अवघे ७५ वयमान!

only-75

सतीश सिन्नरकर, संपादक

चिरतरूण श्री. सुभाष देसाई यांचे वर्णन करताना जे वरील शब्द योजिले आहेत ते अत्यंत सकारात्मक भावनेने लिहिले आहेत. या अंकाच्या निमित्ताने ज्यांच्याशी बोलणे झाले त्या सर्वांची पहिली प्रतिक्रिया म्हणजे, ‘काय म्हणता? देसाई साहेबांचे वय ७५ आहे? अहो, अजिबात वाटत नाही’ असे आश्चर्याचे उद्गार काढून मग ते कसे तत्पर आहेत, त्यांनी आपली तब्येत कशी मेन्टेन केली आहे आणि दररोज योग व व्यायाम केल्याशिवाय त्यांचा दिवस कसा पुरा होत नाही वगैरे चर्चा होत राहते. गेली ५० ते ६० वर्षे वैयक्तिक व सामाजिक जीवनात श्री. देसाई हे ज्या तडफेने अहोरात्र कार्यमग्न आहेत त्याकडे पाहताना असे वाटते की अजूनही त्यांना अनेक नव्या गोष्टी करायच्या आहेत, नवी आव्हाने पेलायची आहेत आणि यशाचे नवे टप्पे गाठायचे आहेत.

सदैव कार्यमग्न असणाऱ्या माणसांना थोडाही रिकामा वेळ अस्वस्थ करतो. मग जुन्या राहून गेलेल्या कामांची आठवण येते. फोनाफोनी होते आणि रिकाम्या वेळेचे सार्थक होते. एरवी करण्यासारखी अनेक कामे राहून गेलेली असतात आणि न केली तरी चालतील अशा अनेक कामांमध्ये आपला वेळ खर्ची पडत असतो. पण ही झाली सामान्यांची कथा! सुभाष देर्साइंसारख्या माणसांना आपल्या वेळेचे महत्त्व माहीत असते. आणि इतरांकडून कामे करून घेण्याचे कौशल्यही त्यांच्यापाशी असते. त्यामुळे प्रत्यक्ष स्वत: किंवा इतरांच्या माध्यमातून आवश्यक असलेली सगळी कामे मार्गी लावण्याचे तंत्र त्यांना साधते. गेली ५०-६० वर्षे याच तंत्राने त्यांचे सर्वांगीण कार्य चालू आहे.

राजकीय कामामध्ये बराच वेळ द्यावा लागत असला तरी देसाई यांचा मूळ ंिपड राजकीय नाही. घणाघाती राजकीय चर्चा चालू असेल तेथे जास्त वेळ घालवणे त्यांना रूचत नाही. अवघड राजकीय प्रश्नांना समयोचित उत्तर देण्यात त्यांचा हातखंडा असला तरी तो अनुभवांवर आधारित आलेल्या राजकीय कौशल्याचा भाग असतो. एरवी सामाजिक विषयांवर होणाऱ्या चर्चांमध्ये मात्र ते समरसून भाग घेतात, अनेक नवीन मुद्दे मांडतात व समोरच्याचे म्हणणे आपुलकीने ऐकून समजून घेतात. ‘समझाना और समझना यह निरंतर चलनेवाली प्रक्रिया है’ हे अटलबिहारी वाजपेयी यांचे वाक्य श्री. देसाई यांना तंतोतंत लागू पडते. अनेक विषयांची प्राथमिक माहिती देखील नसताना कालांतराने त्या विषयांची इथ्यंभूत माहिती ते वाचून, ऐकून आणि समजून घेतात व नंतर त्यावर अधिकारवाणीने बोलतात. रक्तपेढी, थायलेसेमिया, डायलेसिस ंिकवा जेनेरिक औषधे अशा विषयांवर ते ज्या अधिकारवाणीने बोलू शकतात व चर्चा करू शकतात त्याचे रहस्य हेच आहे. याचे खरे कारण म्हणजे राजकारणापेक्षा सामाजिक विषयांमध्ये श्री. देसाई यांना जास्त रस असतो.

अत्यंत आत्मीयतेने ते सामाजिक, शैक्षणिक व आरोग्याच्या विषयांमध्ये लक्ष घालतात. हाच त्यांचा स्वभाव अनेक मराठी व अमराठी लोकांना भावतो आणि ते सर्व देर्साइंच्या प्रेमात पडतात.

