गेली ३० वर्षे मी पाहतोय. काही लोक असं होतंय, तसं होतंय म्हणून काही पण सांगतात. मूळात तशी प्रगती काही दिसत नाही. प्रगती करण्याची येथील राजकीय लोकांची इच्छाशक्तीच नाही. नकोत्या कल्पना घेऊन हे लोक काम करतायत. यात सरकारचा दोष आहे. या संदर्भात मी कुणाशीही समोरासमोर चर्चा करु शकतो. तुम्हाला जर टुरिझम आणायचं असेल तर पहिल्यांदा टुरिझम संदर्भातील पायाभूत सुविधांकडे लक्ष द्यायला हवे. टुरिझम कुठे होऊ शकते, जो कोस्टल म्हणजे समुद्र किनाऱ्या जवळचा भाग येथे. तुम्हाला ३०-४० वर्षे कोस्टल साईडला रोड करायला लागतात. सिंधुदुर्गात समुद्राच्याकडेने जाणारा २०० मीटरचा तरी रोड आहे का? एकही रोड समुद्राला समांतर गेलेला नाही. जे काही पूर्वीचेच रोड होते त्यांची थोडीशी डागडुजी केली, कुठे पुलं बांधली म्हणजे कोस्टल रोड झाला का? लोकांना मूर्ख बनवायची कामे आहेत सगळी. कोस्टल हायवेची काही पॅरामिटर असतील ना? गोव्याच्या पुढे कारवार साईडलाही कोस्टल रोड आहेत. रत्नागिरीत गणतीपुळे येथेही रोड झालेत. पण कुणीही दाखवावं की ते कोस्टल रोड म्हणून प्लांिनग करून झालेत म्हणून. आता पर्यटन सुविधा केंद्राचे… ते कुठे एका बाजूला. असे केंद्र हायवेला हवे ना? म्हणजे काय सुधारणेच्या नावाखाली थातुरमातुर कामे करायचीत, पैसे खर्च केलेत म्हणून दाखवायचे व आपल्याच कार्यकर्त्यांना कामे देऊन पोसायचे असा सगळा कारभार आहे.
व्यवसाय करताना तुम्हाला काही अडचणी जाणवल्या का?
मी सिंधुदुर्गातलाच आहे. गेली तीस वर्षे व्यवसायात आहे. माझं पोट भरत नव्हतं म्हणून मी व्यवसायात आलेलो नाही तर व्यवसायाविषयी प्रेम होते. जिद्द होती, काहीतरी करून दाखण्याची म्हणून मी व्यवसायात आलो. आज येथील कोणत्याही लोकांची अशी मानसिकता नाही. अशा लोकांना वास्तव समजून द्यायला या लोकांनाच ते मूळात समजलेले नसते. यांना फक्त किती हजार कोटी व लाख कोटी एवढेच आकडेच दिसत असतात.
यापूर्वी मरिन पार्क व्हायचा होता. पण त्याबद्दल सविस्तर माहिती दिली का? जर सविस्तर माहिती दिली असती तर मानसिकता तयार झाली असती. मरिनपार्क झाल्यावर काय सुधारणा होणार हे जनतेला सांगितले असते तर समजले असते. मालवणात होणारा हा प्रकल्प विरोध करणाऱ्यांना दाखवला असता, तेथे काय काय होणार हे दाखवले असते तर आपोआपच विरोध मावळला असता. आता सिवर्ल्ड प्रोजेक्टबद्दल सांगतो. सिवर्ल्ड कुठे केला, आचरा भागात. तेथे स्थानिक विरोध होऊ लागला. विरोध का होऊ लागला, कारण तुम्ही विश्वासात घेत नाही म्हणून. जर त्याची सविस्तर कल्पना दिली असती, तेथील काही सुशिक्षित तरुणांना प्रत्यक्ष होणाऱ्या जागेवर नेऊन प्रकल्पाबद्दल समाजावून सांगितले असते तर हा विरोध झाला असता का? तुम्ही सरकारी खर्चाने येता, वारेमाप पैसा राहण्याखाण्यावर करता हेच जर येथील तरुणांसाठी केले असते तर …. लोकांना वास्तविकता समजली असती; पण नाही. ते स्वत:ला अतिशहाणे समजतात. कोणाला विकास नको असतो? असे होऊच शकत नाही. ज्यावेळी तरुण मोटीवेट होतो त्यावेळी त्यासाठी आणखी काही करायची गरज नसते. पण त्यासाठी