संन्यासी मुख्यमंत्री

Monk-Chief-Minister

– सतीश  सिन्नरकर, संपादक

२०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतरच्या प्रत्येक निवडणुकीत वृत्त माध्यमांनी खोलवर लक्ष घातले. बहुतेकजण ‘मोदींच्या पराभवाची ंिकवा नामुष्कीची जणु वाट पहात होते. दिल्ली व बिहारने तशी संधी त्यांना मिळाली देखिल व त्या त्या वेळेस मोदींना झोडपण्यामध्ये त्यांनी कोणतीही कसूर ठेवली नाही. अशाच अपेक्षेने गेल्या महिन्यात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालांकडे मीडियाचे लक्ष होते. पण निकालाच्या दिवशी सरसावून बसलेल्या सर्व पत्रकारांची पूर्ण निराशा झाली. मतदारांनी भाजपला एवढे भरभरून यश दिले की तीन चतुर्थांश जागा ंिजकून भाजपला निर्विवाद सत्ता मिळाली. पाचपैकी चार राज्यात सत्ता स्थापून भाजपने विरोधकांची बोलती बंद केली. यानंतर युपीचा मुख्यमंत्री नेमताना मोदींनी जो झटका दिला त्यातून बरेच जण अजून सावरलेले नाहीत. ‘योगी आदित्यनाथ सारख्या वादग्रस्त व्यक्तिमत्त्वास पुढे केल्याने केवळ विरोधकच नव्हे तर अनेक भाजपवासी देखील आश्चर्यचकित झाले.

हिन्दु मुस्लिम विषय असो, राममंदिरचा मुद्दा असो ंिकवा गोरक्षेचा प्रश्न असो, त्यावर लोकसभेत ंिकवा बाहेर आपली मते रोखठोक भाषेत मांडणारा भगव्या परिवेशातील हा माणूस धर्मनिरपेक्षता व असहिष्णुता यांचा सतत जप करणारे पक्ष, वृत्तपत्रे व संस्था यांना पटणे शक्यच नव्हते. त्यामुळे काही तासातच योगी आदित्यनाथ यांची जुनी वादग्रस्त विधाने, मुलाखती समाजमाध्यमांवर झळकू लागली. चॅनल्सवर चर्चेची गुऱ्हाळे सुरू झाली. मुसलमानांना भडकवणे सुरू झाले. प्रदेशाच्या विकासाची भाषा बोलण्याऐवजी राममंदिर, गोहत्या, समान नागरी कायदा यांचेच उल्लेख ठळकपणे होऊ लागले.

उत्तर प्रदेश या देशातील सर्वात मोठ्या राज्यातील जनमानस नेहमीच महत्त्वाचे मानले जाते. येथील दंगली, जातिवाद, आक्रमक मुस्लिम समाज, आर्थिक मागासलेपण आणि विशिष्ट जातींच्या जोरावर चालणारे राजकारण यांची चर्चा देशभर अखंडपणे चालू असते. ‘योगींना मुख्यमंत्री पदावर बसविल्याने या सर्व मुद्यांवर नव्या जोमाने वाद झडत आहेत. वास्तविक जातीपातींचा प्रभाव कमी करून मतदान घडवून आणण्याचा भाजपचा प्रयत्न महत्त्वाचा होता. त्यासाठी जी रणनीती भाजपने अवलंबली त्याची चर्चा होणे गरजेचे होते. सुशिक्षित मुस्लीम महिलांनी भाजपला मतदान का केले याचा उहापोह होणे व त्यातून मुस्लिम समाजात आवश्यक सुधारणांची चर्चा होणे जास्त उपयोगी आहे.

पण भगव्या वस्त्रातील मुख्यमंत्री, रा. स्व. संघाचा ‘तथाकथित हस्तक्षेप, कत्तलखाने बंद झाले तर निर्माण होणारी बेकारी या मुद्यांवरच पत्रकार आपली लेखणी झिजवत बसले आहेत. मोदी व त्यांच्या टीमने विकासाच्या एकमेव अजेंड्यावर अखंडपणे काम केल्याने आणि सर्जिकल स्ट्राइक व नोटाबंदीसारखे निर्णय अमलात आणल्याने त्यांची जी प्रतिमा जनमानसात तयार झाली आहे त्यामुळे जनतेच्या मतांची मोहोर उत्तरप्रदेशमध्ये उमटली. हा मनुष्यच निर्णय घेऊ शकतो व ते अमलातही आणू शकतो असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे. मग ते शहरी असो वा ग्रामीण! हे सत्य मनोमन माहीत असल्याने २०१९ च्या निवडणुकीचा निकाल सर्व विरोधी पक्षांनी आजच कबूल केला असून उमर अब्दुल्लाने तो फक्त बोलून दाखविला इतकेच.

योगी आदित्यनाथ हेही जननेते आहेत, मते खेचणारे आहेत, उत्तम वक्ते आहेत आणि हिन्दू मतांचे ध्रुवीकरण करण्यात यशस्वी ठरले आहेत. २० वर्षे खासदार या नात्याने त्यांना सर्व यंत्रणांचा अनुभव आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची धुरा ते यशस्वीपणे सांभाळू शकतात. त्यांनी मोदींची कार्यशैली राबवावी पण उमा भारतींसारख्या चुका होऊ देऊ नयेत व विरोधकांच्या हातात आयते कोलीत देऊ नये हीच सदिच्छा !

Related posts

Leave a Comment