– प्रशांत असलेकर
उच्च शिक्षण घेतलेला तरूण समाजाची कोणतीही गरज भागवायला सक्षम नसतो. त्याचप्रमाणे बरेचदा असे दिसून येते की एखाद्या क्षेत्रातले पूर्ण शिक्षण घेतलेला तरूण त्या क्षेत्रातल्या व्यवहारी ज्ञानापासून अनभिज्ञ असतो. त्यामुळे त्याने घेतलेले शिक्षण आणि त्या क्षेत्रात झालेले बदल यांच्यात मोठी तफावत पडते. पाठ्यपुस्तकीय ज्ञान व्यवहारी पातळीवर निरुपयोगी शाबित होते. केवळ ग्रामीणच नव्हे तर शहरी बेकारी वाढण्यासाठीही हे एक मोठे कारण आहे.
भारतातील शिक्षण व्यवस्था पाठ्यपुस्तकीय ज्ञानावर जास्त भर देते. तिच्यात
रोजगारविषयक शिक्षणाचा अभाव आहे. छोटे व्यवसाय उदा. सुतारकाम,
वेल्डींग, टर्नरकाम, गवंडीकाम-मिसनरीवर्क, कपडे शिलाई, वायरमन,
प्लंबर, घरगुती उपकरणांची दुरूस्ती, सायकल-दुचाकी दुरूस्ती, संगणकज्ञान
यांचे शिक्षण आठव्या इयत्तेपासूनच शाळेबरोबरच दिले गेले पाहिजे.
छोटे व्यवसाय उदा. सुतारकाम, वेल्डींग, टर्नरकाम, गवंडीकाम-मिसनरीवर्क, कपडे शिलाई, वायरमन, प्लंबर, घरगुती उपकरणांची दुरूस्ती, सायकल-दुचाकी दुरूस्ती, संगणकज्ञान यांचे शिक्षण आठव्या इयत्तेपासूनच शाळेबरोबरच दिले गेले पाहिजे.
ग्रामीण बेकारीमागची कारणे आपण समजू शकतो.
यामागची काही मुख्य कारणे अशी आहेत –
१) शेती हा मुख्य व्यवसाय – भारतात शहरीकरण जरी वाढत असले तरी आजही भारत हा खेड्यांचाच देश आहे. भारतात १ लाख ३८ हजार खेडी १५हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेली आहेत. भारतातील बहुसंख्य जनता खेड्यात राहते. प्रदेश कोणताही असो या बहुसंख्य ग्रामीण जनतेच्या उपजीविकेचे साधन शेती हेच आहे. शेती ही हंगामी असते. जेव्हा हंगाम असतो तेव्हा इतके काम असते की घरातले सर्व लोक अपुरे पडतात. पण हंगाम सरला की कोणाच्याच हाताला काहीच काम उरत नाही. शेतीच्या हंगामानुसार वर्षातले आठ ंिकवा चार महिने भारतातील शेतकऱ्यांवर बेकारीची वेळ येते.
२) शेतीला पूरक असे व्यवसाय विकसित न होणे. – शेतीवर आधारित असे काही व्यवसाय असतात. उदा. पशुपालन, दुग्धोत्पादन, फळप्रक्रिया उद्योग वगैरे. बहुधा शेतीचा हंगाम संपला की पूरक उद्योगांचा काळ सुरू होतो. भारतात ते पुरेशा प्रमाणात विकसित झालेले नाहीत. त्यामुळे वर्षातला बराचसा काळ भारतीय शेतकरी बेरोजगारच राहतो.
३) शेती निसर्गावर अवलंबून असणे – ंिसचन व्यवस्था व्यवस्थित विकसित झालेली नसल्याने भारतातील शेती ही अजूनही मोठ्या प्रमाणावर निसर्गाच्या लहरीवर अवलंबून आहे. त्यामुळे भारतीय शेतकरी जास्तीत जास्त दोन पिके घेऊ शकतो. पंजाब व गंगा-यमुनेच्या खोऱ्यांचा प्रदेश सोडला तर सर्वत्र वर्षातले चार महिने असे असतात की त्या काळात शेतीतून कोणतेही उत्पन्न घेता येत नाही. शेतकऱ्यांना पावसाची वाट बघत नुसते बसून राहावे लागते.
