शुभ संकल्पाचा सण गुढी पाडवा

gudi-padwa-auspicious-time

गुढी पाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक यशदायी, मंगल मुहूर्त आहे. ब्रह्मपुराणानुसार महाप्रलयानंतर भगवान ब्रह्माजींनी या दिवशी जगाची निर्मिती केली. या दिवसापासून पृथ्वीवरच्या खऱ्या जीवनचक्राला सुरुवात झाली, अशी आख्यायिका आहे.

कोणताही नवीन व्यवसाय सुरू करणे, घर, बंगला खरेदी करणे, नवीन व्यवसायात गुंतवणूक करणे, जमीन, प्लॉट खरेदी इतकेच काय, पण वाहन खरेदी, सोने खरेदी करण्यासाठी हा दिवस उत्तम व आदर्श मानला जातो.

ज्या वास्तुत ब्रह्मतत्त्व बाधित झाले असेल, दूषित झाले आहे त्या वास्तूमध्ये गुढी पाडव्याला दारात गुढी उभारल्यामुळे ब्रह्मतत्त्वदोष काही प्रमाणात कमी होतो.

शास्त्रोक्त गुढी कशी उभारावी :

ढी पाडव्याला घराची अंर्तबाह्य स्वच्छता करावी. घर रंगवून घेतल्यास उत्तम. पाण्यात समुद्री मीठ टाकून फरशी पुसून घ्यावी. आंब्याच्या डहाळ्यांचे व फुलांचे तोरण मुख्य दारावर लावावे. दाराच्या समोर सुबक व आकाराने मोठी शुभ चिन्हांनीयुक्त रांगोळी काढावी. दाराच्या उजव्या बाजूस छोटा लाकडी पाट मांडावा आणि पाटाभोवती सुबक रांगोळी काढावी. आपल्या घराच्या उंचीपेक्षा जास्त उंचीचा एक लाकडी बांबू घ्यावा. बांबू उंच घेतल्यामुळे सर्वांच्या नजरेला आपली गुढी पडेल. तो बांबू पाटावर ठेवावा. केशरी किंवा किरमिजी तांबड्या रंगाचे एक उंची वस्त्र बांबूच्या वरच्या टोकाला बांधावे. त्याच्यावर एक चांदीचा किंवा ताब्याचा गडू पालथा घालावा. गुढीला पाना-फुलांचा हार घालावा. एक कडूलिंबाची डहाळी बांधावी. साखरेची अलंकाराची छाप असलेली माळ बांधावी. घरातील सर्वांनी नवीन वस्त्र परिधान करावे.

गुढीच्या पूजनाने म्हणजे सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाच्या पूजनाने दिवसाची सुरुवात करावी. पूजा करताना ब्रह्मध्वज नमस्तेतु सर्वाभीष्टफलप्रद । प्राप्तेस्मिन् संवत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू । असा ध्वजमंत्र म्हणावा. आरोग्य, संपत्ती, संततीसह भरभराट व्हावी, अशी प्रार्थना करावी. प्रसाद म्हणून गूळ व कडूलिंबाची पाने एकत्रित करून सर्वांना वाटावीत. आयुर्वेदानुसार गूळ व कडूलिंबाची पाने पोटाचे आरोग्य व्यवस्थित ठेवतात. रक्त शुद्ध करून पोटाची रोग प्रतिकारकशक्ती वाढवितात. अध्यात्माच्या दृष्टीने गूळ हे आनंदाचे तर कडूलिंब हे दु:खाचे प्रतीक आहे. गूळ व कडूलिंबाचा एकत्रित प्रसाद हा आयुष्य म्हणजे चांगले व वाईट, आनंद व दु:ख, यश व अपयश यांचे मिश्रण असल्याचे प्रतीक आहे. गूळ हा कृतयुग व त्रेतायुगाचे प्रतीक आहे. जे शुद्धता, भरभराट व शांततेचे द्योतक आहे. कडूलिंब हे द्वापारयुग कलीयुगाचे प्रतीक आहे. जे अशुद्ध-ता, अनागोंदी व दु:खाचे द्योतक आहे. सूर्यास्तावेळी पुरणपोळीचा किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून गुढी उतरावी. तो प्रसाद सर्वांना वाटावा.