त्यांना योग्य दिशेने मोटीवेट करावे लागते. असा प्रयत्न त्यांना करावासाही वाटत नाही. एखाद्या ठिकाणी विरोध झाला तर मुद्दामहून तेथेच प्रोजेक्ट करणार अशी जी भाषा वापरली जाते वा त्यादृष्टीने हमरातुमरीवर येऊन स्थानिकांवर टिच्चून काम केले जाते. हे कशासाठी? आता हा मालवणचा प्रोजेक्ट देवगड, मुणगे येथेही होऊ शकला असता. तेथे तर मोकळी जागा होती. पण नाही. जिद्दीने मालवणातच घेतला मग विरोधामुळे १२०० एकरमधील प्रोजेक्ट २५० एकरवर आला. आता येथील जागांचे भाव २ लाख रु. गुंठा आहे. तुम्ही सरकारी भावाने घेणार १५ हजार रु. गुंठाने मग लोक मुर्ख आहेत का तुम्हाला जमीन द्यायला. कोकणातला माणूस सबसिडीसारख्या भिकेवर जगणारा नाही. तुम्ही त्यांना विश्वासात घ्या. जेथे जमिनींना भाव नाही अशा ठिकाणी प्रोजेक्ट करा. तेथे तुम्हाला रोड वगैरे करायला कोकणातली जनता मोफत जमीन देईल. अशा ठिकाणी प्रोजेक्ट केला असता तर तेथील लोकांच्या जमिनीलाही भाव आला असता. पण तसे करायचे नाही. जेथे लाखो रुपये गुंठा आज बाजारभाव आहे अशी शहरातीलच जमीन तुम्हाला हवी व तीपण १०-१५ हजार रुपये गुंठ्याने! कोण देईल. हा प्रकल्प तर देवगड-मुणगे साईडला झाला असता तर लोकांनी हसत हसत आपल्या जमिनी दिल्या असत्या कारण तेथे जमिनींना भावच नाही.
आज कोकणातली जी काही डेव्हलपमेंट झाली आहे ना ती तेथील लोकांनी आपली स्वत:ची गरज म्हणून केलेली आहे. यात शासनाने काहीही केलेले नाही. शासनाने दाखवावेत कोकणात त्यांनी किती उद्योजक, व्यावसायिक निर्माण केलेले ते… आम्ही समोरासमोर बसून चर्चा करायला तयार आहोत. कोकणात करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. छोट्या छोट्या…. पण सरकारला तसे करायचेच नाही. त्यांना डायरेक्ट अशी सिवर्ल्ड, मरिनपार्क सारखीच मोठीमोठी स्वप्ने पडतात व अर्धवट राहतात, लोकांचा विरोध होतो.
सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलाय मग तेथे त्याला परस्पर पूरक म्हणून कोणत्या इंडस्ट्रीला वाव मिळायला हवा तर एज्युकेशन! येथील वातावरण एज्युकेशन इंडस्ट्रीला पूरक असे आहे. त्यादृष्टीने जागरुकता निर्माण झाली तर खूप काही होऊ शकते. आता आंबोली येथे बऱ्याचशा जागा महाराष्ट्र शासनाच्या अंडर आहेत. अशा ठिकाणी जर मोठ्या संस्थांना जागा दिल्या तर येथेही एज्युकेशन हब निर्माण होऊ शकते. मध्ये मुंबई विद्यापीठ येथे सिंधुदूर्गात जागा शोधत होती. अरे मी म्हणतो, मुंबई विद्यापीठासारख्याला जागा शोधावी लागते? तुम्हीच सांगायला हवे की चला तुम्हाला आंबोलीत ५० एकर जागा दिली म्हणून. पण ही मानसिकताच नाही. शिक्षणाबद्दल आत्मीयताच नाही. आता सावंतवाडीचे पहा सावंतवाडी एज्युकेशन हबसाठी आदर्श आहे. पालकमंत्री येथीलच आहेत मग कुठे घोडे अडलेय?
‘रेरा’ बद्दल काय सांगाल?
– रेरा अतिशय उत्तम कायदा आलेला आहे व याचा आम्हाला खूप फायदा आहे. कोकणातला बिल्डर, डेव्हलपर हा कुणाला फसवणाऱ्यातला नसतो व अजूनपर्यंत तसे कुणी केलेलेही नाही व या कायद्याने करताही येणार नाही त्यामुळे हा कायदा सर्वांनाच फायदेशीर आहे.
