कोविडने बदलली जीवनशैली

आता कोविड 19 ची दूसरी लाट ओसरली आणि निर्बंध कमी झाले म्हणून लोकांनी निःश्वास टाकला आहे पण ह्या कोरोनामुळे एकूणच जीवनाची वीण उसवल्यासारखी झाल्याचे सतत जाणवते. दीड वर्षांपूर्वी जेव्हां कोरोनाची चर्चा सुरू झाली तेव्हां कोरोनाचे अक्राळविक्राळ रूप भारतीयांना कळले नव्हते पण मार्च २० मध्ये कोरोना भारतात आला आणि राष्ट्रीय लॉकडाऊन जाहीर झाल्यावर सर्वांना त्याची दाहकता जाणवू लागली. लॉकडाऊनचा प्रभाव दैनंदिन जीवनावर पडलाच पण स्थलांतरित मजूर व हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांची दैना उडाली. वाहतूकीची साधने बंदच झाल्याने स्थलांतरित मजूर कुटुंबकबिल्यासह आपल्या गावाकडे पायीच चालू लागले तर अनेक गावांनी बाहेरून येणाऱ्यांंना १५ दिवसांचे विलगीकरण अनिवार्य केले. सर्वत्र भय व अविश्वासाचे वातावरण तयार झाले तर मास्क लावणे दैनंदिन जीवनाचा भाग झाला. जेष्ठ नागरिक व लहान मुलं घरात कोंडली गेली. सर्व सदस्य घरातच राहिल्याने सुरूवातीला आनंददायी वाटणारा पण कालांतराने स्वतःची स्पेस हवाहवासा वाटणारा ठरू लागला. जेष्ठ मंडळींना तर अजूनही बाहेर सरसकट जाण्याची मुभा नाही त्यामुळे घरातच राहून फक्त टीव्हीवर कोरोनाच्या भय वाढविणारया बातम्या बघणे त्यांच्या हातात आहे.

दुसरीकडे कोरोनाचा कहर चालू होता, आजार नवीन त्यामुळे नक्की काय उपाययोजना करायची ह्यावर विचारमंथन चालू झाले. आपल्या आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा समोर आल्या तर वेगाने कोरोनाने जीव गमावणारयांची संख्याही वाढू लागली. आपल्या जवळचे असे कोरोनाबळी ठरू लागल्यावर सर्वसामान्य माणसांचा धीर सुटू लागला. पण हळूहळू का होईना कोरोना आवाक्यात येऊ लागला, अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली. पण ह्या काळात आर्थिकदृष्ट्या सर्वांचेच प्रचंड नुकसान झाले. स्टार्टअप सुरू केलेल्यांना जबर धक्का बसला आणि ते बंद पडले तर हॉटेलव्यावसायिकांनाही मोठा फटका बसला. कारखाने बंद असल्याने तिथे काम करणारे कामाविना त्यामुळे पगाराविना हताश झाले तर घरोघरी काम करणाऱ्या मोलकरणींनाही आता सोसायटीमध्ये प्रवेश नसल्याने त्या बेरोजगार झाल्या. सर्वत्र पैशाची आवकच थांबल्याने क्रयशक्ती एकदम कमी झाली आणि त्याचा परिणाम आजही अर्थव्यवस्थेवर जाणवतो आहे.

अनेकांना ‘वर्क फ्रॉम होम’ चा पर्याय मिळाला पण नवरा,बायको दोघेही घरूनच काम करताना ते काम चोविस तासाचे झाले तर मुलांचे शिक्षण ऑनलाइन झाल्याने तीसुध्दा मोबाईल,टँबवर रूजू झाली. पण ह्या सगळ्यात घरकाम कोणी करायचे हा प्रश्नही निर्माण झाला कारण कोरोनाभयामुळे घरकाम करणाऱ्या येणं बंद झालं होतं. त्यामुळे घरातील स्त्रीवर कामाचे ओझे दुप्पट झाले तर काहींनी घरकामात पत्नीला मदत करायचे स्विकारले. सुरूवातीला छान वाटलेला वर्क फ्रॉम होमचा पर्याय नंतर २४/७ एकत्र राह्यला लागल्यामुळे थोडा नकोसाही झाला. एकटं राहणाऱ्या तरूणांना हॉटेलं बंद असल्याने स्वतःपुरता का होईना स्वयंपाक करायला लागला,अनेकांना त्याची गोडीही लागली. ह्या काळात पहिल्यांदाच किराणामालाची दुकाने पूर्ण रिकामी होताना दिसली कारण पुढच्या अनिश्चिततेमुळे लोक धान्य भरून ठेवत होते तर दुसऱ्याबाजूला हाती पैसाच नसल्यामुळे लोकांनी दान केलेल्या सामानावर लोक जगत होते. ह्या काळात ही दरी प्रकर्षाने जाणवली. त्याचप्रमाणे अनेक जण एकत्र येऊन गरजूंची मदत करू लागले. रा.स्व.संघाने तर मदत गट तयार करून थेट वस्तीवस्तीत जाऊन टेस्टिंग,ट्रेकिंगचं काम करून सरकारी कामाला हातभार लावला.