या दिवसाला युद्धाचा आणि जय पराजयाचा वास आहे. रामाने रावणाचा बिमोड करून अयोध्येत प्रवेश केला तो हा दिवस. अयोध्यावासीयांनी विजयोत्सवाच्या दिवसाचे प्रतीक म्हणून गुढी उभारून रामराज्याचे स्वागत केले. रामराज्य म्हणजे उज्ज्वल भरभराटीचा, सत्याचा काळ. शालिवाहन राजाने आपला शक निर्माण केला तो याच दिवसापासून. महाराष्ट्रात व दक्षिण भारतात त्याच्या नावानं सुरू होणाऱ्या शकाच्या वर्षांरंभाच्या दिवशी अभिमानाची गोष्ट म्हणून गुढ्या उभारल्या जातात. आज रोजी खरनाम संवत्सर प्रारंभ होत आहे. सुष्ट शक्तीचा दुष्ट शक्तीवर विजय होतो हा विश्वास लोक गुढी उभारून व्यक्त करतात.

गुढी पाडव्याची जय्यत तयारी

अवघ्या चार दिवसांवर आलेल्या मराठी नववर्षाच्या स्वागताचा सण म्हणजे गुढी पाडवा. पाडव्याच्या दिवशी अंगणात उंच गुढी उभारण्याची चढाओढ आता इको फ्रेंडलीच्या नावाखाली पाच इंचांपर्यंत पोहचली आहे. रांगोळीच्या सजावटीने तोऱ्यात डुलणारी साडी, चाफ्यांची माळ, कडुलिंबाची हिरवीगार डहाळी आणि त्यासोबत साखरेची माळ, गढू अशा वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. मेस काठी, वस्त्र, साखरेच्या माळा यासारख्या वस्तूंनी मुंबई शहरातील मुख्य बाजारपेठांसोबत इतरत्रही या वस्तूंचे स्टॉल उभारलेले दिसत आहेत.

गुढी पाडव्याच्या दिवशी अंगणात आकाशाला गवसणी घालणारी गुढी जितकी मोठी तितके लौकिक व यश प्राप्त होते, अशी थोरा-मोठ्यांची समजूत असायची; मात्र कालांतराने हे चित्र बदलत असल्याचे दिसते. गुढी पाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त. या पार्श्वभूमीवर घरात नवीन वस्तूंची खरेदी करणे हे शुभ मानले जाते. शहरात अनेक वस्तूंचा बाजार या मूहूर्तावर भरला आहे.

गुढीसाठी मेस काठ्यांचा बाजार

शहरातील मध्यवस्तीतील चौकांसह प्रमुख बाजारपेठांत गुढीच्या काठ्यांसाठी झुंबड उडत आहे. १०० रुपयांपासून ते ४००, ४५० रुपयांपर्यंत वेगवेगळ्या उंचीच्या मेसकाठ्या विक्रीसाठी सज्ज झाल्या आहेत.

फुलांचा बाजार

गुढी पाडव्याला फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. बाजारात अनेकविध प्रकारची फुले आत्तापासूनच यायला सुरुवात झाली आहे. शहरातील फुलांचा मोठा बाजार दादर येथे भरला जातो. याशिवाय उपनगरांतही फुलांचा बाजार सजला आहे. फुले खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

साखरेच्या माळा

रंगबेरंगी साखरेच्या माळांनीही बाजारपेठा सजल्या आहेत. लहान मुलांच्या गुढीवरील आकर्षण असणाऱ्या साखरेच्या माळा सूर्य, चंद्र, वाघ अशा अनेक आकारांत बाजारात उपलब्ध आहेत. साधारण ५० रुपयांपासून विविध आकारांत या माळांची विक्री होत आहे.

