घरांची वाढती मागणी आणि व्याजाचे वाढते दर यामुळे घरांच्या किंमती वाढत आहेत. 

घरांच्या मागणीमध्ये अचानक झालेली वाढ ही अजून काही दिवस तरी कायम राहण्याची शक्यता आहे.  किंबहुना ही मागणी अजून ५% ते १०% नी वाढण्याची शक्यता आहे. महागाईमुळे घरासाठी लागणाऱ्या कच्या मालाच्या किंमती सुद्धा वाढल्या आहेत. त्यामुळेच प्रमुख ६ शहरातील बांधकाम व्यावसायिकांना सुद्धा घरांच्या किंमती वाढवायला लागणार आहेत. काहींनी तर प्रत्येक तिमाहीत घरांच्या किमतींमध्ये २% वाढ करायला सुरुवात केली आहे. ही वाढ अशीच चालू राहण्याची शक्यता आहे. कच्या मालाच्या वाढणाऱ्या किमतींबरोबरच जमिनीच्या किंमतीही वाढत आहेत. एवढं सगळं असून सुद्धा घरांच्या मागणीमध्ये वाढ होईल असे मत व्यक्त केले जात आहे. घरांच्या मागणीत अचानक वाढ कशी झाली हे अभ्यासणे गरजेचे आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे बांधकाम व्यावसायिकांना सध्या सुगीचे दिवस पाहायला मिळत आहेत. ते तसेच राहायला हवेत. 

 

गेल्या आर्थिक वर्षात घरांच्या मागणीत ३३% ते ३८% ने वाढ झाली आहे. कोविड पूर्वीसुद्धा घरांच्या मागणीत एवढी वाढ झाली नव्हती. २०१६ ते २१ या आर्थिक वर्षात सामान्य माणसाच्या खिशाला परवडतील अशा किंमतीत घरे मिळायची. पण आता घराच्या किंमती बघता स्वतःच्या मालकीच्या घरात राहण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहिलं तर कमी पैसे मोजावे लागतात. क्रिसिल रेटिंग एजेन्सीने केलेल्या सर्वेक्षणानुसार वाढते भांडवल, व्याजदर आणि स्टॅम्पड्युटी ही कारणे आहेत. या सर्वेक्षणानुसार प्रमुख ६ शहरांमध्ये कच्या मालाची साठ्याची स्थिती ही कोविड पूर्वीपेक्षा चांगली आहे. गेल्या दोन वर्षात कोविडमुळे सर्वच व्यवहार ठप्प होते. त्यामुळे विक्रीही मंदावली होती. आता हळू हळू कोविडचे प्रमाण कमी होत असलं तरी नवे प्रकल्प खूप कमी आहेत. त्यामुळे घरांच्या किंमतीत वाढ आणि मागणी जास्त असणं स्वाभाविक आहे.

आता नवीन प्रकल्प सुरु होणार आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या मागणीनुसार जो माल एवढे दिवस पडून होता त्याला मागणी वाढेल. नावाजलेले बांधकाम व्यावसायिक चांगल्या प्रतीचा माल वापरतात. त्यामुळे कच्या मालाच्या विक्रीतही वाढ होण्याची शक्यता आहे. या सगळ्यामुळे रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या व्यावसायिकांचा मार्केटमधील वाटा २४%-२५% वर जाईल. जो कोविडच्या आधी १८% वर होता. आर्थिक वर्ष २०२१मध्ये त्यांची विक्री १३% नी वाढली. तर एकूण या क्षेत्रातील विक्री २०२२ मध्ये २०% ते २५% नी वाढली. बांधकाम क्षेत्राच्या तुलनेत एका प्रस्थापित डेव्हलपरची विक्री ३५% ते ४०% ने वाढली. आकडेवारीच्या बाबतीत बोलायचं तर डेव्हलपरची बॅलन्सशीट आता चांगल्या स्थितीत दिसत आहे. साथीच्या सुरुवातीला ४०% वर असलेला डेट असेट प्रमाण आता २५% वर आले आहे.

जमिनीचे व्यवहार आणि मालमत्ता यांच्यातून सुद्धा त्यांना १३ हजार कोटींचा फायदा झाला आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. जे छोटे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची सुद्धा चांदी आहे. त्यांच्या डेट असेटचे प्रमाण ५०% पर्यंत आले आहे. जे साथीच्या सुरुवातीला ५५% ते ६०% पर्यंत होते. जे छोटे बांधकाम व्यावसायिक असतात त्यांना कच्चा माल घेण्यासाठी बाजारातून उचल घ्यावी लागते. त्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे एखादा प्रकल्प सुरु करायचा झाल्यास मोठ्या बांधकाम व्यावसायिकांबरोबर भागीदारी करावी लागते. यात त्यांचाच फायदा आहे. मोठ्या बांधकाम व्यावसायिकांबरोबर भागीदारी केल्यास छोट्या व्यवसायीकांचाही ब्रँड तयार व्हायला मदत होते.

Related posts

Leave a Comment