आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार

the-architect-of-your-own-life

भारत हा एक विविधतापूर्ण देश आहे. त्याच्या अनेक समस्या आहेत. बेकारी ही त्यातील एक आहे. भारतातल्या कोणत्याही समस्येची सर्व प्रांतांसाठी सरसकट समान मांडणी करणे वा तिची सर्वत्र एकाच पद्ध-तीने उकल वा निराकरण करणे शक्य नाही. बेकारीच्या समस्येलाही अनेक पैलू आहेत. तिचे विश्लेषण वेगवेगळ्या पद्ध-तीने होऊ  शकते.  तसेच तिचे निराकरण करण्याचे उपायही वेगवेगळ्या प्रभागांसाठी वेगवेगळे असू शकतात. भारतात जसे केरळसारखे शिक्षणाच्या दृष्टीने अग्रेसर राज्य आहे तसेच काश्मीरसारखे  सर्वात अप्रगत राज्यही आहे. काश्मीरच्या बाबतीत पर्यटन विकास हे बेकारी निराकरणाचे उत्तम साधन होऊ शकते. मग भले तिथे शिक्षण कमी असले तरी. पण तो उपाय केरळच्या बाबतीत जसाच्या तसा लागू करता येत नाही. अशिक्षित काश्मीरी तरूण शिकाऱ्यावर उभा राहील तसा सुशिक्षित केरळी तरूण केरळ बॅकवॉटरमध्ये होडी वल्हवणार नाही.  तशा स्वरूपाचा रोजगार उपलब्ध असूनही तो करणार नाही. कारण शिक्षणाने त्याच्या जाणीवा विस्तृत केलेल्या असतात.  पर्यटनाच्या क्षेत्रात रोजगार मोठ्या प्रमाणात असला तरी त्यातून मिळणारे उत्पन्न उच्चशिक्षित केरळी माणसाच्या आकांक्षांना पुरे पडणारे नाही. त्यामुळे तो सुखासीन नोकरीसाठी महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यांकडे धाव घेतो.

दुसरीकडे  महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे. देशभरातून रोजगारासाठी लोक येथे येतात. त्यांना कामही मिळते. याचा अर्थ असा नव्हे की महाराष्ट्रात  बेकारीच नाही. येथील स्थानिकांत भरपूर बेकारी आहे. त्याचे कारण रोजगाराचा अभाव हे नसून मानसिकता हे आहे.  येथील स्थानिक अंगमेहनतीची कामे करायला तयार नसतात.  कामे उपलब्ध असून, समाजात बेकारी असूनही ती  करायला माणसे मिळत नाहीत. मग परप्रांतीय येऊन ती अंगकष्टांची कामे  आनंदाने करतात. कारण त्यांच्या प्रदेशात  तीही उपलब्ध नसतात. त्यातून भूमीपुत्र विरूद्ध- परप्रांतीय असा राजकीय संघर्ष उभा राहतो.

हीच गोष्ट गुजरातमधील कडीया या समाजाच्या बाबतीत झाली आहे. त्यांचा व्यवसाय गवंडीकाम हा आहे. गुजरात हे देशातील वेगाने औद्योगिक प्रगती करणारे राज्य आहे. तरी तेथील कडीया हा बांधकाम व्यावसायिक समाज रोजगाराच्या शोधासाठी अन्य राज्यांची वाट धरतो. गुजरातमध्येही बांधकाम व्यवसाय जोरात सुरू आहे. त्यांना गुजरातेत काम उपलब्ध आहे. पण महाराष्ट्र, मुंबई परिसराकडे धाव घेतो कारण इथे जास्त मजुरी मिळते.  स्थानिक कामे नाकारून तो हालअपेष्टा सोसून तो विस्थापित होतो. या विस्थापनामुळे गुजरातमध्ये बांधकाम  क्षेत्रात कुशल कामगारांची जी पोकळी निर्माण होते ती भरून काढायला आंध्रातील कामाठी समाजाचे लोक गुजरातला स्थलांतर करतात. म्हणजे कडीया समाज गुजरातमधून बेकारीमुळे स्थलांतर करतो आहे  असे नव्हे. तिथे काम आहे. ते करायला बाहेरून लोक येताहेत. स्थानिक मात्र अन्य राज्यांत अधिक मजुरीसाठी जातात. अशी विचित्र परिस्थितीही असू शकते.