इलेक्ट्रॉनिक वस्तूचा बाजार

शहरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या शोरूम्सही पाडव्यासाठी सज्ज झाल्या आहेत. विविध आकर्षक योजना देऊन ग्राहकांना वस्तूंची विक्री केली जाते. टी.व्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, एलसीडी, एलइडी, मायक्रोवेव्ह ओव्हन, इंडक्शन कूकर अशा अनेक  लहान- मोठ्या प्रकारच्या इलेक्टॉनिक वस्तू पाडव्याच्या मुहूर्तावर  खरेदी केल्या जात असल्याने आकर्षक ऑफर्सनी बाजार सज्ज झाला आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीमध्ये यंदा फोरजी मोबाईलला अधिक मागणी असल्याचे दिसून येते.

वाहन खरेदी

पाडव्याच्या मुहूर्तावर चारचाकी व दुचाकी गाड्यांच्या विविध कंपन्यांचे स्टॉल शहरात अनेक ठिकाणी उभारले आहेत. शो रूम्स गाड्यांच्या विक्रीसाठी सज्ज आहेत. पाडव्याच्या मुहूर्तावर अनेक कंपन्यांनी आपल्या नवीन गाड्याही लाँच केल्या आहेत. यामुळे यंदा वाहन खरेदी मोठ्या प्रमाणावर होणार असे दिसते आहे.

ऑनलाईन शॉपिंग

सध्या तरुणाईला वेड लावलंय ते ऑनलाईन शॉपिंगने. हात रूमालापासून ते इलेक्ट्रॉनिक वस्तूपर्यंतची सर्व खरेदी घरबसल्या करता येते. पाडव्याच्या मुहूर्तावर ऑनलाईन शॉपिंग व्यवसायही चांगलाच तेजीत आहे.

मुहूर्तावर सोने खरेदी

पाडव्याचा सण असल्याने सराफी पेढय़ांमध्ये सोने खरेदीला उधाण आले आहे. या सणाला प्रामुख्याने सोने खरेदी केली जाते. यामुळे महिलावर्गाचा सोन्याचे दागिने खरेदीकडे कल आहे. गुंतवणूकदारांचा सोन्याचे बिस्कीट व तत्सम वस्तू खरेदीकडे ओढा आहे. तर लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर दागदागिने खरेदी करण्यात येत आहेत.

वस्त्र प्रावरणांची जोरदार खरेदी

वस्त्र प्रावरणांची विक्री केंद्रेही हाऊसफुल्ल गर्दीने फुलून गेली आहेत. मुंबई शहर व परिसरातील नागरिक वस्त्र प्रावरणांच्या खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात दाखल होत असून सूट, शर्ट, शेरवानी, कुर्ता-पायजमा तसेच साडय़ा आदींची मोठय़ा प्रमाणात खरेदी केली जात आहे. मुंबईतील बहुतेक कपड्यांची दुकाने हाऊसफुल्ल झाली आहेत.

रियल इस्टेटची धूम

पाडव्याला स्वतःच्या घरकुलाचे स्वप्न साकारण्यासाठी फ्लॅट तसेच प्लॉट खरेदीकडील ओघ मोठा आहे. काहींना मंगळवारी बुकिंग किंवा खरेदी जमली नसली तरीही चौकशीसारखे पूर्वतयारीचे सोपस्कार अनेकजण पार पाडत आहेत.

सध्या रियल इस्टेट क्षेत्रामध्ये काही प्रमाणात मंदीचे सावट आहे. दरम्यान, पाडव्याचा मुहूर्त बांधकाम व्यावसायिकांना लाभदायक ठरेल असे चित्र पाहावयास मिळत आहे.

Related posts

Leave a Comment