४) शेतीची साधने व तंत्र मागासलेले – भारतात शेतीचे क्षेत्रफळ मोठे आहे पण त्यातून निघणारे धान्याचे उत्पादन तेवढ्याच क्षेत्रफळाच्या शेतीतून इतर देशांत निघणाऱ्या उत्पादनापेक्षा खूप कमी आहे. याचे कारण भारतात बहुतेक शेती ही पारंपरिक पद्ध-तीने केली जाते. तिच्या लागवडीचे, ंिसचनाचे, रोगनिवारणाचे तंत्र कालबाह्य आहे. अलीकडे काही प्रमाणात भारतीय शेतकरी आधुनिक शेतीतंत्राकडे वळला आहे. पण तरी अजून बराच पल्ला गाठायचा बाकी आहे. उत्पन्न अपुरे असल्याने तिच्यावर अवलंबून असलेल्या लोकांना योग्य परतावा मिळत नाही. ही शेती मोठ्या लोकसंख्येला किफायतशीर रोजगार पुरवायला असमर्थ ठरते. भारतात लोकसंख्या जास्त असल्याने येथील शेतीतंत्र मानवी श्रमांचा जास्त उपयोग करणारे आहे. याच्या उलट अमेरिकेत गहू , मका, बार्ली या पिकांची शेती अत्याधुनिक तंत्राने केली जाते. त्यात मानवी श्रमांचा कमीत कमी वापर केला जातो. त्यामुळे ती शेतकऱ्यांना नफा देणारी ठरते तर भारतात शेती जेमतेम उत्पन्न देणारी ठरते वा निसर्गाची एखादी अवकृपा झाली तर तो आतबट्ट्याचा व्यवहार ठरतो.
५) छोटी शेते, शेतीचे तुकडे – भारतात लोकसंख्येची प्रमाणाबाहेर वाढ झाल्याने शेतीचे अगणित तुकडे झाले आहेत. पिढ्यान्पिढ्या शेतीचे एकक कमी कमीच होत जाते. बांध आणि सीमारेषा यांमुळे प्रत्यक्ष कसण्याजोग्या शेतीच्या क्षेत्रफळात घट होते. एकूण देशाचा विचार केला तर हजारो हेक्टर शेतजमीन बांधांच्या खाली आहे. तिचा वापर होत नाही. शेतजमिनीचे छोटे तुकडे झाल्याने तिच्या व्यवहार्यतेचा व कार्यक्षमतेचा प्रश्न उभा राहतो. यापुढची गोष्ट अशी की एका शेतकऱ्याच्या मालकीची जमीन एकाच जागी असते असे नव्हे. काही वेळा एका शेतकऱ्याची शेती दोन गावांमध्ये तुकड्या तुकड्याच्या स्वरूपात पसरलेली असते. ती सलग नसते. त्यावर शेतकरी आपले लक्ष केंद्रित करू शकत नाही. आधुनिक साधने वापरण्यासाठी शेती काही किमान आकाराची असावी लागते. ट्रॅक्टर, ठिबक ंिसचन, मल्चिंग पेपर या तंत्रांचा वापर करायचा तर शेतीचे क्षेत्र सलग आणि विनाखंड असावे लागते. भारतातील शेतजमीन विस्कळित असल्याने तिच्यात बरीच आधुनिक साधने उदा. ट्रॅक्टर, ऊसतोडणी, धान्यकापणी मशिन वगैरे वापरता येत नाहीत. त्यामुळे जे उत्पादन येते ते त्यात काम करणाऱ्यांना नफा मिळवून देण्याइतके नसते.