नुकतीच त्यांची विधान परिषदेवर निवड झाली. आता सहा वर्षे तरी त्यांना स्वत:साठी निवडणुकीची धावपळ करावी लागणार नसली तरी आपल्या पक्षाचे एक निष्ठावंत सैनिक या नात्याने मुंबई व महाराष्ट्रभर दौरे करून आपले कर्तव्य पूरे करण्यात ते आघाडीवर राहतील यांत शंका नाही. वयाचा, तब्येतीचा ंिकवा वेळेचा विचार करीत न बसता ठरविलेले इप्सित साध्य करण्याकरता लागणारे कष्ट करण्यास ते तत्पर राहतील.

गेले दीड वर्ष महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री म्हणून श्री. देसाई सत्तेवर आहेत. यासाठी महाराष्ट्र राज्यात त्यांचे अनेक दौरे झाले. अमेरिका, जर्मनी, जपान अशा अनेक परदेशांमध्ये देखिल त्यांचे प्रवास झाले. मुंबईत भव्य प्रमाणात साजऱ्या झालेल्या ‘मेक इन इंडिया’ प्रदर्शनाच्या आयोजनामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. या दरम्यान महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा दर्शविणारे तब्बल २६५०जे करार झाले त्यामागेही इतरांबरोबर त्यांचेही परिश्रम होते. महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती व त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी याचे महत्त्व श्री. देसाई यांना चांगलेच उमगले आहे. याच विचाराची कास धरून ‘महानगरी वार्ताहर’च्या या विशेषांकात आम्ही ‘बेरोजगारी व त्यावरील उपाय’ या महत्त्वपूर्ण विषयाचा समोवश केला आहे. श्री. देसाई व त्यांचे मित्र-सहकारी यांना आमचा हा छोटा प्रयत्न आवडेल असे वाटते. यामध्ये महाराष्ट्रातील बेरोजगारी, त्याची व्याप्ती, त्यामागील कारणे – विशेषत: शैक्षणिक धोरणे, शहरी व ग्रामीण भागांचे विभिन्न प्रश्न, सरकारी योजना, इत्यादींचा ऊहापोह आहे. हे सर्व तयार करताना योग्य दृष्टी असलेले राजकीय नेतृत्व आणि अमलात आणू शकेल असे मनुष्यबळ यांचा विचार मनात येतो. सुभाष देसाई आणि शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते यांना हे एक मोठे आव्हान आहे. समृद्ध- आणि प्रगतिशील महाराष्ट्र निर्माण करण्याची ही पहिली पायरी आहे. ही गोष्ट नेतृत्त्वाने आणि अनुयायांनी समजून घेतली तर आणि तरच बेरोजगारीची ही भीषण समस्या मार्गी लागेल असे वाटते. सुदैवाने आज श्री. देसाई व शिवसेना हा पक्ष राज्यात व केन्द्रात सत्तेवर आहे. असंख्य क्रियाशील कार्यकर्त्यांमुळे त्यांना समाजात मानाचे स्थान आहे. त्यांच्या शब्दाला मान आहे. शेती, उद्योजकता आणि रोजगारनिर्मिती याला सर्वोच्च अग्रक्रम देण्याचा हा काळ आहे. एक आव्हान पेलण्याची ही सुसंधी आहे. एक जबरदस्त चळवळ पूर्ण राज्यभर चालविण्याची काळाची ही हाक आहे. निवडणुका येतील आणि जातील पण हे कार्य जर यशस्वी झाले तर मराठी माणूस आयुष्यभर विसरणार नाही. मुंबईत जे अनेक राज्यांचे भिकारी दिसतात त्यामध्ये पंजाब ंिकवा केरळचा माणूस शोधूनही सापडत नाही. हेच मराठी माणसाविषयी अभिमानाने सांगण्याचे भाग्य शिवसेनेने मिळवावे असे वाटते.