कोरोनामुळे जाणवलेले एक सत्य म्हणजे ह्या आजारात तुम्ही एकटे असता, कोणीही तुम्हांला भेटू शकत नाही आणि दुर्दैवाने म्रूत्यू आलाच तर कुणीही सांत्वनासही येऊ शकत नाही. त्यामुळे कितीही दुःख झाले तरी फक्त फोनवरून बोलूनच सांत्वन करणेच होऊ शकते. अशा एकट्या पाडणारया कोरोनामुळे नातेबंध थोडे उसवल्यासारखे झाले आहेत. त्याचप्रमाणे आता सर्व कार्यक्रम, मिटींग्ज ह्या ऑनलाइनच होतात, होत आहेत त्यामुळे सामाजिक कार्यक्रमासाठी एकत्र येणे आता बंदच झाले आहे. कुणीही कुणाकडे अनाहूतपणे जात नाही कारण कोरोना नियम अंगवळणी पडले आहेत. मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे,वारंवार हात धुणे, सँनिटायझर जवळ बाळगणे ही आता जीवनशैली झाली आहे. ह्या कालावधीत सर्वात जास्त नुकसान झाले आहे ते शैक्षणिक क्षेत्राचे. शाळा कॉलेजं बंद झाल्याने विद्यार्थी पण घरात कोंडले गेले व ऑनलाइन शिक्षण सर्वांनाच न मिळाल्याने लाखो विद्यार्थी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर फेकले गेले. त्याचप्रमाणे सर्वच परिक्षा रद्द झाल्याने हुशार विद्यार्थ्यांना त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे.

ऑनलाइन शिक्षण आणि प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिकणे ह्यामध्ये असलेला फरक जाणवतो आहे कारण एकत्र रहाणे, एकमेकांशी वागण्यातून होणारे चांगले/वाईट परिणाम आता होत नाहीत. त्याचप्रमाणे ऑनलाइन शिक्षणामुळे मुलामुलींच्या हातात आता मोबाईल/टँब जास्त राहू लागल्याने शिक्षणाव्यतिरिक्तही त्याचा उपयोग वाढला असे जाणवत आहे. लोकांना असणारी सणसमारंभ दणक्यात करण्याची सवय काहीप्रमाणात सरकारी नियमांमुळे नियंत्रित झाली असे म्हणायला लागेल. २५,५० जणांच्या उपस्थितीत दोन तासात विवाहसमारंभ होऊ शकतो हे लोकांना कळले. त्याचवेळी कमी खर्चात लग्न उरकता येत म्हणून बालविवाह वाढले ही त्याची दुसरी बाजू आहे तर दणक्यात लग्न करण्यासाठी दोन वर्षे ते पुढे ढकलणारे पण दिसले. एकूणच सर्व समारंभ कमी झाल्याने लोकांची कपडे खरेदी सुध्दा आटली. एकूणच कपडे खरेदी सुध्दा ऑनलाइन झाली आणि त्याची शैलीही बदलली कारण आता लोकांना घरात वापरायचे कपडे जास्त सोयीस्कर वाटू लागले आहेत. जवळच्या नातेवाईकांसोबत व्हिडीओ कॉलवरून संवाद साधणे आता सामान्य बाब झाली आहे तसेच प्रिय जनांना स्विगी,झोमँटो मधून खाऊ पाठवाणे, ऑनलाइन भेटी पाठविणेही आता सहज झाले आहे.

