
सतीश सिन्नरकर, संपादक
सह्याद्रीच्या कडे-कपारीत पहुडलेला…अरबी समुद्राचा नितळ…निळेशार किनारा लाभलेला…माडा-पोफळींच्या, गर्द आमराईच्या बागांचा हिरवा साज ल्यालेला…आंबा, काजू, फणस यासारख्या विविध फळांच्या रानमेव्याचा…रानफुलांच्या रानगंधाचा…ओल्या-सुक्या मासळींचा…विविध बोलींचा, लोककलांचा…परंपरागत जपलेल्या संस्कृतींचा…आपलेपणाच्या ओढीचा…शहाळ्यातील पाण्याच्या गोडीचा…ज्या भूमीने अनेक नररत्ने दिली अशा शूरवीरांचा…गड आणि किल्ले यांतून इतिहासाची साक्ष देणारा…
लालमातीचा टिळा लावून पराक्रमाची ज्योत तेवत ठेवणारा…कोकणी बाण्याचा…निसर्गाच्या अनुपम लावण्याने मोहवणारा…असा हा कोकणाचा परिसर म्हणजे जणू सृष्टिसौंदर्याचं कोंदणच! खरच…हे नयनरम्य कोकण…भविष्यात नक्की कसं असेल?…काय आणि कसा असेल कोकणचा चेहरा-मोहरा? धावत्या युगात काळाची गणितं दिवसागणिक बदलत जातात. जगण्याची समीकरणं बदलतात…वेगवेगळे प्रवाह येतात…या सा-या प्रवासात माझं कोकण कोणतं रुप धारण करेल?
विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र व कोकण हे विद्यमान महाराष्ट्र राज्याचे ‘पाच’ प्रादेशिक विभाग आहेत. कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात जमीन, पाऊसपाणी, हवामान, पिके, निसर्ग, मनुष्यस्वभाव, मानसिकता, भाषा इ. जवळपास सारखे आहेत. मात्र कोकणचा प्रादेशिक विचार करता कोकणातील परिस्थिती इतर महाराष्ट्रापेक्षा फार भिन्न आहे. त्यामुळे इतर प्रदेशांसारखे विकासाचे समान मापदंड लावून कोकणचा विकास साधणे शक्य होणार नाही. त्यासाठी हवे व्यापक नियोजन! इथल्या लोकांच्या मानसिकतेला विचारात घेऊन, इथल्या परंपरागत मूल्यांचा विचार करुन, पर्यावरणाचा, सौंदर्याचा विचार करुन; थोडीशी विचारपूर्वक पाऊले उचलणे आवश्यक आहे. इथला मूळ गाभा, घटकांना धक्का न पोहोचता, भावीपिढीच्या भवितव्याचा विचार करुन, राजकीय, सामाजिक, वैचारिक संघटन लक्षात घेऊन शाश्वत विकासाचा मूलमंत्र जपत, सर्व स्तरांतून जाणीवपूर्वक प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे वाटते.
कुठल्याही प्रदेशाच्या विकासासाठी त्या प्रदेशातील उपलब्ध साधनसामग्रीचा जास्तीत जास्त वापर कसा करुन घेता येईल याचा विचार होणे आवश्यक आहे. विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान, सुगामी, व्हावी यासाठी विकासाचा एक निश्चित आराखडा असावा; त्याची कार्यवाही नीट होते की नाही याचा सतत पाठपुरावा करावा. कागदावरच्या योजनांपेक्षा प्रत्यक्ष कृतीयोजना असाव्यात. त्यासाठी दूरदृष्टीचे नियोजन असावे. येथील उपजत सौंदर्य जपत, शाश्वत व चिरकालीन समृध्दीचा वारसा निर्माण करावा. त्यासाठी शासन, राजकीय मंडळी, विचारवंत… एकूणच सारी जनता यांनी कंबर कसायला हवी. मनातील नकारात्मकता संपवून सकारात्मकता जोपासून ‘कोकणच्या समृध्दीचे’ स्वप्न साकारण्याची जिद्द… या लालमातीची ओढ व प्रेम मना.. मनात… चेतवली पाहिजे.
कोकणामध्ये सुमारे दिडशे इंच पाऊस पडतो. पाट बंधा-यांच्या सहाय्याने हे पाणी अडविले गेले तर भाताचे एक नव्हे तर वर्षातून तीन पिके घेतली असती. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी आधुनिक शेती पध्दती, संकरीत बी-बियाणे, रासायनिक खते, आधुनिक कृषी अवजारे, शेतीतील नवनवे संशोधन, प्रयोग व पध्दती यांचा व्यावहारीक वापर केला तर समृध्दी साधता येईल. यासाठी शेती कार्यशाळा, शिक्षण, ग्रामपंचायत, कृषिअधिकारी, ग्रामसेवक यांच्याकडून शेतकऱ्यांनी वेळोवेळी माहिती प्राप्त केली पाहिजे.