श्री. सुभाष देसाई यांच्या ७५ व्या वाढदिवशी आणखीही काही योग आहेत. त्यांच्या वैयक्तिक जीवनातले हे वर्ष म्हणजे त्यांच्या विवाहाचे ५० वे वर्ष आहे. हा एक दुग्धशर्करा योगच आहे. शिवाय याच वर्षी शिवसेनेच्या स्थापनेलाही ५० वर्षे पूर्ण होत आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात मानाचे स्थान प्राप्त करणाऱ्या शिवसेनेबद्दल सर्वसामान्य मराठी माणसास जी आपुलकी व विश्वास वाटतो त्यामागे स्व. बाळासाहेबांची व त्यांच्या काळातील धुरंधर नेते व कार्यकर्ते यांची तपश्चर्या  आहे. हा विश्वास सतत वृंिद्ध-गत होत त्याचे रूपांतर श्रद्ध-ा व पुढे निष्ठेमध्ये होण्यासाठी आताच्या पिढीला श्री. देसाई यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली जिवापाड मेहनत करणे आवश्यक आहे.

आता लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. सर्व माध्यमांनी असा प्रचार करून ठेवला आहे की मुंबई शिवसेनेची मुख्य ताकद असून तिथे सत्ता टिकवणे हे यावेळचे सर्वात मोठे आव्हान शिवसेनेपुढे आहे. शिवसेनेची सारी मदार मराठी मतांवर असली तरी हिन्दुत्वाच्या व्यापक मुद्यावर अनेक अमराठी मतदार शिवसेनेस मतं देतात. या दोन्ही गोष्टींची सांगड घातल्यास शिवसेनेस ही निवडणूक जड जाणार नाही. मुंबईतील विरोधी पक्षांमध्ये विशेष दम नाही. तरी दिल्लीप्रमाणे सर्व विरोधक एकत्र आले तर काही ठिकाणी त्याचा प्रभाव बनू शकतो. या सर्व गोष्टींचा विचार केला तरी एक गोष्ट निश्चित आहे की मुंबईतील मराठी माणूस ठामपणे सेनेच्या बरोबर आहे. त्याचा हा विश्वास डळमळणार नाही याची काळजी घेत पुढे वाटचाल केल्यास यश निश्चित आहे.

आज मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर बनले असून देश विदेशातील सर्व प्रकारचे लोक येथे आपापला प्रभाव राखून आहेत. अशावेळेस मराठी भाषा, मराठी सांस्कृतिक परंपरा, मराठी वेशभूषा, मराठी खाद्यपदार्थ आणि मराठी कलाक्षेत्र यांनीही आपला विस्तार सर्वापर्यंत प्रभावीपणे पोहोचवला पाहिजे. हे काम सर्व जनता मिळूनच करू शकते. काही मूठभर नेते वा कार्यकर्ते हे करू शकणार नाहीत. पण शिवसेनेने या प्रत्येक बाबतीत पुढाकार घेऊन राजकीय लाभाचा विचार न करता सकारात्मक कार्यक्रम प्रभावीपणे राबविले तर सर्व मराठी जनांचे स्वप्न साकार व्हायला वेळ लागणार नाही.

श्री. सुभाष देसाई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी महानगरी वार्ताहरचा विशेषांक आम्ही प्रसिद्ध- करीत आलो आहोत. या अंकामध्ये महाराष्ट्रासंबंधी विविध विषयांवर केलेले लेखन असते. याही अंकात रोजगार व शिक्षण या विषयांवर सविस्तर लेखन व माहिती देण्यात आली आहे. ती वाचकांना रूचेल असा विश्वास आहे. आमचे सहकारी प्रकाश कामत यांनी घेतलेली श्री. सुभाष देसाई यांची प्रदीर्घ मुलाखत हे या अंकाचे वैशिष्ट्य असून यामध्ये श्री. देसाई यांनी मोकळेपणी आपले विचार व्यक्त केले आहेत.

श्री. देसाई व सौ. देसाई यांचे लग्नाच्या ५० व्या वर्षानिमित्त हार्दीक अभिनंदन! या अंकात अनेक व्यक्तींनी जाहिरातरूपाने श्री. देसाई यांचे अभीष्टंिचतन करून आम्हाला जे सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचेही आम्ही Fणी आहोत. महानगरी वार्ताहरच्या वाचकांना हा अंक संग्रही ठेवावासा वाटेल अशी आशा आहे.

धन्यवाद!

Related posts

Leave a Comment