दुकानात जाऊन खरेदी आता कमीच होते, तर ऑनलाइन खरेदी वाढल्यामुळे तरूणांना रोजगारही मिळत आहे. मनोरंजन क्षेत्रावर कोविडचा परिणाम भलताच झाला असून मॉल ,थिएटर्स बंद असल्याने घरीच टीव्हीवर मनोरंजन करून घेण्याची लोकांना सवय लागली तर ओटीटी प्लँटफॉर्म लोकांना मनोरंजन पुरवू लागला अर्थात त्याची गुणवत्ता किती हा प्रश्न असला तरी तरूणपिढीला ते आवडत आहे हे नक्की. नाटक,सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघणे हे इतिहासजमा तर होणार नाही ना अशी शंका वाटते कारण मल्टिप्लेक्स झाल्यापासून तिथे सिनेमा बघणे खूपच महाग झाले होते, तीन तासांसाठी एका कुटुंबाला जवळपास १५०० रूपये खर्च करायला लागत होते. त्याऐवजी आता घरबसल्या मनोरंजन हे आवडायला लागले आहे. कोरोना भारतात आला तेव्हां त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती,चाचपडत उपचार चालू होते. टीव्हीवर येणाऱ्या बातम्या, रूग्णांचे हाल, स्मशानातील रांगा, न मिळणाऱ्या अँम्ब्युलन्स, हॉस्पिटलं भरलेली असणे ह्या सगळ्यामुळू सामान्य नागरिकांना प्रचंड भिती वाटत होती. त्यातूनच मग कोरोना पेशंटची शुश्रुषा करणाऱ्या वर्सेसना,डॉक्टर्सना रहिवासी इमारतीत येण्यास मज्जाव करण्यासारख्या घटनाही घडल्या. पण आता लोकांनी त्यांना कोरोनायोध्दे म्हणून स्विकारले आहे. त्याचप्रमाणे सर्व डॉक्टरचे दवाखाने बंद असल्यामुळे व्हिडीओ कॉल करून औषधौपचार करण्याची सवय लागली तर ज्यांना ते शक्य नाही ते छोटीमोठी आजारपणं घरगुती उपचार करू लागले. त्याचप्रमाणे कोरोनाबाबतीत व्यापक प्रमाणावर जनजागरण करण्याची दक्षता न घेतल्याने जे उपचार वाचनात आले ते करत सुटण्याची सवयही लागली. कोरोनामुळे एक प्रकारची अलिप्तता समाजात जाणवू लागली आहे. प्रत्येक जण त्याच्यावाटचे भोग भोगताना एकटाच असल्याने कदाचित असे झाले असेल आणि बाकीच्यांना कोरोनानियमांमुळे बाधित लोकांपर्यंत पोहोचता न आल्याने असेल एकप्रकारचा कोरडेपणा जाणवतो आहे. सगळं काही ऑनलाइन असल्याने आता कामं तर होत आहेत पण एकमेकांना भेटून मिळणारी उर्जा त्यात आढळत नाही.

कित्येकांनी आवर्जुन मित्रांशी फोनवरून संवाद साधण्याचे काम केले तर अनेकांनी घराबाहेर पडून गरजूंना मदत करण्यासाठी कंबर कसली. एकीकडे कोरडेपणा वाढतानाच सामाजिक भान येणे हेसुध्दा कोरोनामुळे झाले आहे. जीवनातील प्राधान्यक्रमात कशाला महत्व द्यायचे हेही लोकांना कळले आहे. ‘जान है तो जहान है’ हे सर्वांना कळल्यामुळे सर्वजण स्वतःची काळजी घेणे, इम्युनिटी वाढविणे , कोरोना नियमांचे पालन करणे हे करत आहेत तसेच आपल्या कुटुंबियांशी जास्त भावनिक जवळीक साधण्याचे प्रयत्न करत आहेत. उद्याची शाश्वती नसल्याने आपल्या आवडीचे वा कुटुंबासाठी काही करायचे असेल तर ते आजच करण्याची व्रूत्ती पण दिसते आहे. कोरोनाकाळात विकसित तंत्रज्ञानामुळे जीवन खूपच सुसह्य झाले आहे आणि ऑनलाईन व्हिडीओ कॉल हा जीवनशैलीचा भाग झाला आहे. मास्कमुळे कोरोना लांब राहिलाच पण प्रदूषणही लांब रहाते हे लक्षात आले, त्यामुळे मास्क कोरोना गेल्यानंतरही दैनंदिन जीवनाचा भाग राहिला तर आश्चर्य वाटायला नको.

Related posts

Leave a Comment