आता कोकणात भाताबरोबरच ज्वारी, भुईमूग, मका, नाचणी, वरी, कांदा, मिरची, लवंग, मिरी, वेलदोडा, जायफळ इ. पिके घेतली जातात. काही भागात उसशेतीचा प्रयोगही केला जात आहे. मात्र अशा पिकांतून मिळणारे आर्थिक उत्पन्न हे तुटपुंजे आहे. अशा पिकांना योग्य हमीभाव मिळाला, मार्केटिगची सक्षम व्यवस्था निर्माण केली तर अधिक उत्पादन होऊ शकते.
कोकण कृषी विद्यापिठाच्या साथीने कोकणातील पिकांच्या सक्षम उत्पादनासाठी मदत करणे योग्य ठरेल. कोकणात फळ बागायतींबरोबरच इथल्या शेतकऱ्यांनी फुलशेती, भाजीपाला पिके, वनौषधी लागवड यांकडे लक्ष केंद्रित करुन खऱ्या अर्थाने कोकणच्या विकासाला हातभार लागेल.
‘कोकणात येवा, कोकणाचा मेवा चाखून जावा’
खरच! या कोकणची लाल माती म्हणजे विविध फळांचे आगारच! या लालमातीत सहजपणे पिकणारी फळे म्हणजे आंबा, काजू, फणस, रातांबा (कोकम), नारळ, सुपारी, केळी, जांभूळ, करवंद, अननस, पपई, पेरु, चिकू, जांभ, बोर, कलिंगड इ. होत.
यापैकी आंबा हा फळांचा राजा! यातील हापूस आंब्याने तर जागतिक कीर्ती मिळविली आहे. हापूस आंबा हे पिक लोकांना आर्थिक समृध्दीकडे घेऊन जाणारे आहे. मात्र त्याचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. जे बागायतदार चांगले व्यवस्थापन राखून आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरतात अशाना ३ ते ७ टन प्रतिहेक्टर एवढे सरासरी उत्पादन हापूस आंबा बागेतून मिळते.
आंब्यापाठोपाठ कोकणातील महत्त्वाचे फळपिक म्हणजे काजू. वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राने काजूच्या कितीतरी किफायतशीर जास्त लाग असणाऱ्या जातींचे संशोधन केले आहे. या काजूपिकांकडे सर्व सामान्य शेतकऱ्यांनी अर्थार्जनाचे एक साधन म्हणून पाहिले पाहिजे. शासकीय अनुदान, प्रोत्साहन याचाही लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे.
‘‘तुझ्या सहर्ष स्वागतास, उमलतो नवा ऋतू,
ये सुखात, कोकणात, गात हर्ष गीत तू’’
कोकणचे निसर्गवैभव एवढे संपन्न आहे की, इथे भेट देणारा पर्यटक त्याच्या प्रेमात न पडला तर नवलच! कोकणातील निसर्गसौंदर्य हे विविधांगी आहे. इथले सागर किनारे निरव, निळेशार प्रदुषणमुक्त आहेत. कडेकपारीतून कोसळणारे मनोहारी धबधबे आहेत, वनर्राइंनी व्यापलेली हिरवा साज केलेली अवनी आहे… इथले तलाव, नदीकाठ, हिरवाईने नटलेला, वळणवेड्या वाटांचे रस्ते, प्राचीन मंदिरांची लाभलेली पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत. गड आणि किल्ले यांचा वारसा आहे.
कोकणचा एकूणच प्रांत मोहमयी सौंदर्यस्थळांचा आहे. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी, विकासाच्या वाटा खुणावत आहेत. देशातील सुमारे ६०० जिल्ह्यांपैकी ‘सिधुदुर्ग’ हा एकमेव असा जिल्हा आहे की, जो ‘संपूर्ण पर्यटन जिल्हा’ म्हणून घोषित केला गेला आहे.
येथे सुंदर विचारांची बिजे फार पूर्वांपार पेरली गेलीत. कोकणच्या अनुपम लावण्याने ती अधिकाधिक मोहरावीत हीच अपेक्षा. या साठी सर्व कोकणवासीयांनी सामाजिक, नैतिक, राजकीय, शैक्षणिक उत्थानासाठी सदैव कंबर कसली पाहिजे.
