चला! हेडगेवार करु या!!

Dr._Hedgevar

आपल्या येथे प्रत्येक घरामध्ये वर्षानुवर्षे, काहीतरी व्रत, उपवास, वगैरे चालत असते. कोणी शंकराचा सोमवार, कोणी हनुमानाचा शनिवार तर कोणी गुरुसाठी गुरुवारचे व्रत ठेवतात. त्याचे तंतोतंत पालन करतात. त्यांना काही खायला वगैरे दिले की ते म्हणतात, आज माझा ‘अमुक अमुक’ वार आहे. म्हणून उपवास आहे. अशा व्रताच्या दिवशी विशेष आचारधर्म पाळला जातो. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे जीवनकार्य अभ्यासले आणि त्यांनी दिलेला जीवनसंदेश कोणता याचा विचार केला तर असे म्हणता येईल की या देशाची व समाजाची सद्यस्थिती बदलायची असेल तर सोमवार, मंगळवार असले वार न करता एकच वार करावा, तो म्हणजे ‘हेडगेवार’!

Dr._Hedgevar

ही काही केवळ शाब्दिक कोटी नाही. हेडगेवार करणे म्हणजे निःसिम राष्ट्रनिष्ठा, देशभक्ती. हेडगेवार करणे म्हणजे स्वतःचे अस्तित्व विसरून फक्त आणि फक्त समाजाचा विचार, उच्चार व कृती करावयाची, हेडगेवार म्हणजे साक्षात ‘कर्मयोग’! निष्काम कर्मयोग. सज्जनांचे रक्षण व दुर्जनांचा नाश यासाठी संगठित शक्ती तयार करणे म्हणजे हेडगेवार व्रत करणे. ‘स्वराज्य’ हा माझा जन्मसिद्ध- अधिकार आहे हे जसे लोकमान्यांनी ठणकावून सांगितले तसेच समर्थ, स्वावलंबी आणि संपन्न सुराज्यासाठी सर्वस्व समर्पण करण्याचा संदेश डॉ. हेडगेवारांनी दिला आहे. असे कार्य देशातील तरुणच करू शकतात. तरुणाई हे पॉवर हाऊस असून त्यातून बाहेर पडणारी लक्षावधी किलोवॅट शक्तीच देश बलवान करू शकेल. म्हणून ‘हेडगेवार’ करायला हवा.

‘महानगरी वार्ताहर’चा हा डॉ. हेडगेवार विशेषांक बाराव्या वर्षात पदार्पण करीत आहे. याही अंकात ज्येष्ठ संघ कार्यकर्ते श्री नारायण सामंत यांच्या संपादकत्वाखाली ‘मला भावलेले संघगीत’ ही लेख मालिका आहे. गेल्या वर्षीच्या विशेषांकात देखिल श्री. नारायण सामंत यांनी असाच सुंदर उपक्रम राबविला होता व तो असंख्य वाचकांना प्रचंड आवडला होता. अनेकांची पत्रे आली, फोन आले व अंकाचे भरभरून स्वागत झाले. दुर्दैवाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अंक वेळेवर पोचू शकला नाही. पण कालांतराने तेही काम पूर्ण झाले.

Dr._Hedgevar

संघाची वाटचाल आता शताब्दीकडे पोहोचत आहे. २०२५ मध्ये संघाला अभिप्रेत असलेले समर्थ हिन्दूराष्ट्र आपणांस याचि देही याचि डोळां पहावयास मिळणार असे वातावरण देशात निर्माण झाले आहे. संघाला जरी रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव वगैरे साजरे करण्यात स्वारस्य नसले तरी या निमित्ताने संघ निर्मात्याने उराशी बाळगलेले समर्थ हिन्दु समाजाचे स्वप्न कितपत साकार झाले याचा आढावा घेऊन अजून किती पल्ला गाठायचा आहे व तो कसा चालवा लागेल याची मांडणी करता येईल. यासाठीच अशा विशेषांकांची आवश्यकता आहे.

गुढी पाडवा म्हणजे आपला एक मोठा सण. हाच डॉ. हेडगेवार याचा जन्मदिवस. हिन्दु नववर्षाचा प्रारंभ करणारा हा पवित्र दिवस आणि आद्यसरसंघचालक प्रणाम करण्याचा हा एकमेव दिवस होय. विगत वर्षाचा आढावा आणि आगामी वर्षाची योजना यादृष्टीने हा दिवस आत्मचिंतनाचा होतो.

या अंकातील मजकूर वाचकांना आवडेल अशी आशा आहे. या अंकासाठी ज्यांनी लेखन व जाहिराती याद्वारे जे सहकार्य केले आहे, त्यांचे हार्दिक आभार मानतो आणि सर्वांना उज्ज्वल भविष्यासाठी गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.

Related posts

Leave a Comment