२३ जानेवारी, हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. याच दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यावर्षीपासून हा दिवस ‘देशभक्ती दिन’ म्हणून साजरा केला जातोय. या दिनाचे औचित्य साधून आम्ही ‘महानगरी वार्ताहर’चा ‘देशभक्ती विशेषांक’ आपल्या हाती देत आहोत. यात ज्ञात-अज्ञात अशा अनेक देशभक्त क्रांतिकारकांची प्रेरक अशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच चित्रपटातील ‘देशभक्ती गीते’ हा स्वातंत्र्यकाळापासूनच्या चित्रपटांपासून १९९०-९५ पर्यंतच्या चित्रपटातील देशभक्तीपर गाण्यांचा अभ्यासपूर्ण असा आढावा घेणारा लेख, ‘चीन-भारत युद्ध-ां’ची वास्तवता दर्शविणारा लेख, ‘बेगडी देशभक्त’ हा देशभक्तीच्या बदललेल्या आयामांचे वास्तव विशद करणारा लेख, नेताजी सुभाषचंद्रांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी घेतलेले अपार कष्ट, त्यांना मिळालेली वागणूक यावर प्रकाश टाकणारा लेख, असे साहित्य समाविष्ट करण्यात आले आहे. आपणांस हा अंक आवडेल अशी अपेक्षा करतो. प्रतिक्रियांचे स्वागत आहे.
आज मा. बाळासाहेब आपल्यात नाहीत. पण त्यांच्या आठवणी तमाम हिंदुत्ववादी जनतेच्या मनातून कधीच पुसल्या जाणार नाहीत. कारण-बाळासाहेबांचे बोलणे तुकोबांच्या भंडारा डोंगरावरच्या काटेरी झुडपांसारखे झोंबणारे, कडकडीत उन्हात भाजून काढणारे आहे. ही भाषा काहींना शिवीगाळ, शिवराळ, असभ्य, डोक्यावरून पदर घ्यायला लावणारी वाटायची. पण बाळासाहेबांच्या डोळ्यांना भ्रष्ट, नादान, लंपट जीवनव्यवहार दिसत राहायचा. सत्यशोधक समाजाच्या सत्तापिपासू टोळ्या झालेल्या त्यांना दिसत होत्या. कामगारांचे शोषण, शेतकऱ्यांची नागवणूक, परप्रांतीयांची लोचट-हावरट घुसखोरी, मराठी माणसांची भांडी घासणी, लुगडी धुणी हे सारे लबाड, दरोडेखोरीचे उद्योगधंदे, सत्ताधीशांनी भ्रष्टांना पाठीशी घालणे, सामान्य माणसाने घाबरून सरपटत जमीन चाटणे हे सगळे बघितल्यावर बाळासाहेबांनी शिव्या घालायच्या नाहीत तर काय फुले वाहायची?
बाळासाहेब लहानपणीचे बाळ होते, तेव्हाही त्या बाळाला राजा नागवा आहे हे दिसत होते. मग मोठे झालेले बाळासाहेब ‘राजा नागवा आहे’ हे सांगायला घाबरणारा मिडास राजाचा न्हावी होणार काय? पोपट मेला हे लख्ख खरं, पण ते सांगणार, उगाच चोच वासली आहे, उताणा पडलाय, पाय वरती केलेत, खाली जमिन ओली आहे, असे करीत ते सांगणारच नाहीत. ते निव्वळ सुधारक नेते नव्हते तर प्रक्षोभक नेते होते, बेडर नेते होते. एकसंघ राष्ट्रीय जीवनाचे आणि मराठी जगण्याचे वाटोळे करणारे भ्रष्ट राज्यकर्ते, आचरट विचारवंत यांना बाळासाहेबांनी भर सभेत खेचले, त्यांच्यावर कडाडून टीका केली. रुद्रावतार धारण केला. गरीबाला निदान झोपडी हवी, दोन घास हवेत, बायकोला अब्रू रक्षणार्थ निदान दोन साड्या हव्यात ही आर्त हाक बाळासाहेबांच्या काळजाचे पाणी करून गेली. या जगण्यावर पाणावलेला डोळा जडला. मग
महाराष्ट्राच्या अवघ्या जगण्याची भक्ती बाळासाहेबांवर का जडणार नाही?
बाळासाहेबांसारखा हिंदुत्वप्रचारक आजवर झाला नाही. त्यांच्या हिंदुत्व प्रचारावर रान पेटवण्याचे कुणाला फारसे जमले नाही. आवश्यकही वाटले नाही. एकही जातवादी संघटना बाळासाहेबांची वैरीण बनली नाही. कारण बाळासाहेबांची हिंदुत्व संरक्षणाची हाक, हेतू, गाभा त्यांना बराचसा उमगलाय. हिंदुत्व ही जगण्याची बाब आहे. प्रवचन, भाषणबाजी, चमनगोटा, जानवे मिरवण्याची वा देऊळवाल्यांच्या तुंबड्या भरण्याची मखलाशी नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कीर्तिविधान बाळासाहेबांनी मनात पक्के धरले असावे. आम्हाला हिंदू समाजात, हिंदूंच्या समवेतच रहायचे आहे. पण सन्मानाने, गुलाम म्हणून नाही. हिंदू समाजात सर्वांना सारख्याच दर्जाने, प्रतिष्ठेने, सन्मानाने आणि उपजत अतिशहाणपणा न दाखवता राहायचे, असे बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या आग्रहाचे सूत्र आहे.