६) शिक्षण पद्ध-तीतले दोष – हा केवळ ग्रामीणच नव्हे तर भारतातील एकूणच बेकारीचे प्रमाण वाढवणारा घटक आहे. शेती असो वा उद्योग, शहरी भाग असो वा ग्रामीण शिक्षण व्यवस्था त्यातील नागरिकांचा सहभाग निश्चित करत असते. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीच्या अंगी काही समाजोपयोगी कला, कौशल्य, उपयोगिता निर्माण व्हावी असे अभिप्रेत आहे. हे कौशल्यच ती व्यक्ती उपजिविकेसाठी वापरते. त्यातून ती आपले जीवन घडवते. त्याला आकार देते. ते संपन्न करते. त्याद्वारेच राष्ट्रीय उत्पन्नाला योगदान देते. भारतात ज्या प्रकारचे शिक्षण शालेय पातळीवर दिले जाते त्याचा जीवनाशी काही संबंध नसतो. शिक्षण पाठ्यपुस्तकीय स्वरूपाचे दिले जाते. ते रोजगाराभिमुख नसते. सुशिक्षित तरूण जेव्हा पदवीचे शिक्षण घेऊन बाहेर पडतात तेव्हा ते समाजाची कोणतीही गरज भागवण्यास समर्थ नसतात. त्याचा परिणाम म्हणजे त्यांना बेकारीला तोंड द्यावे लागते. शिक्षण हे व्यवसायाभिमुख असले पाहिजे. जेव्हा एक तरूण त्याचे विहित शिक्षण घेऊन शालेय वातावरणाच्या बाहेर पडतो आणि समाजात आपले नवे अस्तित्व निर्माण करू पाहतो तेव्हा त्याच्या अंगात समाजाची एखादी गरज भागेल अशे कौशल्य असले पाहिजे. भारतातील शिक्षण व्यवस्था पाठ्यपुस्तकीय ज्ञानावर जास्त भर देते. तिच्यात रोजगारविषयक शिक्षणाचा अभाव आहे. छोटे व्यवसाय उदा. सुतारकाम, वेल्डींग, टर्नरकाम, गवंडीकाम-मिसनरीवर्क, कपडे शिलाई, वायरमन, प्लंबर, घरगुती उपकरणांची दुरूस्ती, सायकल-दुचाकी दुरूस्ती, संगणकज्ञान यांचे शिक्षण आठव्या इयत्तेपासूनच शाळेबरोबरच दिले गेले पाहिजे.
उच्च शिक्षण घेतलेला तरूण समाजाची कोणतीही गरज भागवायला सक्षम नसतो. त्याचप्रमाणे बरेचदा असे दिसून येते की एखाद्या क्षेत्रातले पूर्ण शिक्षण घेतलेला तरूण त्या क्षेत्रातल्या व्यवहारी ज्ञानापासून अनभिज्ञ असतो. त्यामुळे त्याने घेतलेले शिक्षण आणि त्या क्षेत्रात झालेले बदल यांच्यात मोठी तफावत पडते. पाठ्यपुस्तकीय ज्ञान व्यवहारी पातळीवर निरुपयोगी शाबित होते. केवळ ग्रामीणच नव्हे तर शहरी बेकारी वाढण्यासाठीही हे एक मोठे कारण आहे.
७) सुशिक्षित वर्गाचा अंगकष्टाच्या कामांना नकार – उच्च शिक्षण घेतलेल्या वर्गाची अपेक्षा असते की त्याला पांढरपेशा काम मिळावे. शारीरिक कष्टाचे काम करणे तो आपल्या पातळीच्या खालचे समजतो. त्यामुळे काही वेळा कामे असूनही ती करायला ग्रामीण सुशिक्षित तरूण तयार नसतात. त्यामुळे काही कामे उपलब्ध असूनही तरूण बेकार आहेत असे चित्र निर्माण होते.
८) औद्योगिकीकरणाची धिमी गती – ज्या प्रमाणात शिक्षणाचा प्रसार होत आहे ंिकवा ज्या प्रमाणात लोकसंख्येची वाढ होत आहे त्या प्रमाणात देशातील औद्योगिकीकरण वाढलेले नाही. याचे परिणाम शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांत दिसून येत आहेत. शिक्षणाचा अधिकार, सर्वशिक्षा अभियान, दुपारचे जेवण यांच्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शिक्षण प्रसार झाला परंतु ते शिक्षण घेऊन सुशिक्षित झालेल्या तरूणांच्या हातांना रोजगार पुरवू शकेल इतक्या वेगाने भारताचे औद्योगिकीकरण झालेले नाही. लोकसंख्या वाढ इतक्या प्रमाणात होत आहे की औद्योगिकीकरणाचा वेग तिच्यापुढे हतबल ठरला आहे. एक नोकरी एकदाच उपलब्ध होते व ती घेणारा ती दीर्घकाळ करतो. त्यामागून येणाऱ्याला नोकरी पाहिजे असेल तर दुसरी संधी उपलब्ध करून द्यायला हवी. ती तेवढ्या सहजतेने उपलब्ध होत नाही. त्यामुळे ५०-६० वर्षांपूर्वीच्या तुलनेत औद्योगिकीकरण वाढलेले असूनही बेकारीचे प्रमाण कमी झालेले दिसत नाही. दरवर्षी मोठ्या संख्येने सुशिक्षित तरूण़ रोजगाराच्या बाजारात दाखल होत आहेत. औद्योगिकीकरणाचा वेग शिक्षण प्रसाराच्या वेगापेक्षा कमी आहे. त्यामुळे बेकारीची समस्या वाढते व अधिकाधिक क्लिष्ट होत जात आहे. हे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील बेकारीच्या बाबतीत लागू आहे.
