ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत पदक मिळवण्यापेक्षाही त्यामध्ये भाग घेणे अधिक महत्त्वाचे असते हे आधुनिक ऑलिंपिकचे जनक पेरेझ श बॅरन डी कुबटी॑न यांनी सांगितलेले तत्व भारताने आजपर्यंत तंतोतंत पाळले आहे. सव्वाशेपेक्षा जास्त जणांचे पथक पाठवणाऱ्या भारताला आजपर्यंत एकाही स्पर्धेत पथकांची संख्या दोन आकडीही गाठता आलेली नाही. यंदा दोन आकड्यांचा पल्ला गाठला तर ती आजपर्यंतची विक्रमी कामगिरी असेल.
राजवर्धन सिंग राठोड याने २००४ च्या ऑलिंपिकमध्ये मिळवलेले रौप्यपदक आणि २००८ च्या ऑलिंपिकमध्ये अभिनव बिंद्रा याने मिळवलेले ऐतिहासिक सुवर्णपदक ही दोन्ही पदके भारताच्या नेमबाजी क्षेत्रात क्रांती घडवणारी ठरली आहेत. त्यानंतर नेमबाजीत भाग घेणाऱ्यांची संख्या भरपूर वाढली आहे आणि भारतीय नेमबाज जागतिक स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये नेत्रदिपक कामगिरी करू लागले आहेत. यंदा पदकांच्या तालिकेत नेमबाजांचा मोठा वाटा असेल असा अंदाज आहे.
मनूकडून मोठ्या अपेक्षा
जागतिक स्पर्धांच्या मालिकेत आत्तापर्यंत नऊ सुवर्णपदके मिळवणाऱ्या मनू भाकेर हिने नेमबाजीतील चमकणारा तारा अशी लोकप्रियता मिळवली आहे. तिने आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा आणि युवा ऑलिम्पिक स्पर्धांमध्येही वर्चस्व गाजविले आहे. दहा मीटर आणि पंचवीस मीटर पिस्तूल प्रकारात तिच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. २५ मीटर पिस्तूलमध्ये अलीकडेच जागतिक स्पर्धेत सनसनाटी विजेतेपद मिळवणारी महाराष्ट्राची राही सरनोबत ही यंदा ऑलिंपिक पदकावर नाव करेल अशी अपेक्षा आहे.
नेमबाजीत सौरभ चौधरी
पुरुषांच्या नेमबाजीत सौरभ चौधरी हा युवा खेळाडू पदकांच्या शर्यतीमधील दहा मीटर्स पिस्तूल विभागात हुकमी एक्का मानला जात आहे. आत्तापर्यंत जागतिक मालिकेत आठ सुवर्णपदकांबरोबरच त्याने युवा ऑलिम्पिक आशियाई क्रीडा स्पर्धा, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि आशियाई स्पर्धांमध्ये सोनेरी यश मिळविले आहे. संघातील वरिष्ठ खेळाडू संजीव रजपुत यांनी आत्तापर्यंत राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई स्पर्धा आणि जागतिक स्पर्धांमध्ये आठ सुवर्णपदकासह एक डझन पदकांची कमाई केली आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये तो कशी कामगिरी करतो याचीच उत्सुकता आहे. दिव्यांशुसिंग पन्वर आणि अभिषेक वर्मा हेही पदकांच्या शर्यती मधील खेळाडू मानले जात आहेत.
नीरजवर मोठी भिस्त
ॲथलेटिक्स हा पथकांची लयलूट करण्यासाठी असलेला हुकमी क्रीडाप्रकार मानला गेला आहे. आजपर्यंत या क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंना ऑलिंपिक पदकाने हुलकावणी दिलेली आहे. मात्र अपयशाची ही मालिका नीरज चोप्रा हा खंडित करू शकेल अशी अपेक्षा आहे. भालाफेकीत त्याने आशियाई क्रीडा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सोनेरी यश संपादन केले आहे. अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अजिंक्यपद पटकावित अपेक्षा उंचावल्या आहेत. गेल्या दीड वर्षातील त्याची कामगिरी रिओ ऑलिंपिकमधील ब्राॅंझपदकापेक्षा अधिक चांगली झाली आहे.
मेरी कोम पुन्हा चमकणार ?