अजून एका उदाहरणाने हा मुद्दा जास्त स्पष्ट होईल. नुकतेच मुंबई शहरात रिक्षा परवाने देण्यासाठी अर्ज मागवण्यात आले. त्यात परप्रांतीयांना जास्त परवाने मिळाल्याचे उघड झाले. यामागचे कारण शोधताना लक्षात आले की मराठी लोकांनी फारसे अर्जच केले नव्हते. मराठी समाजात शिक्षणाचे प्रमाण आणि जीवनमान इतके उंचावले आहे की  त्यांना रिक्षा परवाने मिळवण्यात फारसे स्वारस्य उरलेले नाही. हेच तरूण  चांगल्या जॉबसाठी अर्जविनंत्या करतात. हातपाय आपटतात. हा सर्वत्र आढळणारा घटक आहे. जेव्हा शिक्षणाचे प्रमाण वाढते तेव्हा सुशिक्षित तरूणांच्या अपेक्षा वाढतात. ते अंगकष्टाची कामे करू इच्छित नाहीत. त्यांच्यासाठी पारंपरिक स्थानिक रोजगार उपलब्ध असतात पण ते नाकारून ते इतरत्र जातात. तिथे बेकारी दिसते. स्थानिक पातळीवर कामाला माणसे मिळत नाहीत असे चित्र निर्माण होते. पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे ऊसपट्ट्यात ऊसतोडणीला स्थानिक बेकार तयार नसतात. ते मजूर मराठवाड्यातून आणावे लागतात. प. महाराष्ट्रातले मजूर ऊसतोडणीसारख्या किचकट कामाला नकार देतात. वास्तविक ते बेकार असतात. पण ऊस तोडणीचे काम करायची त्यांची तयारी नसते. हेच तरूण मुंबई-पुण्यात येऊन इथली बेकारी वाढवतात.

तेव्हा बेकारीची समस्या ही दिसते तितकी साधी नाही. एखाद्या प्रांतातील बेकारीच्या समस्येचे सरधोपटपणे विश्लेषण करणे शक्य नाही. त्यातून भाबडेपणाने काही अनुमान काढणे चुकीचे ठरेल. पण एवढे मात्र निश्चितपणे म्हणता येईल की शहरी भागापेक्षा बेरोजगारीचे प्रमाण  ग्रामीण भारतात जास्त आहे. कारण भारत हा खेड्यांचा देश आहे. भारतातील ७०  % लोकसंख्या आजही खेड्यांत राहते. २००९-१० साली  राष्ट्रीय  ग्रामीण बेकारीचा दर ९.७ टक्के होता. म्हणजे एकूण बेकारीच्या दराच्या ०.३ % जास्त होता. याचा अर्थ शहरांपेक्षा ग्रामीण भागात बेकारीची समस्या जास्त आहे.

ग्रामीण भागातील बेकारी ही भारतापुढील ज्वलंत समस्या आहे. तिचे निराकरण करण्यासाठी सरकार अनेक पावलेही उचलत आहे पण तिचे स्वरूप पाहता फक्त सरकार तिचा नायनाट करू शकणार नाही. बेरोजगारीची स्थिती पालटणे ही एकट्या सरकारची जबाबदारी होऊ शकत नाही. त्यासाठी समाजातही उद्योजकता वाढीला लागली पाहिजे. जेव्हा एक माणूस नोकरीला लागतो तेव्हा तो एकटाच रोजगार मिळवतो. जेव्हा एक व्यक्ती व्यवसाय सुरू करते तेव्हा तिच्यात अनेकांना रोजगार  देण्याची शक्यता असते. नोकरी हा एका पिढीचा तर व्यवसाय हा येणाऱ्या अनेक पिढ्यांचा रोजगार असू शकतो. तेव्हा तरूणांनी उद्योजकतेची कास धरली पाहिजे.

अलीकडे भारत सरकारने स्कील डेव्हलपमेंट, स्टार्ट अप इंडीया, सीड कॅपिटल ( सिडबीमार्फत बीजभांडवल देणे), सामूहिक रोजगारांसाठी क्लस्टर डेव्हलपमेंट अशा अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्या योजनांचा लाभ उठवून तरूणांनी पारंपरिक नोकरीची मानसिकता सोडून स्वयंरोजगाराकडे वळले पाहिजे.