ग्रामीण भागात या समस्येचे गांभीर्य अधिकच वाढते कारण तिथे औद्योगिकीकरणासाठी अनुकूल वातावरण नसते. रस्ते, विद्युतपुरवठा, संचारसाधने या ज्या किमान गोष्टी उद्योगांसाठी लागतात त्या ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात नसतात. त्यामुळे तिथे बेकारीची समस्या जास्त प्रमाणात भेडसावते. तेथील तरूणांना रोजगारासाठी शहरात येण्यावाचून काही पर्याय उरत नाही.
—————————————————————-
भारतातील ग्रामीण बेरोजगारीवरील उपाय
ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. ही परिस्थिती दूर करायची असेल तर खालील उपाय केले पाहिजेत
*लोकसंख्येला आवर घालणे *शेतीला पूरक व्यवसाय वाढविणे *स्कील डेव्हलपमेंट *क्लस्टर डेव्हलपमेंट स्वरूपाची उद्योग उभारणी *सरकारी कामे हाती घेणे *नद्या व खोरे विकास महामंडळे *कृषी पर्यटनाला प्रोत्साहन *शिक्षण पद्ध-तीत बदल *श्रमाला प्रतिष्ठा
१) लोकसंख्येला आवर घालणे
भारताची सगळी आर्थिक औद्योगिक प्रगती भयानक लोकसंख्यावाढीमुळे झाकोळून गेलेली आहे. बेकारीची समस्याही मुख्यतः या लोकसंख्यावाढीमुळेच उद्भवलेली आहे. पंचवार्षिक योजना, नियोजनबद्ध- विकास, सरकारी क्षेत्रातील मोठे उद्योग व सरकारी खाती यांच्याद्वारे देशाचे मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाले पण लोकसंख्येच्या वाढीपुढे ते तोकडे पडले आहे. शहरी असो वा ग्रामीण कोणत्याही क्षेत्रातल्या बेकारीला आवर घालायचा तर लोकसंख्यावाढीवर नियंत्रण ठेवले गेले पाहिजे.त्यासाठी समाजप्रबोधन घडवले पाहिजे. आणि संपर्काची सर्व साधने वापरली पाहिजेत.
२) शेतीला पूरक व्यवसाय वाढविणे –
शेती हा जरी मुख्य व्यवसाय असला तरी तो नेहमीच शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधरवायला अपुरा ठरतो. तेव्हा शेतीला पूरक असे व्यवसाय वाढण्यास उत्तेजन दिले पाहिजे. उदा. पशूपालन, दुग्धोत्पादन, स्थानिक वाहतूक वगैरे. त्यासाठी सरकारी आणि सामुदायिक सहकारी स्तरावर विशेष प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांनी वित्तपुरवठा केला पाहिजे. शेतकऱ्यांनी या व्यवसायांकडे मोहरा वळवला तर त्यांचे उत्पन्न वाढू शकेल. त्यामुळे बेकारीची समस्या इतकी भेडसावणार नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात तसेच गुजरातमध्ये दुग्धोत्पादन हा एक मोठा पूरक व्यवसाय आहे.
३) कुटीरोद्योगांचे पुनरुज्जीवन –
एके काळी भारतात अनेक प्रकारचे कुटीरोद्योग अस्तित्वात होते. भारतातील हातमागाच्या कापडाला जगभरात मागणी होती. काळाच्या ओघात अनेक कुटीरोद्योग नष्ट झालेले आहेत. हे कुटीरोद्योग म्हणजे भारतीय शेतकऱ्यांचे पूरक व्यवसायच होते. त्यांचे पुनरूज्जीवन केल्यास बेकारीच्या समस्येची मात्रा कमी होऊ शकेल.