मुष्टियुद्धामध्ये ऑलिंपिक ब्राॅंझपदक विजेती एम.सी. मेरी कोम ही पुन्हा पदकाची दावेदार मानली जात आहे. खेळाच्या दृष्टीने प्रौढत्वाकडे झुकलेल्या या खेळाडूची शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती ही अन्य खेळाडूंना लाजवणारी आहे. तिने आत्तापर्यंत सहा वेळा जगज्जेतेपद मिळविले आहे. भारताची पोलादी महिला आणि सुपरमॉम म्हणूनच तिची ख्याती आहे. खेळावरील निष्ठा, देशावरील निस्सीम भक्ती, आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटी आदी अनेक गुणांबाबत ती श्रेष्ठ महिला खेळाडू मानली जात आहे. कारकिर्दीतून निवृत्त होण्यापूर्वी आणखी एक ऑलिंपिक पदक आपल्या नावावर करावे अशीच तिची इच्छा आहे. मुष्टियुद्धामध्येच विकास कृष्णन याला गतवेळी पंचांच्या चुकीमुळे पदकापासून वंचित राहावे लागले होते. यंदा हे अपयश तो धुवून काढेल अशीच अपेक्षा आहे. त्याच्याबरोबरच अमित पंघाल हादेखील पदकाचा दावेदार आहे. पंचवीस वर्षांच्या या खेळाडूने गेल्या तीन वर्षांमध्ये अनेक ऑलिंपिक आणि जागतिक पदक विजेत्यांना पराभवाची धूळ चारली आहे.
कुस्तीमध्ये गतवेळी ब्रॉंझपदक मिळवणारी साक्षी मलिक हिला यंदा पात्रता पूर्ण करता आलेली नाही. तिची उणीव विनेश फोगट भरून काढेल असा अंदाज आहे. विनेशने दोन वेळा राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. यंदा तिने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सोनेरी कामगिरी करताना आपल्या सर्वच प्रतिस्पर्ध्यांवर एकतर्फी विजय मिळविले आहेत. अलीकडेच आंतरराष्ट्रीय खुल्या स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकून आपल्या श्रेष्ठत्वाची झलक दिली आहे. पुरुषांमध्ये बजरंग पुनिया याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. फ्रीस्टाईल विभागात त्याने २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. नुकत्याच झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत त्याने रुपेरी यश मिळविले आहे.
पी व्ही सिंधू ही यंदा सुवर्णपदकाचे स्वप्न साकार करील अशी अपेक्षा आहे.
रिओ येथे पाच वर्षांपूर्वी ऑलिंपिक रौप्यपदक मिळवणारी पी व्ही सिंधू ही यंदा सुवर्णपदकाचे स्वप्न साकार करील अशी अपेक्षा आहे. गतवेळी अंतिम सामन्यात कॅरोलिना मरिनविरुद्ध आघाडीवर असताना तिने पराभव पत्करला होता. तिची ही पारंपारिक प्रतिस्पर्धी खेळाडू यंदा दुखापतीमुळे सहभागी झालेली नाही ही सिंधूसाठी जमेची बाजू असणार आहे. गतवेळच्या जागतिक स्पर्धेत सिंधूने अजिंक्यपदावर नाव कोरले आहे. बॅडमिंटनमध्येच सात्विक साईराज रान्किरेड्डी व चिराग शेट्टी ही जोडी पदकाची दावेदार मानली जात आहे. या जोडीने थायलँड खुल्या स्पर्धेत अजिंक्यपद मिळविताना विश्वविजेत्या ली जूनहुई आणि लिऊ चेन यांच्यावर खळबळजनक विजय नोंदविला आहे.
वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू हिने जागतिक स्पर्धेतील सोनेरी यशामुळे ऑलिंपिकबाबत अपेक्षा निर्माण केल्या आहेत. तिने दोन वेळा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्येही सोनेरी कामगिरी केली आहे.
हॉकीमध्ये पदकाचा दुष्काळ संपवणार?
हॉकीमध्ये एकेकाळी निर्विवाद सत्ता गाजविणाऱ्या भारतीय संघास गेल्या ४१ वर्षांमध्ये ऑलिंपिक पदकावर नाव कोरता आलेले नाही. ऑलिपिंकच्या इतिहासात आठ सुवर्ण, एक रौप्य आणि दोन ब्राॅंझपदक अशी भारतीय संघाची कामगिरी झाली आहे. यंदा पुरुष गटात भारतीय संघ पदकाचा दुष्काळ संपवणार असे चित्र आहे. ग्रॅहॅम रीड या परदेशी प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली उतरलेल्या भारतीय संघाची तयारी खूप चांगली झाली आहे. मनप्रीत सिंग सारखा चतुरस्त्र कर्णधार आणि पी. आर. श्रीजेश याच्यासारखा श्रेष्ठ अनुभवी गोलरक्षक असलेल्या भारतीय संघाने गेल्या दोन वर्षात विविध परदेशी संघांविरुद्ध सातत्यपूर्ण विजय मिळवले आहेत. पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल करण्यातील दोष कमी करण्यात आणि अधिकाधिक फिल्ड गोल करण्याबाबत त्यांचे तंत्र सुधारले आहे. सांघिक समन्वय याबाबतही त्यांच्या खेळात खूप प्रगती झाली आहे.
एरवी अन्य जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये वर्चस्व गाजविणारे भारतीय खेळाडू ऑलिंपिकमध्ये मात्र आत्मविश्वास इच्छाशक्ती आणि मानसिक याच्या भावी पदक मिळविता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. यंदा ही उणीव ते कशी भरून काढणार याची उत्कंठा निर्माण झाली आहे.
— मिलिंद ढमढेरे