शहरी-ग्रामीण वगैरे भेद कृत्रिम आहेत. बेकारीच्या समस्येबाबत तर तिचे विभाजन फक्त या दोन कप्प्यांत करता येणार नाही. मूळ उपाय आहे. उद्योजकता विकास आणि स्वयंप्रेरणा ! ज्याच्याजवळ ती आहे तो अगदी ग्रामीण भागातही स्वतःपुरता रोजगार निर्माण करू शकतो. ग्रामीण भागात बरेच जण कुल्फी विकणे, प्लास्टिकच्या घागरी विकणे, बेकरी प्रॉडक्टस् विकणे, रेशीम लागवड, मधुमक्षिका- कुक्कुटपालन वगैरे उद्योग करताना दिसतात. ग्रामीण भागातील काही स्त्रिया जर्सी गायी, जाफराबादी म्हशी घेऊन दूध उत्पादन करताना दिसतात. हा त्यांनी आपापल्या परीने बेकारीच्या समस्येवर शोधलेला उपायच असतो. याविरुद्ध- शहरात शारीरिक कष्टाची कामे नाकारणारे, ऑफिसस्टाफच्या कामांचाच आग्रह धरणारे लोक दिसतात. त्यांच्या बेकारीची समस्या कुणीच सोडवू शकणार नाही. शहरांमध्ये एक ऐदी लोकांचा वर्गही दिसतो. काही जण बायकोच्या जीवावर बसून खातात. काही कोणताच कामधंदा न करता आळशीपणाने आयुष्य घालवतात. अशा लोकांना साक्षात ब्रह्मदेवही काही मदत करू शकणार नाही. मुंबई शहरात साई निर्माल्य विसर्जन सेवा नावाची एक कंपनी आहे. घरा-घरांत देवाला फुले वाहिली जातात. त्यांचे निर्माल्य पायदळी जाऊ नये,ते पाण्यात विसर्जित करावे अशी भावना असते. संजीव सैद नावाचा एमबीए तरूण बोरिवली परिसरात दीड हजार घरांना ही सेवा सशुल्करित्या पुरवतो. त्यामुळे ग्राहकांचाही निर्माल्य विसर्जनाचा त्रास वाचतो. तो निर्माल्य गोळा करतो व तिचे खत करतो. त्याच्या प्रयत्नांचे मोल जाणून महापालिकेने त्याला खत बनवण्यासाठी एक जागाही दिली आहे. त्यातून त्याने स्वतःसाठी तर रोजगार शोधलाच शिवाय तो चार जणांना रोजगार पुरवतो. अशी कल्पकता दाखवली तर बेकारीची समस्याच उरणार नाही. जर तुम्ही एक पाऊल टाकाल तर तुम्हाला मदत करणारे हातही पुढे येतील. सरकार पुष्कळ चांगल्या योजना आखेल त्यांचा लाभ घेण्यासाठी शेवटी तरूणांनीच पुढे यायचे आहे. जर ते आले नाहीत तर बेकारीच्या समस्येचा दोष सरकारला देता येणार नाही. जर तरूणानी अर्ज करूनही त्यांना कर्ज मिळाले नाही ंिकवा सरकारी अनुदान मिळाले नाही तर काही करता येईल. पण जर पुढाकारच घेतला नाही तर बेकारीविरुद्ध- तक्रार करण्यात काहीच हशील नाही.

उद्यमन ही सिध्यंति कार्याणि च मनोरथा ः ।

न हि सुप्तस्य ंिसहस्य मुखे प्रविशन्ति  मृगा ः ॥

समस्या बेकारीची असो वा अन्य कोणतीही असो, ती शहरी भागातील असो वा ग्रामीण भागातील जेव्हा आपण कोणत्याही समस्येसाठी सरकारला, देशाला दोष देतो तेव्हा चार बोटे आपल्यावरही रोखलेली असतात.

उद्ध-रेदात्मनाआत्मानं नात्मानंवसादयेत् ।

आत्मैहि आत्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनाः ॥

या न्यायाने स्वतःचा उद्ध-ार आपणच करून घ्यायला हवा. आपणच आपले सर्वात चांगले मित्र असतो ंिकवा सर्वात वाईट शत्रूही असतो. बेकारीच्या समस्येवरचा खरा उपाय आत्मप्रेरणा, सरकारी योजनांचा लाभ घेणे, त्यांच्या अंमलबजावणीतले अडथळे धीराने, चिकाटीने पार करणे, विधायक कामाचे डोंगर उभे करणे  हा आहे. प्रयत्नशील माणूस परिस्थिती बदलू शकतो. ती बदलताना त्याला कुणाला दोष देण्यासाठी , चर्चा करण्यासाठी वेळच मिळत नाही.  प्रत्येकाने आहे त्या परिस्थितीत आपल्या पुरता रोजगार शोधला, अंगकष्टाचे काम करायची तयारी ठेवली तर देशात एकही बेरोजगार राहणार नाही.

Related posts

Leave a Comment