३) स्कील डेव्हलपमेंट –
मूळात शिक्षण रोजगाराभिमुख नसल्याने बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. स्कील डेव्हलपमेंटच्या माध्यमातून काही कौशल्ये विकसित केल्यास तरूणांना रोजगार मिळणे सुलभ होईल. मोठ्या उद्योगांना विशिष्टरित्या प्रशिक्षित कामगार लागतात. त्यांना एकाच क्षेत्रात पूर्ण ज्ञान असलेले कामगार लागतात. जर तरूणांना कौशल्यविकास कार्यक्रमांतर्गत तसे प्रशिक्षण दिले तर मोठ्या कारखान्यांची गरजही भागेल आणि मोठ्या संख्येने रोजगार उपलब्ध होईल. जहाजबांधणी, समुद्रातून तेल काढणे, खाणकाम अशा अनेक उद्योगांत नेमके ज्ञान असलेले कुशल कामगार लागतात. त्या क्षेत्रांची माहिती तरूणांसाठी उपलब्ध करून दिली आणि त्याचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करून दिली तर बेकारीच्या समस्येची कडा कापली जाईल.
३) छोट्या उद्योगांना उत्तेजन –
छोट्या उद्योगांची कामगार सामावून घेण्याची क्षमता जास्त असते. त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी असतात. भारतात छोट्या उद्योगांना खूप मोठा वाव आहे. त्यांना वित्तपुरवठा करणाऱ्या अनेक संस्थाही आहेत. त्यांच्या माध्यमातून जर या उद्योगांना प्रोत्साहन दिले तर बेकारीला चाप बसेल. छोट्या उद्योगांना कमी व्याजदराने आणि जास्त मुदतीची कर्जे उपलब्ध करून दिली पाहिजेत. फळ प्रक्रिया, बेकरी, स्थानिक वाहतूक, कातडी कमावणे अशा स्वरूपाचे उद्योग कमी भांडवलात उभारले जाऊ शकतात. ते जागोजागी रोजगार उपलब्ध करून देऊ शकतात. त्यामुळे शहरांकडे येणारा बेरोजगारांचा लोंढा थांबू शकेल. बेकारीची समस्याही कमी होईल.
४) क्लस्टर डेव्हलपमेंट स्वरूपाची उद्योग उभारणी –
अनेक भौगोलिक स्थानांवर काही विशिष्ट प्रकारचे उद्योग एकवटलेले असतात. ते तिथल्या भौगोलिक परिस्थितीला अनुरूप असतात. उदा. महाराष्ट्रात कोकणात काजू प्रक्रिया, फळ प्रक्रिया उद्योग आहे. काही ठिकाणी हातमाग उद्योग एकवटलेला आहे. अशा प्रकारच्या उद्योगांना उत्तेजन दिल्यास तिथे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊ शकतो. सरकारने अशा एका जागी एकवटलेल्या उद्योगांना सामूहिक उत्तेजन देणाऱ्या उपाययोजना हाती घेतल्या पाहिजेत.
५) सरकारी कामे हाती घेणे –
कोणत्याही देशाच्या बेकारीच्या समस्येवरील उपाय हा सरकारने पुढाकार घेऊन काही कामे हाती घेणे हाच असतो. १९४० साली अमेरिकेत मंदी आली तेव्हा तेथील सरकारने हीच उपाययोजना केली होती. धरणे बांधणे, रस्ते बांधणे, डांबरीकरण, तलाव खोदणे, तलावांतील गाळ काढणे अशा स्वरूपाची कामे सरकारने हाती घेतली तर त्यांमुळे जनतेच्या हातांना काम मिळते. बेकारीची झळ कमी होते. सरकारद्वारे मजुरीच्या रुपात दिला गेलेला पैसा पुन्हा जीवनावश्यक गोष्टींच्या मागणीद्वारे चलनात येतो आणि एकूण मागणी वाढते. त्याद्वारे परत उद्योगांना चालना मिळते.
६) नद्या व खोरे विकास महामंडळे –
भारत सरकारने अनेक नद्या आणि त्यांच्या खोऱ्यांच्या विकासासाठी महामंडळे स्थापन केली आहेत. त्यांच्या माध्यमातून त्या त्या क्षेत्रांचा विकास केला जातो. ही महामंडळे त्या क्षेत्रातील एकंदरीत रोजगारवाढीसाठी प्रयत्न करतात. त्यामुळे त्या क्षेत्राचा विकास होतो. त्यामुळे मुख्यतः ग्रामीण बेकारी घटते.
७) कृषी पर्यटनाला प्रोत्साहन –
पर्यटन ही संकल्पना जुनीच आहे. तिचे नवे रूप कृषी पर्यटन या नावाने उदयाला आले आहे. शहरातील लोकांनी ग्रामीण जीवनाचा आनंद घेण्यासाठी खेड्यांमध्ये जायचे आणि शेतकऱ्यांनी त्यांचा सशुल्क पाहुणचार करायचा अशी कृषीपर्यटनामागची संकल्पना आहे. शहरात पैसा जास्त असतो पण शांतता, निसर्गसौंदर्य नसते. ग्रामीण भागात ते असते पण तिथे पैसा नसतो. कृषीपर्यटनाद्वारे या दोन्हींची सांगड घातली जाते. ग्रामीण भागातील बेकारीची समस्या सोडवण्यासाठी कृषीपर्यटन हा एक रामबाण उपाय आहे. पर्यटन हा व्यवसाय अलीकडे चांगला फोफावला आहे. पण त्यात काही ठरावीक पर्यटनस्थळांचा समावेश असतो. कृषीपर्यटन हे कुठेही घडू शकते. कल्पक शेतकरी यजमान आपल्या शेतीवाडीला पर्यटकांना आकर्षित करू शकेल असे विकसित करू शकतो. तसेच शेतीच्या माध्यमातून लहान मुलांना निसर्गसान्निध्याचे आणि सृष्टीचक्राचे धडे दिले जाऊ शकतात. पुण्यातील अलका टॉकीजचे मालक श्री. अनिल दामले यांची खामगाव तळ्याजवऴ शेती आहे. तिथे त्यांची द्राक्षांची बाग आहे. पुण्यातील अनेक शाळा तिथे आपल्या मुलांना निसर्गसहवासासाठी नेतात. त्यातून मुलांना भुईमुग झाडाला कुठे लागतात, कापूस कुठे पिकतो अशा साध्या गोष्टी समजतात. तसेच मोठ्या माणसांसाठीही मासेमारी, बैलगाडी चालवणे असा ग्रामीण जीवनाचा अनुभव घेऊ शकतात. कृषीपर्यटनाच्या निमित्ताने स्थानिक वाहतूक, पशूपालन, स्थानिक कलाकुसरीच्या गोष्टी वगैरेंनाही चालना मिळते. एकूण कृषीपर्यटन हा ग्रामीण बेरोजगारीवरील एक उत्तम उपाय आहे. त्याची जाणीव शहरांत वाढवली पाहिजे.
८) शिक्षण पद्ध-तीत बदल –
बेकारीच्या समस्येवरील खात्रीशीर हमखास उपाय म्हणजे शिक्षण पद्ध-तीत आमूलाग्र बदल. शिक्षण रोजगाराभिमुख केले पाहिजे. शालेय शिक्षणात व्यावसायिक कोर्सेसचा समावेश असला पाहिजे. छोट्या छोट्या कला उदा. केस कापणे, कपडे शिवणे, इलेक्ट्रिक काम, सुतारकाम या माणसाला स्वयंपूर्ण बनवू शकतात. त्यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केला पाहिजे. शिक्षणाचा अर्धा भाग अभ्यासाचा व अर्धा भाग प्रात्यक्षिकांचा असला पहिाजे. किमान शिक्षण घेऊन जो बाहेर पडतो त्याच्या अंगात काही किमान कौशल्ये असली पाहिजेत. जेणेकरून तो समाजाची काही गरज भागवू शकेल आणि त्याला किमान स्वाभिमानाने जगण्यापुरता रोजगार मिळू शकेल.
९) श्रमाला प्रतिष्ठा –
शिक्षण म्हणजे पाढंरपेशे काम असा गैरसमज झाला आहे. सुशिक्षित लोक शारीरिक अंगकष्टाच्या कामांना तयार नसतात. त्यामुळे जे काम उपलब्ध आहे ते करायचे ते टाळतात. अर्थव्यवस्थेत सगळ्यांनाच ऑफिसस्टाफचे जॉब मिळणे शक्य नाही. त्यामुळे तरूणांनी शारीरिक अंगकष्टांच्या कामाबद्द्लची घृणा सोडून दिली पाहिजे. सर्व प्रकारच्या कामांना समान प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. व्हाईट कॉलर जॉब म्हणजे प्रतिष्ठा आणि कष्टाची कामे म्हणजे कमीपणा हे समीकरण समाजमनातून नाहीसे झाले पाहिजे.
